Get it on Google Play
Download on the App Store

बेधुंद

अखेरीस देशमुख मुख्यमंत्री झाले.सहकारी पक्षाला चांगलाच झटका बसला.देशमुखांनी रात्रीतुन युती तोडून विरोधी पक्षाशी म्हणजेच कदम अण्णांशी हातमिळवणी केली आणि नवा खेळ मांडला.कदम आणि देशमुख आता सोबत फीरू लागले.कौटुंबिक पार्ट्या होऊ लागल्या. फँमिली डीनर रंगू लागले.घरातील मोठ्यांच्या गराड्यात सक्षम देशमुख व सायशा कदम हे दोन जीव एकमेकांच्या जवळ येऊ लागले. दोघेही राजकीय कुटुंबातील असल्याने आणि आता दोघांची युती झाल्याने राजकीय वर्तुळात सोबत फीरू लागले.

"हँलो,उद्या काय करत आहात?",सक्षमने करारी आवाजात विचारले.

"काय करायचे आहे ते सांगा.

"या की मग उद्या व्रुक्षारोपण करायला डोंगरावर. वाट पाहु आम्ही."

"येऊ की",सायशाने लाजतच फोन खाली ठेवला.सक्षम होताच तसा.गोरापान. मस्त सिल्की केस.सतत डोळ्यांवर काळा गॉगल.पांढरेशुभ्र लॉंग कुडते व त्यावर वेगवेगळ्या जिन्स.पाहताच क्षणी असं वाटायचं हाच माझा नवरा व्हावा.हँडसम बॉय!पर्सनॅलिटी तर होतीच पण कार्यकर्ते त्याचे जिगरी दोस्त होते.राजकारणात तो कमी वयातच चांगलाच मुरला होता.वडील मुख्यमंत्री झाले असले तरी पक्षाची काम करण्याची धडपड त्याने जिवंत ठेवलेली होती.मुंबईत तर त्याला खुपच मान होता परंतु तो संपूर्ण महाराष्ट्रात पक्षविस्तार करण्यावर भर देत होता.दुसऱ्या दिवशी सायशा फीकट गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घालून डोंगरावर पोहोचली.नेहमीप्रमाणे अंगावर एकही दागिना नव्हता.डोंगरावरील हवेने केस सारखे उडत होते.ती पुन्हा पुन्हा ते केस कानामागे ढकलत होती.सक्षममात्र भान हरवून एकसारखा तिच्याकडेच बघत होता.

"झाडं लावायची का?की फक्त पाहण्याचा कार्यक्रम आहे..."

"नाही नाही.. लावुना..आणा रे रोपं..तुमची तयारीच अशी असते की नजरच हटत नाही."

"खुपच कॉमन डॉयलॉग आहे हा!नवीन काही तरी बोला."

कमी आवाजात दोघांची धुसफूस चालू होती.हळूहळू रक्तदान, कॉलेज गँदरींग,मेळावे..अनेक कार्यक्रमात जोडी सोबतच दिसू लागली.जहा आग होती है वही धुआ उठता है या उक्तीप्रमाणे लवकरच प्रसारमाध्यमांनी विवाहाची बातमी देऊन टाकली.झोपेचं सोंग घेतलेली दोन्ही कुटुंब खाडकन जागी झाली.

"हा काय प्रकार आहे?देशमुखांशी संबंध आपल्याला परवडणारे नाहीत. आपल्या मर्यादेत रहायचं.रस्त्यावरच्या कुत्र्यांना भुंकण्याची संधी देऊ नका.शेवटचं सांगतो आहे.केरळला अँडमिशन घेतली आहे तुमची.बँग उचला आणि अर्ध्या तासात इथून निघा.",कदम संतापात बोलत होते.

सायशाने रडतरडतच बँग भरली.सुरू व्हायच्या अगोदरच प्रेमाचा खेळ संपला.वडीलांसमोर लहानपणापासूनच सायशाची काहीच बोलण्याची हींमत झाली नाही.

"आमच्या पिढ्यानपिढ्या या राजकारणात झिजल्या तेव्हा कुठे हे वैभव आणि हा पक्ष दिसतोय.राजकारणात दोन पक्षात कधीच नातेसंबंध निर्माण होणं शक्य नाही सक्षमराव.आजजरी कदम आपल्या सोबत आहेत उद्या तेच आपले विरोधक राहतील.उद्या तुम्हाला त्यांच्या विरुद्ध प्रचार करायचाय.तुम्ही त्यांचीच मुलगी घरात आणून ठेवली तर तळागाळातील कार्यकर्ते तरी कशी तुम्हाला साथ देतील? आपल्या करीअरवर लक्ष द्या. प्रेम करायला अख्खं आयुष्य पडलयं.काय...समजतयं ना..काय म्हणतोय ते..उद्या सकाळी पंढरपुरात निघा.निवडणुका जवळ आल्यात.मोर्चेबांधणी करा.",देशमुख समजुतीच्या भाषेत आवाजात थोडी जरब ठेऊन बोलत होते.

सक्षमलाही म्हणणे पटत होते.एका प्रेमप्रकरणासाठी कुटुंबाची प्रतिष्ठा चव्हाट्यावर आणणे त्यालाही पटत नव्हते.त्यानेही सायशाकीडा डोक्यातून काढून पंढरपुरचा रस्ता धरला. ज्या पत्रकारांनी प्रकरण उचललं होतं त्यांना समजूत देऊन प्रकरण दाबलं गेलं.प्रेमाची ठीणगीतर पडली होती त्यामुळे झळ दोघांनाही बसली.सक्षमतर पंढरपुरच्या स्थानिक निवडणुकीत स्वतःला हरऊन बसला.पण सायशामात्र अजुनही त्याच्यातच गुंतून बसली होती.न राहऊन आठ दिवसांनी तिनेच त्याला परत फोन केला.

