ताऱ्याच्या शोधात
आज मी पुन्हा नवीन तार्याचा शोध घेत भरल्या डोळ्यानं आकाशाकडे बघत होतो त्यामुळे चांदण्यांनी भरगच्च भरलेलं आभाळही मला अंधूक दिसत होतं. किती आश्चर्य आहे ना? सुर्य मावळतो, आणि असंख्य चांदण्या आकाशात उगवतात जणू सूर्याला हरवून त्या फिदीफिदी हसताहेत असंच त्यांच टीमटीमणं, परंतु आज त्या चक्क माझ्यावरच हसताहेत याचा मला भास होऊ लागला होता. भास कसला? खरंच तर हसत आहेत त्या माझ्या दैवावर. मन दु:खी, उदास असलं की असंच वाटतं जणू प्रत्येक गोष्ट आपला उपहास करतेय. माणसाच्या दुःखाला एकटेपणा आणि अंधार या गोष्टी अधिक भयाण व करुणामय करून सोडतात. अंधाराचा आधार घेऊन मी माझ्या अश्रूंना वाट देत घराच्या गच्चीवरच्या कोपऱ्यात बसलो होतो. डॉक्टरने इलाज करण्यासाठी हृदयाची सर्जरी करावी अन् कापसाचा बोळा हृदयातच राहिला म्हणून पुन्हा ह्रदय फाडावे असंच काहीतरी काळानं माझ्यावर घात केल्याचं मला भासत होतं. आज पुन्हा त्या आठवणींना उजाळा मिळाला होता आणि एकेक आठवणींची स्लाईड माझ्या डोळ्यासमोरून जात होती. दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, ज्यावेळी मी माझ्या भावाकडे डोंबिवलीला गेलो होतो. माझा भाऊ हा घरातील फरशी बसविणे, स्टाईल बसविणे, किचन बनविणे, इत्यादी बांधकामाशी संबंधित कामे करत असतं. उन्हाळा असल्याने मी तिकडेच कामासाठी जायचो. डोंबिवली स्टेशनवरून मी वेस्ट ला लोठेवाडीला गेलो. घरी गेल्यावर मी हात पाय धुवून सगळ्यांसोबत जेवण केले. मग आम्ही कामाबद्दल चर्चा केली. भावाचं काम डोंबिवली ईस्ट ला पारिजातक सोसायटीमध्ये चालू होतं, आणि मलाही उद्या कामाला जायचं असल्याने मी लवकर झोपलो.
जवळूनच रेल्वेची लाईन गेल्याने गाडीचा आवाज येऊन मला जाग आली. माझी झोप झाली नव्हती, कधी न पडलेले स्वप्न आज पडले होते. परंतु एक वेगळीच प्रसन्नता वाटू लागल्याने झोप झाली नसली तरीही माझी तंद्री पूर्ण भंग झाली होती. मी अंघोळ केली आणि आम्ही ऑटो रिक्षाने डोंबिवली स्टेशन व नंतर स्टेशन ओलांडून पुन्हा ऑटोरिक्षातून पारिजातक सोसायटीत उतरलो. मोठमोठ्या इमारतींनी अवतरलेली ही पारीजातक सोसायटी मन मोहून घेत होती. माझ्या प्रसन्नतेत अजूनच भर पडली, मन उल्हासित झाले अन् मी भानावर आलो. आज हे असं का होतंय? कसला हा प्रकार आहे? कधीच न आलेल्या भावना आज मनात काहूर माजवत आहेत. त्यामुळे माझा चेहरा स्मित करू लागला, त्याच्यावर तेज चढल्यासारखे माझे मलाच वाटू लागले. सोसायटीतील बी विंग मध्ये चौथ्या मजल्यावरील अकरा नंबरच्या फ्लॅटमध्ये आम्ही गेलो. तिथे गेल्यावर मी डावीकडे पाहिले की एक मोठी