भाग २
"वा! भारीच आहे बंगला.. " अल्फा त्या बंगल्याकडे पाहत म्हणाला. आम्ही गेटच्या दिशेने चालू लागलो. तितक्यातच एक चाळीशी ओलांडलेला तरुण आमच्याकडे येत म्हणाला,
"या या, प्रधानजी. उशीर केलात.."
"हो. निघायलाच थोडा उशीर झाला. " प्रधान म्हणाले. मी आजूबाजूला पाहिले. तेथे बऱ्याच गाड्या उभ्या होत्या आणि आतून लोकांचा गलबला ऐकू येत होता, " अल्फा आणि प्रभव, हे सचिन मिरासदार. माधवचे सर्वात लहान सुपुत्र. "
प्रधान सरांनी ओळख करून दिली. आम्ही त्यांना अभिवादन केले. त्यांची शरीरयष्टी मजबूत होती. भरघोस मिशा होत्या आणि नजरेत धार होती. त्यांनी आम्हाला आत जाण्याचा मार्ग दाखविला.
" गणपत! " त्यांनी हाक मारली. एक उंचीने लहान, किडकिडीत आणि पांढऱ्या केसांचा घरगडी धावत आला, "प्रधान साहेबांना आत ने आणि त्यांची व्यवस्था बघ जरा. मी आणखी कोणी यायचे आहे का, ते पाहतो."
"हो मालक. " गणपत म्हणाला, " या साहेब. "
आम्ही त्याच्या मागे आतमध्ये गेलो. बंगल्याच्या भोवती शोभेच्या झाडांचे आच्छादन होते. दरवाज्यावर मोठ्या अक्षरांत 'सुस्वागतम' असे लिहिले होते. आत जाताच एक मोठा हॉल होता. तेथे नुकतीच आलेली काही मंडळी गप्पा मारत होती. आम्हीही तेथे एक जागा पकडून बसलो. त्या बंगल्याची बांधणी आणि आतील फर्निचर मिरासदारांची श्रीमंतीच दर्शवित होते. भिंतीवर बरेच फोटो लावले होते. त्यांतील सर्व फोटोंमधील कॉमन व्यक्ती म्हणजे माधव मिरासदार, असा आम्ही निष्कर्ष काढला. फोटोवरून तरी तो मनुष्य हसतमुख आणि सभ्य वाटला. आम्ही इकडे तिकडे पहात असतानाच गणपतने आम्हाला सरबत आणून दिले. आतमधून आणखी एक उंचपुरा माणूस आला आणि हॉलमध्ये बसलेल्या लोकांची विचारपूस करू लागला.
"हा विवेक मिरासदार. माधवचा मधला मुलगा. " प्रधानांनी हळूच सांगितले.
" अच्छा. "अल्फा म्हणाला, " त्यांना तीन मुले आहेत का एकूण? "
" हो. " प्रधान म्हणाले, " सर्वात मोठा आहे तो महेश मिरासदार. त्याने एमबीए केलेलं आहे आणि तो सध्या परदेशातच काम करतो. मधला विवेक, जो आत्ता तुमच्या समोर आहे. माधवचा बऱ्यापैकी व्यवहार आता तो सांभाळतो. आणि बाहेर जो आपल्याला भेटला तो सचिन, सर्वात लहान. तो पूर्वी एनसीसीमध्ये प्रशिक्षक होता. पण आता इथेच असतो. विवेकला धंद्यात मदत करतो. एकूणच सर्व मुले कामाची आहेत आणि माधव मिरासदार सध्या एक चिंतामुक्त माणूस आहे, असे म्हणायला काही हरकत नाही. "
आम्ही थोडा वेळ तेथेच बसलो. अल्फा त्या जागेचे आणि आजुबाजूच्या लोकांचे निरीक्षण करत होता, तर मी जेवणाचा मेनू काय असेल, याचा तर्क करत होतो. दुपारचे जेवण होऊन बराच काळ लोटला होता आणि मला जाम भूक लागली होती. प्रधान सर काही ओळखीच्या लोकांशी बोलत होते. बसून कंटाळा आला म्हणून आम्ही उठून त्या लांबलचक हॉलमधले शोपिसेस पाहू लागलो. काचपेटीत बरेच मेडल्स आणि ट्रॉफिज होत्या. त्यांमधल्या बऱ्याचशा मिरासदारांचा थोरला मुलगा महेश याच्या होत्या. त्या मेडल्सवरून दिसत होते, की तो बराच हुशार असावा. धाकट्याचे एनसीसीचेही काही मेडल्स होते. पण मधला मुलगा विवेक मात्र या पदकांच्या बाबतीत फार काही मजल मारू शकला नव्हता, असे दिसत होते. त्याच्या बाजूच्या कपाटात बऱ्याच प्रकारची अत्तरे, परफ्यूम्स, बॉडी स्प्रेच्या बाटल्या ओळीने मांडल्या होत्या. अल्फाने कुतूहलाने त्यांच्याकडे पाहिले.