"हँलो..काय विसरलात तुम्ही आम्हाला?"

"नाही.. तुम्हालाच त्रास नको म्हणून आम्ही स्वतःहून दुर झालो.कदमकाकांचाही विचार करावा लागतो की आम्हाला."

"आपण परत कधीच भेटु शकणार नाही का?",हुंदका दाबतच सायशा बोलली.

"म्रुगजळामागे धावण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे नवी सुरूवात करा.इतकेच सांगतो."

सायशाला उत्तर मिळाले नि फोन कट झाला.

सायशा व सक्षमतर मुंबईत नव्हते पण विरोधकांना मात्र चघळायला आयताच विषय मिळाला होता.त्याच्या उडत्या पतंगाची दोरी कापण्यासाठी विरोधक वारंवार सायशा प्रेमप्रकरण उचलून धरत होते.

"सक्षमराव तुम्ही आता लग्न करून टाका."

"काहीतरीच काय पप्पा"

"एकदा तुमचं लग्न झालं,मुलं झाली की सायशा प्रेमप्रकरण कायमचं दाबलं जाईल बघा.तुमची इमेज साफ करायचीय आपल्याला.मोहीत्यांची कन्या आहे .डॉक्टर आहे.तुम्ही पाहतच आला आहात तिला.आपल्या कुटुंबाला शोभेल अशीच आहे.तुम्ही फक्त हो म्हणा."

"आम्ही कधी नाही म्हटलयं पप्पा तुम्हाला.बरं मग काढा आठ दिवसाची सुटी.करतो मी मोहीत्यांना फोन"

मोहीत्यांनी पटकन मुख्यमंत्र्यांना हो म्हणून टाकले.मुलीचं नशीब उजळलं म्हणून समाधान व्यक्त केले.

"अगं ये उषा,ऐकते का साहेबांनी सक्षमरावांसाठी आपल्या नेहाचा हात मागितला आहे."

"खरचं..देवचं पावला की..नेहा ...मी काय म्हणते."

"काय.."

"तुझं लग्न जमवलयं बाबांनी तुझ्या. सक्षम देशमुख.."

"काय..असं अचानक"

"हो..अचानकच...परवा संध्याकाळी ते आपल्या घरी येतील..तयारी करा..."

सकाळ झाली. आठ वाजले तरी नेहा झोपलीच होती.

"उषा,नेहाला उठवं.फोटोशुट करायचयं.सक्षमरावांसोबत.चांगले कपडे द्या बँगेत आणि पोरीला पाठवा आमच्या सोबत."

"बरंबरं"

"उठ गं.फोटोशूट आहे म्हणे तुझं जावईबापुंसोबत.उठ लवकर.तयारी करं.पप्पा वाट पाहत आहेत खाली."

"फोटोशुट...",मनात कालवाकालव सुरू होती.पण नेहा तयार झाली. सक्षमला भेटायची हुरहुरपण होती.थोड्याच वेळात नेहा वडीलांसोबत फार्महाऊसवर पोहोचली.

"नमस्कार मामा"

"नमस्कार.."

"आता तुम्हाला मामाचं म्हणावं लागेल"

"हो हो..बरं मी गावात जाऊन येतो.तुमचं फोटोशूट झाले की फोन करा मला.मी येतो नेहाला घ्यायला."

"ठीक आहे"

नेहा बँग घेऊन गाडीतून उतरली.आकाशी रंगाचे फुलबाह्यांचे टॉप आणि ब्लु जिन्स होती.केस मोकळे सोडलेले होते.सक्षम आणि ती आज पहील्यांदाच एकमेकांना इतकं जवळून पाहत होते.नेहाची व सक्षमची नजरानजर झाली. नेहाने पटकन आपली मान खाली केली.

"चला आत जाऊया"

नेहा सक्षमसोबत आत गेली.हॉलमध्ये सक्षम,ती व फोटोग्राफर तीनचजण होते.घरात शेजारी शेजारी बसून दोन तीन फोटो काढले.नंतर नेहाने टॉप बदलले.फोटोग्राफने सक्षमला बाईकवर बसायला सांगितले. नेहाला त्याच्या खांद्यावर हात ठेऊन बसायला सांगितले. नेहाच्या हातातला अवघडपणा सक्षमला लगेच जाणवला.दोघांनी परत कपडे बदलले.बाहेरील शेतात सोबत फीरतांना फोटो काढले.

"अहो सक्षमराव हात हातात घ्या की.तुमची मैत्री आहे असंतर वाटलं पाहीजे की."

"हो हो",सक्षमने बोलतच नेहाचा हात हातात घेऊन टाकला.

सक्षमच्या स्पर्शाने नेहा  बिचकलीच.नेहाचं अंग चोरणं पाहून सक्षमने लगेच तिचा हात सोडला व तिला कंफरटेबल केले."

नेहाचा गोरा रंग,केसांच्या लटा,पायातल्या साखळ्यांचा आवाज, गळ्यातील नाजुक चैन सगळचं मोहक होतं.सक्षम एकसारखा तिच्याकडे बघत होता.नेहा मात्र लाजून नजर चोरत होती.फोटोशुट संपलं.फोटोग्राफरपण गेला.आता मात्र बंगल्यात दोघचं होते.

