भाग १
पावसाळ्याचे दिवस होते. अॉगस्ट संपून सप्टेंबर सुरू झाला आणि पावसाने आपला जोर आणखीनच वाढवला. मला तसा पावसाळा फारसा आवडायचा नाही. ढगाळ आणि निरुत्साह वाढवणारे वातावरण, सर्वत्र ओल आणि चिकचिक, कुठे बाहेर पडायची सोय नाही, काही करावेसे वाटत नाही. मी तर अगदी बोअर होऊन जायचो. त्यातच नव्या कॉलेजचे नऊ दिवस संपून गाडी आता परिक्षांकडे जायला लागली होती. त्यामुळे गपचूप रूमवर बसून अभ्यास करणे हा एकच पर्याय माझ्या समोर होता. तशी मी एक जिम जॉईन केली होती म्हणा. रोज संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर मी तिकडे जायचो. पण तीही बरीच लांब होती आणि जोराचा पाऊस असला तर तिकडे जाणेही रद्द व्हायचे. मला घरापासून दूर राहण्याची सवय नसल्याने रूमवर करमायचे नाही . सारखे घरी जावेसे वाटायचे. अशा परिस्थितीत मी तिथे टिकून राहण्याचे केवळ एकच कारण होते - ते म्हणजे अल्फा!!
अल्फा म्हणजे एक रंगीबेरंगी मुलगा होता. दरवेळी मला त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे नवीन नवीन रंग पहायला मिळायचे. रत्नजडित खंजिराचे प्रकरण होऊन आता महिना उलटून गेला होता. आम्ही अधेमधे त्यावर चर्चा करायचो. अल्फाची निरीक्षणे नेहमी चालूच असायची. त्याची, किंबहुना शेरलॉक होम्सची निरीक्षण निष्कर्ष पद्धत कधीकधी तो मला समजावून सांगायचा. पण माझी करमणूक त्याच्या निरीक्षणांपेक्षा त्याच्या बडबडीने जास्त व्हायची. करण्यासारखं काही काम नसेल, तर गप्पा ठोकणे हा आमचा आवडता छंद. असा एकही विषय नव्हता, ज्यावर अल्फा बोलू शकणार नाही. एखादा विषय घेऊन आम्ही एकदा बोलायला सुरुवात केली, की आमचे बोलणे तासनतास चाले. अर्थात, त्यातलं बरंचसं अल्फाच बोलायचा, हा भाग वेगळा. पण त्यात वेळ कसा जायचा, हे कळायचंच नाही.
अशीच एक शुक्रवारची ढगाळलेली संध्याकाळ होती. मी पुस्तक वाचत बसलो होतो आणि अल्फा नुसताच बसून जांभयांवर जांभया देत होता. ते वातावरण आणि त्यात अल्फाच्या जांभया, यांमुळे मलाही वाचायचा कंटाळा आला. अल्फाने अजून एक जांभई दिली.
"अकरा!!" मी पुस्तक बाजूला ठेवत म्हणालो, " आज काय एकसलग जांभयांचा रेकॉर्ड करण्याचा विचार आहे की काय!! झोप येत असेल तर सरळ झोपून टाक ना. "
"या जांभया म्हणजे झोपेचं लक्षण नाहीयेत, प्रभू. " अल्फा म्हणाला. त्याने मला हाक मारण्यासाठी आलिकडेच हे सरळ साधे सोपे नाव शोधून काढले होते, "जांभया दोन प्रकारच्या असतात - एक झोपेची जांभई आणि एक आळसाची जांभई. संध्याकाळचे साडेपाच ही काही माझ्या झोपण्याची वेळ नाहीये, हे तुला ठाऊकच आहे. त्यामुळे या सगळ्या जांभया माझ्यात भरलेल्या आळसाचे प्रतिक आहेत, असे म्हणायला हरकत नाही."
"मग जांभया देऊन आळस थोडीच जाणारे.. काहीतरी काम कर. मग जरा फ्रेश वाटेल." मी म्हणालो.
" काय करण्यासारखे आहे का, यावर मी गेला अर्धा तास विचार करतोय. पण माझा मेंदू मला सांगतोय, की तुझ्याकडे जांभया देण्याशिवाय दुसरे कोणतेच काम नाहीये. त्यामुळे शांत बस आणि जांभया देत रहा!!" अल्फा एक मोठ्ठा आळस देत म्हणाला.
" अभ्यास कर ना मग. वेळ सत्कारणी लागेल." मी सुचविले.
" छे!! तो पर्याय तर मी पहिल्यांदाच बाजूला केला आहे." अल्फा मोठ्याने हसत म्हणाला.
" वा!! छानच. तुझ्यामुळे माझाही अभ्यासाचा मूड गेला." मी खिडकीपाशी जात म्हणालो. खिडकीच्या बाहेर खाली ओलसर झालेला रस्ता आणि तुरळक रहदारी दिसत होती.
"आज जिम नाहीये का तुझी? " अल्फाने विचारले.
"सकाळीच जाऊन आलो. " मी उत्तरलो.
" कॉलेजवर काही काम नाही का?? तिकडे जाणार असशील तर मीपण येतो. तुमचा कँपस भलामोठा असल्यामुळे तिकडे वेळ पटकन जातो." अल्फा म्हणाला.
" काही काम नाहीये. आज तर उलट कॉलेज रिकामं पडलंय. "
" का? कुठे गेलेत सगळे?" अल्फाने विचारले.
