५ अतूट प्रेम(भाग २) (अंतिम)
आमोद
त्या दिवशी सकाळी मी तिच्या फोनची नेहमी प्रमाणे वाट पाहात होतो .तिचा फोन आला नाही .मी तिला फोन केला .फोन स्वीच ऑफ होता .मला काहीच कळेना .मला कॉलेजला जायचे असल्यामुळे मी जास्त विचार करीत न बसता कॉलेजला गेलो.संध्याकाळी खोलीवर आल्यावर पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला .फोन स्विच ऑफ येत होता .मी माझ्या आई वडिलांना फोन केला .ते त्यावेळी सिंगापूरच्या ट्रिपला गेलेले होते.त्यांच्याशी बोलणे झाले परंतु त्यांना काहीच माहित नव्हते .मी सुलभाच्या आई वडिलांना फोन केला .त्यांनी फोन उचलला परंतु वडिलांना नीट बोलता येत नव्हते.त्यांनी सुलभा आजारी आहे काळजी करू नका ती बरी झाल्यावर फोन करील असे सांगितले .मी रोज फोन करीत होतो .सुलभा अजून आजारी आहे त्यामुळे तिला फोन करता येत नाही असे ते सांगत होते .मला नक्की काय झाले आहे ते कळत नव्हते .तसेच भारतात निघून यावे असे मला एकदा वाटले .परंतु शिक्षण सोडून तसे येणे योग्य वाटले नाही .
मी वडिलांना फोन केला .तेही नीट बोलत नव्हते .त्यानी तू सुलभाला विसर एवढेच मला सांगितले .
आईला विचारल्यावर तिने सुलभाचे लग्न दुसरीकडे ठरले आहे .त्यामुळे आता तिला विसर असे सांगितले.
सुलभा
शुद्धीवर आल्यावर मी पुन्हा पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करीत होते.आणि मला बोलता येत नव्हते .आतून खूप काही आई वडिलांजवळ बोलावे असे वाटत होते परंतु बाहेर मात्र एक शब्दही उमटत नव्हता.आई वडील माझ्या जवळ काहीतरी बोलत होते हे त्यांच्या तोंडाच्या हालचालीवरून कळत होते .परंतु शब्द मला ऐकू येत नव्हते .अपघातात ऐकण्याच्या व बोलण्याच्या दोन्ही केंद्रांना धक्का पोचला होता त्यामुळे यापुढे आयुष्यात मला ऐकू येणार नव्हते किंवा बोलता येणार नव्हते.मुका व बहिरा असल्यासारखी माझी स्थिती झाली होती .माझा फोन वाजत असावा .त्यावर आमोदचे नाव झळकत होते.मला त्याला काहीच उत्तर देणे किंवा तो काय बोलत आहे ते ऐकणे शक्य नव्हते.मला रडू कोसळले .उशीमध्ये तोंड खुपसून मी किती वेळ तरी हमसून हमसून रडत होते. मला त्याला सर्व सत्य परिस्थितीचा मेसेज करणे सहज शक्य होते परंतु तो करावा असे मला आतून वाटत नव्हते.मला अॅक्सिडेंट झाला हे ऐकून तो पूर्ण कोलमडून गेला असता. लगेच शिक्षण सोडून इकडे धावत आला असता .
अशा परिस्थितीत लग्न करून त्याला संकटात टाकणे मला योग्य वाटेना.त्याला तू आता मला विसरून जा असे सांगून त्याने ऐकले नसते .मी बाबांना आईला, त्याला पत्र लिहिणार आहे असे सांगितले.त्यात माझे लग्न ठरले आहे. तू मला विसरून जा.आपले केवळ शारीरिक आकर्षण होते .तुझ्याशी माझे लग्न ठरले तो पोरखेळ होता.पूर्ण विचारांती, आपल्या दोघांमध्ये असलेला आर्थिक फरक लक्षात घेता ,आपले लग्न यशस्वी झाले नसते असे मला प्रामाणिकपणे वाटते . मला माझा खरा जीवनसाथी सापडला आहे .त्याच्यावर मनापासून मी प्रेम करीत आहे .मी त्याच्याशी लग्न करीत आहे .सोबत पत्रिका पाठविली आहे . अशा आशयाचा मजकूर लिहून दाखविला .एक खोटी पत्रिका तयार करून ती छापून घ्यावी व त्याला पत्रासोबत पाठवावी असे सांगितले . त्यांना माझा निर्णय विशेष पटत नव्हता असे दिसले.तरीही माझ्यावरील प्रेमापोटी त्यांनी माझे म्हणणे ऐकले असे मला वाटले .