"मामांना करू का फोन?"

"हो हो.."

"थांब थोडावेळ..इतकी काय घाई आहे घरी जायची?"

"नाही.. असचं"

"एमबीबीएस नंतर काय मग पुढे.."

"परीक्षा देते आहे पुढची...नंबर लागला की मग अजून दोन वर्ष कॉलेज राहील."

"बरं..मी सतत बाहेर असतो.माझ्या आईसारखचं तुलाही सगळं सांभाळावं लागेल."

"हो..मी एक विचारू का"

"विचार की..."

"ते..तुम्ही... सायशा... खरं आहे का?"

"तुम्ही मुलीपण ना..",सक्षम जोरात हसायला लागला.

"नाही गं...ते सगळं विरोधक करत असतात.राजकारणात असं चालुच राहतं."

"पप्पांना फोन करायचा का?"

"हो करतो..",नेहाची लगबग पाहुन सक्षमने लगेच मोहीत्यांना फोन केला.

"यापुढे आता हे पाश्चिमात्य कपडे सोडा.आपली संस्कृती जपा.बघा जमलं तर."

नेहाला थोडसं ऑकवर्डच झाले. ती काहीच न बोलता वडीलांची वाट पाहू लागली.पण तिच्या हातांची चुळबूळ, आवाजातला कापरेपणा यातून तिचं अवघडलेपण सक्षमला स्पष्ट जाणवत होते.एका क्षणासाठी सक्षमला सायशाच्या राहणीमानाचीच आठवण येऊन गेली.नेहमी फुलबाह्यांचे पंजाबी ड्रेस,त्यावर रंगीबेरंगी स्टोल,एका छोट्याशा क्लचने काहीसे अडकवलेले केस,काळेभोर डोळे आणि मंद स्मितहास्य. पण पुढच्याच क्षणी तो भानावर आला. मोहीते येताच नेहा पटकन गाडीत बसून निघून गेली.

सगळचं अचानक झाल्याने नेहा जरा हादरूनच गेली.रात्रभर झोपही आली नाही तिला.सकाळी उठल्यापासूनच ती फेशियल, ज्वेलरी,साडी यांत अडकली.त्यातच सासुबाईंचा फोन आला.

"हँलो,झाली का तयारी.संध्याकाळी मिडीयासमोर उभं रहायचं आहे अशी तयारी करं.बसं हेच सांगायला फोन केला तुला.आजपासून देशमुखी सांभाळायचीय तुला.लक्षात ठेव."

"हो हो..आलं लक्षात."

सासुबाईंचा फोन ऐकून नेहा अजूनच घाबरली.पण मोहीते परीवाराचा आनंद गगनात मावत नव्हता.संध्याकाळी पाच वाजले.देशमुख कुटुंबिय मोहीत्यांकडे आले.जांभळ्या रंगाची सुंदर पैठणी,कंदाच्या फुलांचे गजरे,सोज्वळ मेकअप ,केसांचा जुडा व बांगड्या आणि पैंजण यांची सारखी रूणझुण घेऊनच नेहा हॉलमध्ये आली.सक्षमतर काहीवेळ तिच्याकडे एकटक बघतच राहीला.वडीलधाऱ्या मंडळीत नेहामात्र मान वर करून सक्षमकडे बघु शकली नाही. जेवणाचा कार्यक्रम पार पडला.लग्नाची तारीख ठरली.छोटेखानी साखरपुडा झाला. रात्री आठ वाजता सक्षम व नेहा दोघांनी दुसऱ्या मजल्यावरील गँलरीतून पत्रकारांना अभिवादन केले व साखरपुडा झाला असे जाहीर केले.सगळं कसं सुरळीत चालू होतं.त्याचवेळी मिडीयातुन सक्षमव नेहाचं फोटोशूट झळकु लागले.सक्षम व नेहाचा विवाह हा अरेंज मँरेज नसून लव मँरेज आहे असं दाखवण्यात आले.त्यामुळे सायशा प्रकरण वाऱ्यासारखं उडून गेलं.

"आठवण नाही आली आमची",सायशा अतिशय मादक स्वरात बोलत होती.

"कोण,सायशा...आहे की आठवण.पाठवतोय पत्रिका.या लग्नाला."

"लवकर निर्णय घेतला लग्नाचा"

"वय वाढत होतं म्हणून घेऊन टाकला.काही गोष्टी विशिष्ट वयातच केलेल्या बऱ्या असतात."

"अभिनंदन तुमचं.पण तुमच्या मनात माझी जागा कोणीही घेऊ शकणार नाही हे लक्षात ठेवा."

"आत्मविश्वास आवडला आम्हाला तुमचा.या लग्नाला."

महीनाभरातच शाही विवाह सोहळा पार पडला.नेहा मुख्यमंत्र्यांची सुन झाली. साहजिकच तिच्या मनावरचे दडपण वाढले होते.नेहाचं सौंदर्य व डॉक्टर म्हणून असलेला व्यक्तीमत्त्वातील रूबाब सक्षमला आकर्षित करत असे.त्यामुळे साहजिकच तो नेहाकडे खेचला जात होता.हळूहळू नेहामधील अवघडलेपण कमी झाले.ती देखील सक्षममध्ये एक चांगला मित्र शोधु लागली.