गॅलरी होती. त्या गॅलरीमध्ये अनेक प्रकारच्या फुलांची रोपे होती. मला मोह आवरला नाही, मी लगेच तिकडे गॅलरीत गेलो. त्या फुलांचा वास त्या गॅलरीत मुक्त दरवळत होता, त्या फ्लॅटमधील लोकांना तो तितक्या तीव्रतेने जाणवत नसावा कारण त्यांना सवय झालेली असावी. मी त्या फुलांना बघत होतो, हळुवारपणे स्पर्श करत होतो, तोच माझी नजर समोरच्या A- विंगच्या गॅलरी कडे गेली. तिथेही अशीच फुलांची रोपटे होती. परंतु ती फुलांनी जास्त लदबदलेली व आकर्षक होती, मनमोहक होती. जणू त्यांच्यावर अमृताचा वर्षाव होत असावा, असंच मला वाटलं. आणि खरंच की काय, त्यांच्यावर अमृतरुपी पाण्याचा वर्षाव करत एक सुंदर मुलगी आपल्या पूर्ण स्नेहाने त्या रोपट्यांना पाणी घालत होती. कोण ही मुलगी? अचानकपणे मला रात्री पडलेले स्वप्न आठवून गेले, इतकी सुंदर मुलगी मी कधीच बघितली नसावी अशा प्रकारे मी तिला टक लावून बघू लागलो, तिला न्याहाळू लागलो. आमच्यातील अंतर कमी होते आणि ती कमरेपासून वर स्पष्टपणे मला दिसत होती. इतक्यात तिचीही नजर माझ्या नजरेला भिडली आणि चमत्कारच झाला, तीही आश्चर्य झाल्यासारखे माझ्याकडे बघू लागली. जणू आम्ही एकमेकांना आधीपासूनच ओळखत असावे, असाच भास होऊ लागला. आता राहवत नव्हतं. तिला जाऊन मिठीत घ्यावं असं वाटू लागलं होतं. आणि तिलाही तसंच काहीतरी वाटत असावं, असं मला वाटू लागलं. रोपट्यांची कुंडी पाण्याने भरून वाहू लागली होती त्याचप्रमाणे आमच्याही मनात प्रेमाचे जुने स्फुल्लिंग वाहू लागल्याची प्रचिती येऊ लागली.
कुंडीतील पाणी वाहून तिच्या पायाखाली गेल्याने ती मुलगी भानावर आली. आणि तिने डोळे वळवत सोसायटीच्या ग्राउंडकडे नेत उजव्या भुवईने खुणवले. तिने मला खाली ग्राउंडवर येण्याची खुणवल्याचे मला लगेच कळाले. आम्ही दोघेही अधीर झालो होतो, जणू कामदेवाचा बाण लागावा अशीच स्थिती आमची झाली होती. पण या मुलीला बघून असं का व्हावं? या आधी काय मुलींचं बघितल्या नव्हत्या काय? लगेच एक प्रसंग डोळ्यासमोर तरळून गेला राजा शंतनू आणि गंगेचा. ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये कामातूर झाल्याने त्यांना ब्रह्मदेवाने मृत्युलोकात जन्म घेण्याचा शाप दिला होता, असचं काहितरी आमचंही नसेल ना, नाही नाही, असं होणं शक्य नाही, पण मग हे स्वप्न तर नाही ना, अशा अनेक गोष्टीचा विचार करत मी लिफ्टची वाट न पाहता पायर्यांनी झपकन झपकन खाली उतरून ग्राउंडवर पोहोचलो. मी इतक्या फास्ट येऊनही ती माझ्या अगोदर ग्राउंडवर आलेली बघून तिची आतुरता कळू लागली. मला बघून ती ग्राऊंडच्या बाहेर गेली व तिने एक ऑटोरिक्षा थांबवला. माझ्या