" तुला काहीच ठाऊक नाही असं दिसतंय." मी म्हणालो, "आज इथे जवळच एका कार्यक्रमाला बॉलीवूडची एक सुप्रसिद्ध अभिनेत्री येणार आहे. तिला पहायला माझे सगळे मित्र गेले आहेत. बऱ्याच दिवसांपासून या गोष्टीची चर्चा सुरू आहे. तुला कसं काय ठाऊक नाही कुणास ठाऊक!! "
" वा!! हे नवीनच कळालं. मी आमच्या कॉलेजला दांड्या मारत असल्यामुळे कदाचित माझ्या कानावर काही पडले नसेल." अल्फा म्हणाला, "पण आपल्याला जायला काही हरकत नव्हती. तू का नाही गेलास तुझ्या मित्रांसोबत?? "
"मला नाही बुवा आवडत हे सगळं.. काय बघायचंय त्या बाईला! तेही इतक्या गर्दीत!! त्यापेक्षा इथे शांत बसून कंटाळलेलं बरं. "
" निरसपणाचं उत्तम उदाहरण म्हणजे तू आहेस बघ प्रभू. बॉलीवूड ही करमणुकीची गोष्ट आहे. त्यात न आवडण्यासारखं काय आहे?? "
" माझ्या मते तो निव्वळ वेळेचा अपव्यय आहे. " मी म्हणालो, " मी मुव्हीज पाहत नाही असं नाही. पण फारच थोड्या मुव्हीज अशा आहेत, ज्या पाहण्यात काही तथ्य असते. एखाद्या गोष्टीवर आपण वेळ खर्च करतो, याचा अर्थ त्यातून काहीतरी उपयोगी असे आपल्याला मिळायला हवेच ना!! चित्रपट काय किंवा इतर करमणुकीची साधने काय. वेळ घालवण्यापलीकडे ती काहीच करत नाहीत. त्यापेक्षा अभ्यास केलेला बरा. त्यातून काहीतरी आऊटपुट तरी मिळते. "
"तू तर दोन मुलांचे वडील असल्यासारखा बोलतोयस!! " अल्फा हसून म्हणाला, " प्रत्येक गोष्टीत जर तू आऊटपुट शोधत बसलास, तर तू कधी आनंदी राहू शकणारच नाहीस. मुव्हीजमधून मनाची करमणूक होते. त्यांचं कामच हे आहे, की रोजच्या धावपळीतून लोकांच्या थकलेल्या मनाला पुन्हा ताजेतवाने करणे. बरं, बॉलीवूड वगैरे जाऊदे. तू कधी निसर्गाला वेळ दिला आहेस?? हिवाळ्यातल्या एखाद्या सुंदर संध्याकाळचा सुर्यास्त पहा ; पावसाळ्यात धो धो पडणाऱ्या पावसाचे आणि ढगांच्या गडगडाटाचे संगीत ऐक. उन्हाळ्यातल्या पहाटेचा वारा श्वासांत भरून घे. यातून तुझ्या म्हणण्याप्रमाणे आपल्या फायद्याचे असे काहीच मिळत नाही. मिळते ते फक्त मनाचे समाधान, आनंद. शेवटी आयुष्यात हेच तर आपण शोधत असतो. मग ते मुव्हीजमधून असेल, निसर्गाच्या सानिध्यातून असेल, किंवा छंद जोपासण्यातून असेल. मनाचे सुख महत्त्वाचे. आता तू म्हणशील, की मी भरपूर अभ्यास केला, की मला आयुष्यात हवं ते मिळवता येईल, मनाचे समाधान होईल. मी अभ्यासाला नाही म्हणत नाही. प्रत्येकाने ध्येय हे बाळगायलाच हवे आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करायलाच हवेत. पण ते करताना जगायलाही शिकले पाहिजे ना. विसरू नकोस प्रभू, यशस्वी होणे आणि आनंदी होणे यात खूप फरक आहे!! "
मी ते ऐकून हडबडूनच गेलो.
" वाहव्वा!! खुपच हृदयस्पर्शी होतं हे.." मी मनापासून बोललो, " तुझे नामकरण आता 'एकविसाव्या शतकातील थोर विचारवंत श्री. अनिकेत महाजन' असेच करायला हवे. "
अल्फा हसला.
" उर्फ 'अल्फा' असंही पुढे कंसात लावायला हरकत नाही. " तो डोळा मारत म्हणाला. मी स्मित केले.
"शेवटी 'आता काय करायचं' हा प्रश्न उरलाच!!" अल्फा म्हणाला. मी काही प्रतिक्रिया द्यायच्या आतच माझा फोन वाजला. तो फोन माझा क्लासमेट मितेन याचा होता.
"हां बोला महाशय, झाला का कार्यक्रम?? पाहिलं का तुझ्या आवडत्या नटीला डोळे भरून??" मी त्याला विचारले.
" होय.. झाला.. पण ते जाऊदे.. मी एका खुपच मोठ्या संकटात सापडलोय रे प्रभव. मला तुझी मदत हवीय.." त्याचा आवाज एकदम घाबराघुबरा झाला होता आणि तो धापा टाकत बोलत होता.
" काय रे? काय झालं?" मी चिंताग्रस्त होऊन विचारले.
" तू आधी इथे हॉस्टेलवर माझ्या रूमवर ये. तुला सगळं सांगतो. मला काहीच सुचेनासं झालंय रे.." तो रडवेल्या आवाजात म्हणाला.
" हे बघ, तू शांत हो. मी दोनच मिनिटांत निघतोय." मी त्याला धीर देत म्हणालो.
" लवकरात लवकर ये. आणि येताना तुझा तो रूममेट आहे त्यालाही घेऊन ये." तो म्हणाला. त्याचा आवाज जवळपास कापतच होता. त्याने अल्फाला सोबत घेऊन यायला सांगितल्यावर मला जरा विचित्रच वाटले.
" बरं ठिकाय. आलोच मी. " मी फोन ठेवला. अल्फा माझ्याकडे पाहत होता.
"चला, शेवटी काहीतरी काम मिळालंच!! " त्याचा नूर एकदमच पालटला आणि तो उत्साही दिसू लागला, "तुमच्या कॉलेजच्या D3 हॉस्टेलवर पोहोचण्यास फारतर पाच मिनिटे लागतील, नाही का? त्यात तुझ्या मित्राची रूम तळमजल्यावरच आहे. आपण लवकर गेलो तर तुझ्या मित्राला नक्कीच मदत करू शकू. "
मी आश्चर्याने अल्फाकडे पाहतच राहिलो.
" मी अजून तुला एका शब्दानेही काही बोललो नाहीये अल्फा!! तुला कसं कळालं की आपल्याला कुठे जायचंय?" मी म्हणालो. अल्फा हसला. मी फोनवर जे बोललो, ते पुन्हा एकदा आठवून पाहिले. मी कुणाचा फोन आहे, काय प्रॉब्लेम आहे, कुठे जायचंय, याबद्दल काहीच बोलल्याचे मला आठवले नाही.
