मनोगत
"पेशव्यांची बखर" ही कल्याण येथील एका प्रसिद्ध गृहस्थाकडे जतन केली होती. ह्या बखरीचे पहिले तीन बंद गहाळ झाले आहेत व पुढे मध्येच १२१ वा बंद हरवला आहे. ही बखर आरंभा पासून बंदांच्या एका अंगाने लिहितां लिहितां २४० बंद पर्यंत जाऊन, तेथून बंदांच्या पाठीवर लिहित लिहित पहिल्या बंदा पर्यंत आणून संपविली आहे. अशा रीतीने लिहिल्यामुळे पहिले बंद गहाळ झाले तेव्हां अर्थात पाठी मागील शेवटचे बंदही त्यांजबरोबर गेले.
पहिले पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ भट हे त्यांचा मूळ गांव जो श्रीवर्धन तेथून निघाल्या पासून तहात इंग्रज सरकाराने पुण्यांत शनवारचे वाड्यावर आपला बावटा चढविला, तो पर्यंत हकीगत आहे.
ही बखर सदरहू वैजनाथ गांवी रा. रा. कृष्णाजी विनायक सोहनी यांनी तोंडी सांगितली व तेथील लोकांपैकी कित्येकांनी ती आदरपूर्वक लिहून घेऊन तिचा संग्रह केला. हे कृष्णाजीपंत पेशवाईत सुभेदारीच्या कामावर होते. शेवटले पेशवे यांचे कारभारी श्री. चितोपंत देशमुख पावसकर यांचे कृष्णाजी पंत हे आप्त होते व देशमुख यांची त्यांजवर कृपाही होती असे म्हणतात. कृष्णाजीपंत हे कोकणांत रत्नागिरी नजीक सोमेश्वर नांवाचा गांव आहे तेथील रहाणारे.
आज पंतांविषयी जास्त हकीगत मिळत नाही ही दिलगिरीची गोष्ट होय.अशी विलक्षण माहिती ज्या पुरुषास होती व ज्याने इतके संगतवार तिचे स्वमुखाने निवेदन केले, त्या चतुरस्र पुरुषाचे बाळपणच दिवस कोठे गेले, व तो पुढे उदयास कसा आला, वगैरे हकीगत तपशीलवार कळणे मोठे अगत्याचे होते पण ती मिळण्याचा योग सध्यां घडून येत नाही ही मोठी दुःखाची गोष्ट समजली पाहिजे. असो, सोहनी यांजवर कालचक्र फिरून विपत्तीचा पगडा पडल्यावर त्यानी सर्व संसार-कार्य सोडून वैजनाथ येथे नदीतीरी शिवालयांत आपले उत्तर आयुष्य घालविले. तेव्हां तेथील लोकांनी त्यांचे काही न्यून पडू दिले नाही हे त्यांस भूषणास्पद होय. तेथे पंत जटा वाढवून तपस्व्या प्रमाणे आपला काल ईश्वरोपासने मध्ये घालवीत. हा क्रम वर्षानुवर्ष चालला होता. शेवटी त्या शिवालयांत त्यांचा काल सुमारे इ० स० १८५४-१८५५ या साली झाला. त्या वेळी त्यांचे वयास सुमारे ७० वर्षे. असावी. . वरून त्यांचे जन्म इ० स० १७८४-१८८५ चे सुमारास म्हणजे श्री० सवाई माधवराव यांचे कारकिर्दीत झाले असे होते.
जुने लेख मोडी असोत अगर बाळबोध असोत, त्यांत विरामचिन्हें नसतात हे सर्वांस माहीत आहेच. ही विरामचिन्हें आम्ही अर्थानुरोधे घातली आहेत व तशीच विषयानुरोधे कलमेंही पाडिली आहेत व सर्व कारकिर्दी एक सारख्या एकत्र लिहिल्या होत्या त्या निरनिराळ्या करून लिहिण्याचे योजिले आहे. जेथे जेथे वाक्यरचनेच्या नियमांविरुद् रचना मुळांत दृष्टीस पडली, तेथे शब्दरूपें बदलून ती नीट केली आहे, व पुनरुक्तर्भूत शब्द व वाक्ये होती ती गाळली आहेत. ह्या वरून ध्यानात येईल की, मूलग्रंथ जितका सुगम होईल तितका केला आहे; तथापि त्यांतील भावार्थ किंवा स्यांतील विशेष शद्वयोजना व वाक्यरचना ह्यांस बिलकुल धक्का न लावितां ती तशीच्या तशीच ठेविली आहेत.