तिथे जाण्या अगोदरच तिने कुठे जायचे ते रिक्षावाल्याला सांगितले असावे, मी रिक्षात बसलो. आणि आम्ही एका मोठ्या गार्डन जवळ आलो, रिक्षातून उतरून आम्ही त्या गार्डनमध्ये आलो. या गार्डन मध्ये लहान मुले खेळत होती, वयोवृद्ध व्यक्ती फिरत होते, एका कोपऱ्यात काही कपल्स बसले होते, तिथे असलेल्या एका झाडाखालील बाकावर आम्ही बसलो. मी पूर्णपणे विसरलो होतो, की मी कामासाठी आलोयं ते सगळं सोडून मी तिच्या एका इशाऱ्यावर इथपर्यंत आलो होतो, इतकी कशी जादू असावी तिच्या नजरेत! तिने स्मित करून किंचित आश्चर्याने विचारले की, "तू कोण आहेस?" आणि या आधी तुला कधी मी पारिजातक मध्ये पाहिलं नाही. तिच्या त्या सुंदरते सारखेच जणू तिचे बोल शारदेच्या झुंबरासारखे अद्भुत लोलक होते. मी तिला माझ्याबद्दल व कामाबद्दल सांगितले. मला तिच्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता वाटू लागली. मीही औपचारिकतेनेच विचारले, व तिने सगळे सांगितले. "माझे नाव निकिता आहे, घरात मी व माझे मम्मी-पप्पा असतात." तिची आई ज्युनिअर कॉलेजमध्ये टीचर होती. वडील पूर्वी पोलीस मध्ये होते, परंतु निकिताने सांगितले की, ती एक दिवस पप्पाला म्हणाली, तुम्ही नेहमी कामात असता माझ्यासाठी तुमच्याकडे वेळच नसतो. आणि केवळ आपल्या मुलीला वेळ देता यावा म्हणून त्यांनी सरकारी नोकरी सोडून प्रायव्हेट पार्ट टाइम जॉब सुरू केला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचे निकितावरील प्रेम अंकित होतं होते. आपल्या मुलीला वेळ मिळावा यासाठी केवळ एका शब्दावर एवढा मोठा निर्णय घ्यावा? पण त्यांनी घेतला होता. आणि निकिताच्या आपल्या आई वडिलांविषयी बोलतानाच्या आदर भावातून त्यांचे प्रेम प्रतिबिंबित होते. निकिता 19 वर्षांची होती ती पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. ती फारच समजूतदार होती. जणू आधीच्या जन्मीच ज्ञान ती सोबत घेऊन आली असावी. तिच्या बोलण्यात प्रेम होतं, विश्वास होता, पण कसली तरी अनपेक्षित भीती होती, असं मला वाटलं. कदाचित अनोळखी मुलासोबत बोलल्याने असं होत असेल किंवा मी तिला नीट ओळखू शकलो नसेल, यामुळे असं वाटत असावं. तिने तिचं माझ्याबद्दलचं निर्माण झालेलं प्रेम व आकर्षण व्यक्त केलं होतं आणि मीही व्यक्त केलं. पण एक गोष्ट मात्र आम्हा दोघांनाही खटकली की, इतक्या कमी वेळात झालेलं हे प्रेम केवळ आकर्षण असावं. पण इतक्या तीव्रतेचे असणं कसं शक्य आहे? पण आता आम्ही एकमेकांना चांगलेच ओळखतो, अशाच प्रकारे वाटू लागलो, आम्ही क्षणातच एक झालो होतो. आणि आता रोज भेटायचं असं ठरवून आम्ही परतलो.