"तुझ्या चेहर्यावरील बदलणाऱ्या भावांनी मला सगळे सांगितले. "अल्फा म्हणाला, " तू सुरूवातीला 'हॅलो' वगैरे काही न म्हणता थेट कार्यक्रम झाला का असेच विचारलेस. याचा अर्थ दुसरीकडून बोलणारा तुझा बऱ्यापैकी चांगला मित्र असला पाहिजे. इथे आल्यापासून माझ्याखेरीज मितेन हा तुझा चांगला मित्र झाला आहे. मग मी अंदाज बांधला, की फोन मितेनचाच असावा. पुढे क्षणातच तुझ्या चेहर्यावरचे भाव चिंतेचे दिसू लागले. त्याअर्थी त्याने तुला काहीतरी गंभीर गोष्ट सांगितली असावी. मग लगेचच चिंतेबरोबर तुझ्या चेहर्यावर मला तणाव दिसला आणि तू त्याला 'शांत हो' असे बोललास. म्हणजेच घटना जास्तच गंभीर आहे आणि ती स्वतः मितेनसोबतच घडली असावी. मग पुढच्या वाक्याला तू माझ्याकडे पाहिलेस आणि त्याला लगेच निघण्याचे आश्वासन दिलेस. म्हणजे काम फक्त तुझे नसून कदाचित मलाही तुझ्यासोबत यावे लागणार असावे. आणि रूमबद्दल म्हणशील, तर तू मागे एकदा मितेन आणि D3 हॉस्टेलच्या तळमजल्यावरील रूमबद्दल बोलल्याचे मला आठवतेय. मग सरळच आहे ना, की आपल्याला आत्ता तिकडेच जायचे असावे. "
मी थक्कच झालो.
"अल्फा, तू खरंच कधीकधी कमाल करतोस बाबा!! " मी म्हणालो.
" बरं, ते असूदे. आता निघुया का आपण? " तो जवळपास उड्याच मारत होता, " मला तर कधी एकदा तुझ्या मित्राला भेटतो असे झालेय. काहीतरी इंटरेस्टिंग घडलेलं असावं, अशी अपेक्षा करुया. "
" हो जाऊया. पण तू तुझा उत्साह जरा कमी कर आणि थोडा गंभीर चेहरा कर. मला ठाऊकाय, तुला एखादी केस मिळाली, की आनंद होतो. पण माझा मित्र बिकट परिस्थितीत दिसतोय. तुला खुष वगैरे पाहून तो बाहेरच काढेल आपल्याला!! "
" हो रे.. तू नको काळजी करू. " अल्फा त्याचे सँडल घालत म्हणाला. आम्ही कॉलेज हॉस्टेलकडे जायला बाहेर पडलो. वाटेत मी नक्की काय घडले असावे, याचाच तर्क करत होतो. पाच-दहा मिनिटांत आम्ही D3 हॉस्टेलपाशी पोहोचलो. कॉलेजच्या कँपसमध्येच, पण थोड्याशा बाजूच्या भागात हॉस्टेलच्या इमारतींची रांग होती. कॉलेज बरेच जुने असल्यामुळे हॉस्टेलच्या इमारतींचे बांधकामही दगडी व जुन्या पद्धतीचे होते. गेटमधून आत गेल्यानंतर पहिलीच इमारत D3 ची होती. त्या इमारतीला लागूनच भिंत होती आणि त्या भिंतीपलीकडे झाडांची गर्दी होती.
आम्ही तेथे पोहोचलो, तेव्हा बऱ्यापैकी अंधार पडला होता आणि दिवे लागले होते. आम्ही D3 च्या तळमजल्यावरील शेवटच्या रूमकडे गेलो. तेथे दारातच माझा मित्र मितेन आमची वाट पाहत उभारला होता.
"या.. पटकन आत या.. " तो म्हणाला. त्याचा चेहरा अतिशय भेदरलेला होता आणि तो अतिशय सैरभैर झाल्यासारखा दिसत होता. आम्ही त्याच्या मागोमाग आत शिरलो. ती रूम फार मोठीही नव्हती आणि फार लहानही नव्हती. आतमध्ये आणखी तीनजण होते. तेही चिंताग्रस्त दिसत होते. तिथल्या एका रिकाम्या कॉटवर मितेनने आम्हाला बसण्यास सांगितले.
"काय झालेय मितेन? तू इतका घाबरलेला का आहेस?? आम्हाला सर्वकाही सविस्तर सांग." मी म्हणालो.
"हो.. हो.. सांगतो.. " त्याचे श्वास वेगाने सुरू होते, " हा.. हा अल्फाच आहे ना..?? तुझा रूम पार्टनर?? "
" होय. मीच अल्फा आहे. " अल्फा म्हणाला.
" ठिकाय.. "त्याने स्वतःला शांत करण्यासाठी थोडा वेळ घेतला आणि तो बोलला, " फार मोठा हादरा बसलाय मला.. माझी मौल्यवान हिऱ्याची अंगठी चोरीला गेलीय.. "
"अरे देवा!! " मलाही धक्का बसला, " कसं घडलं हे? आणि कधी?? "
" आत्ताच.. काही वेळापूर्वी.. आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो तेव्हा.. " मितेन म्हणाला, " मला काही सुचेनासं झालंय रे.. संपलोय मी आता.. "
" टेन्शन नाही घ्यायचं मितेन. शोधून काढूया आपण तुझी अंगठी. " तिथे उभारलेला एक धडधाकट मुलगा त्याला धीर देत म्हणाला.
" इतक्यात आशा सोडू नकोस, मितेन. " अल्फा म्हणाला, " आता मला अगदी पहिल्यापासून काय काय घडलं ते सांग. "
" हो.. सांगतो.. " मितेन म्हणाला, " ती अंगठी माझ्या बाबांची होती. बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांनी ती बनवून घेतली होती. खुपच मौल्यवान आहे ती अंगठी.. लाखाच्या घरात किंमत असेल तिची. मला पहिल्यापासून त्या अंगठीचे आकर्षण होते. मी खुपदा त्यांच्याकडे ती मागितली ; पण त्यांनी मला कधी दिली नाही. आता पुढच्या आठवड्यात आमची फ्रेशर्स पार्टी आहे आणि त्याला मी ती घालून जाणारच, असा मी त्यांच्याकडे आग्रह धरला. शेवटी ते तयार झाले आणि जपून वापरण्याच्या अटीवर त्यांनी ती अंगठी मला दिली. गेल्या रविवारीच मी ती घरून इकडे आणली आहे आणि आज.. ती नाहिशी झाली!! "
मितेनने जोरात डोके हलवले. त्याच्या मित्रांनी त्याला धीर दिला.
