रंग प्रीतीचे
वडीलांच्या निधनानंतर हीमांशु क्षीरसागरकडे राजकारणात पुर्ण ताकदीनिशी उतरण्याशिवाय पर्याय राहीला नाही. हीमांशुनेपण कमी वयात सहजच पक्षाचा डोलारा सांभाळला.या कार्यात आई,आजोबा आणि पक्षातील ज्येष्ठ मंडळींचीपण त्याला दर्जेदार साथ मिळाली.सुरवातीच्या एक दोन महीन्यांतच त्याने सगळ्यांचेच मन जिंकुन घेतले आणि लवकरच त्याच्या मतदारसंघात तो आमदार म्हणून निवडुनपण आला.
"वयाच्या पंचविसाव्या वर्षीच तुम्ही मला आमदार बनवलं म्हणून मी तुमचा आभारी आहे.पण मला कधीही साहेब,दादा..म्हणून संबोधु नका.मी तुमचा हीमांशु आहे आणि मला शेवटपर्यंत हीमांशुच राहु द्या ही विनंती.मला कधीही तुमचा नेता समजु नका.मी तुमच्यातलाच एक आहे.मला महाराष्ट्रातलं लोकशाहीला मारक असलेलं राजकारण संपवायचं आहे आणि फक्त जनतेची सेवा करणारे शुभ्र राजकारण आणायचे आहे.आपले चोवीस तास जनतेलाच देणारे लोक विधानसभेत आले पाहीजे याची काळजी तुम्ही दरवेळी मतदान करतांना घ्या.पुन्हा सगळ्यांचे एकदा आभार मानतो आणि निरोप घेतो.जय महाराष्ट्र.",निवडणूक जिंकल्यानंतर हीमांशुचे मनोगत व्रुत्तवाहीन्यांवर झळकत होते.
जोशी कुटुंबिय टीव्हीसमोर एकत्र बसुन निकालाचा आढावा घेत होते.राज्यात कोणतं सरकार बसणार याविषयी चर्चा चालू होती.रात्री अखेर सत्ता स्थापन करण्यासाठी हीमांशुच्या पक्षाचीच मदत घ्यावी लागेल हे निश्चित झाले.त्यामुळे जोशी कुटुंबाच्या सतत हीमांशुकडे चकरा सुरू झाल्या.काही दिवसांतच सुधीर जोशी मुख्यमंत्री झाले. सत्ता स्थापनेनंतर हीमांशुने जोशी कुटुंबियांना जेवणाचे आमंत्रण दिले.
नियोजनाप्रमाणे जोशी सपत्नीक आपल्या मुलांसह जेवणाला उपस्थित राहीले.याच प्रसंगी अदविका आणि हीमांशुची पहीली भेट झाली.अदविका ग्रँजुएशन करत होती.पहील्याच भेटीत अदविकाला हीमांशुचे बोलणे,राहणीमान सगळं काही मनाला स्पर्श करून गेले.हीमांशुलापण तिचे घरी येणे कुठेतरी मनाला आनंदीत करून गेले.वडीलधाऱ्या मंडळींसमोर दोघांमधे बोलणे काहीच झाले नाही पण तरीही दोघांच्या मनात प्रीतीच्या गुदगुल्या झाल्या हे नक्की..हीमांशुपण नेहमी जोशींच्या घरी गेला की त्याची नजर आपोआपच अदविकाला शोधु लागे.अदविकापण हीमांशुचा आवाज येताच काहीतरी बहाणा करून हॉलमध्ये चक्कर टाकत असे.हळूहळू एकमेकांना वॉट्स अपवर सणउत्सवांच्या शुभेच्छा पण चालू झाल्या.रोज एकमेकांसाठी गुडमॉर्निंग आणि गुडनाइटचे स्टेटस लावणे सुरू झाले.