आई बाबांना असे वाटत होते की त्याला सत्य परिस्थिती व्यवस्थित कळवावी.सत्य त्यांच्यापासून लपवून ठेऊ नये .नंतर तो जो निर्णय घेईल तो मान्य करावा .
त्याचे माझ्यावरील नितांत प्रेम लक्षात घेता त्याने मला आहे अशा स्थितीतच आनंदाने स्वीकारले असते हे मला माहित होते.पुढील त्याचे सर्वच जीवन कष्टमय गेले असते असे मला भावुकपणे वाटत होते .तेव्हा त्याच्यावरील प्रेमापोटी त्याच्या हिताच्या दृष्टीने त्याला वरील प्रमाणे खोटे लिहून एक खोटी पत्रिका पाठवून द्यावी असे मी निश्चित केले .वडिलांचे म्हणणे त्याचे हित कशात आहे ते त्याचे त्याला ठरवू दे असे होते.माझा हट्ट पाहून शेवटी ते तयार झाले .
आमोद
मी काळजीत असताना एक दिवस माझ्यावर लेटर बॉम्ब येऊन कोसळला .त्यात सुलभाची लग्नपत्रिका होती .सोबत तिचे पत्र होते .समोर पत्र पत्रिका दिसत होती . अंत:करणाला त्यातील काहीच पटत नव्हते.माझ्या बाबांना फोन लावल्यावर तेही त्याप्रमाणेच सांगत होते .लग्ना अगोदरच ती धोकेबाज निघाली हे आपल्याला कळले हे बरे झाले .तू एका मोठ्या संकटातून सुटला असे त्यांचे म्हणणे होते .सुलभाच्या बाबांना फोन केला असता त्यांनीही पत्र व पत्रिका खरी आहे असे जड आवाजात सांगितले .तुम्ही तिला फोन करण्याचा प्रयत्नही करू नका असे आवर्जून सांगितले .मला एकदा तिच्याशी बोलायचे आहे असा माझा आग्रह होता .परंतु माझे तिच्याशी बोलणे होऊ शकले नाही .
तिचे व माझे बाबा माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत असा माझा ठाम ग्रह झाला.नक्की गडबड काय आहे ते इथे अमेरिकेत बसून कळण्यासारखे नव्हते.शिक्षण गेले उडत असे म्हणून ताबडतोब फ्लाइट पकडून भारतात यावे असे मला वाटत होते .एवढ्यात मला माझ्या जिवलग मित्राची आठवण झाली.तो हल्ली मुंबईमध्ये राहत नव्हता .नोकरीनिमित्त त्याचे पुण्यात वास्तव्य होते .त्याला मी सर्व हकीगत फोनवर सांगितली .तू मुद्दाम चार आठ दिवस रजा काढ.मुंबईला जा सर्व हकीगत स्वतः पाहा आणि मला कळव असे सांगितले .त्याच्यावर मी सर्व सोपवून निश्चिंत झालो.आता मला सत्य काय ते कळणार होते.
सुलभा
पत्र व पत्रिका पाठवून मी निश्चित झाले.तो फ्लाइट पकडून इथे सत्य परिस्थिती बघण्यासाठी येईल अशी एक मला भीती वाटत होती परंतु ती खोटी ठरली .मुकी बहिरी मुलगी सून म्हणून स्वीकारणे त्याच्या आई वडिलांनाही जड जाणार होते .मीच असा निर्णय घेतल्यामुळे सुंठीवाचून खोकला गेला अशी त्यांची भावना झाली असावी .