" तू शेवटचं कधी पाहिलं होतंस त्या अंगठीला? आणि ती गायब झालीये, हे तुझ्या कधी ध्यानात आलं??" अल्फाने विचारले.
" मी ती अंगठी माझ्या पाकिटाच्या आतल्या कप्प्यात ठेवतो आणि ते पाकीट त्या कपाटात असते." मितेनने खिडकीजवळील एका छोट्या लाकडी कपाटाकडे बोट दाखविले, " आज त्या कार्यक्रमाला जाण्याआधी मी त्या पाकिटात अंगठी आहे ना, याची खात्रीही केली होती. मी ते पाकीट व्यवस्थित ठेवून दिलं, कपाटाला कुलूप घातलं, मग आम्ही आमच्या रूमलाही कुलूप घातलं आणि तिकडे निघून गेलो. आणि आल्यावर पाहतो तर काय - कपाटाचे कुलूप कोणीतरी फोडले होते. माझ्या छातीत एकदम धस्स झाले. मी धावतच जाऊन कपाट उघडले आणि माझे पाकिट तपासले. अंगठी गायब होती. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली..!! आम्ही खूप शोधाशोध केली, हॉस्टेलवरच्या प्रत्येकाला विचारले. पण कोणालाच काही ठाऊक नव्हते. मग शेवटचा पर्याय म्हणून प्रभवला फोन लावला. "
" तुझ्याकडे ही अंगठी आहे, याबद्दल किती जणांना ठाऊक होते? " अल्फा.
" माझ्या रूममेट्स व्यतिरिक्त कोणालाच नाही. " मितेन म्हणाला, " मी मुद्दाम ही गोष्ट कोणालाच सांगितली नव्हती. कारण अंगठी मौल्यवान होती आणि त्यात मी ती बाबांच्या इच्छेविरुद्ध इथे आणली होती. त्यामुळे मी फक्त माझ्या रूममेट्सना ती दाखविली होती. "
" यातले कोण आहेत तुझे रूममेट्स? " तेथे उपस्थित असलेल्या मुलांकडे पाहत अल्फाने विचारले.
" हे तिघेही माझे रूममेट्स आहेत. " मितेनने दाखविले, " हा विकास, हा नितीन आणि हा करण. "
विकास आणि नितीन मध्यम बांध्याचे, सुमार उंचीचे आणि सुटसुटीत असे दिसणारे होते. करण सडपातळ आणि चांगलाच उंच होता. त्या तिघांचेही चेहरे चिंतीत आणि थोडे घाबरलेले दिसत होते.
" हे तिघेही आमच्याच गावचे आहेत आणि माझे पहिल्यापासूनचे मित्र आहेत. " मितेन म्हणाला.
" तुमचं गाव कुठलं?? " अल्फाने विचारले.
" विटा. इथून तास-दिड तासाच्या अंतरावर आहे. आम्ही एकमेकांच्या चांगले ओळखीचे असल्यामुळे आम्ही एकत्रच ही रूम घेतली." मितेनचा मित्र नितीन म्हणाला.
"तुम्ही तिकडे कार्यक्रमाला गेलात किती वाजता आणि परत कधी आलात? "
" आम्ही साधारण तीनच्या सुमारास गेलो आणि सहा वाजता परत आलो. " करण बोलला.
" पूर्ण कार्यक्रमात तुम्ही एकत्रच होता का? "
" नाही. आम्ही एकत्र गेलो. पण तिथे इतकी गर्दी झाली होती, की कोण कुठे आहे हे कळालेच नाही. शेवटी येताना पुन्हा एकत्र जमलो आणि परत आलो. "
" ते ठिकाण किती लांब आहे इथून? " अल्फाने प्रश्नांची सरबत्ती सुरूच ठेवली.
" अॉटोने साधारण दहा मिनिटांच्या अंतरावर आहे. " विकास म्हणाला.
" अच्छा. " अल्फाने मान डोलावली, " मितेन, तू म्हणालास, की तू आलास तेव्हा तुझ्या कपाटाचं कुलूप तुटलेलं होतं. मग रूमच्या कुलूपाचं काय? तेही तुटलेलंच होतं का?? "
" नाही. रूमचं दार आहे त्या अवस्थेत कुलूपबंद होतं. " मितेन उत्तरला.
" आँ!! हे कसं शक्य आहे?? " मी चकित होऊन विचारले, " मग अंगठी चोरणारा दार न उघडता आत कसा आला?? "
" दुर्दैवाने हे शक्य आहे. " मितेन म्हणाला, " या हॉस्टेलचे दरवाजे असेच आहेत की कुलूप न काढताही ते उघडले जाऊ शकतात!! "
" ते कसं काय बुवा?? " मी तोंडात बोटच घातले.
" या हॉस्टेलचे दरवाजे खूपच जुने आहेत. आमच्या दरवाजाला कुलूप लावलं तरी दार घट्ट बसत नाही. थोडं पुढेमागे केलं की कुलूप तसंच राहतं, पण कडी निघते आणि दार उघडतं. जसं उघडता येतं, तसंच ते बंदही करता येतं. आम्ही आलो तेव्हा ते पहिल्यासारखं बंद अवस्थेत होतं. त्यामुळे कोणी रूममध्ये येऊन गेलं असलं, तरी कळायला मार्ग नाही. "
" हं. " अल्फा विचार करीत म्हणाला, " ही दाराची भानगड भलतीच इंटरेस्टिंग आहे. मला जरा दाखवशील का?? हे कसं घडतं ते?? "
" हो. बाहेर चला. " मितेन म्हणाला. आम्ही रूमच्या बाहेर आलो. ते दार जुन्या पद्धतीच्या दारांसारखे दोन भागांचे होते आणि त्यांना मधोमध कडी होती. मितेनने दोन्ही दारे ओढली आणि त्यांना बाहेरून कुलुप घातले. मग दोन्ही दारांना आतल्या बाजूने धक्का दिला. मधले कुलूप तसेच राहिले, पण दार उघडले.