"वा!! म्हातारेबुवांना सुगंधी द्रव्ये बरीच आवडतात, असं दिसतंय. " अल्फा म्हणाला. आम्ही टेहळणी करत असल्यासारखे फिरून पुन्हा आमच्या जागी येऊन बसलो. प्रधान सर जवळ नाहीत, हे पाहून अल्फाने आपली तोंडाची पट्टी पुन्हा सुरू केली,
" किती फसवा आहे ना 'पार्टी' हा प्रकार? सर्वांच्या चेहर्यावर एक कृत्रिम आनंद आहे. इथे मनापासून काही होत नसते. पार्टी देणाऱ्याचा भाव आपला आनंद सर्वांच्यात वाटावा,. हा नसून सर्वांना माझी श्रीमंती आणि मोठेपणा दाखवावा, असा असतो ; तर दुसरीकडे पार्टीला आमंत्रित करण्यात आलेल्या लोकांचा भाव पार्टी देणाऱ्याचे शुभचिंतन करणे नसून फुकटात मिळेल तेवढा पाहुणचार करवून घेणे असा असतो. "
" तू हे प्रत्येकाला लागू करू शकत नाहीस. यातले बरेचजण चांगल्या मनानेपण आले असतील. "मी म्हणालो.
" फारच थोडे! अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके. "अल्फा म्हणाला, " आता तो बघ तो विवेक मिरासदार. किती पट्टीचा व्यापारी दिसतो. हॉलमध्ये बाकीचे कितीतरी आमंत्रित लोक बसले असतानाही मघापासून तो त्या जाड भिंगाचा चश्मा घातलेल्या गृहस्थांबरोबरच बोलत आहे. अर्थातच त्यांच्याकडून त्याला काही आर्थिक फायदा असणार. आणि ती जाडेली बाई. बघ बघ किती खोटं खोटं हसतेय. आपणही काही फार सभ्य नाहीये. मला तर त्या म्हाताऱ्याच्या पंच्याहत्तरीशी काही देणं घेणं नाहीये. जेवण फक्त झकास मिळालं, की आपण तृप्त झालो. "
" हे मात्र अगदी मनातलं बोललास बघ." मी हळूच हसत म्हणालो. अर्धा तास गेला आणि अखेर मिरासदारांचा घरगडी गणपत आम्हाला बोलवायला आला.
"हॉलमध्ये बसलेल्या सर्वांना मोठ्या मालकांनी गार्डनमध्ये बोलावले आहे. वाढदिवसाचा केक कापायचा आहे. "
सर्वजण बंगल्याच्या मागे असलेल्या गार्डनच्या दिशेने निघाले. ते गार्डन खुपच छान तयार केले होते. मधोमध एका मोठ्या टेबलावर एक भलामोठा केक ठेवला होता. त्यासमोर बसण्यासाठी खुर्च्या मांडल्या होत्या. कोपऱ्यामध्ये मेजांवर जेवणाची पक्वान्ने ठेवलेले बाऊल्स होते. माझे पाय तिकडे ओढले गेले, पण मी स्वतःला काबूत ठेवले.
"जाम भूक लागलीय यार. " अल्फा मी जिकडे पाहत होतो, तिकडे पाहत म्हणाला.
