माय
दत्ता वालेकर
माय, वाढविले
मला तू उदरात
लहानाचं केलंस
मोठं तू पदरात
माय ल्यायची कुंकू
जसा पौर्णिमेचा शशी
शीत प्रकाश देई
कोजागिरीच्या दिशी
माय भरवायची
मला पहिला घास
आठवणी शिवाय
चालत नाही श्वास
माय होती सोनाई
सारखं वाटायचं
घरी लकलकाट
स्वर्णच भासायचं
माय माझी अडाणी
ओळख नाही तिला
अक्षरांची, संस्कार
शिदोरी दिली मला
माय गेल्यावर हे
माझे गेले आकाश
मागे रेंगाळतो हा
अंधारात प्रकाश