"वा!! काय कलाकृती आहे!! " अल्फा स्तिमित होऊन म्हणाला, " हे दार असे उघडते, याबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे का? "
" नाही, सर्वांना नाही. पण आम्हा चौघांना तरी ठाऊक आहे. बाकी कोणाला ओघात बोललो असलो, तर आणखी कोणाला याबद्दल माहिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. " मितेन उत्तरला.
अल्फाने त्या दाराची तपासणी केली.
" थोडक्यात काय, तर चोराला आत शिरण्याचे फुकट तिकीटच मिळाले, असे म्हणायला हरकत नाही. आता मला जरा आतले कपाट पाहू दे. "
आम्ही आत गेलो. ते कपाट खिडकीपासून एक हातभर अंतरावर होते. अल्फाने त्या कपाटाचे निरीक्षण केले. त्याचे छोटेसे कुलूप तुटून बाजूला पडले होते. अल्फाने ते हातात घेऊन नीट पारखले.
" चिखल!! " तो पुटपुटला, " यावर टोकदार दगडाने घाव घालून हे तोडण्यात आलंय. तुम्ही आल्यावर इथे फार हलवाहलव नाही ना केली?? "
" नाही. वस्तू आहे त्या जागी तशाच आहेत. " मितेन म्हणाला. अल्फाने थोड्याशा समाधानाने मान डोलावली. त्याने कपाट उघडले आणि त्याच्या दाराचे निरीक्षण केले. मग त्याने खिडकी न्याहाळली. बराच वेळ तो त्या खिडकीच्या गजांकडे पाहत होता. कदाचित त्याला काहीतरी खटकले असावे, असे मला वाटले. त्याचा चेहरा थोडा त्रासल्यासारखा वाटला. मग त्याने थोडे इकडेतिकडे पाहिले. तो रूमच्या बाहेर गेला आणि त्याने दरवाजाचे आणि व्हरांड्याचे सखोल निरीक्षण केले. मग तो परत आत आला आणि त्याने खिडकीतून बाहेर पाहिले. तो थोडा गोंधळात पडल्यासारखा वाटत होता.
"इकडे मागच्या बाजूला काय आहे? " त्याने विचारले.
" थोडी झाडी आहे आणि त्यापलीकडे खेळाचे ग्राऊंड आहे. " मितेन म्हणाला.
" इकडे मागच्या बाजूला जाता येईल का आपल्याला?? "
" हो येईल ना. बाजूच्या भिंतीवरून उडी मारून जावे लागेल. " मितेन.
" चल, जाऊन पाहुया. " अल्फा म्हणाला.
" चोराने खिडकीतून चोरी केली, असं वाटतेय का तुला?? " मी विचारले.
" हां, तशी शक्यता आहे. " अल्फा उद्गारला. आम्ही रूमच्या बाहेर पडलो आणि त्या इमारतीच्या बाजुच्या भिंतीपाशी आलो. फार काही उंच नव्हती ती भिंत. फारतर कंबरेपर्यंत होती आणि त्यावरून उडी मारून जाणे सहज शक्य होते. त्या भिंतीवर आणि खाली पायात कसलीतरी पांढरी पावडर पडली होती. अल्फाने ती थोडीशी चिमटीत घेतली.
"रस्त्यावर रेषा आखण्यासाठी वापरण्यात येणारी फक्की. " तो पुटपुटला.
" परवाच कॉलेजमधले रस्ते नवीन केले आहेत. त्यावर रेषा मारून उरलेली फक्की त्यांनी इथे आणून टाकलीये." करण म्हणाला.
"अच्छा. " अल्फा हलकेच म्हणाला. मी, अल्फा आणि मितेन त्या भिंतीवरून उडी मारून हॉस्टेलच्या मागच्या बाजूला आलो. मागे सर्वत्र अंधार होता. आम्ही मोबाईलची बॅटरी सुरू केली. आमच्या बाजूला तुरळक झाडी होती आणि पायांखाली ओलसर गवत होते.
" आहाहा.. पावसाळा आणि चिखल.. माझे अगदी जवळचे मित्र!! " अल्फा खाली वाकून गवताला न्याहाळत म्हणाला.
" काही निशाण मिळतायत का? " मी विचारले.
" हो. जमिनीला थोडासा ओलसरपणा असल्यामुळे गोष्टी थोड्या सोप्या झाल्यात. " अल्फा उत्तरला. आम्ही सगळ्यात कोपऱ्यातील मितेनच्या रूमच्या मागे गेलो. तिथे पोहोचताच अल्फा एकदम म्हणाला, " तो बघ, कपाटाचे कुलूप फोडण्यासाठी वापरण्यात आलेला दगड!! "
खिडकीच्या बाजूला बॅटरीच्या प्रकाशात आम्हाला खाली एक दगड पडलेला दिसला. त्याच्या टोकावर आपटण्याचे निशाण होते. अल्फाने तो उचलला. त्यावर पांढरट डाग असलेले मी पाहिले.
" यावर असलेला चिखल पाहता हा इथूनच उचललेला आहे, असे दिसतेय. " अल्फा आजूबाजूला पाहत म्हणाला. त्याने तो रुमालात गुंडाळून व्यवस्थित खिशात ठेवून दिला. रूमची खिडकी तशी जमिनीपासून उंच होती. आम्हाला खिडकीच्या खाली एक मोठा दगड ठेवलेला दिसला.
" यावर चढून त्याने अंगठी चोरली तर.. " मितेन त्रासिकपणे म्हणाला. अल्फाने त्या दगडाचे निरीक्षण केले. मग तो मला म्हणाला,
" प्रभू, एक सेकंद माझा मोबाईल पकड. "
मी त्याचा मोबाईल हातात धरला. तो त्या दगडावर चढला आणि खिडकीतून हात घालून कपाट उघडण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही हात तिथवर पोहोचला नाही. मग तो खाली उतरला.
" आता तू चढून पहा बघू. कपाटाच्या कुलूपापर्यंत हात पोहोचतो का तुझा ते. "
त्या दगडावर मी चढलो आणि खिडकीतून हात घातला. मी अल्फापेक्षा बऱ्यापैकी उंच असल्याने माझा हात जेमतेम कुलूपापर्यंत पोहोचला.
" पोहोचतोय ना? शाबास! " अल्फा म्हणाला. मग तो मितेनकडे वळला, " तुला पक्की खात्री आहे का, की तू अंगठीबद्दल फक्त तुझ्या रूममेट्सनाच सांगितलेयस?? "
" हो. मी त्याबद्दल दुसऱ्या कोणालाच काही बोललो नाहीये. " मितेन विचार करत म्हणाला.