"मी काय म्हणतो,सुटी वाढवा तुमची हॉस्पिटलमध्ये"

"पंधरा दिवस झाले आता..हजर होऊ द्या की कामावर आता."

"मी सांगितले ना सुटी वाढवा.सतीनारायण झाले, कुलदेवता दर्शन झाले, पाहुणचार झाले... आता महाबळेश्वर जाऊ आपण उद्या."

नेहाला काय बोलावे तेच समजले नाही. ती चहाचा कप हातात देऊन निघून गेली.दुसऱ्या दिवशी पहाटेच सक्षम व नेहा महाबळेश्वरला गेले.

"काहो,इतक्या जवळ का आणलं फीरायला"

"तु पाहीलयं का महाबळेश्वर?"

"नाही"

"मी पण नाही पाहीलयं.मग का म्हणून दुसऱ्या राज्यात टुरीझम करायचं.आधी आपला महाराष्ट्र तर पुर्ण पाहुन घ्यावा की नाही."

नेहा नेहमीप्रमाणेच काहीही प्रत्युत्तर न देता शांत झाली. सक्षमला मुळात तिचं हे वाद न घालणचं खुप आवडत होते.दोघांनीही आपला मधुचंद्र खुपच एन्जॉय केला.घरी येताच दोघेही आपल्या कामात अडकले.

एक दिवस अचानकच एका रात्री बातम्या झळकु लागल्या. कदम तात्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.त्यामुळे सर्वच राजकीय वातावरण गढूळ झाले. सायशा अंत्यसंस्कार करण्यासाठी केरळहुन मुंबईला आली.वडीलांचे प्रेत पाहुन तिच्या मनात विचारांचं थैमान चालु झाले.

"या माणसाने आयुष्यभर लोकांच्या सुपाऱ्या दिल्या आणि आज त्याचीच कोणीतरी सुपारी देऊन हत्या केली.आयुष्यात सतत उंच आवाजात बोलणारे कसे निपचित पडलेत.एका राक्षसाचाच जणू अंत झाला आहे.दोन्ही हात बांधलेत.पाय बांधलेत प्रेताचे.नियती खरोखरच श्रेष्ठ ! इतकं लाचार बनवणं या माणसाला जिवंतपणीतरी शक्य नव्हतं.मेरी सुनो प्रव्रुत्ती ...होती.विशेष म्हणजे धुलीवंदनाच्या पुर्वसंध्येलाच कशी ज्योत मावळली !खुपच आवडता सण होता त्यांचा ! का निव्वळ योगायोग असावा हा!आयुष्यात कधीकधी काही गोष्टींचा उलगडाच होत नाही हेच खरं.हत्या होण्याअगोदर एक दिवसापुर्वीच ते आजीआजोबांना भेटायला गेले होते.बालपणीचे मित्र,गावपरीसर सर्व न्याहाळून आले होते.जणुकाही जायची वेळ झाली आहे याची कुणकुण लागलेली होती.अनाकलनीय आहे सगळं!..जाऊ द्या मेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलु नये हेच खरं!",सायशा मनातल्या मनात स्वतःशीच संवाद साधत होती.

सायशाची आई सायलीताईदेखील एकटक प्रेताकडे बघत होत्या.गेला एकदाचा ....म्हणून मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी हायसं वाटत होतं त्यांना. सायलीताई एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होत्या. कॉलेजमध्ये असताना कदम अण्णा त्यांच्या सौंदर्यावर भाळले.पण पुढे जाऊन हेच त्यांच सौंदर्य त्यांच्यासाठी अभिषाप बनले.या सुंदरतेमुळेच कदम अण्णा सायलीताईना कोणत्याही पुरूषाशी बोलु देत नव्हते.घरातील नोकरवर्ग पण बहुतांश स्त्रियाच होत्या. सायलीताईंचा फोनदेखील सतत कदम अण्णा तपासत असत.माहेरी जाण्याची तर त्यांना मुळीच परवानगी नव्हती.अण्णांची आज्ञा ऐकली नाही तर रात्री अण्णा सायलीताईंना मारत असत.गालावर हाताची बोटे स्पष्ट दिसत.मग सायलीताई आठ दिवस खोलीतच चेहरा लपऊन बसत.नेहमी फुलबाह्यांचे ब्लाऊज व साडी,विनामेकअप,मोजकचं बोलणं आणि हसणंतर मुळीच नाही.. अशीच अवस्था होती थोडक्यात. सायलीताईंचा मेकअप हा फक्त बेडररूममध्येच होत असे.बेडरूममध्ये त्यांना पाश्चात्त्य कपडे घालण्यासाठी कदम अण्णा उलट जबरदस्ती करत.कदम अण्णांच्या या पिंजऱ्यात जीव गुदमरुन गेला होता सायलीताईंचा. आज अखेरीस सुटका झाली.

आज संध्याकाळी अंत्यसंस्कार झाले. रात्री सगळ्या कार्यकर्त्यांच्या स्टेटसला बाबाच दिसत होते.पहाटे पाच वाजताच धुलीवंदनाच्या धुळवडीचे स्टेटस झळकू लागले.एका रात्रीत नाव या प्रुथ्वीतलावरून गायब झाले. दोन दिवसांत लोक कोण कदम म्हणून विचारतील?हेच खरं....।कदमांच्या पक्षाची धुरा कदमांची एकुलती एक कन्या सायशाकडे आली.सायशा राजकारणात नवीन होती.शिवाय सक्षमची ओढही कमी झालेली नव्हती.सायशाने देशमुखांनाच पाठींबा कायम ठेऊन सरकार स्थिर ठेवले.पक्षीय बैठकीत सक्षम व सायशा समोरासमोर आले.

