भाग १
मार्च महिन्यात पश्चिमेचे अल्हाददायक वारे सुरू झाले आणि थंडीचा जोर ओसरू लागला. नुकतीच माझ्या कॉलेजमध्ये मिड-सेमिस्टर परिक्षा होऊन गेली होती आणि अभ्यासातून मला थोडी उसंत मिळाली होती. चौदा तारखेला, म्हणजे शुक्रवारी कॉलेजचे गॅदरींग सुरू होणार होते, जे पुढे तीन दिवस चालणार होते. गॅदरींग म्हणजे माझ्यासाठी सुट्टीच!! मला तो धागडधिंगा फारसा आवडत नसे. पहिल्यापासूनच मी अशा अवांतर गोष्टींपासून दूर राहिलो होतो (कदाचित त्यामुळेच प्रत्येक वर्षी मी क्लासचा टॉपर होऊ शकलो). माझा कॉलेज गॅदरींग बुडवून मस्त घरी जाण्याचा बेत होता. पण नेहमीप्रमाणे अल्फाने मला जबरदस्तीने सांगलीत थांबायला लावले आणि मी घरी जाण्याचा प्लॅन रद्द केला.
"तू इथे असलास, की माझा वेळ कसा जातो कळत नाही बघ प्रभू. " त्याचे ठरलेले स्टेटमेंट!!
आम्ही गुरुवारच्या रात्री जेवण झाल्यानंतर फिरायला बाहेर पडलो होतो. गेल्या तीनचार दिवसांपासून आम्ही हा कार्यक्रम सुरू केला होता. विश्रामबागचा परिसर बऱ्यापैकी मोकळाढाकळा होता. रात्री दहानंतर तेथे फारशी रहदारी नसायची. अशा शांत वातावरणात छानपैकी वारं सुटलेलं असायचं. मग आम्ही फिरायला बाहेर पडायचो. मला फार अभ्यास नसेल तर आम्ही कधीकधी चक्क बारा वाजता रूमवर परतायचो. दिवसाचा हा भाग मला फार आवडायचा. अल्फाशी बोलताना मी कधीच कंटाळत नाही, त्यामुळेच मी त्याचा घरी न जाता त्याच्यासोबत राहण्याचा आग्रह डावलू शकायचो नाही.
"तू रूमवर रहायला यायच्या आधी मला एकटं रहायची सवय लागली होती. माझं बोलण्यास उत्सुक असलेलं तोंड तेव्हा मला बळजबरीने बंद ठेवावं लागायचं. पण तू आल्यानंतर मला माझी बडबड ऐकवायला एक आयताच बकरा मिळाला. आणि तूपण अगदी साधूसारखा शांत चित्ताने माझी सगळी बडबड ऐकून घेतोस. त्यामुळे आता तू घरी गेलास, की मला एकट्याला अगदीच घुसमटल्यासारखं होतं. तू नसलास की मी एक सुस्त,आळशी व्यक्ती बनतो. "
अल्फाच्या त्या बोलण्यावर मी हसलो.