मुंबईत एका संग्रहालयात शिवकालीन संस्कृतीचे प्रदर्शन भरले होते.हीमांशु आणि अदविकाने दोघांनी त्या प्रदर्शनाला बरोबर पाच वाजता जायचे ठरवले.अदविका तिच्या एका मैत्रिणीसोबत पावणेपाचलाच येऊन पोहोचली.हीमांशुपण आपला नेहमीचा लवाजमा थोडासा कमी करून पाच वाजता प्रदर्शनात पोहोचला.साहजिकच दोघांची नजरानजर झाली आणि दोघांनी सोबतच प्रदर्शनाचा आनंद घेतला.पत्रकारांनापण दोघांचे सोबत प्रदर्शन पाहतांना फोटो मिळाले.एक दोन तासांतच ती बातमी व्रुत्तवाहीन्यांवर झळकु लागली.नवनिर्वाचित आमदार आणि मुख्यमंत्री कन्येच्या विवाहसोहळ्यापर्यंत बातम्या रंगु लागल्या.हीमांशु आणि अदविकामधील जवळीक समाजमाध्यमांच्या नजरेतुन सुटु शकली नाही. पण ही बातमी पाहुन जोशी कुटुंबिय आधिकच चिडले.
"तु जोपर्यंत अदविका सुधीर जोशी आहेस तोपर्यंतच तुला महत्त्व आहे हे विसरू नकोस.नाव कमवायला मनुष्याचे पुर्ण आयुष्य जाते आणि तुमच्यासारख्या कन्यारत्नांमुळे एका बापाची समाजाकडून पायमल्ली होते."
"अहो बाबा,पण मी केलं तरी काय आहे.हे टी.व्हीवाले राईचा पर्वत करत आहेत."
"समोरचा आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करू शकेल इतके बेजबाबदार वर्तन कशासाठी?आपण एका राजकीय घराण्यात जन्माला आलो आहोत.आपल्या कुटुंबातील एकाही गोष्टीचे आपण सामाजिकीकरण होऊ देत नाही. आजपर्यंत उभ्या आयुष्यात तुझी आई कधी कँमेऱ्यासमोर आली नाही आणि तु .....बाहेरच्या बारा कुत्र्यांना भुंकायची संधी दिलीस."
अदविकेच्या खोलीत सुधीर जोशी जोरजोरात बोलत होते.त्यांच्या आवाजामुळे सगळेच कुटुंबिय त्या खोलीत जमले.बाबांचा रोष पाहुन अदविकेच्या डोळ्यांतून अश्रु वाहु लागले.मनातल्या मनात कुठेतरी हीमांशुचं आणि माझं या विरोधापुढे कसं होणार?ही चिंता तिला सताऊ लागली.
"हे बघ अदविका,तुझ्या मनात त्या क्षीरसागरबद्दल काही असेल तर तु याच क्षणी विसरून जा.राजकारणात कधी कोणी सोबत असतं तर कधी विरोधीपक्षात.या चिखलात केव्हा कोणाचा बळी घ्यावा लागेल काहीही सांगता येत नाही.राजकारणात माणूस जितक्या उच्चपदावर असतो,तितकाच तो मेलेला असतो.तो फक्त शरीराने इकडेतिकडे भटकत असतो.हीमांशु क्षीरसागरचे पण एकदिवस तसेच होईल.हीमांशुपेक्षा श्रीमंत आणि उमद्या मुलाशी मी तुझं लग्न लाऊन देईल.",जोशी संतापात ताडताड बोलून निघून गेले.
"अगं ये पोरी,तुझा बाप आणि तो पोरगा वेगवेगळ्या पक्षातली माणसं.निवडणुकीत ती एकमेकांना शिव्या देतात ,एकमेकांवर नको नको ते आरोप करतात,तेव्हा तु कोणाची बाजु घेशील?कशाला स्वतःहून आगीत उडी घेतेस?आयुष्यभर नवरा की बाप या चक्रव्यूहात अडकशील.पुरूषाची जात फक्त स्वतःसाठीच जगते मग तो भाऊ,बाप की नवरा असो.आयुष्यभर लक्षात ठेव.",आजी पोटतिडकीने अदविकाला समजाऊ लागली.