"नमस्कार सक्षमराव"

"नमस्कार"

"मोकळ्या झालो आता आम्ही. कोणी प्रश्न विचारत नाही आम्हाला आता.बंधन संपली सगळी.या बंगल्यावर संध्याकाळी.",सायशा एकदम अधीर होऊन बोलत होती.सक्षमनेही तिला कडकडून मिठी मारावी असचं तिला मनापासून वाटत होतं.

"नक्कीच"

सायशाचं मन मोडणं आता परवडणारे नव्हते.आता चारीत्र्यावर शिंतोडे उडाली तरी चालतील पण सायशाबाईचा मान राखणं गरजेचं होतं.ठरल्याप्रमाणे सक्षम संध्याकाळी बंगल्यात पोहोचला.लालभडक साडी,त्यावर काळ्या रंगाचं स्लीवलेस ब्लाऊज,मोकळे केस,हलकासा मेकअप,डीओचा मंद सुगंध...एकही दागिना नाही तरीही ती आकर्षक दिसत होती.सक्षमला स्वतःकडे आकर्षित करण्यासाठीच ती तयारी करून बसली होती.सायशाचे हे रूप अतिशय मोहक होतं पण सक्षमसाठी अनपेक्षित होते.कारण आजपर्यंत त्याने तिला केवळ फुल बाह्यांच्या पंजाबी ड्रेसमध्येच पाहीलेले होते व तेही कधीच खांद्यावरची ओढणी खाली पडू न देता.आजचा तिचा श्र्रुंगार केवळ सक्षमसाठीच होता.

"या या सक्षमराव..",एक सेकंदही सायशाची नजर सक्षमच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती.पक्षीय बैठकीतही ती एकसारखी न राहऊन सक्षमकडेच बघत होती.त्याचा चेहरा तिला कायमस्वरूपी डोळ्यात भरून घ्यायचा होता.

सक्षम थोडासा बेचैन होता.काय करावं ते समजत नव्हतं.पण हाती आलेली सत्ता पाच वर्ष टीकवायची होती.म्हणून सायशाच्या कलाने घेणे स्वाभाविक होते.

"काय म्हणतेस?"

"काही नाही. मला राजकारणात काहीही इंटरेस्ट नाही. मला जे हवयं ते देत रहा.माझा पक्ष सदैव तुम्हाला पाठींबा देत राहील."

"खरं सांगु.लग्न कर व नवीन सुरूवात कर.माझ्यासाठी मनातल्या मनात कुढु नकोस.मी तुझाच होतो आणि आजही तुझाच आहे."

"तुम्ही वरचेवर येत रहा.बसं.आणि काही नको."

संध्याकाळची रात्र झाली.सायशाच्या हालचाली त्याला घायाळ करत होत्या. प्रेमतर त्याचंही होतं तिच्यावर. फक्त परिस्थितीने साथ दिली नव्हती.शिवाय तो एक पुरूषच होता.समोरची स्त्री स्वतःहून समपर्ण करायला तयार असल्यावर तो तरी कसा स्वतःवर नियंत्रण ठेऊ शकेल? रात्रीची पहाट झाली. दोघांनाही वेळ समजली नाही आणि नात्याची मर्यादाही पाळली गेली नाही. सायशाला जे स्वर्गीय सुख हवं होतं ते अखेरीस मिळाले.काही प्रमाणात तिचं मन शांत झाले.सक्षम वरचेवर बंगल्यावर हजेरी देऊ लागला.राजकारणात उलटसुलट चर्चा चालू झाल्या.पण मुख्यमंत्र्यांनी खुर्ची टीकून आहे म्हणून डोळे मिटून घेतले.

सायशाची आत्यादेखील घरात कुरकुर करू लागली.भाऊ होता तोपर्यंत ती घरात चोरासारखी रहायची पण कदमअण्णांची हत्या झाल्यापासून तिची जीभ जरा जास्तच चरचर करायला लागली होती.

"पोरगी काय दिवे लाऊन राहीली घरात...आणि आईला काही चिंताच नाही. कदम घराण्याचं नाव धुळीत मिळवायला निघाल्या आहेत तुम्ही... आज भाऊ राहीला असता तर ढसाढसा रडला असता.",आत्या सकाळी सकाळी नाश्त्याच्या टेबलवर चरचर करत होती.

"रडलाच असता ..आत्या ..तुझी नाटकं पाहून.स्वतःला विधवा बाई म्हणवते आणि सारखी त्या अपार्टमेंट मध्ये तोंड ताणते.काय असतं गं तुझं दिवसभर मागच्या गँलरीत.पेपर वाचायला, फोनवर बोलायला, गाणी ऐकायला..खोलीत नाही बसता येत का?घरात एवढे नोकर असताना कचरागाडी आल्यावर कचरा टाकायला तु एवढी तुरूतुरू का पळते...आम्हाला काही समजत नाही का?जिनके खुदके घर शीशेके होते है वो दुसरोंके घरोपें पत्थर फेंका नहीं करते.तसंही तुमचे दिवस भरले या घरातले.गावाकडे निघायचं.आजोबांकडे.सेवा करा वडीलांची थोडी म्हातारपणात. तेवढचं पुण्य मिळेल."

"सायशा...",सायलीताई मध्येच बोलु पाहत होत्या.

