Get it on Google Play
Download on the App Store

एका ऊ ची गोष्ट


एक होती ऊ. ती गेली गंगेवर आंग धुवायला. पण तिथे तिचे पोट फुटले व त्यांतून रक्ताचा एकच ओघळ लागला. त्याने गंगेचे पाणी लाल होऊन गेले.

इतक्यांत तिकडून एक गाय गंगेवर पाणी प्यावयास आली. ती गंगेला म्हणाली,
'गंगे-गंगे, तुझें पाणी लाल कां बाई झाले?'

गंगेला पाणी लाल झाले म्हणून आधीच राग आला होता, तो गाईच्या प्रश्नाने अनावर झाला. गंगा म्हणाली,

ऊ किं पुटपुटो
गंगा लालो
गाईचे शिंग मोडो

त्याबरोबर गाईचे शिंग पुरतें मोडले ती बिचारी खिन्न होऊन एका वडाच्या झाडाखाली जाऊन बसली. ती शिंगमोडी गाय पाहून वडाला मोठा चमत्कार वाटला.

तो म्हणाला, ‘गाई, गाई, तुझें शिंग कशाने मोडले?'

तेव्हां गाय रागावुन सांगते,

ऊ कि पुटपुटो
गंगा लालो
गाईचे शिंग मोडो
वडाचे पान झडो

त्याबरोबर वडाची पाने सगळी गळून गेली. त्या वडावर रोज एक कावळा येऊन बसत असे. तो तितक्यांत तेथे आला. पहातो तो वडाची पाने सगळी गळून पडलेली.

तेव्हां तो वडाला काय विचारतो, 'वडा, वडा, तुझी पाने कां गळाली बुवा?’

वड रागाने लाल झाला व म्हणाला

ऊ किं पुटपुटो
गंगा लालो
गाईचे शिंग मोडो
वडाचे पान झडो
कावळा काणा

वडाच्या शापामुळे कावळा बिचारा काणा झाला. बिचारा अगदी खिन्न होऊन डोळ्यांना तेल लावण्यासाठी तेल्याकडे गेला. तेल्याने पाहिले तो कावळा काणा.

तेली विचारतो, ‘कावळ्या कावळ्या, तूं काणा कशाने झालास?’

कावळा सांगतो
ऊ किं पुटपुटो
गंगा लालो गाईचे
शिंग मोडो
वडाचे पान झडो
कावळा काणा
तेली आंधळा तेव्हां

तेली पुरता अंधळा झाला. तो नेहमीप्रमाणे फुलें आणायला माळ्याकडे गेला. तेव्हां माळी विचारतो, 'तेल्या, तेल्या, तूं आंधळा रे कां झालास?'

तेली रागावून म्हणाला

ऊ किं पुटपुटो
गंगा लालो
गाईचे शिंग मोडो
वडाचे पान झडो
कावळा काणा
तेली अंधळा
माळी लंगडा

त्याबरोबर माळी पुरता लंगडा झाला. नेहमीप्रमाणे फुलें घेऊन तो राजवाड्यांत गेला. पण तिथे त्याला बटीक भेटली.

ती म्हणते, 'माळ्या, माळ्या, तूं लंगडा रे का झालास?'

तो रागावून म्हणतो

ऊ किं पुटपुटो
गंगा लालो
गाईचे शिंग मोडो
वडाचे पान झडो
कावळा काणा
तेलि अंधळा
माळि लंगडा
बटिक पादरी

त्याबरोबर राणीची बटिक मोठ्याने पादूंच लागली.


राणीला मोठा राग आला त्या बटकीचा व तिने पसले. ‘बटकी. बटकी, तूं पादतेस कां?'

बटीक म्हणते 'काय करणार राणी- साहेब?'

ऊ किं पुटपुटो
गंगा लालो
गाईचे शिंग मोडो
वडाचे पान झडो
कावळा काणा
तेली अंधळा
माळी लंगडा
बटिक पादरी
राणि नाचरी

बटकीच्या शापामुळे राणी थयथयां नाचूं लागली. राजवाड्यांत तिने गोंधळ मांडला. काही केल्या खळेचना.

तेव्हां आश्चर्याने गुंग होऊन राजाने राणीला म्हटले, 'अशी नाचतीस काय? 'राणी म्हणते,

ऊ किं पुटपुटो
गंगा लालो गाईचे
शिंग मोडो
वडाचे पान झडो
कावळा काणा
तेलि अंधळा
माळि लंगडा
बटिक पादरी
राणि नाचरी
राजा ढोलके वाजवितो

त्याबरोबर राजा ढोलके घेऊन बडवीत सुटला. एवढा थोर राजा ढोलके वाजवीत बसलेला पाहून त्याचा चतुर प्रधान आश्चर्याने थक्क होऊन गेला व तो राजाजवळ जाऊन हळूच म्हणतो 'राजेसाहेब, तुम्ही ढोलकें का वाजवीत बसलेत?’ राजा म्हणतो

ऊ किं पुटपुटो
गंगा लालो
गाईचे शिंग मोडो
वडाचे पान झडो
कावळा काणा
तेलि अंधळा
माळि लंगडा
बटिक पादरी
राणि नाचरी
राजा ढोलके वाजवितो
प्रधान डोके खाजवितो

त्याबरोबर प्रधान जो डोके खाजवीत बसला तो अजून काही खळत म्हणून नाही.

इटकुली मिटकुली गोष्ट सरो तुमचे आमचे पोट भरो

 

 

 

एका ऊ ची गोष्ट

महाकाल
Chapters
एका ऊ ची गोष्ट