" तुझे रूममेट्स कितपत विश्वासार्ह आहेत? " अल्फा.
" मी त्या तिघांनाही शाळेत असल्यापासून ओळखतो. ते माझे खूप चांगले मित्र आहेत. मला त्यांच्यापैकी कोणी चोरी केली असेल, तर विश्वास बसणार नाही. पण अंगठीबद्दल ठाऊक असणारे ते तिघेच आहेत. त्यामुळे मला आता काहीच समजेनासं झालंय. "
" ठिकाय. फार विचार नको करूस." अल्फा म्हणाला. "चला पुढच्या बाजूला जाऊ. "
आम्ही पुढे हे तिघे थांबले होते, तिथे आलो. अल्फाने दुरूनच मितेनच्या रूमकडे पाहिले. तो कसल्यातरी खोल विचारात बुडालेला दिसत होता आणि त्याच्या मनात फार मोठी उलथापालथ होत असावी, असे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होते.
" रूमकडे चला. " तो म्हणाला. आम्ही परत मितेनच्या रूमबाहेर आलो. तिथे अल्फाने पुन्हा दाराचे आणि व्हरांड्यातल्या फरशीचे निरीक्षण केले. अखेर त्याने विचारले,
" तुमची रूम तळमजल्यावरील शेवटची आहे, बरोबर ना? "
" हो." मितेन उत्तरला.
"आणि तुमच्या रूमपलीकडे बाथरूम आहे, असं दिसतंय. "
" होय. प्रत्येक मजल्याच्या शेवटाला बाथरूम आहे - त्या पूर्ण मजल्यावरील रूम्स साठी. "
अल्फाने थोडा विचार केला.
" तू या तिघांना तुझ्या अंगठीबद्दल कधी सांगितले होतेस ते आठवतेय का? म्हणजे, दिवसाच्या कोणत्या वेळी? "
" मी गावाहून आल्याच्या रात्री त्यांना मी अंगठीबद्दल सांगितले. दहा - अकरा वाजले असतील रात्रीचे. "
अल्फाने फक्त मान डोलावली. काही क्षण शांततेत गेले.
" मितेन, आता एक काम करूया. खालच्या मजल्यावरील तुझ्या मित्रांना भेटवशील का मला? तुझ्या बऱ्यापैकी ओळखीचे असणारे?? तुझ्या रूमवर येतात असे?? "
" हो. चालेल. " मितेन कबूल झाला, " पण अंगठी मिळेल ना? मला खूपच भीती वाटतेय. जर अंगठी नाही मिळाली, तर माझे बाबा मला घरात घेणार नाहीत..!! "
" मिळेल, मिळेल. थोडी वाट पहा. " अल्फा म्हणाला, " प्रभू, तू या तिघांसोबत मितेनच्या रूमवरच थांब. आम्ही थोड्या वेळात येतोच. "
मी होकारार्थी मान डोलावली आणि मितेनच्या रूममेट्स सोबत आतमध्ये गेलो. अल्फा आणि मितेन तपास करण्यासाठी गेले. आम्ही साधारण अर्धा तास वाट पाहत होतो. माझी मितेनच्या रूममेट्सशी फारशी ओळख नसल्याने मी काही न बोलता शांत बसून राहिलो. ते तिघेही थोडे घाबरलेले असल्यामुळे तिथे एक तणावपूर्ण शांतता होती. मी त्या तिघांकडे पाहत चोर कोण असावा, याचा तर्क करण्याचा प्रयत्न केला. चोर त्या तिघांमधलाच असावा का? ज्याअर्थी अल्फा मितेनच्या रूममध्ये न थांबता दुसर्या रूम्समध्ये शोध घ्यायला गेला होता, त्याअर्थी चोर हे तिघे सोडून दुसरा कोणीतरी असावा. पण मितेनच्या अंगठीबद्दल फक्त त्याच्या रूममेट्सनाच ठाऊक होते. मग दुसरा कोणी कशी चोरी करेल? मला तर काहीच अंदाज लागेना. विचार करता करता अर्धा-पाऊण तास गेला आणि अखेर अल्फा आणि मितेन रूमवर परतले. मितेन अजूनही गोंधळलेला दिसत होता आणि अल्फा शांत आणि विचारमग्न होता. त्याच्या चेहर्यावरून त्याला काही सुगावा लागला आहे की नाही, याबद्दल मला काहीच समजले नाही.
"तू काही बोलत का नाहीयेस? " मितेनने अल्फाला विचारले, " अंगठीचा काही पत्ता लागणार नाही का? आपण पोलिसांत तक्रार देऊया का?? "
" नको. त्याची काही गरज नाही. " अल्फा शांतपणे म्हणाला, " मी काही प्राथमिक अंदाज बांधले आहेत, अंगठीच्या चोराबद्दल. फक्त एकदा खात्री करून घेतो आणि तुला सविस्तर सांगतो. "
" खरंच का? तुला कोणी चोरी केलीये, हे ठाऊक आहे का?? " मितेनने आनंदमिश्रीत उत्साहाने विचारले.
" ठाऊक आहे असं म्हणता येणार नाही. पण अजून थोड्या तपासाअंती मी सांगू शकेन. " अल्फा म्हणाला, "तुला कदाचित उद्या सकाळपर्यंत वाट पहावी लागेल. पण तुला अंगठी मिळवून देण्याची हमी मी देतो."
" प्लीज लवकरात लवकर काहीतरी कर. ती अंगठी मिळाली, तर मी जन्मभर तुझा ऋणी राहीन. " मितेन काकुळतीला येऊन म्हणाला. आम्ही त्याला धीर दिला.
" चल प्रभू. आपण निघुया. मितेन, मी तुला योग्य वेळी फोन करेन. काळजी करू नकोस. " अल्फा म्हणाला. आम्ही बाहेर पडलो. थोडे अंतर चालून हॉस्टेलच्या गेटबाहेर आल्यानंतर मला राहवले नाही आणि मी अल्फाला विचारलेच,
" अंगठीच्या चोरीबाबत मला काहीच तर्क करता येत नाहीये. तू कोणत्या दिशेने विचार करतोयस? तुला नक्कीच काहीतरी धागेदोरे मिळाले आहेत, हो ना?? "
" हो, मिळाले तर आहेत. पण थोडा पाया भक्कम करायचा आहे. उगाच चुकीचा निष्कर्ष निघायला नको. त्यासाठी आणखी थोडा शोध घेणे गरजेचे आहे. " अल्फा म्हणाला.