"आई,माझ्या.व सक्षममध्ये.जो येईल तो आयुष्यातून असाच उठेल.मला केरळला पाठवायचं याच बाईने सुचवलं होतं बाबांना.मला माहीती आहे सगळं.भरला तिचा पापाचा घडा.जाऊ दे आता.अजून कीती दिवस तिचा सासुरवास सहन करायचा आहे तुला."

"बस..बस..झाला तितका अपमान पुरा झाला. चाललीच मी.येते वहीनी.वेळीच आवर या बायजाला.नाही तर जगात कुठे तोंड दाखवायला जागा राहणार नाही."

आत्या संतापात गावाकडे निघून गेली. नेहालापण सायशा सक्षमची जवळीक सहन होत नव्हती.वाईट वाटत होतं.पण हा तिढा न सुटणारा होता.सक्षमची सायशाकडे ओढ खुर्चीसाठी होती की मनापासून होती.एकेकाळी तिच्याशीच प्रेमविवाह करणार होते ते..पण परिस्थितीने दुर झालेले होते.नेहाला सक्षमजवळ काहीच बोलता येत नव्हते पण मनातल्या मनात ती उदास होती.कारण कोणत्याही स्त्रीला तिचा नवरा दुसऱ्या बाईसोबत सहन होत नाही. सक्षम आणि नेहाच्या लग्नाला जेमतेम सहा महीने झाले होते.तेवढ्यातच हे सर्व प्रश्न निर्माण झाले.

सायशाच्या मातोश्री सायलीताई मुलीच्या वागण्याने चिंताग्रस्त झालेल्या होत्या. कार्यकर्ते नाराज होत होते.त्यामुळे त्यांनी स्वतःहून सायशाशी बोलायला सुरुवात केली.

"काय हा वेडेपणा.सक्षमराव डोक्यातून काढा आता.आपल्या वडीलांचा वारसा चालवायचा आहे तुम्हाला.कार्यकर्ते तुमच्या कडे आशेने बघत आहेत आणि तुम्ही सर्व शुन्य करायच्या तयारीत आहेत."

"आम्ही काय करतोय आम्हाला चांगलचं माहीती आहे.तुमचं नाव आणि प्रतिष्ठा सांभाळण्यातच आयुष्य गेलं आमचं.आता थोडसं जगु द्या आम्हाला आणि तुम्हीही जगा.पप्पांमुळे तुम्हाला कधी माहेरच्या लोकांसाठी काहीच करता आलं नाही. माहेरी जाऊन या आठ दिवस. एखाद्या पार्लरमध्ये जाऊन स्टेप कट करून घ्या.पंजाबी ड्रेस वापरत जा.लग्नसमारंभात,उत्सवात मनसोक्त नाचत जा.मनसोक्त खळखळून हसत जा.फाडा हा बुरखा राजकारणाचा.पप्पांमुळे खुप काही करायचं राहून गेले आहे तुमचं आयुष्यात. स्वतःसाठी जगा.या तुम्ही. आमची चिंता करू नका.कदमांचा पिढ्यानपिढ्या चाललेला पक्ष कधीच धुळीस मिळणार नाही. लवकरच आपण खुर्ची मिळऊ.वचन आहे आमचं."

"मी काय म्हणते..जाधवांच्या मुलाचं स्थळ आलयं.तुलाही सोबत होईल शिवाय पक्षासाठी पैसाही मिळेल.विचार कर."

"आई...नको तो विषय..या तुम्ही"

सायलीताई उदास मनानेच खोलीतून बाहेर पडल्या.पण विचारतर त्या ही करू लागल्या. नवरा असतो तोपर्यंत खरचं कीती बंधनात राहते स्त्री.तो सोबततर देत असतो पण त्यापेक्षा त्याचा धाक व दराराच जास्त असतो.त्यामुळे कधीतरी काहीवेळा तो नसलेलाच बरा असंच वाटून जाते की!सायशा सांगते तेच खरं..हा विचार करत करतच त्या झोपी गेल्या. सकाळ होताच माहेरी निघून गेल्या.आता घरातून आईही निघून गेली.सायशा आता दिवसभर राजकारणाचे फड रंगऊ लागली तर रात्री सक्षमसोबत गाजऊ लागली.सक्षमचं रात्रीचं स्वतःच्या घरी जाणं हळूहळू बंद होतचं आलं.साहजिकच सक्षमची रखेल म्हणूनच सायशाचा उल्लेख होऊ लागला.पण तिने चालू केलेल्या समाजसेवेच्या व्रतापुढे ही बदनामी झाकली जात होती.

सायशा गरीबांच्या झोपडीत फीरत होती.त्यांच्या हक्कासाठी लढत होती.हळूहळू अख्खा महाराष्ट्र तिने पिंजून काढला.वक्तृत्व देणगी म्हणून वडीलांकडून मिळालेले होते.त्यामुळे साहजिकच कार्यकर्ते पक्षाकडे खेचले जात होते.वर्षभरातच ती उत्तम राजकारणी म्हणून उदयास आली.साहजिकच स्वाभिमानी पक्ष आम्हाला पाठींबा द्या ,तुम्हाला मुख्यमंत्री बनवतो म्हणून मनधरणी करू लागला.

"नमस्कार ,सायशाताई"

"नमस्कार, आज कसं येणं केलं कुलकर्णींनी"

"मुद्द्याचचं बोलतो.अजून अडीच वर्ष निवडणूक नाही. हे सरकार पाडूया.आपण सव्वा वर्षाप्रमाणे वाटून घेऊया."