हळूहळू सगळेच खोलीतून निघून गेले.रात्री दहा वाजता हीमांशुचा फोन आला.
"हँलो,काय करत आहात?"
इकडून अदविकाच्या तोंडातून शब्दच निघत नव्हते.डोळ्यांतून घळाघळा पाणी वहायला लागले.
"तुम्ही प्लीज मला आता कधीच फोन नका करू..."
"अहो पण तुम्ही रडत का आहात?"
"घरात सगळेच रागावलेत माझ्यावर. बाबांनी तर दुसरा मुलगा शोधण्याचीपण भाषा केली आहे."
"अहो पण,माझ्यात काय कमी आहे?"
"माहीत नाही, पण बाबांच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल असं मी आयुष्यात कधीही वागणार नाही."
"ठीक आहे,मी बोलेल तुमच्या बाबांशी.पण तुम्ही रडू नका.धीर धरा."
"सगळं संपलं आहे..डोळ्यातलं पाणीच थांबत नाही आहे तर मी तरी काय करू?"
अदविकाशी फोनवर बोलल्यानंतर हीमांशुपण निराश झाला. दुसऱ्या दिवशी सकाळीच तो मुख्यमंत्री बंगल्यावर येऊन पोहोचला.
"नमस्कार आबासाहेब"
"नमस्कार हीमांशुराव,आज सकाळी सकाळीच"
"हो माझ्यामुळे तुम्हाला खूप मनःस्ताप झाला, म्हणून माफी मागतो."
"अहो,नाही नाही.... मिडीया..पत्रकार ...आपल्याला काय नवीन आहेत का?यापुढे फक्त काळजी घ्या"
"हो नक्कीच, येतो मी"
जोशींच्या तटकतोड बोलण्याने हीमांशुनेपण काढता पाय घेतला.पण एक नजरतरी अदविका पहायला मिळेल म्हणून जीव कासाविस होत होता.जोशींच्या नजरेतून हीमांशुच्या मनातली कालवाकालव लपली नाही.तीन महीने झाले. पण आता हीमांशुचा संयमपण जाऊ लागला.मधुनमधुन अदविकाबद्दल बातमी मिळत होती.तिला कुठेच बाहेर जाऊ देत नाही आहेत,मोबाईल काढून घेतला आहे..वगैरे..वगैरे.मुख्यमंत्र्यांच्या जवळचीच माणसं मुद्दाम हीमांशुच्या कानावर या गोष्टी टाकत.हे प्रेमप्रकरण आता काही अंधारात राहीलं नव्हतं.हीमांशुचा उतरलेला चेहरा,मुख्यमंत्र्यांशी दुरावा सगळं काही राजकीय वर्तुळात चघळलं जात होतं.एका दिवशी सकाळीच हीमांशु मुख्यमंत्र्यांकडे जाऊन पोहोचला.
"नमस्कार आबासाहेब,माझ्याकडे कोणी वडीलधारी मंडळी नाही म्हणून मी स्वतः अदविकाचा हात मागण्यासाठी तुमच्या कडे आलो आहे.मी तुम्हाला शब्द देतो राजकारण आणि नात्यांची मी उभ्या आयुष्यात कधीही सरमिसळ होऊ देणार नाही. तुमच्या मुलीला मी माझ्या राजकारणापासून कायम दुर ठेवेल आणि त्याचबरोबर या प्रुथ्वीवर माझ्याइतकं प्रेम तिला दुसरा कोणीही देऊ शकणार नाही. एका बापासाठी कन्यादानाच्यावेळी फक्त मुलीचं सुख महत्त्वाचे असते की आपली प्रतिष्ठा ..समाज..?"असं पण मी रीतीरीवाजासह तिच्याशी लग्न करणार आहे त्यामुळे समाजाचा प्रश्नच येत नाही. त्यासोबतच तुमच्या सहमतीशिवाय लग्नासाठी कोणतंही चुकीचं पाऊल उचलणार नाही याचीही खात्री देतो."