मला आता माझ्या जीवनाकडे पाहायचे होते .खुणांची भाषा शिकण्यास मी सुरुवात केली .थोडय़ाच महिन्यांमध्ये मी त्यात पारंगत झाले.आई वडिलांशी त्याचप्रमाणे ही भाषा जाणणाऱ्याशी मी आता चांगल्याप्रकारे कम्युनिकेट करू शकत होते .संगणकावर मला काम करता येत असल्यामुळे माझी नोकरी व्यवस्थित चालू होती .मी वाचू शकत होते .काम करू शकत होते.फक्त मला बोलता येत नव्हते व ऐकू येत नव्हते .ज्याच्या मोटारसायकलमुळे मला अपघात झाला होता त्याला उगीचच दोषी असल्यासारखे वाटत होते.हॉस्पिटलमध्ये असताना व नंतरही तो मला सतत भेटण्यासाठी येत होता .मी त्याला आवडते. त्याचा माझ्याशी लग्न करण्याचा कल आहे हे मला कुठेतरी जाणवत होते.अपराधी भावनेने तो अशी इच्छा प्रगट करीत आहे .त्याला त्याने न केलेल्या चुकीचे प्रायश्चित्त घ्यायचे आहे असे मला वाटत होते .तरीही माझ्या आई वडिलांना मी त्याच्याशी लग्न करून सुखी व्हावे असे वाटत होते .तो आमच्या सारखाच मध्यम आर्थिक स्थितीतील होता.त्याने खुणांची भाषा चांगल्या प्रकारे शिकून घेतली होती.लॅपटॉपवर उत्तम प्रकारे टाइप करून तो आपले विचार माझ्यापर्यंत पोचवीत होता. मीही त्यांच्याशी त्याप्रकारेच संभाषण करीत होते .तो मला आवडत होता परंतु मित्र म्हणून आवडत होता .त्याच्याकडे त्या दृष्टीने पाहणे मला शक्यच नव्हते.
आनंद
त्या दिवशी मी मोटारसायकलवरून नेहमीप्रमाणे जात होतो .अकस्मात एक मुलगी माझ्या मोटरसायकल समोर आली .कितीही जोराने ब्रेक दाबला तरी तिला धक्का बसलाच .ती रस्त्यावर आपटून बेशुद्ध झाली .मी माझी मोटारसायकल रस्त्यावर सोडून तिला टॅक्सीतून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो .हॉस्पिटलमध्ये तिला अॅडमिट करून सर्व वैद्यकीय सुविधा सुरू झालेल्या पाहिल्या .तुम्ही कोण असे विचारता मी ती माझी बायको म्हणून सांगितले.
पिलियन सीटवर बसलेली असताना ती घसरून पडली व तिला लागले असे सांगितले .मला तिचे नावही माहीत नव्हते .जे मनात येईल ते एक तिचे नाव म्हणून सांगितले .मला तेवढ्यात तिच्या पर्सची आठवण झाली .त्यामध्ये तिच्या घरचा पत्ता मिळाला .थोड्याच वेळात तिचे आई वडील हॉस्पिटलमध्ये आले .त्यांना मी सर्व सत्य परिस्थिती सांगितली .तेही सज्जन निघाले.मला दोष न देता त्यांनी माझे आभार मानले .
ती शुद्धीवर येईपर्यंत मी रोज चकरा मारीत होतो .ती शुद्धीवर आल्यावर तिला ऐकू येत नाही बोलताही येत नाही हे लक्षात आले .मला प्रचंड गिल्टी कॉन्शस वाटत होते .ती पूर्ण बरी होऊन घरी गेल्यावर सुद्धा मी नियमितपणे तिच्याकडे जात होतो .तिच्यासाठी ही खुणांची भाषा शिकून घेतली .टाइप करून एकमेकांशी आम्ही बोलू शकत होतो .ती मला आवडली होती .तिने माझ्याशी लग्न केले असते तर मला आनंद झाला असता .मी तिला मित्र म्हणून आवडत होतो . मला जसा प्रतिसाद मिळावा असे वाटत होते तसा प्रतिसाद दुर्देवाने मिळत नव्हता .तिच्या आई बाबांची मूक संमती होती .त्यांनी तिचे ठरलेले लग्न साखरपुडा वगैरे सर्व हकीगत मला स्पष्टपणे सांगितली होती .त्यांना माझ्यापासून काहीही लपवून ठेवायचे नव्हते . एक ना एक दिवस ती तयार होईल अशी मला आशा होती .
सुलभा
आनंदच्या मनातील विचार स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते .तसा तो मलाही आवडत होता .जोपर्यंत आमोदचे लग्न होत नाही तोपर्यंत आपण कसलाही विचार करायचा नाही असे मी मनोमन ठरविले होते. व्यावहारिक विचार केला तर आई वडिलांच्या पाठीमागे लग्न केल्याशिवाय तसेच राहणे मला विशेषत:अशा मूक बधिर परिस्थितीत कठीण होते.