मी अचानकपणे कामावरून निघून गेल्याने, माझ्या भावाला मला काय झाले ते कळेना. मी परत कामावर गेलो आणि सारखं सारखं समोरील गॅलरी कडे बघून काम करू लागलो. अधून-मधून वाऱ्याची झुळूक येई व फुलांचा वास येई, त्यामुळे तिचा स्पर्श झाल्याचेही जणू मला भासे. सुर्य क्षितीजाकडे झुकला होता, जणू मोठ-मोठ्या इमारतींनी तो गिळला होता. अंधाराची चाहूल लागली होती. पण सगळीकडे लाईटची झगमग वाढली होती. त्याचप्रमाणे माझ्याही मनाची अस्वस्थता वाढू लागली, अन् डोळ्याची घरी जातानाच्या आधी तिला बघण्याची चकमक चालू झाली होती. शेवटी मला ती दिसली अन् डोळ्याचे पारणे फिटल्यासारखे झाले. तीही मलाच शोधत असावी, असं तिच्या चेहऱ्यावरून वाटत होतं. आम्ही स्मित केलं, आणि तिने तिचा हात ओठांना लावत त्याचे चुंबन घेऊन ते हवेत हळूवार फुंकलं, त्यावर मी पुन्हा स्मित करून हात हलवून तिला बाय बाय केलं. खरंतर मला तिथून निघावं वाटत नव्हतं. परंतु पुन्हा उद्या भेटायचं या आशेने खाली आलो. आणि ग्राऊंडच्या बाहेर जाताना वळून पुन्हा एकदा मागे बघितले. तीही मी नजरेआड होईपर्यंत मला बघत होती. काय असतं हो हे प्रेम? जे दोन जीवांना एक करत. आपल्याहून दुसऱ्याची काळजी जास्त वाटते, प्रेम तर आपण सर्वांवरच करतो ना? आई-वडील भाऊ-बहीण, मित्र मग या प्रेमात वेगळं काय असतं? याचाच विचार करत मी घरी आलो. आता माझ्या मनात प्रत्येक क्षणाला तिचाच विचार चालू होता. जणू मनाचे संपूर्ण स्पंदने खुली झाली होती. नवीन भावनांचा आविष्कार झाला होता. रात्री उशिरापर्यंत मला झोपच आली नाही. सकाळी सकाळी झोप लागली पण आज रेल्वेगाडीच्या आवाजानेही मला जाग आली नाही. वहिनीने मला उठवलं. मी उठलो, अगदी चित्त्याच्या स्पीडने न्हानीकं ( अंघोळ इ.) उरकून तयार झालो. माझं मन सूर्याच्या प्रकाशाच्याही अधिक वेगाने कालच्या गॅलरीतून डोकावून येत असे, कधी जातो आणि एकदाच तिला बघतो असं झालं होतं. आम्ही निघालो होतो पारिजातक सोसायटीकडे नव्हे! तर अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे. कालच्या प्रमाणेच मी गॅलरीमध्ये प्रथम जाऊन तिला बघितले. निकिताही माझीच वाट बघत होती. जणू आज सर्व फुले तिच्यावर रुसले होते, कारण त्यांच्यावरच्या स्नेह प्रेमाचा भागीदार मी झालो होतो. आज आम्ही सायंकाळी भेटायचं ठरवलं तसं तिने इशाऱ्याने मला कळवलं होतं. सायंकाळ होताच मी भावाला सांगितले की, तू घरी जा मला थोडा उशीर होईल मला काम आहे. तो ऑटो रिक्षात बसून घरी जाताच मी निकिताची येण्याची वाट पाहू लागलो. आता तिच्या येण्याच्या क्षणाचाही विलंब मला दिवसासारखा भासू लागला होता. आणि ती येताना मला दिसली, आता ती सोडून मला काहीच दिसत नव्हते, मी प्रेमांध झालो होतो.