" थोडा वेळ धीर धरा. वाळवंटातून आल्यासारखे करू नका. " प्रधान सरांनी आमचा रोख पाहून दटावले, "केक तरी कापून होऊ दे. नाहीतर लोक म्हणतील, कुठल्या उपाशांना घेऊन आले आहेत हे महाशय!"
सर्वजण गार्डनमध्ये आल्यानंतर शेवटी माधव मिरासदार तेथे येऊन पोहोचले. बेताची उंची, सडपातळ देह, डोक्यावर पांढरे केस आणि भरपूर मिशा असा एकूण त्यांचा अवतार होता. अंगावर किंमती सूट घातला होता. ते येताच सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. मिरासदारांनी सर्वांना वाकून अभिवादन केले.
"पार्टीला आलेल्या सर्वांचे स्वागत. मी महेश मिरासदार. " एक जाडजूड आणि गोरापान मनुष्य बोलला, "माझ्या वडीलांना ओळखत नाही, असे सांगलीत फारच थोडे लोक असतील. त्यांनी मोठ्या कष्टांनी नाव कमावले आहे आणि आपल्या मनमिळाऊ स्वभावाने सर्वांना आपलेसे केले आहे. त्यांचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस. त्यांना आपण दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा देऊया. त्यांनी केक कापावा, अशी माझी विनंती. "
सर्वांनी पुन्हा टाळ्या वाजवल्या. मिरासदार केक कापणार, इतक्यातच गार्डनमध्ये एक व्यक्ती प्रवेशली. उन्हाने रापलेला काळा वर्ण, धिप्पड देह, हातात तांब्याचे कडे, गळ्यात चेन आणि रागीट चेहरा. पेहरावावरून तरी तो मनुष्य गुंडांचा म्होरक्या वाटत होता. त्याला पाहताच, का कोण जाणे, पण सर्व मिरासदार मंडळींच्या चेहर्यावरचे हसू कुठल्याकुठे उडून गेले. क्षणापूर्वी सर्वांकडे पाहून स्मितहास्य करणाऱ्या माधव मिरासदारांच्या चेहर्यावर तो मनुष्य येताच आठ्या पडल्या. त्यांचा मधला मुलगा विवेक तर त्या माणसाकडे खाऊ की गिळू अशा आवेशात पाहत होता. त्या माणसाने वृद्ध मिरासदारांकडे पाहून हात उंचावला. मिरासदारांनी थोड्या त्रासिकपणेच त्याला हात करून सर्वांच्यात सामील होण्यास सांगितले. तो माणूस आमच्या बाजूलाच येऊन उभारला. त्याने मारलेल्या परफ्यूमचा घमघमाट खूपच वैताग आणणारा होता. आम्ही त्याच्यापासून थोडे लांबच सरकलो. अखेर मिरासदारांनी केक कापला आणि शुभचिंतन वगैरे झाल्यानंतर आम्ही जेवणाकडे वळायला मोकळे झालो. मी तर स्वीट भरपूर वाढून घेतले आणि आम्ही जवळच्याच एका टेबलावर जाऊन बसलो. प्रधान सर मिरासदारांना भेटायला गेले. आम्ही जेवण्यास सुरूवात केली.
"वा! किती वर्षांनी जेवत असल्यासारखे वाटतेय. " मी खुष होऊन म्हणालो, " रोज मेसचे जेवण जेवणाऱ्याला पर्वणीच म्हणायची ही. "
मला इतकी वर्षे घरचे जेवण जेवण्याची सवय असल्यामुळे मेसचे जेवण मुळीच आवडायचे नाही. मग वीकेंडला कधी एकदा घरी जातो असे व्हायचे. आज घरी गेलो नसलो तरी जेवण मात्र स्वादिष्ट मिळाले, याचे मला समाधान वाटले.
" तो माणूस बघ ना. " अल्फा त्या मघाच्याच गुंडाकडे इशारा करत म्हणाला, " कोण असेल तो? तो आल्यानंतर सर्व मिरासदार कुटुंबियांच्या चेहर्यावरची रयाच गेली. पाहिलेस का तू? "
मी खाण्यात मग्न असल्यामुळे नुसतीच मान डोलावली.
" काहीतरी गोम नक्कीच आहे. " अल्फा म्हणाला. तेवढ्यात प्रधान सर मिरासदारांना घेऊन आमच्यापाशी आले.