आमोद
माझ्या जिवलग मित्राने मुंबईला जाऊन चार आठ दिवस राहून सर्वांना भेटून सर्व सत्य परिस्थिती मला सविस्तर सांगितली .तिचे लग्न झालेले नाही . तिने खोटी पत्रिका तयार करून पाठविली . तिला जीवघेणा अपघात झाला .ती आता मूक बधिर अशा स्थितीत आहे .त्यामुळे तिला माझ्याशी लग्न करायचे नाही .माझ्या सुखासाठीच तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे .वगैरे सर्व हकिगत मला माझ्या मित्राने सांगितली .
हे सर्व ऐकून मला दुःख तर झालेच परंतु दुसऱ्या बाजूने समाधान व आनंद वाटत होता.आमचे परस्परांवर दृढ प्रेम आहे हे मला अंतकरणातून जाणवत होते ते खरे आहे असे सर्व हकीगत ऐकल्यावर लक्षात आले.ती माझ्या आयुष्यात नसताना मी सुखी कसा होईन? असे तिला वाटले तरी कसे ?माझ्या सुखासाठी हा सर्व तिने बनाव केला हे जरा अतिच झाले .मीही त्यावर एक गेम खेळायचा ठरविला .
सुलभा
अपघाताला एक वर्ष होऊन गेले होते .आमोद कडून किंवा त्यांच्या आई वडिलांकडून कोणताही संबंध ठेवला गेला नव्हता .एका बाजूने मला बरे वाटत होते तर दुसऱ्या बाजूने दुःख होत होते .आमोद भारतात आल्यावर मला एकदा तरी भेटायला निश्चित येईल असे मला आतून कुठेतरी वाटत होते .परंतु ते खोटे ठरले .
त्यानंतर एक दिवस तो स्वतः मला भेटण्यासाठी आला.मी खोटे मंगळसूत्र घालून त्याला भेटण्यासाठी हॉलमध्ये आले .तो माझ्याशी खुणांच्या भाषेमध्ये बोलू लागला .त्याने ही भाषा चांगल्या प्रकारे शिकून घेतलेली दिसत होती .त्याने त्याचे लग्न ठरले आहे म्हणून सांगितले .मी मला आनंद होत आहे असे खुणानी सांगितले .माझा अपघात माझा मूक बधिरपणा हे सर्व त्याला माहीत होते .तू लग्न केले आता मीही लग्न करीत आहे म्हणून त्याने सांगितले .माझ्या लग्नाला तुम्ही सर्वजण अवश्य या म्हणूनही त्याने सांगितले .तुम्ही सर्व आल्याशिवाय माझे लग्न होणार नाही असेही तो म्हणाला .माझे आईबाबा तिथेच शेजारी बसले होते .मी वरवर जरी आनंद होत आहे असे दाखवीत असले तरी मला आतून वेदना व क्लेश होत होते.तो सूक्ष्मपणे माझ्या चेहऱ्यावरील भाव पाहात आहे हे मला जाणवले .नंतर त्याने त्याची लग्नपत्रिका माझ्या हातात दिली .माझा हात थरथरत होता .डोळ्यात अश्रू जमा झाले होते .पत्रिका उघडून पाहणेही मला नको होते .त्याने पत्रिका तर उघडून पाहा असे सांगितले .
मी नाईलाजाने त्याच्या समाधानासाठी पत्रिका उघडून पाहिली .लग्नाची तारीख चार दिवसांनी होती.मंगल कार्यालयाचे नावही होते. खाली वधुवरांचे नाव वाचत असताना मी आश्चर्यचकित झाले .वर म्हणून आमोदचे नाव तर वधू म्हणून माझे नाव छापलेले होते .माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना .आमोद माझ्याकडे मिश्किलपणे पाहात होता .अग वेडे तू माझ्याशिवाय व मी तुझ्याशिवाय जगू शकू का असे त्याने खुणानी विचारले .
आई वडील तिथे आहेत हे मी विसरून गेले .उठून उभी राहून डबडबल्या डोळ्यांनी मी त्याला मिठी मारली .
( समाप्त )
१९/१/२०१९©प्रभाकर पटवर्धन