"थांबा ,..ए तुषार ...अदविकाला पाठव"
अदविका घाबरत घाबरतच हॉलमध्ये आईसोबत आली.केस मोकळेच होते पण चेहऱ्यावरची रया गेली होती.हीमांशुला पाहताच अदविकाने नजर खाली करून घेतली.पण हीमांशु एक सेकंदपण डोळ्याची पापणी बंद करत नव्हता.सोफ्यापासुन थोड्या अंतरावरच त्या उभ्या राहील्या.
"बेटा अदविका,तुला यांच्याशी लग्न करायचे आहे का?"
"नाही",म्हणून टचकन डोळ्यात पाणी काढून अदविका हॉलमधून पळून गेली.
"हीमांशुराव तुम्ही अदविकाचं उत्तर ऐकलयं.दहा वर्षांनी तुम्हाला माझ्या खुर्चीवर बसायचं आहे.त्यामुळे आपल्या करीअरकडे लक्ष द्या"
हीमांशुचा नाईलाज झाला. निराश मनाने तो बंगल्यातुन बाहेर पडला.
हीमांशुने आज स्वतःहुन बोलणी केल्यावर जोशीपण विचारात पडले.अदविकाचे दुसऱ्याशी लग्न लाऊन दिले तरी हीमांशु नावाची भिंत कायमस्वरूपी त्या नात्यात राहील याची जोशींना खात्री होती.एक बाप म्हणून काय करावे त्यांनाही सुचत नव्हते.पण वर्षानुवर्षे विरोधी पक्ष असलेल्या घरात आपली पोरगी द्यावी कशी ?हेदेखील समजत नव्हते.जोशी अदविकाच्या खोलीत गेले.दरवाजा आतुन बंद करून घेतला.
"हे बघ बेटा,मुलीने चंद्र मागितला तर तिच्यासाठी चंद्र आणणारा मी बाप आहे.तर हीमांशु काही मोठी गोष्ट नाही. पण आम्ही दोघेही राजकारणात आहोत.आम्ही सतत एकमेकांवर आरोप करू...आमचे पक्ष कधी सोबत असतील तर कधी एकमेकांविरुद्ध. तु माझ्या शब्दाबाहेर नहीस पण तु आयुष्यभर मन मारून जगावे हे मला मान्य नाही. पण तुझा बाबा आणि तुझं प्रेम रणांगणात सतत एकमेकांविरूद्ध उभे असतील. त्यासाठी तुझी तयारी आहे का?"
"बाबा,तुम्ही मला समजुन घेतलं हेच माझ्यासाठी पुष्कळ आहे.राजकारण आणि नाती यांची सरमिसळ केली नाही तर सर्व शक्य आहे बाबा.राजकारणात अनेक लोक एकमेकांचे कट्टर शत्रु असतात तरी ते घनिष्ट मित्रपण असतात. अशी भरपूर उदाहरणं आहेत बाबा."
"मोठी झालीस आता तु.पुढची निवडणूक येण्याआधी तुझं लग्न लाऊन मोकळा होतो मी एकदाचा."
"बाबा.....",अदविका आता पुन्हा बाबासाठी रडु लागली
बाबा खोलीतुन बाहेर पडताच अदविकाने हीमांशुला फोन केला.
"हाय हँन्डसम, मी लवकरच येत आहे तुमच्या घरी"
"मुख्यमंत्री कन्यादानाला तयार झाले वाटतं...हो ना रडुबाई"
"हो...लग्नाच्या तयारीला लागा नवरदेव"
अर्चना पाटील
अमळनेर