" 'आळशी व्यक्ती बनतो' या तुझ्या विधानाला काही अर्थ नाहीये बरं का अल्फा. मी असलो तरीही तू एक आळशी व्यक्तीच असतोस!! "
"बरं.. 'जास्तच' आळशी व्यक्ती बनतो असं म्हण.. " मी त्याला शब्दांत पकडलंय, हे त्याच्या लक्षात आलं, " कसं असतं ना हे सगळं.. मला तर आपलं आयुष्य म्हणजे एखाद्या नदीसारखं वाटतं बघ. उगमाच्या ठिकाणी ते जन्म घेतं आणि मग त्याचा पुढच्या दिशेने प्रवास सुरू होतो. वाटेत शेकडो हजारो माणसे भेटतात, आई, वडील, नातेवाईक, मित्र.. आणि प्रत्येक व्यक्तिगणिक त्याचा प्रवाह रुंदावत जातो. ते हळूहळू मोठे होत जाते. शरीराने आणि मनानेही. आणि त्याला मोठे कोण करतात, तर हेच त्याला वाटेत भेटणारे लोक. ते आपल्याकडे येतात आणि आपल्यातच मिसळून जातात. पहा ना, एखाद्या व्यक्तिसोबत तू जर आयुष्याचा काही काळ व्यतित केलास, मग तो चांगला असो किंवा वाईट, त्याच्या आठवणी आयुष्याच्या शेवटापर्यंत तुझा एक अविभाज्य भाग बनतात, प्रवाहासारख्या. नदीतून जसा एकदा मिळालेला प्रवाह परत बाहेर पडत नाही, तशा आठवणी आपल्या डोक्यातून कधीच बाहेर पडू शकत नाहीत. फक्त विस्मरणात जातात काही काळासाठी.. आपली साथही तशीच. दोन भिन्न प्रवाह येऊन मिळालेत आणि आता ते आयुष्यभरासाठी आठवणी निर्माण करताहेत. छान आहे नाही का हे?? "
"होय.. खरंच.. " मीही भावनांच्या ओघात वाहू लागलो. मी सांगलीमध्ये पाऊल ठेवेपर्यंत कधी कल्पनाही केली नव्हती, की मी एका विक्षिप्त बडबड्या मुलासोबत एकाच खोलीमध्ये राहू शकेन, अॅडव्हेंचरस असे काही करेन आणि चक्क गुन्हेगार लोकांना पकडण्यात कोणाच्या उपयोगी पडेन. पण आता अल्फाची एवढी सवय लागली होती, की रात्री त्याची टकळी ऐकल्याशिवाय झोपच यायची नाही. आम्ही रूमवर सतत गप्पा मारत असायचो (मी आजपर्यंत ज्याच्याशी सर्वात जास्त बोललो असेन, तो निश्चितपणे अल्फाच असेल!!). त्यामुळे घरी गेल्यानंतर लोक एकदम कमी बोलताहेत, असं मला वाटू लागायचं.
रात्रीचे बारा वाजून गेले आणि आम्ही रूमकडे जाण्यासाठी परत फिरलो. शंभर फूटी रस्ता सताड रिकामा झाला होता आणि रस्त्यावरील दिव्यांच्या फिकट प्रकाशात आम्हाला पायांत सरकणाऱ्या आमच्या सावल्या दिसत होत्या.
"जरा जास्तच लांब आलो आज आपण, नाही का?? " अल्फा म्हणाला. खरंच विचार करता करता आम्ही बरेच लांब आलो होतो. तरी आम्ही मुख्य रस्त्यावरून चालत होतो म्हणून नशीब!! इथे एखाद दुसरं वाहन अधूनमधून येत जात तरी होतं. नाहीतर ती शांतता फारच भयाण वाटली असती.
"दिवसभर गजबजलेला हा रस्ता रात्री एवढा निर्मनुष्य होत असेल, यावर पटकन विश्वास बसत नाही. " मी म्हणालो.
"अगदीच निर्मनुष्य होतो असं नाही.. रात्री इथे काही खास लोकांचं राज्य असतं. " अल्फा मिश्कीलपणे म्हणाला. लांबून एक माणूस रस्त्याच्या कडेला बसलेला आम्हाला दिसला. तो आपल्याच धुंदीत काहीतरी बडबडत होता.
"दारुडे आणि वेडे!! " मी मान हलवत म्हणालो. तो रस्त्याच्या बाजूला बसला होता. आम्ही जवळ जाऊ तसा त्याचा आवाज मोठा मोठा होत होता, " हे महाशय नवीनच दिसतायत या राज्यात..!! आधी तरी या भागात कधी पाहिले नाहीये याला. "
"हो, खरंय. " अल्फाने मला दुजोरा दिला, " वेडा दिसतोय कोणीतरी हा.. "
"राक्षस.. भयानक राक्षस.. " त्याचे बोलणे आम्हाला ऐकू येत होते, " त्याने मारून टाकले.. खून केला.. जाळून टाकले!! खूनी आहे तो.. "
अल्फा आणि मी विचित्र नजरेने एकमेकांकडे पाहिले.