" हाच का तो मुलगा? वा वा! " मिरासदार अल्फाकडे पाहत म्हणाले, " भालचंद्र नेहमी तुझ्याबद्दल सांगत असतो. आणि हा कोण? "
" हा माझा मित्र, प्रभव. "अल्फाने ओळख करून दिली.
" वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, सर. " मी म्हणालो
" धन्यवाद, धन्यवाद. " मिरासदार म्हणाले, "बरं झालं तू यांना घेऊन आलास, भालचंद्र. "
" हुशार आहेत दोन्ही पोरं. " प्रधान म्हणाले.
" बरं, तुम्ही खाऊन पिऊन घ्या. संकोच बाळगू नका. " मिरासदार म्हणाले, " आणि आज रात्री तुम्ही इथेच थांबायचं आहे. "
मी आणि अल्फाने भुवया उंचावल्या.
" अरे नाही नाही. आम्ही तर रात्री जाण्याच्या तयारीने आलोय. थांबता येणार नाही. " प्रधान आढेवेढे घेत म्हणाले.
" थांब रे. रिटायर्ड माणूस तू. काय करणार आहेस लगेच घरी जाऊन? आणि तसेही उद्या रविवारच आहे. त्यामुळे या मुलांनाही हरकत नसावी. तेही आराम करतील आणि आपल्यालाही जुन्या गप्पा मारता येतील. "
" नको रे माधवा.. पुन्हा कधीतरी करू ना आपण हा गप्पांचा कार्यक्रम. आज नको. "
" पुन्हा म्हटलं की ते राहून जातं. ते काही मी ऐकणार नाही. आज रहा. सकाळी लवकर जा म्हणे. " मिरासदार आग्रहाने म्हणाले. आमच्यासमोर काही पर्यायच उरला नाही. मला लवकरात लवकर रूमवर जाऊन ताणून द्यायची होती. पण विचार केला, झोपायचेच तर आहे. मग ते इथे काय आणि तिथे काय.
" बरं बाबा. ठिक आहे. " प्रधान मिरासदारांना म्हणाले.
" शाबास. चल, जेवून घेऊ आता. आणखी काही जणांशी ओळख करून द्यायचीय तुझी. मुलांनो, तुम्हाला झोपायला जायचं असेल तेव्हा गणपतला सांगा. तो तुम्हाला तुमच्या रुमकडे नेईल. "
" हो सर. नक्कीच. "
ते निघून गेले. जेवण झाल्यानंतर तेथे फार काही करण्यासारखे उरलेच नव्हते. मग आम्ही उगीचच इकडे तिकडे करत बसलो. जेवण झाल्यानंतर बरेच पाहुणे निघून गेले. जे थोडे लोक उरले होते, ते गार्डनमध्ये खुर्च्या टाकून गप्पा मारू लागले. आम्ही थोडा वेळ बंगल्याच्या बाहेरच्या रोडवरून फेरफटका मारून आलो. ते ठिकाण अगदीच सुनसान जागी होते. रस्त्यावर दिव्यांचा अंधुकसा उजेड होता. रस्त्यावरून अंधारात बुडालेला 'देखावा' बंगला त्या परिसरात अगदीच एकाकी वाटत होता.
"चल रे अल्फा वरती. मला झोप येतेय. " बराच वेळ गेल्यानंतर मी म्हणालो.
" थांब ना थोडा वेळ. " अल्फा म्हणाला, " झोपायचं काय रोजचंच आहे. अशा शांत वातावरणात, शहराच्या धावपळीपासून दूर तुला रोज रोज यायला थोडीच मिळणारे. "
" तू काय दुपारी मोठ्ठी झोप काढलीयेस बाबा. मला तर आठवडाभर झोप नाहीये परिक्षेमुळे. तसेही बारा वाजायला आलेत. खूप उशीर झालेला आहे. " मी डोळे चोळत म्हणालो.
" बरं. चल. "अल्फा तयार झाला, " आपल्याला आता गणपतला शोधायला हवे. "
आम्ही बंगल्याच्या गेटपाशी आलो तेव्हा समोरच गणपत दिसला. तो आणि एक तेरा-चौदा वर्षांचा पोरगा मिळून आतमधला कचरा बाहेरच्या कुंडीत टाकत होते.
