गुढीपाडवा
ब्रह्मदेव एक दिवस ध्यान धारणा करत होते. त्यांनी सृष्टीरचनेचा विचार केला आणि भगवान विष्णुला सांगितले. भगवान विष्णुंना त्यांच्या ध्यान धारणेतुन कला स्फुरली आणि याच दिनी पृथ्वीची उत्तपत्ती झाली. असेही म्हणतात की याच दिवशी प्रभु श्रीराम रावणाचा संहार करुन सीता मातेला अयोध्येत घेऊन आले होते.
या दिवसाच्या आधी अमावस्येला घराची साफ-सफाई करतात. फाल्गुन मासातील शेवटच्या अमावस्येला घरातुन शक्य तितकी घाण-कचरा काढतात आणि एक नारळ ओवाळुन टाकतात. चैत्र महिन्याची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा. हिंदु शक हे चैत्र महिन्यात चालु होते. अजुनही कुणाच्या घरात आजी असेल तर तिच्या बोलण्यातुन कळेल की ही पुर्वीची लोकं चैत्र, वैशाख , भाद्रपद या महिन्यानुसार आपलं कॅलेंडर मनात सेट करतात. ते आजही प्रतिपदा, एकादशी, अमावस्या, पौर्णिमा असे दिवस मोजतात.
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. घरातले सदस्य सकाळी शुभमुहूर्त पाहुन एक गुढी उभारतात. गुढी साठी एका मोठ्या कळकाच्या काठीला स्वच्छ करतात. त्या काठीच्या टोकाला एक जरीची साडी बांधतात. त्याला एक बत्ताश्यांची माळ, पाच-सहा कडुलिंबाच्या काड्या, झेंडुच्या फुलांची माळ, आंब्याच्या डहाळ्या बांधल्या जातात. या कळकावर चांदीचा कलश उपडा ठेवतात. घरातील वडिलधारे व्यक्ती गुढीची पुजा करतात. गुढिला नारळ वाहतात. नैवेद्य म्हणुन पुराणपोळी, कडुलिंब आणि गुळ असे वाहिले जाते.
काश्मीरमध्ये हिंदू पंडितांचा नवरोह नावाचा सण या दिवशी असतो. या दिवशी सरस्वती देवीच्या मंदिरात जाऊन तिची पूजा करतात. घरातील महिला आदल्या रात्री एका ताटात थोडे उकळलेले आणि थोडे शिजवलेले तांदूळ, अक्रोड, मध, दही घेतात. फुले, रुपया,मीठ, दौत आणि लेखणी किंवा लेखनाचे साहित्य व नव्या वर्षाचे पंचांग ठेवतात. यामधे वचा नावाची औषधी वनस्पती आणि देवाची मूर्तीही ठेवलेली असते. या सर्व वस्तू समृद्धीचे प्रतीक मानल्या जातात. मुहूर्तावर उठून सगळे आरशात चेहरा पाहतात, आणि ताटात ठेवलेल्या या सर्व वस्तूंचे दर्शन घेतात. या थाळीचे दर्शन घेणे हा या दिवसाचा महत्त्वाचा उपचार आहे. थाळीतील तांदुळाचा साखरभात नंतर प्रसाद म्हणून वाटतात.
गुढी घराला नकारात्मक शक्तींपासुन वाचवते. गुढीपाडवा साजरा करण्याचे महत्वाचे कारण असे की, हिंदु हे सुर्यवंशीय आहोत. सुर्य हा अखंड शक्ती आणि जीवन म्हणजेच प्रकाश याचा स्त्रोत आहे.शिवाय प्रभु श्रीराम हे श्रीविष्णुच्या मानव अवतारातील गृहास्थाश्रमाचे उत्तम उदाहरण मानले जाते. त्यामुळे आपण या दिवशी सुर्य आणि प्रभु श्रीराम यांची पुजा-अर्चा करतो. यांना हिंदु धर्मामध्ये विशेष महत्व आहे. सुर्य हा जीवनाची सुरुवात करतो आणि निस्वार्थ भावनेने आपल्याला प्रकाश देत असतो. तसेच प्रभु श्रीराम हे मानवावतराती पुरुषोत्तम मानले जातात. त्यामुळे हिंदु धर्मात यांना आराध्य मानले जाते.
श्रीलंकेतही गुढीपाडव्या दिवशी नवे आर्थिक वर्ष सुरु होते. श्रीलंकेत या दिवशी नव्या वर्षातील पहिला आर्थिक व्यवहार केला जातो. याला 'काई विशेषम्' म्हटले जाते. या दिवशी लहान मुले वडिलधारीनां वंदन करतात. पुढील हंगामाचे नवे पीक घेण्याची सुरुवात म्हणून जमीन खणण्याचा आणि नांगरण्याचा छोटा विधी या दिवशी केला जातो. याला 'अरपुडु' म्हणतात. या दिवशी गावांमधील युवा मंडळ पारंपरिक खेळांच्या स्पर्धा भरवतात. गाड्याच्या शर्यती, नारळ फेकून खेळला जाणारा खेळ अशा स्पर्धा आयोजित होतात.