" मला आता न फिरवता व्यवस्थित सांग, तू या प्रकरणात कुठपर्यंत आला आहेस ते. मला फार काळ उत्सुकता ताणून धरणे जमत नाही बुवा. " मी बेचैन होऊन म्हणालो.
" बरं, ठिक आहे. मी या प्रसंगाचा कोणत्या टप्प्यांत विचार केला आणि कोणत्या निष्कर्षाप्रत पोहोचलो, हे थोडक्यात तुला सांगतो. " अल्फा म्हणाला, " मितेनने ती अंगठी गेल्या रविवारी इथे आणली होती, म्हणजे पाच दिवसांपूर्वी. त्याने त्या अंगठीबद्दल फक्त त्याच्या तीन रूममेट्सना सांगितले होते - विकास, नितीन आणि करण. बाकी कोणालाच त्या अंगठीबद्दल काहीही ठाऊक नव्हते. साहजिकच मी प्रथम त्या तिघांकडेच मुख्य संशयित म्हणून पाहत होतो. कारण पाच दिवस हे मितेन अंगठी कुठे ठेवतो, कधी आणि कशी ठेवतो, हे जाणून घेण्यासाठी पुरेसे होते. त्यात ते कुलूप घातल्यानंतरही उघडणारे विचित्र दार. चोर मोकळीक कधी मिळतेय, याची वाटच पाहत असावा आणि काल त्या कार्यक्रमाला हॉस्टेलवरचे सर्वचजण गेल्यामुळे त्याचे फावले. तो सर्वांसोबत तिकडे गेला, गर्दीत हरवल्याचा बहाणा करून परत हॉस्टेलमध्ये आला, अंगठी चोरली आणि परत कार्यक्रमाला गेला. अगदी सोप्पं!!
मग त्या तिघांतला नक्की चोर कोण? मी दरवाजा आणि व्हरांड्याची थोडी तपासणी केली. मला तिथे एखाद्या पांढरट पावडरचे कसलेतरी डाग पडलेले दिसले. ते कसले आहेत, हे पाहण्याचा मी प्रयत्न केला, पण मला सुरूवातीला काही ध्यानात आले नाही. मग ते बाजूला ठेवून मी कपाटाची आणि त्याच्या कुलूपाची तपासणी केली. मला त्या कुलूपावर थोडा चिखल दिसला. म्हणजे ज्या दगडाने ते कुलूप फोडण्यात आलंय, तो चिखलातून उचलण्यात आला होता. पण हॉस्टेलच्या इमारतीसमोर किंवा आजूबाजूला कुठेच चिखल दिसत नव्हता. मग मी खिडकीतून मागच्या बाजूला पाहिले. तिथे चिखल होता. मी खिडकीच्या गजांचेही निरीक्षण केले. त्यावरही थोडा चिखल लागला होता. याचा अर्थ असा होता, की चोरी समोरच्या दारातून नाही, तर खिडकीतून झालीय. आश्चर्याची गोष्ट होती खरी. मी तर चोर दारातूनच आला आहे, असे धरून चाललो होतो. पण तिथले निशाण काही वेगळंच सांगत होते. पण मग प्रश्न उभा राहतो, की दारातून येणे इतके सोपे असतानाही चोराने खिडकीतून का चोरी केली?
याचा केवळ एकच अर्थ असू शकतो - चोर हा मितेनचा रूममेट नसावाच. त्याला ठाऊकच नसावे, की त्या रूमचे दार असेच किल्लीशिवाय उघडते. त्याशिवाय त्याने खिडकीतून अंगठी चोरण्याचा नसता खटाटोप केला नसता. जर चोराने खिडकीतून चोरी केली असेल, तर मग मागच्या बाजूला काही सुगावे मिळण्याची शक्यता होती. त्यामुळे मी मागे जाऊन तपास करण्याचे ठरविले. तेव्हाच मला तेथील भिंतीजवळ पांढरी फक्की पडलेली दिसली आणि मितेनच्या रूमच्या दारावर आणि व्हरांड्यात ते पांढरे डाग कसले होते, याचा उलगडा झाला. पण हे डाग तिथे कसे? अजून एक नवीन प्रश्न!! इथून चढून गेलेला कोणीतरी मितेनच्या रूममध्ये गेला असावा. त्याशिवाय तिथे पांढरे डाग उमटणे शक्य नाही. ठोस उत्तर मिळेनासे झाल्यावर मी पुन्हा तो प्रश्न बाजूला ठेवला आणि मागे काय मिळते, ते पाहण्यास सुरूवात केली. तेथे मला नुकतेच कोणीतरी येऊन गेल्याचे निशाणही मिळाले आणि तो दगडही मिळाला. त्या दगडावरही पुसट पांढरे डाग होते. थोडक्यात, चोर इथे आला होता आणि खिडकीतूनच त्याने कपाट फोडले. मी खिडकीतून कपाट उघडण्यासाठी किमान उंची किती लागते, याचा अंदाज लावण्यासाठी तुला तेथे चढायला लावले. तुझा हात कुलूपापर्यंत पोहोचत होता. म्हणजेच, चोरी करणारा किमान तुझ्याइतक्या उंचीचा असला पाहिजे, असा मी आखाडा बांधला.
पण शेवटी एक प्रश्न शिल्लक होताच - जर चोरी खिडकीतून झाली असेल, तर मितेनच्या रूमच्या दरवाजावर आणि व्हरांड्यात त्या भिंतीवरील फक्कीचे डाग कोठून आले?? चोर भिंतीवरून जाताना चोराच्या चपलांना, हातापायाला ती पांढरी फक्की लागणार, हे उघडच आहे. पण ते निशाण दरवाजाजवळ आणि व्हरांड्यात नसायला हवे होते. कारण चोर दरवाजातून गेलाच नव्हता. त्याचे काम एवढेच, की पाठीमागच्या बाजूने येणे, अंगठी चोरणे आणि आल्या वाटेने परत जाणे. मग दरवाजावरील डागांचे रहस्य नक्की काय होते?? "
आम्ही हॉस्टेलच्या चिंचोळ्या रस्त्यावरून कॉलेजच्या इमारतीपाशी आलो. अल्फा न थांबता बोलतच राहिला,
" मी माझ्या मेंदूला थोडासा ताण दिला आणि माझ्या सर्वकाही ध्यानात आले. मी चोराबद्दल निष्कर्ष काढायला जरासा चुकलो होतो. याचे कारण, तो निष्कर्ष मी त्या प्रसंगाचा अर्धवट विचार करून काढला होता. चोर रूमच्या मागील बाजूस नक्कीच आला होता आणि त्याने खिडकीतून हातही घातला होता; पण अंगठी चोरली नाही..!! "
मी बुचकळ्यात पडलो.
