Get it on Google Play
Download on the App Store

बापजन्म

मुकुल च्या घरी लग्न होऊन आलेली मेधा अगदी दुधात साखर विरघळावी  अशी केव्हा विरघळून गेली तिचं तिलाच समजलं नाही!!

मुकुल चं कुटुंब म्हणजे थोडं थोडक नव्हे चांगलं दहा पंधरा माणसांचं खटलं!

त्याचे आई बाबा, काका काकू,आजी  आजोबा, चुलत बहीण भाऊ ,सख्या दोघी बहिणी ,एक मोठा दादा वहिनी म्हणजे विचार करा, केवढा गोतावळा!!

पण सगळे अगदी आनंदाने रहायचे, त्यात मुकुल सगळ्यात लहान आणि सर्वांचा लाडका, त्याच्यावर विशेष जबाबदारी अशी काही यायचीच नाही, मेधा शी लग्न झालं तेव्हाही सगळे त्याला आणि मेधाला चिडवतच होते," मेधा, सांभाळ बाई आता मुकुल ला , तुझा नवरा असला तरी घरातला सर्वात छोटा मेंबर आहे तो,अगदी लाडोबा ,आता तू किती लाड पुरवतेस की पुरवून घेतेस पाहू यात!!"

म्हणता म्हणता दिवस सरले आणि आज मुकुल मेधाच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस  आला ही!! त्यामुळे दिवसभर घरात गडबड,  विशेष स्वयंपाकाची धामधूम वगरे होतीच, संध्याकाळी केक कापणे वगरे झालं आणि मुकुल मेधा ने ते दोघे 'आई-बाबा' होणार आहेत ही गोड बातमी दिली!

झालं आधीच एवढ्या तेवढ्या कारणाने घरात नुसता गलका असायचा , आजच्या बातमीने तर उधाण आलं सर्वांच्या उत्साहाला!

मेधा ची तर दुष्ट च काढली सगळ्यांनी मिळून आणि सोबत गोड दटावणी देखील,' आता अवघड कामं बंद, आराम सुरू, उत्तम जेवण  व्यायाम,,दूध फळं..... एक ना दोन!!"

मेधाला  ऐकूनच दम लागला," बाप रे, किती हा उत्साह, किती प्रेम"

एवढ्यात मुकुल ला सगळ्यांनी घेरलं," आता तुझी ही लाडोबा ची पदवी लवकरच hand over होणार आहे, तेव्हा जरा मोठ्यांसारखा वाग, मेधा ची काळजी घे."

पण मुकुल ने झटकून टाकले नेहमीप्रमाणे," छ्या, मी काय वेगळी काळजी घेणारे मेधा ची, तुम्ही सगळे असताना मला वेगळं काही करायची गरज तरी आहे का!!"

मेधा ला नाही म्हटलं तरी मुकुल चं बोलणं खटकलं." बाकी सगळं छान आहे पण हा जो बेफिकीर स्वभाव आहे न ह्याचा तो काही रुचत नाही मला, कधीही कसली जबाबदारी नको, स्वतः हुन कुठलं काम नको, शिवाय शिक्षण नोकरी हे देखील अगदी नशिबाने इतकं सुरळीत झालंय ह्याचं ;की ना कसली वळणं, ना अडथळे, अगदी गुळगुळीत डांबरी रस्त्या सारखा जीवनाचा प्रवास! अर्थात घरात इतकी मोठी माणसं आहेत त्यामुळे काम किंवा जबाबदारी मुकुल पर्यंत येईस्तोवर पूर्ण ही झालेलं असतं त्यामुळे त्याला तरी काय दोष देणार म्हणा!' मेधाचं मनातल्या मनात चालू होतं सगळं पण प्रत्यक्षात मात्र तिनं हसून प्रसंग साजरा केला.

रात्री दमून दोघे बेडरूममध्ये आल्यावर मुकुल लगेच झोपण्याच्या तयारीत होता , मुद्दाम मेधा च त्याच्या जवळ गेली," मुकुल ,आता आपण आई बाबा होणार आहोत अरे, आणि मला वाटतं की तू माझी काळजी घ्यावीस, मला काय हवं नको ते विचारावं स, थोडा जबाबदारी ने वाग ना, बघ सगळे किती काळजी घेतील आता माझी पण मला तुही माझ्या कडे लक्ष द्यायला हवं आहेस" मेधा त्याच्या कुशीत शिरत म्हणाली.

" ए वेडाबाई, अग मी काळजी घेतली काय किंवा घरातल्या सर्वांनी घेतली काय ,सारखं च तर आहे, तू जरा जास्तच विचार करतेस ,आणि मी आहेच की तुझ्या सोबत" मुकुल ने विषयच संपवला!

" तुला ना ,कधीही मी काय म्हणतेय ते समजणार नाही, जाऊ देत"म्हणत मेधा फुरंगटून त्याच्या कडे पाठ करून झोपली.

पुढील सगळे दिवस/ महिने सर्वांनी मेधा ची खूप काळजी घेतली ,तिला काय हवं नको ते विचारलं, वेळोवेळी डॉक्टरांकडे नेलं, पण ह्यात मुकुल कुठेच नसायचा अर्थात त्याला त्यात काळजी नव्हती असं नाही पण नेहमीप्रमाणे च कोणीतरी आहे न सोबत मग झालं तर! ह्या विचाराने तो निर्धास्त असायचा.