गुढीपाडवा आंध्रप्रदेशमध्ये उगादी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गौतमीपुत्र सत्करणी याने तत्कालीन आंध्रप्रदेशला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्याकाळी त्या प्रदेशात लोकतंत्र प्रस्थापित केले. या आनंदात तिथे गुढीपाडवा साजरा होतो. आठवडाभर आधी या सणाची पूर्वतयारी सुरू होते. घराची आणि अंगणाची स्वच्छता केली जाते. नववर्ष स्वागतासाठी दरवाजावर तोरण बांधतात. दारापुढे रांगोळी काढतात. नवीन कपड्यांची खरेदी, भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात. सकाळी अभ्यंगस्नान करतात. गरीबांना दान देतात..स्वयंपाकात पछडी (कोशिंबीर) करतात. काहीजण मंदिरात जाऊन देवदर्शन घेतात. पचडी या पदार्थात गोड, आंबट, तिखट अशा सर्व चवींचे एकत्रित मिश्रण असते. चिंच, कडुनिंबाची पाने, गूळ, मीठ, कैरी घालून हा पदार्थ तयार केला जातो. कडू-गोड आठवणींचे स्मरण रहावे ही यामागील प्रतिकात्मकता आहे असे मानले जाते. कर्नाटकात नवीन वर्षाचे पंचांगश्रवण करण्याची पद्धत आहे.
पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके शालिवाहन शकावर आधारित असल्यामुळे इतर काहीराज्यातकुठे कार्तिक प्रतिपदेला, तर कुठे मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानीत असले तरी शालिवाहन शक मात्र सर्वदूर रूढ आहे. या शालिवाहन शक आपल्याला विशेष वाटण्याचे कारण असे की, हा शक सुरू करणारा राजा शालिवाहन एक महाराष्ट्रीय होता. या शकाचा प्रारंभ म्हणजे गुढीपाडवा होय. यादिवशी पंचांग वाचन आणि सरस्वती पूजन केले जाते म्हणून नववर्ष प्रारंभाचा हा दिवस घरोघरी गुढी उभारून साजरा केला जातो.
गुढीपाडवा म्हणजे वसंत ऋतुचा पहिला दिवस. त्यामुळे शेतकर्यांसाठी हा दिवस काढणीचा दिवस म्हणुन साजरा केला जातो. गुढीपाडवा सदृश्य सण सार्या जगभरात साजरा केला जातो. अगदी सायबेरिया पासुन ते नेपाळ बलुचीस्थान या ठिकाणीही वेगवेगळ्या पद्धतीने चैत्र शुद्ध प्रतिपदेला सण साजरे होतात.कुठे काठीची पुजा होते तर कुठे काठी आणि वस्त्राची. ह्यावरुन कळते की इतर विचारधारांप्रमाणे हिंदु धर्म उथळ नसुन एक भक्कम पाया आणि पौराणिक इतिहास असलेला धर्म आहे.
पाडवा शब्द संस्कृत शब्द "प्रतिपदा" म्हणजे पहिला दिवस यावरून आलं आहे. गुढी म्हणजे "ब्रम्हध्वज". ईंद्रदेवाने पृथ्वीवरील राजाला कळक दिला होता. तो त्या राजाने ईंद्राच्या सन्मानार्थ भुमित पुरुन उभा केला. त्यावरील चांदीचा कलश म्हणजे घरामध्ये धन संपत्तीचा वर्षाव होवो याच प्रतिक आहे. जरीचे वस्त्र म्हणजे घरात समृद्धीचे प्रतिक आहे. कडुलिंब म्हणजे निरामय आरोग्य प्रतिक आहे. साखरेचे बत्ताशे म्हणजे घरातल्या नात्यांमध्ये गोडवा आहे. आंबा आणि झेंडु म्हणजे घरातील भरभराट आहे. या दिवशी वाटल्या जाणार्या कडुलिंब आणि गुळ या नैवेद्या मागे एक शास्त्र सांगितले जाते. भगवतगीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे आयुष्यात गोड सुख आणि कडु दुख ही समप्रमाणात येतात. त्याचेच प्रतिक म्हणुन कडुलिंब आणि गुळ दिला जातो.
ईंग्रजांनी त्यांचे कॅलेंडर वापरण्यास भाग पाडले असले तरी, हिंदु शके अजुनही अबधित आहेत. त्यानुसारच आपण सण साजरे करतो.