"काहीतरीच काय..असं पाठीत खंजीर खुपसणं आम्हाला जमणार नाही. माफ करा.या तुम्ही."

सायशाने पक्षातील ज्येष्ठ सल्लागार तात्यांची भेट घेतली.

"तात्या, अडीच वर्ष वेळ आहे आपल्याला. पुढची पाच वर्ष आपणच एकहाती सत्ता घेणार.काय म्हणता?"

"तु फक्त झपाटून जनतेची सेवा कर.तुझी खुर्ची तुला मिळालेच.मी तुझ्यासाठी कार्यक्रम आखतो.तशा बैठका घे व काम कर.यश तुझेच आहे.पण सक्षम प्रकरणाचे काय..."

"या समाजाला प्रख्यात गुंड,वेश्या ,नक्षलवादी... मंत्री म्हणून चालतात...माझं सक्षम प्रकरण आहे तरी केवढं."

"हजरजबाबी आहेस"

"येते तात्या, पप्पा तुम्हाला एवढे का मानायचे ते आज समजले."

सायशाने आता स्वतःला जनतेसाठी वाहून घेतले.सक्षमपेक्षाही तिची लोकप्रियता आधिक वाढू लागली.सक्षमशी तिचं भेटणंही कमी झाले. पण सक्षमला अजूनही असचं वाटतं होतं की पुढच्या वर्षीही सायशा व आपली युती होऊन आपण पुन्हा सत्तेतच राहणार.सायशा सक्षमकडून आपल्या नाजूक भेटींमधून त्याची रणनीती काढून घेत होती व त्याप्रमाणे पावलं टाकत होती.तात्यांनी सायशाला विक्रम जाधवांचा प्रस्ताव स्विकारण्यास सुचवले.

"हे बघ सायशा,तु मला माझ्या मुलीसारखी. आयुष्यात जोडीदार हवाच.सक्षमराव दिवसाच्या उजेडात कधीच तुम्हाला स्विकारणार नाहीत. तुमचे संबंध असतील पण समाजाच्या मर्यादाही आहेत.तुम्ही विक्रमशी विवाह केला तर ...पक्षाला आर्थिक मदत होईल.शिवाय विक्रम उद्योजक आहेत.ते सक्रीय राजकारणात कधीच येणार नाहीत. उलट आयुष्यात सदैव तुम्हाला पाठिंबा देतील."

"बरोबर आहे तुमचं तात्या.भेट घडवा आमची.मी तयार आहे."

दुसऱ्याच दिवशी तात्यांच्या फॉर्महाऊसवर दोघेही भेटले.

"नमस्कार, या विक्रमराव.आता मीच सायशाताईंच्या वडीलांच्या जागेवर आहे.त्यामुळे तुम्हाला इथे बोलवले आहे.तुमचा लग्नाचा प्रस्ताव आम्हाला मान्य आहे.पण तरीही तुम्ही दोघं बोलुन घ्या.येतो आम्ही. लंचची सोय केली आहे.दोघांनी जेऊनच जा."

सायशा व विक्रमची नजरानजर झाली. सायशाने पटकन नजर खाली केली व विषयाला सुरूवात केली.

"तुम्ही एवढे गर्भश्रीमंत... तरी तुम्ही आम्हाला मागणी का घातली?आमचा इतिहास तर तुम्हाला माहीतीच असेल.तरी लग्नाची मागणी घातली आम्हाला.'

"आवडतात तुम्ही आम्हाला. मनापासून. तुमच्या वडीलांची हत्या झाली होती तेव्हा आलो होतो तुम्हाला बंगल्यावर भेटायला. त्या दिवशीच मनात भरल्या तुम्ही. म्हणून पाठवला प्रस्ताव लग्नाचा.तुमचा इतिहास हा इतिहासच राहील.आम्ही तर वर्तमान आणि भविष्य आहोत तुमचे.आवडती गोष्ट मिळवण्यासाठी माणूस कसाही वागतो हे काही तुम्हाला वेगळं सांगायचे का?'

सायशाला विक्रमच्या बोलण्यातला खरा अर्थ समजला.त्यामुळे तिनेही जुना विषय सोडून साखरपुडा व लग्नाच्या तारखा काढून घेतल्या।

"शेवटचे सहा महीने राहीले आता.शेवटी शेवटी तरी बंगल्याची वारी बंद करा.ती बाईच यावेळी कट्टर विरोधक आहे आपली."

"काहीतरीच...पप्पा. कालची आलेली ती पोर..तिला कोण मतदान करणार"

"मुख्यमंत्री केवळ एसी हॉलमधे बसून निर्णय घेतात.त्यांना शेती,उद्योगधंदे यांचे कवडीचे ज्ञान नाही. आणि त्यांचे पुत्रतर रात्रंदिवस केवळ गाड्याच फीरवतात...मग तळागाळातील जनतेसाठी काम करतोय कोण?......",सायशा भाषणात बोलत होती.मुख्यमंत्र्यांनी विडीओ सक्षमच्या अंगावर फेकला.

"बघतोच तिला..बंद आजपासून वारी बंद."

सक्षमने संतापात सायशाला फोन केला.पण ती फोन उचलत नव्हती.शेवटी न राहऊन तो बंगल्यावर पोहोचला.