" म्हणजे?? "
" म्हणजे, " अल्फा म्हणाला, " मी मघाशी म्हणालो, त्याच्या बरोबर उलट चित्र वास्तवात होते. चोराची उंची तुझ्यापेक्षा जास्त नव्हे, तर तुझ्यापेक्षा कमी असली पाहिजे. त्यामुळे त्याचा हात कपाटापर्यंत पोहोचू शकला नाही आणि म्हणूनच तो पुन्हा पुढच्या बाजूला गेला आणि त्याने दरवाजातून आत प्रवेश केला. तो पुन्हा भिंतीवरून चढून गेल्यामुळे त्याच्या चपलांचे डाग दारावर आणि व्हरांड्यात आपल्याला मिळाले. त्याला दार विना चावीचे उघडते, हे ठाऊक नव्हते ; पण थोडा प्रयत्न करता त्याच्या लक्षात आले असणार. मग तो आत गेला, कुलूप फोडले, अंगठी मिळविली आणि दार होते तसे परत लावून तो तिकडे कार्यक्रमाच्या ठिकाणी गेला. सबंध हॉस्टेल रिकामे असल्यामुळे त्याला हे सगळे उपद्व्याप करण्यासाठी मोकळे रान मिळाले. मला खात्री आहे की असंच घडलेलं असणार आहे. त्याशिवाय ते पांढरे डाग दोन्हीकडे आढळून आले नसते. "
" ओहोहो.. सुपर्ब!!" मी एकदम उत्साहित होऊन म्हणालो, "असं आहे तर!! "
"बघ ना.. एका छोट्याशा गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि बरोबर उलटा निष्कर्ष निघाला!!" अल्फा उद्गारला, "आता शेवटचे आणि सर्वात अवघड काम शिल्लक होते - गुन्हेगार शोधणे!! चोर जर मितेनचा रूममेट नसेल, तर आख्ख्या हॉस्टेलवरचा कोणीही असू शकत होता, किंवा बाहेरचाही.. मग त्याला शोधायचे कसे? आणि त्यातच, मितेन म्हणाला की त्याच्या अंगठीबद्दल फक्त त्याच्या रूममेट्सनाच माहीत होते. मग बाहेरचा कोणी कशी चोरी करेल? मितेनही त्याबद्दल कोणाला काही बोलला नव्हता आणि त्याचे रूममेट्सही शपथेवर सांगतायत, की त्यांनी चुकूनही कोणाकडे त्या अंगठीचा उल्लेख केलेला नाहीये. शेवटी एकच शक्यता उरते - मितेनने जेव्हा त्याच्या रूममेट्सना अंगठीबद्दल सांगितले, तेव्हा कदाचित बाहेरून कोणीतरी ऐकले असावे. मितेनच्या रूमच्या पलिकडे कोपर्यात पूर्ण तळमजल्यावरील राहणाऱ्या मुलांसाठी बाथरूम आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी जेव्हा मितेन त्या अंगठीबद्दल सांगत होता, तेव्हा बाथरूमला आलेले कोणीतरी बाहेर उभारून त्याचे बोलणे ऐकले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा मी विचार केला.
म्हणून मी प्रथम तळमजल्यावरील मुलांवरून नजर फिरवण्याचे ठरवले. त्या भिंतीवरील फक्कीच्या पांढऱ्या डागांचे निशाण चोराच्या अंगावरील एखाद्या वस्तूवर मिळू शकतील, या आशेवर आम्ही एका एका रूममध्ये जाऊन पाहू लागलो. ज्याअर्थी चोराला अंगठी पाकिटात आहे आणि ते पाकिट कपाटात आहे, एवढी माहिती होती, त्याअर्थी चोर मितेनच्या ओळखीचाच असला पाहिजे आणि त्याची मितेनच्या रूमवर ये-जा असली पाहिजे असे मी गृहीत धरले. आम्ही खालच्या मजल्यावरील रूम्समध्ये एक एक करून गेलो आणि अखेर मला हवे ते मिळाले!! "
" काय सांगतोस?? " मी स्तिमित होऊन म्हणालो, " म्हणजे चोर कोण आहे, हे तुला ठाऊक आहे तर!! "
" असे म्हणता येईल. मला एके ठिकाणी पांढरे निशाण मिळालेत खरे. पण आत्ताच त्याच्यावर 'चोर' असा शिक्का मारायची घाई करायला नको. थोडी आणखी माहिती काढणे गरजेचे आहे. त्यामुळे तू थोडा धीर धर. उद्या सकाळपर्यंत सगळं काही काचेसारखं पारदर्शक होईल बघ. "
" मग आत्ता काय करणार आहेस तू? "
" आत्ता तू जेवण वगैरे आवरून रूमवर जा. मी थोड्या वेळाने येईन. " अल्फा म्हणाला.
" आणि तुझे जेवण?? "
" मी नंतर जेवून घेईन. आता तू जा पाहू. तू समोर असलास, की सतरा शंका विचारतोस आणि माझ्या विचारांच्या गाडीला ब्रेक लावतोस. त्यामुळे मी माझ्या कामाला जातो आणि तू रूमवर जा. "
" बरं बरं!! 'चालता हो' म्हणायची फारच सभ्य पद्धत आहे ही. " मी जरा रागानेच म्हणालो, " जातो मी."
" मग..! मी आहेच मुळी सभ्य!" अल्फा हसायला लागला, "चल भेटू नंतर. आणि मला वेळ झाला तर वाट नको पाहू. झोपून जा."
"हो. " मी म्हणालो आणि मेसच्या दिशेने चालू लागलो.