"राक्षस परत येणार आहे.. तो मला मारून टाकणार आहे... तो सर्वांना मारून टाकणार आहे!! " त्याची नजर आमच्याकडे गेली. तो एकदम उठून आमच्या दिशेने आला. माझ्या छातीत धस्सच झाले.
"तुम्ही.. तुम्हीपण मरणार आहे!! " त्याने आमच्याकडे बोट दाखवले, " तो कुणालाच सोडत नाही. तो जाळून टाकतो... तो मारून टाकतो... मी पाहिलंय त्याला मारताना.. खूनी आहे तो...!! "
आम्ही मागे सरकलो . अल्फा मात्र सावधपणे त्याच्याकडे पाहत होता.
"कोण आहेस तू?? आणि कुणाला पाहिलंयस तू मारताना?? " त्याने विचारले. ते ऐकताच तो अचानक बिचकला. मान डोलवत तो मागे मागे सरकू लागला.
"नाही.. नाही.. " तो थरथर कापत होता, " मला ठाऊक नाही.. म्.. मला.. माहित नाही..!! " तो मागे दगडात धडपडला.
"आम्ही तुझी मदत करायला आलोय. घाबरू नकोस, थांब.. " अल्फा हळूवार त्याच्या दिशेने पुढे झाला. पण तो परत उठला आणि आमच्यापासून दूर धावू लागला.
"नाही.. दूर जा.. जीव वाचवा.. पळून जा!! " ओरडतच तो पळत गेला आणि मिनिटभरातच दिसेनासा झाला. मी दूर जाणाऱ्या त्याच्या आकृतीकडे आणि त्याच्याकडे बारीक नजरेने पाहणाऱ्या अल्फाकडे पाहत होतो. अल्फा विचारमग्न होऊन त्या दिशेने पाहत होता.
"तो एक वेडा आहे अल्फा. " मी समजावणीच्या सुरात म्हणालो, " काहीतरी चित्रविचित्र बोलणारच तो. एवढा कशाला विचार करातोस?? "
"तो म्हणाला की त्याने कोणालातरी खून करताना पाहिलंय... " अल्फा म्हणाला.
"तुला काय वाटतं, त्याच्या बोलण्यात काही तथ्य असावे का?? "
"माहीत नाही. " अल्फा म्हणाला, " त्याने काहीतरी भयानक पाहिलं असावं आणि त्यामुळे तो वेडा झाला असावा, किंवा तो वेडा आहे म्हणूनच असं काहीतरी भयानक पाहिल्यासारखं बोलत असावा... किंवा असंही असेल, की .. "
त्याने थोडासा विचार केला आणि मग एकदम मान झटकली, " मी या निरर्थक गोष्टीचा उगाचच विचार करत असेन!! चल, जाऊया रूमवर!! "
'रूमवर जाऊया ' असे अल्फाने म्हणताच मी मनातल्या मनात सुखावलो. मला जाम झोप येत होती आणि अल्फाने जर त्या वेड्याचा पाठलाग वगैरे करण्याचा बेत केला असता, तर माझ्यावर मोठीच नामुष्की ओढवली असती. आम्ही रूमच्या दिशेने चालू लागलो.
"मला ना प्रभू, एखादे रहस्य समोर उभे राहतेय अशी जाणीव जरी झाली, तरी एकदम हुरूप येतो. मग डोक्यात अशी शक्यतांची साखळी बनायला लागते आणि ती गोष्ट सोडून दुसरे काही सुचतच नाही. पण मी एखाद्या गोष्टीत खूप डोकं लावलं आणि शेवटी त्यातून फुसकुंडं काहीतरी निष्पन्न झालं, असं बऱ्याचदा झालंय याआधी. मग शेवटी वाटतं की फुकटच बुद्धी खर्ची घातली मी यामध्ये!! "
"व्हेरी गुड!! " मी उद्गरलो, " मग ही केसदेखील आपण त्याच लिस्टमध्ये टाकूया, त्या वेड्याचे भले होवो अशी प्रार्थना करूया आणि वरती जाऊन मस्त ताणून देऊया!! "
"देअर यू गो!! " अल्फा हसला आणि आम्ही तो विषय तेथेच संपवून टाकला..!!