" नमस्कार, काका. झाले का जेवण? " अल्फाने विचारले.
" होय साहेब, आत्ताच झाले. " तो म्हणाला.
" अहो साहेब काय म्हणताय. आम्ही तुमच्यापेक्षा लहान आहोत. मला 'अल्फा' म्हणा आणि याला प्रभव म्हणा. "
" तुम्हाला काय म्हणायचं? काही कळालं नाही. " गणपतने डोके खाजवत विचारले. मी गालातल्या गालात हसलो.
" 'अल्फा अल्फा'.. सगळेजण तसेच म्हणतात. " अल्फा म्हणाला.
" हां.. बरं बरं. " त्याने मान डोलावली. त्याच्या दृष्टीने 'अल्फा' हे नाव परग्रहावरच्या कुणाचेतरी असणार. तसा अल्फाही काही दिसायला परग्रहवासीपेक्षा कमी नव्हता. (याला कारण - त्याचे विचित्र केस!)
" आज बरीच धावपळ झाली असेल नाही, या बंगल्यावर? " अल्फाने विचारले.
" होय तर! साहेबांची तिन्ही मुलं कालच आलेली आहेत. या फार्महाऊसच्या साफसफाईपासून सगळी कामं आम्ही दोन दिवसांत केली आहेत. " गणपत म्हणाला.
" तुम्ही कधीपासून इथे काम बघता? "
" साधारण पंधरा वर्षे झाली असतील की. हे फार्महाऊस बांधल्यापसून मीच इथलं काम बघतो. मोठे साहेब म्हणजे फार चांगला माणूस. त्यांनी माझीपण इथंच सोय केली. त्यामुळे मला दुसरीकडं कुठंच जायची गरज पडली नाही. "
" अच्छा. " अल्फा म्हणाला, " काका, तुम्ही मघाशी केक कापायच्या वेळी गार्डनमध्ये होता का? तिथे एक माणूस सर्वात शेवटी आला होता - तुम्हाला आठवत असेलच की. कोण होता तो? " अल्फाने विचारले.
" तो काळा दांडगा माणूस? हातात कडी घातलेला? "
" हां, तोच. "
" तो नागेश. मोठ्या साहेबांचा पुतण्या. " गणपत आवाज खाली करत बोलला, " खरंतर मी असं बोलायला नाही पाहिजे, पण एक नंबरचा नालायक माणूस आहे बघा तो. गुंड आहे. "
" हो, ते तर दिसतच होते. " अल्फा म्हणाला, " तुमच्या साहेबांना तो त्रास देत असावा, कारण तो आल्यावर त्यांचा चेहरा चांगलाच पडला होता. "
" त्रास म्हणजे चांगलाच त्रास देतो तो. काहीही काम करत नाही. नुसता काकाचा पैसा उधळतो. आलिकडे तर खुपच करायला लागलाय तो. साहेब या फार्महाऊसवर कधीतरीच येतात. पण हा पठ्ठ्या सारखा सारखा येतो काय, मला हुकूम काय सोडतो, पार्ट्या काय करतो.. काही बोलायचं कामच नाही! "
" ते हॉलमधल्या काचपेटीतील महागडे सेंट्स आणि परफ्यूम्स तोच वापरतो वाटतं. " अल्फा म्हणाला, "मघाशी जेव्हा तो आला, तेव्हा त्याच्या अंगाला किती तीव्र वास येत होता परफ्यूमचा. "
" होय. त्या वासाच्या बाटल्यांचा भारीच नाद त्याला. सदानकदा अंगावर फवारत असतो. दरवेळी नवीन नवीन बाटल्या आणत असतो. " गणपत म्हणाला, " साहेबांची मुलंपण वैतागली आहेत त्याच्या या उधळपट्टीला. आणि का नाही वैतागणार? असा कष्टाने कमावलेला पैसा असाच कोणी उधळायला लागलं, तर एखाद्याला कसं वाटेल? "
" मग ते त्याला सरळ सांगत का नाहीत? असे मूग गिळून गप्प का बसतात? " मी विचारले.
