जगण्यासाठीची कला : संगीत
पृथ्वीतलावर संगीत आवडत नाही किंवा संगीत विषयाशी आपला काहीच संबंध नाही असे म्हणणारा माणूस सापडणारच नाही. मानवाचे आयुष्य हे संगीताने व्यापले आहे. म्हणूनच तर 21 जून या दिवशी जागतिक पातळीवर संगीत दिन साजरा करण्यात येतो. जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणून संगीत पाया विषयाकडे पाहिले जाते.
गायन, वादन, आणि नृत्य या तिन्हींच्या संगमाला संगीत असे म्हटले जाते; हि संगीत विषयात शिकलेली पहिली व्याख्या. स्वर, वादी, काल, मात्रा, आरोह, अवरोह, आवर्तन अशा अनेक पारिभाषिक शब्दांचा शास्त्रीय संगीतात समावेश होतो. भारतीय संस्कृती ही प्राचीन संस्कृती असून तिला अतिशय समृद्ध असा संगीताचा वारसा लाभला आहे. लोक संगीत हा त्याचा अविभाज्य घटक आहे. लोक संगीत म्हणजे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी समूहाने गायलेले गीत.
महाराष्ट्रातील लोक हे संगीतात अभंग, भजन, भारूड, शेतकरी गीत, कोळी गीत, ओव्या अश्या प्रकारांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात याचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात:-
१) ओव्या, आरत्या यांसारखी सणाच्या निमित्ताने गायलेली गीतं.
२)पोवाडे, भजन, लावणी या प्रकारातील गीतं मोठ्या प्रमाणात गायली जातात.
भारतीय संगीतात अनेक प्रकारच्या वाद्यांचा समावेश होतो. काही वाद्ये स्वतंत्र सुद्धा वाजवली जातात तर काही वाद्ये फक्त साथीसाठी वापरतात.
तत्-वितत् वाद्ये म्हणजे तारा असलेली वाद्ये, सुषिर वाद्ये म्हणजे हवेच्या माध्यमातून वाजवली जाणारी वाद्ये, अवनब्ध वाद्ये म्हणजे चर्माच्छादित वाद्ये आणि घान वाद्ये म्हणजे धातू किंवा लाकडापासून तयार केलेली वाद्ये हे वाद्यांचे प्रकार आहेत.
संगीताचा अजून एक घटक म्हणजे नृत्य.
नृत्य म्हणजे मानवी अभिव्यक्तींचे रसमय प्रदर्शन.
यात डोळ्यांतून भावना प्रकट होणे फार महत्वाचे आहे तसेच हसरा व आनंदी चेहरा असणे ही गरजेचे असते.
भारतात शास्त्रीय नृत्ये दोन प्रकारात विभागली जातात:-
1) एकाहार्य प्रयोग
2)अनेकाहार्य प्रयोग
सर्वांनी मिळून आनंद, उत्साह व्यक्त करणे. साधे आकृतीबंध निर्माण करणे हा नृत्याचा उद्देश असतो.
भारतीय शास्त्रीय संगीताचा पाय म्हणजे "राग". राग हा थाटातून उत्पन्न होतो. तसेच रागाचे काही नियम असतात:-
1) राग हे रंजक असून ते गायले जातात.
2)त्यात कमीत कमी स्वरांचा प्रयोग केला जातो.
3)रागात षड्ज हा स्वर कधीही वर्ज नसतो.
4) याचे गायन किंवा वादन विशिष्ट वेळेला केले जाते.
काही राग - भूपराग, बिहाग, बागेश्री, भींपलास, यमन, दीपक हा गायल्याने दिवे लागले तर मल्हार हा राग आळवल्याने पाऊस पडतो असे म्हणतात.
वैज्ञानिक दृष्ट्या संगीताचा कसा वापर करून घेता येईल ह्यावर खूप संशोधन झाले. यातूनच एक गोष्ट पुढे आली ती म्हणजे विविध रोगांवर संगीतामार्फत उपचार करून ते बरे करता येऊ शकतात. आत्ता तर अगदी बालवयापासून ते उतारवयापर्यंतच्या कोणत्याही तणावग्रस्तांसाठी "म्युझिक थेरपी" हा सर्वोत्तम उपाय ठरू शकतो. संगीतातील मधूर स्वर जेव्हा कानावर पडतात तेव्हा आपचसूकच मनाला शांतता निर्माण होते. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांवर संगीताचे संस्कार व्हायला हवेत.
पण साधारणतः आपण पाहतो कि शाळेत संगीत विषय शिकवणाऱ्या एखाद्या शिक्षकास इतरांकडून पाहिजे तेवढी चांगली वागणूक दिसून येत नाही. कारण हा विषय सोडून बाकीच्या विषयांना जास्त प्राधान्य दिले जाते, भविष्यात फक्त त्यांचाच उपयोग सर्वत्र होतो असे सर्वांच्या मनावर काहीसे बिंबवले गेले आहे. याच कारणामुळे मुले निरस, एकलकोंडी व तणावाखाली गेलेली दिसून येतात. यावर उपाय म्हणून काही ठिकाणी अभ्यास करताना त्या खोलीत विशिष्ट प्रकारचे संगीत लावून ठेवण्याची पद्धती सुरु झाल्या आहे, आणि त्याचे अनुभवही फार सकारात्मक आहेत.
संगीत हा विषय फक्त मानवासाठी मर्यादित नसून तो वनस्पती आणि प्राण्यांमधेही हि महत्वाचा घटक आहे. संगीताने वनस्पती जोमाने बहरलेली दिसून येतात तसेच एका संशोधनाच्या माध्यमातून गायी-म्हशिंचे संगीतमय वातावरणात दूध देण्याचे प्रमाण अधिक दिसून येते.
एकटेपणा घालवण्यासाठी, एकाग्रता वाढवण्यासाठी आपण संगीत पद्धतीचा वापर करून घेण्याची फार गरज आहे. स्वरांची शक्ती हि फार मोठी असते त्याचा आपण सर्वांनी सद्उपयोग करून घ्यायला हवा. 'संगीत' म्हणजे जगण्याची एक सुंदर कला आहे हे सर्वांनी नीट समजून घ्यायला हवे.
- अनुश्री केळकर