असेच सात आठ महिने कधी निघून गेले कळलं ही नाही आणि मेधा ची माहेरी पाठवणी झाली.

मेधा गेल्यावर मुकुल ला घर फार रिकामं वाटत होतं पण आता मेधा नाही म्हणून सगळे अजूनच काळजी घेत होते त्याची!!

आठ दहा दिवस गेले असतील आणि एका संध्याकाळी मेधा चा फोन आला मुकुलला," मुकुल ,ये ना रे इकडे, मला फार अस्वस्थ वाटतंय" कधी नव्हे ते मेधा चा आवाज थोडा खोल गेल्यासारखा वाटला.

दुसऱ्याच दिवशी मुकुल ने ऑफिसमध्ये चार दिवसांची सुट्टी घेतोय म्हणून कळवलं आणि सासुरवाडी ला गेला.

मेधा ला पाहून त्याला जाणवलं की आठ दहा दिवसांत मेधा अगदी सुकून गेलेल्या फुलासारखी झालीये, की आज तिच्याभोवती आपल्या घरातल्यांचा गराडा नाहीये म्हणून आपण प्रथमच तिच्याकडे असं निरखून पाहतोय??

मुकुल आल्याने मेधा थोडी सुखावली खरी पण आता दिवस भरत आल्याने तिला छोटी छोटी कामं करणं ही मुश्किल झालं होतं, खुर्चीत उठता बसता ना द्यावा लागणारा जोर, रात्री सतत चाळवलेली झोप, 'बाथरूम' च्या वाढलेल्या फेऱ्या ,एक ना दोन!!

मुकुल ला तिच्याकडे बघून खूप वाईट ही वाटत होतं आणि अपराधी ही!! आपण जरा जास्तच बिनधास्त होतो की काय ह्या सात आठ महिन्यात ? की सतत घरातलं आहे कोणी काळजी घ्यायला म्हणून निवांत होतो? एक दोन वेळा सोडलं तर आपण तिच्यासोबत डॉक्टरांकडे ही फारसं गेलो नाही. मुकुल ला स्वतः चाच खूप राग येत होता, पण आता काय उपयोग!!

आज सकाळी च मेधा ला थोडं पोटात दुखू लागलं म्हणून तिची आई आणि मुकुल तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि डॉक्टरांनी तिला ऍडमिट करून घेतलं.

मेधाची आई समजून गेली की ' ती वेळ आली आहे'

तिनं मुकुल ला सांगितलं की मी अर्ध्या तासात घरून मेधाचं सामान घेऊन येते तोवर तिच्यासोबत थांबा.

आई निघून गेली तसा मुकुलचा धीर सुटू लागला. मेधा ला कळा सुरू झाल्या होत्या आणि आता कुठल्याही क्षणी तिला OT मध्ये न्यावे लागणार होते.

तेवढ्यात नर्सेस आणि डॉक्टर ची धावाधाव झाली आणि त्यांनी तिला आत नेले, मुकुल ने डॉक्टरांना खूप request केली म्हणून त्याला ही OT मध्ये घेण्यात आलं, तो ही मास्क आणि OT ची आवश्यक ती काळजी घेत एका कोपऱ्यात उभा राहिला.

मेधाच्या प्रसवकळा आता चांगल्याच वाढल्या होत्या, डॉक्टर् नर्सेस तिला आवश्यक सूचना देत होते, तिला दीर्घ श्वास घ्यायला सांगत होते, थोडा जोर दे पोटावर म्हणून सतत सांगत होते.

मेधा आता अक्षरशः कळवळत होती आणि ते पाहून  बाजूला उभ्या असलेल्या मुकुल च्या पायाला कंप सुटला होता!

' किती त्या वेदना! देवा ,सुखरूप सुटका कर माझ्या मेधाची' मुकुल च्या डोळ्यात पाणी तरळत होतं पण तो ते निपटून टाकत स्वस्थ उभा होता, अखेर मेधाची सुटका झाली आणि छोट्या पिल्लुचं आगमन झालं, त्याच्या रडण्याने पूर्ण operation theatre भरून गेलं आणि नर्सेस त्या पिलू ला साफ करण्यासाठी आणि बाहेर इतर घरातल्यांना आनंदाची बातमी द्यायला  निघून  गेल्या.

मुकुलने मात्र मेधा कडे धाव घेतली आणि तो ओक्साबोक्शी रडू लागला," मेधा ,मला माफ कर ग,मी तुझी नऊ महिने काळजी घेतली नाही,तुझ्यासोबत वेळ घालवला नाही,स्वतः ची जबाबदारी जाणली नाही,आज समजतंय एका बाळाला जन्म देणं ही केवढी मोठी गोष्ट आहे ते!! ह्याची उतराई कसा होऊ मी आता, फक्त एवढं च प्रॉमिस करतो की पुढल्या जन्मी नक्की मी तुझ्या बाळाची आई होईन !! "

मेधा दमून गेली होती तरी तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.

आज तिच्या पिल्लू सोबत एक 'बापजन्म' ही झाला होता!!

सौ बीना समीर बाचल
12मे21