" असं कसं सांगणार. तो शेवटी मवाली. काहीतरी धाक वगैरे दाखवत असेल आणि यांच्याकडून पैसे उकळत असेल. मी तर ऐकलंय, की आता तो मोठ्या साहेबांच्या प्रॉपर्टीचा हिस्सादेखील मागायला लागलाय. "
" बापरे! फारच वाईट. त्यावर तर त्यांच्या तीन मुलांचा हक्क जायला हवा. तरीच तो विवेक मिरासदार मघाशी नागेशकडे इतक्या रागाने पाहत होता. " अल्फा म्हणाला.
" होय ना. मध्ये एकदा विवेक साहेबांचं आणि नागेशचं भांडणही झालं होतं म्हणे. नागेशने विवेक साहेबांना दामटून गप्प बसवलं होतं. मोठ्या साहेबांचं तर आता वय झालं. ते काय करणार देवालाच माहित. " गणपत म्हणाला. त्याने त्याच्याबरोबर कचरा भरणाऱ्या पोराकडे पाहिले आणि तो ओरडला, "संज्या.. पटपट हात हलव रे! झोपायला जायचं आहे की नाही तुला? "
त्या मुलाने नुसतीच मान डोलावली. त्या मुलाचा अवतार अगदीच वाईट होता. विस्कटलेले केस, मळलेला शर्ट, धुळीने माखलेले अंग आणि पायांत तुटक्या चपला. तोही इथे घरगडी म्हणून काम करत असावा, असा मी अंदाज बांधला.
" घरी सांगून आला आहेस ना, आज इथंच राहणार आहेस म्हणून? " गणपतने विचारले. त्या मुलाने पुन्हा मान डोलावली आणि तो भराभर बुट्टीतला कचरा डस्टबीनमध्ये भरू लागला.
" काका, आम्हाला आमची रूम दाखवता का? झोपायला जायचे आहे. " अखेर अल्फा मुद्द्यावर आला.
" हो. चला की. " गणपत म्हणाला. तो आतमध्ये निघाला आणि त्याच्या मागोमाग आम्ही निघालो.
" तो मुलगाही इथे कामाला आहे का? " अल्फाने विचारले.
" होय. संजू नाव त्याचं. इथून थोड्याच अंतरावर पुढे त्याचं घर आहे. मुका आहे बिचारा. दोन वर्षांपूर्वी तो मोठ्या साहेबांकडे काम मागायला आला आणि साहेबांनी त्याला माझ्या हाताखाली ठेवलं. थोडासा वेंधळट आणि घाबरट आहे. पण पोरगा कामाचा आहे. "
गणपतने आम्हाला आमची खोली दाखविली आणि तो निघून गेला. ती खोली खालच्या मजल्यावर होती आणि खिडकीतून गार्डनमध्ये गप्पा मारणारी मंडळी दिसत होती. खोलीच्या बाजुने वरती जाण्यासाठी जिना होता. बहुधा वरतीही रूम्स असाव्यात.
" मिरासदारांशी नागेशचे वागणे निश्चितच अयोग्य आहे, नाही का? " अल्फाने विचारले, " प्रधान सरांना याबद्दल एकदा बोलायला हवे. "
" हं. " मी उत्तरलो. मला खूपच झोप आली होती. समोर बेड दिसताच मी स्वतःला त्यावर झोकून दिले.
" अरेच्चा! गार्डनमध्ये तर म्हातारे मिरासदार दिसतच नाहीयेत. बाकीचेच लोक बसलेत. ते कुठे गेले असावेत? " अल्फा खिडकीतून बाहेर डोकावत म्हणाला.
" तुला मिरासदार दिसोत न दिसोत. मला तर समोर फक्त आणि फक्त झोपच दिसतेय. " मी जवळपास डोळे मिटतच बोललो, " गुड नाईट अल्फा. "
काही क्षणांतच मी झोपेच्या अधीन झालो. माझ्यासाठी झोपही तीच होती आणि रात्रही तीच होती. पण 'देखावा' बंगल्यासाठी मात्र ती रात्र काळरात्र बनून आली होती, याची कल्पना मला झोपताना नव्हती.