"मी काय गाड्या फीरवतो का दिवसभर..मग कशाला तोंड ताणते माझ्यावर रात्रभर"

"एवढा संताप... हे राजकारण आहे सक्षमराव..इथे एकमेकांविरुद्ध बोलावचं लागतं.आम्हाला पण खुर्चीवर बसायचं आहे की.या खुर्चीमुळे आम्हाला आमचं प्रेम मिळालं नाही की बापाचं प्रेम मिळालं नाही.म्हणून आता खुर्चीवरच प्रेम झाले आम्हाला."

"पुन्हा कधी आमंत्रण देऊ नका आम्हाला फक्त यापुढे बंगल्यावर... येतो."

सक्षम कायमचा हातातून गेल्याने सायशा थोडी नाराजच झाली. पण दुसऱ्याच दिवशी विक्रम जाधवांशी साखरपुडा होऊन तिच्या पदरावर लागलेला सक्षमचा डाग कायमचा पुसला गेला.सायशाच्या साखरपुड्याची बातमी ऐकून सगळ्यात जास्त आनंद झाला तो नेहाला!तिचा नवरा आज तिला परत मिळाला.सक्षममात्र मनाने जखमी झाला. आपली व नेहाची साखरपुड्याची बातमी ऐकून सायशाचे काय झाले होते त्याला आज समजले.आज त्याने सायशाला न राहऊन फोन केला.

"बातमी वाचली.अभिनंदन.दुरचं जायचं होतं तर जवळ आलीच का इतकी?"

"हेच मी पाच वर्षांपूर्वी म्हणत होते.का नाही भांडले तेव्हा माझ्यासाठी?बापाच्या खुर्चीसाठी माझा बळी दिला तुम्ही. विसरा आता.नवी सुरुवात करा."

सक्षमला स्वतःचीच जुनी वाक्य आठवली व तो निशब्द झाला.निवडणुकीचे फड रंगले.सायशाने मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली.अखेरीस सायशा बहुमताने निवडून आली.महाराष्ट्रात स्वाभिमानी पक्षाची एकहाती सत्ता बसली.बिनबापाची पोर,सामाजिक कर्तृत्व, करारीपणा,हुशारी..व जमिनीशी नाळ या गोष्टी विजयाला कारणीभूत झाल्या. अखेरीस सायशा मुख्यमंत्री झाली. एक दिवस सक्षम मला भेटायला येईलच असं तिला मनापासून वाटत होते.आणि तो दिवस उजाडला.

"नमस्कार, सायशाताई.ओळखीच्या लागत नाही तुम्ही आता."

"मी तीच आहे.शेवटपर्यंत तीच राहील.तुझ्यासाठी. तुझ्या कोणत्याच कामासाठी कधीच नकार देणार नाही या खुर्चीवर बसून.शब्द आहे माझा तुला."

"बापरे..एवढं प्रेम...जाधव ऐकतील की"

"स्त्रिया आयुष्यात एकचदा प्रेम करतात आणि शेवटपर्यंत निभावतात. पुरूषांसारखे या फुलावरून त्या फुलावर नाही उड्या मारत."

"मी तुझ्यासाठी नेहाला दूर केले..".

"चुक,तु बापाच्या खुर्चीसाठी मला एका क्षणात दुर केले व नेहाला जवळ केले."

"कारण आपला विवाह होणं शक्य नव्हते. दोन्ही कुटुंब कधीच तयार झाले नसते."

"मी सक्षमची बायको झाले नाही.. पण रखेल झाले.. हे बरं चालून गेलं..तुझ्या बापाला."

"सायशा.....तु रखेल झाली तुझ्या मर्जीने."

"पण मला लग्नाची बायको व्हायचे होते ना.मनापासून प्रेम केलं होतं मी.मला घर सोडून तुझ्या घरी यायचं होतं.पण तु संधीच दिली नाहीस.",सायशाच्या डोळ्यात आज पहील्यांदा पाणी आले.

सक्षमला पण आपली चुक समजली.आपण जर वडीलांना कदाचित थोडा विरोध केला असता तर आज नेहा,सायशा व त्याची अशी अवस्था झाली नसती.

"माझी बायको झाली असती तर चुल आणि मुलच केलं असतं.उलट माझ्यावरील प्रेमाने तु आज मुख्यमंत्री झालीस.महाराष्ट्र सांंभाळायचा आहे तुला आता.मित्र म्हणून कधीही हाक मार मला.आयुष्यात कधीच दगा देणार नाही तुला.शब्द आहे माझा."

"तुझ्यामाझ्यातला हा प्रेमाचा बेधुंदपणा असाच राहु दे सक्षम.याला कधीच कोणाची नजर लागु देऊ नको.विक्रम व नेहाला तर आपण न्याय देऊच पण सोबतच आपली मैत्रीपण जपु."

"बरं,येतो आम्ही. पत्रिका पाठवा.लग्नाला येऊ जोडीने नेहासोबत.पुन्हा नवी सुरुवात."

"आज सगळं मिळाले.वडीलांच्या कुळाचा मान राखला.पक्षाची शान राखली.समाजसेवेची संधी मिळाली.खुर्ची मिळाली.विक्रमसारखा समंजस जोडीदार मिळाला आणि माझा सक्षम माझाच राहीला.तो शरीराने जरी नेहासोबत असला तरी त्याच्या मनात कायमस्वरूपी मीच राहील.यासारखं दुसरं सुख नाही आयुष्यात. ",सायशा आज बऱ्याच दिवसांनी शांतपणे गादीवर शांतपणे लोळली होती व स्वतःशीच संवाद साधत होती.

बेधुंद

अर्चना पाटील
Chapters
बेधुंद