dhada
धडा
ती ऑफिसमधून हाफ डे टाकून घरी आली. ‘‘अग हे काय लवकर का आलीस? बरं नाही का?’’ आई ‘‘कॉफी कर ग आई.’’ तिचं आईच्या प्रश्नाला बगल देऊन उत्तर. या पोरीचं असंच, काही वागणंच कळत नाही. ती हातपाय धुऊन येईपर्यंत आईने कॉफीचा मग समोर ठेवला. आता तरी काही तरी बोलेल या आशेने, पण रक्षाने कप उचलला आणि ती आपल्या खोलीत गेली. धाडकन दार लावून घेतलं. रूमच्या बालकीनतल्या झोपाळ्यावर बसून ती कॉफी पीत रस्त्यावरची गर्दी न्याहाळू लागली. गॅलरीतून समोर ओसंडून वाहणारा दिसत होता. एक मिनिट काही रस्त्यावर शांतता नव्हती. सतत गाड्यांची येजा सुरू होती. रस्त्यावरच्या प्राण्यांची पण पळापळ चालू होती. संपूर्ण जगात उलथापालथ चालू आहे असं तिला वाटलं आणि एकदमच तिच्या मनात विचार आला. सारं जग पळतंय आणि आपलंच आयुष्य असं का थांबलंय असा विचार तिच्या मनात येऊन गेला, फिरून फिरून तोच विचार येतोय म्हणून खरंतर तिला स्वत:चाच राग आला होता. जुने विचार, जुनी माणसं सगळं काही तिथंच सोडून टाकायचं असं तिनं ठरवलं होतं. आज ती वेगळ्याच आनंदात ऑफिसला गेली होती अगदी ठरवून की आता मागचं काही आठवायचं नाही. पण कसलं काय? ऑफिसमध्ये जाताक्षणीच तिचा फोन वाजला. तिने एक-दोनदा दुर्लक्षं केलं, पण परत परत असं‘य वेळा तिचा फोन वाजतच राहिला. शेवटी नाइलाजानं तिनं फोन उचलला, ‘‘प्लीज फोन कट करू नको एकदा माझं ऐक.’’ रुद्र गडबडीनं बोलत होता. ‘‘आता काय झालं? का मला सुखाने जगू देत नाहीयेस?’’ ‘‘रक्षा, तू परत ये मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही.’’ ‘‘मी तिथे असताना तुला हे समजत नाही का? तेव्हा तर मला कस्पटासमान समजतोस. मला काही किंमत देत नाहीस.’’ ‘‘अगं असं तुला वाटतं, तू ये आपण शांतपणे बोलू.’’ ‘‘रुद्र, आता शांतपणे बोलण्याचे दिवस संपलेत. तुझी वाट वेगळी आहे, माझी वाट वेगळी आहे.’’ रक्षाने धाडकन फोन आपटला. पाच मिनिटं शांततेत गेली आणि परत फोन वाजू लागला. तिने फोन उचलला नाही, कशीबशी थोडी कामं केली आणि डोकं दुखतंय या सबबीवर घरी परत आली. तोपर्यंत जवळपास 25 वेळा मिसकॉल येऊन गेला होता. कॉफी पिऊन ती झोपाळ्यावर मागे मान टाकून बसली तोपर्यंत रूमचा दरवाजा वाजला. नक्की आईच असणार, तिला एक चैन पडत नाही, जराही मला स्वस्थ बसू देत नाही. रक्षा मनातल्या मनात चडफडत होती जणू सगळं जग वैरी झालंय आपलं असंच तिला वाटत होतं. ‘‘रक्षा बाळा, दार उघड, काय झालंय?’’ शेवटी रागारागाने ती उठली आणि दार उघडलं. ‘‘काही नाही ग जरा डोकं दुखतंय. मला जरा शांतपणे बसू दे.’’ जरासंच दार उघडल्याचा फायदा घेऊन आई आत आली. मातृहृदयच ते आपली पोरीची अशी तगमग पाहून तिचा जीव तीळ तीळ तुटत होता. ‘‘अगं तू रुद्रचा फोन का उचलत नाहीयेस? तो इथे येऊन गेला.’’ ‘‘काय? इथे आला होता?’’ ‘‘हो...’’ ‘‘तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणे. भांडण झालंय का तुमचं? परवा तू आलीस तेव्हा काहीच बोलली नाहीस? सहजच आले म्हणालीस.’’ परत बोलायचा चान्स मिळेल न मिळेल या शंकेना आईने धाडधाड बोलून टाकले. ‘‘हो जरा भांडण झालंय आमचं. मी तुला ते सगळं नंतर सांगते. आत्ता प्लीज मला शांत बसुदे.’’ रक्षा म्हणाली. ‘‘झाली ना आता कॉफी पिऊन, मग सांग बरं आता मला आणि हे बघ कोणाला तरी मनातली खदखद सांगितल्याशिवाय तुला शांत वाटणार नाही.’’ ‘‘आई, रुद्र मला काही किंमत देत नाही, माझं काही ऐकत नाही आता मी त्या घरात राहणार नाही.’’ ‘‘किंमत देत नाही म्हणजे काय करत नाही? हे बघ हे घर तुझंच आहे तू इथे पाहिजे तितके दिवस राहा. तू आमची एकुलती मुलगी आहेस, पण तुला कधी ना कधी तरी सासरी गेलंच पाहिजे.’’ ‘‘पण का मी काय जायचं? मी का प्रत्येकवेळी त्याचं ऐकायचं? मला नोकरी आहे, चांगला पगार आहे मग मी त्याच्या बंधनात का म्हणून राहायचं?’’ ‘‘हा विचार तू लग्नाच्या आधी करायला हवा होतास रक्षा.’’ आईही थोडा आवाज चढवून बोलली. ‘‘तूच प्रेमात पडून लग्न केलं आहेस आणि आता तुम्ही एकमेकांशी पटत नाही म्हणता हे मला मान्य नाही.’’ ‘‘तेच म्हणूनच मी तुला काही सांगत नव्हते. मला माहीत होतं तू माझ्याविरुद्धच बोलणार.’’ रक्षा. ‘‘रक्षा, अगं असं काही नाही.’’ जानकी ‘‘बरं आता जरा मला शांतपणे विचार करू दे.’’ रक्षा ‘‘अगं तू जर असा शांतपणे विचार करणारी मुलगी असतीस तर एकतर हे लग्नं तरी केलं नसतंस किंवा आता केलंयस तर निभावलं तरी असतंस आणि काय झालंय हे सांगितलंस तर आपण त्यातून विचार करून मार्ग काढू शकतो, पण तुमच्या भांडणांना काही खास कारणही नसेलच...’’ ‘‘आई, तू जा इथून मला अत्ता उपदेशाचा डोस नको आहेत. तुला नेहमी मीच चुकीची दिसते.’’ रक्षा. आई नाइलाजाने बाहेर गेली. एकुलती एक मुलगी अशी रुसून-फुगून सारखी घरी येत होती. लग्नाला आताशी वर्ष होत आलं होतं. तेवढ्या वेळात ती पाच-सहावेळ तरी आली होती. थोडे दिवस झाले की, रुद्रची आठवण तरी यायची किंवा तो समजूत काढायचा आणि ही परत जायची. पण असं किती दिवस चालणार? यावर काहीतरी ठोस उपाय निघाला पाहिजे. रक्षाच्या बाबांना याचा काही फरक पडत नव्हता. मुलं अजून लहान आहेत, समजेल त्यांना थोड्याच दिवसांत असंच त्यांचं म्हणणं होतं. रक्षाची आईने मनात काहीतरी बेत आखला. तिने आपले सगळे आवरले आणि रक्षाला ‘‘मी जरा बाहेर जाऊन येते.’’ असं सांगून ती बाहेर पडली. आईच्या मनात धाकधूक होतीच की आपण करतोय ते बरोबर की चूक? तिथं जाऊन काय काय ऐकावं लागेल देवास ठाऊक? नक्की चूक कोणाची आहे? कसं कळणार? तरीपण काय व्हायचं ते होऊदे जाऊयाच असं म्हणून तिने रुद्रचं घर गाठलं. बेल वाजताच विहीणबाईंनी दार उघडलं. ‘‘या या बसा.’’ असं तोंडभरून स्वागत झालं. त्यांनी पाणी आणून दिलं आणि ‘‘बोला काय काम काढलंत?’’ असं त्यांनी विचारलं. ‘‘खरंतर मी इथे येणं चुकीचंच आहे, पण राहावलं नाही म्हणून आले.’’ जानकीने बोलायला सुरुवात केली. ‘‘रुद्र कुठे आहे?’’ जानकी. ‘‘तो बाहेर गेला आहे.’’ विहीणबाई. ‘‘ते एक बरं झालं. रक्षा आणि रुद्र यांच्यात काय प्रॉब्लेम आहे? ही चौथी की पाचवी वेळ आहे की रक्षा भांडून घरी आली आहे. मी तुम्हाला जाब विचारते आहे असं अजिबात समजू नका. रक्षाचा तापटपणा मला माहीत आहे, पण यातून काही तोडगा निघतो का बघूया म्हणून मी आले आहे.’’ जानकी. ‘‘हे बघा तुम्ही आधी मनातला अपराधीपणा काढून टाका. तुम्हीच आलात हे खूप उत्तम झालं, मलाही खूप वेळा वाटतं काय ही मुलं भांडतायत? यावर काय करावं? तुमच्याशी बोलावं असंही वाटलं, पण...’’ विंहीणबाई ‘‘अरे वा म्हणजे निदान आपले तरी विचार जुळत आहेत.’’ जानकी ‘‘रक्षा तापट आहे असं तुम्ही म्हणताय, पण रुद्रही काही कमी नाही तो खरं सांगायचं तर या मुलांना अॅडजेस्टमेंटची सवयच नाही यामुळे असं होतंय असं माझं तर म्हणणं आहे आणि त्यातून आपली ही मुलं एकटीच त्यामुळे त्यांना त्यांच्यात वाटणी माहीतच नाही. म्हणून हे प्रॉब्लेम होत असावेत.’’ विहीणबाई ‘‘अगदी खरं आहे तुमचं आणि आपण मुलांना दु:खाची झळ बसू नये म्हणून काही सांगितलं नाही त्यामुळे आपल्या दु:खाचीही त्यांना कल्पना नाही. यावर काहीतरी तोडगा काढायला हवा.’’ जानकी. ‘‘खरं आहे तोडगा काढायलाच हवा. अगदी शुल्लक कारणांवरून दोघांच्यात वादविवाद होतात, परवाचीच गोष्ट रक्षाला ऑफिसमध्ये लवकर जायचं होतं तर रुद्रला उशिरा. रक्षाच्या गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम होता, रुद्रने आपल्याला सोडावं ही रक्षाची अपेक्षा, तर मला वेळाने जायचं आहे. तुझी तू जा असं रुद्रचं म्हणणं. दोघांपैकी कुणीच माघार घ्यायला तयार नाही, आपण कुणाची बाजू घ्यावी हा प्रश्न.’’ या कारणावरून रक्षा भांडून घरी आली?’’ जानकीने आश्चर्याने विचारले. ‘‘होय हो. तरी मी तिला समजावत होते, रीक्षाने जा, नाहीतर बाबा सोडतील तुला ऑफिसमध्ये पण तिची काही समजूत पटेना तसेच रुद्रला पण सांगून पाहिलं की, जा ना तू जरा लवकर काय बिघडते? पण नाहीच तोही ऐकायला तयार नाही.’’ ‘‘हद्द झाली या मुलांची.’’ मग दोघींनी काहीतरी प्लॅन केला आणि जानकी जरा समाधानाने घरी आली. इकडे रक्षा आई आत्ता कुठे गेली म्हणून चिडचीड करत बसली होती. एकटेपणात तिला रुद्रची जास्तच आठवण येत होती. त्याचा फोन उचलला नाही म्हणून तिला वाईट वाटत होतं तिने दोनदा फोन केला, पण आता तो चिडला होता त्याने हिचा फोन कट करून टाकला. जानकीने न जास्त काही न बोलता जेवण केलं तेवढ्यात रक्षाचे बाबाही आले आणि सर्वांची जेवणं झाली. बापलेकीची ऑफिसचे काम, इतर अवांतर गप्पा झाल्या. जानकी जरा गप्पगप्पच होती. दुसर्या दिवशी सकाळी रक्षाला जाग आली ती आईच्या आरड्याओरड्यानेच. जानकीचा इतका मोठा आवाज तिने आजपर्यंत कधीच ऐकला नव्हता. ती जेव्हा उठून बाहेर आली तोपर्यंत जानकी बॅग भरून बाहेरच पडत होती. ‘‘आई, कुठे निघालीस?’’ रक्षाने गोंधळून विचारले. ‘‘तुझ्या बाबांनाच विचार.’’ म्हणत जानकी बाहेर पडलीसुद्धा. रक्षाने पूर्ण घरावर एक नजर फिरवली. घरात सर्व पसारा पडला होता. अर्धवट स्वयंपाक झालेला दिसत होता. आई तणतणत बाहेर पडली होती. आई बाहेर पडली याचं वाईट वाटून घ्यायचं की हा पसारा कोण आवरणार आणि आपण ऑफिसला कसं पोचणार याचा विचार करायचा रक्षाला काहीच समजत नव्हते. तिचे बाबा सोफ्यावर हतबल होऊन बसले. आजपर्यंत जानकी कधीच अशी वागली नव्हती. आणि आता या वयात ती असं काही वागेल असं त्यांना वाटलंच नव्हतं. बाबाला सावरू, घर आवरू की आपलं आवरू रक्षाला काहीच कळेना. शेवटी ती बाबाच्या जवळ बसली. ‘‘बाबा, काय झालं? काय बोललास तू आईला?’’ ‘‘अगं काहीच नाही तिला आज तिच्या बहिणीकडे जायचं होतं, ती म्हणत होती मी पटकन आवरते, मला सोडा आणि मग ऑफिसला जा. तर मी म्हटलं ‘माझं काम आहे तू रीक्षाने जा...’’ ‘‘बसं एवढंच.’’ ‘‘हो ना मी हे म्हणताच तिने बडबडायलाच सुरुवात केली ‘तुम्हाला माझी किंमतच नाही, माझ्यासाठी काहीच करायला नको वगैरे वगैरे...’’ ‘‘कमाल आहे आईची, तुम्ही नाही सोडलंत तर मी सोडलं असतं किंवा रीक्षा, टॅक्सी कशानेही जाऊ शकली असती.’’ ‘‘तेच तर एरवी कित्येक वेळा असं होतं, पण आज मात्र मलाच काही समजलं नाही, ती चक्क रागावून, बॅग भरून बहिणीकडे निघून गेलीय.’’ दोन दिवस असेच गेले. जानकी काही आली नाही. रक्षा किंवा तिचे बाबा यांचा फोनही तिने उचलला नाही. रक्षाला वाटलं की आपण आगीतून फुफाट्यात येऊन पडलोय. कारण घरातलं सगळं तिला आवरावं लागत होतं, बाबा पण तिला थोडीच मदत करत होते. घरातलं आवरून ऑफिसला जाणं तिला जड जात होतं. तिकडे रुद्रची आई घरात किती मदत करते. आपल्याला समजून घेते असं वाटत होतं. शेवटी न राहवून तिने रुद्रला फोन केला होता, त्यानेही अधीरतेने उचलला होता. सर्व परिस्थिती सांगितली. सांगताना ती म्हणत होती, ‘‘कमाल आहे आईची एवढ्याशा कारणावरून भांडली बाबांशी.’’ रुद्र गंमतीत म्हणाला, ‘‘मग आई कुणाची आहे?’’ त्यासरशी तिच्या डोक्यात प्रकाश पडला की अरे आपणही याच कारणाने भांडून आलो होतो. रुद्र मी फोन ठेवते नंतर तुला कॉल करते म्हणत तिने कॅब बुक केली. मावशीच्या घरी पोहोचली तर आई आणि मावशी मस्त गप्पा मारत हसत, खिदळत होत्या. रक्षाने पळत येऊन आईला मिठी मारली. ‘‘हे माते, माझं चुकलं. आता आपण घरी चलावं.’’ तिने नाटकीपणाने म्हटलं. ‘‘अरे, तुला कसं कळलं?’’ ‘‘कळलं चल आता!’’ ‘‘पण तुझे बाबा मला घ्यायला आल्याशिवाय मी येणार नाही...’’ जानकी गाल फुगवून म्हणाली. ‘‘ए बाई, आता आणखी नाटक नको करू. एकदा तुला तुझ्या नवर्याच्या ताब्यात देते, मग मी माझ्या नवर्याकडे जायला मोकळी. तू नाहीस तेव्हापासून ते देवदास झालेत. मला सांग तुझ्या या नाटकाची तू त्यांना कल्पना दिलीस का नाही?’’ ‘‘नाही म्हटलं जरा त्यांनाही धडा मिळूदे.’’ तेवढ्यात मावशीच्या दाराची बेल वाजते दार उघडताच जानकी आणि रक्षाला हसू आवरत नाही कारण दारात रुद्र आणि बाबा उभे होते पडलेल्याच चेहर्याने. * * * सौ. शिल्पा पराग कुलकर्णी