ती आली. तिने कालच्या सारखेच मी जवळ येण्याच्या आतच ग्राऊंडच्या बाहेर जाऊन रिक्षा थांबवला आणि मला इशाऱ्याने बोलावलं. मीही लगेच जाऊन बसलो, आम्ही कालच्याच गार्डनकडे चाललो होतो, ते मला समजलं. आमचे हात नकळतच एकमेकांच्या हातात गुंफुन गेले होते, परंतु आम्ही अबोल होतो. ती दूर असताना तिच्याशी बोलावे वाटे पण जवळ आली की सर्वकाही थांबल्या सारखे भासे. गार्डनजवळ उतरलो कालच्याच बाकावर जाउन बसलो. मी तिचा हात हातात घेत तिला म्हणालो, "निकिता तुला माहितीये का की तू किती सुंदर आहेस ते." त्यावर ती हसली आणि म्हणाली, अरे वेड्या स्त्रियांना काय माहीत नसतं का की, त्या किती सुंदर आहेत ते? त्यांच्या सुंदर असण्यात काहीच विशेष नसतं. तर विशेष असते ती बघणाऱ्याची दृष्टी. बघणाऱ्याचा दृष्टिकोन कसा आहे? तो कोणत्या दृष्टीने बघतोय? प्रेमाने की वासनेने? त्यावर स्त्रियांची सुंदरता ही वरदान किंवा शाप ठरत असते. माझ्या एका छोट्याशा प्रश्नाचं ती इतकं मोठ आणि स्पष्ट उत्तर देईल, याची मला कल्पनाच नव्हती. आमची अनेक विषयांवर चर्चा झाली. जीवनाबद्दल तिचे विचार, माझे विचार, आम्ही जाणून घेतले. प्रेमाची परिभाषा काय आणि ती काय असायला हवी? असं तुला वाटतं, असं मी निकिताला विचारल्यावर ती म्हणाली, प्रेमात त्याग असतो. समर्पण असते. व प्रेम यामुळेच निस्वार्थ बनते. आणि म्हणूनच तर ती खुप अमूल्य देणगी असते. प्रेमात दोन शरीराची आवश्यकता नसते, तर एक झालेल्या ह्रदयाची, मनाची, सुखदुःखाची गरज असते. प्रेम ही अनंत कोटीची भावना आहे. आणि म्हणूनच ते शरीराच्या नष्ट होण्याने इतकिंचितही कमी होऊ नये, असं मला वाटतं. आणि आपलं प्रेम हे असंच असावं... तुला सांगू का? प्रेमाचा खरा आनंद लुटायचा असेल ना, तर त्याला मृत शरीराचे बंधन हवेच कशाला! प्रेम ही फार उच्च कोटीची भावना आहे. त्यामुळे प्रेम करणं साधं आणि सरळ नसतं. प्रेमात आणि दिलेल्या वचनात समर्पण आणि त्याग करावा लागतो. आणि जर आपण प्रेमात वचनं दिली तर ती पूर्ण करणं. म्हणजेच समोरच्या व्यक्तीवरील प्रेम अंकित करण्यासारखं असतं...
तीचं हे प्रेमाबद्दलच तत्वज्ञान ऐकून मी स्तब्ध झालो होतो. जणू तिने प्रेमाचे धडेच पाठ केले असावे. पण काही का असेना तिचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी मोलाचा होता. आणि त्यासाठी त्याचक्षणी मी तिला म्हटलं निकिता माझं तुझ्यावर असंच अनंतकोटीच प्रेम आहे, आणि मी तुला वचन देतो की, असंच नेहमी करीत राहीन. पुढे असचं अनेक वेळा आम्ही भेटलो होतो. वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचो, जे दिसेल, जे आवडेल ते खायचो... मी जेव्हाही आमच्या भविष्याबद्दल काहीही विषय काढला की ती म्हणायची, फ्युचर बद्दल काहीही स्वप्न बघणं त्रासदायक असतं. आपण पाहिलेले स्वप्न पूर्ण नाही झाले की, मग त्रास होतो. आणि तेव्हा प्रेमात स्वार्थ जन्माला येऊ लागतो. मग मी विषय बदलायचो, ती अनेक वेळा माझ्या हालचालीकडे शून्यात गेल्यासारखी बघायची. तर कधी जीवनाचं असीम सार तिच्यातच सामावल्याचे मला भासे. निकिता खूप आनंदी असायची, ती निसर्गाने बनवलेल्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक करायची. तिच्याकडे आता सगळ्या गोष्टी होत्या. जिवापाड प्रेम करणारे तिचे आई-वडील आणि प्रियकर. आम्हाला भेटून चौदा दिवस झाले होते. नेहमीप्रमाणे आम्ही गार्डन मध्ये बसलो होतो. समोर छोटे छोटे मुलं खेळत होते. आजूबाजूला काही कपल्स बसले होते.
त्यात काही लग्न झालेली मंडळी आपल्या मुलांना खेळायला घेऊन आलेली होती. आम्ही ज्या बाकावर बसलो होतो त्याच्याच मागच्या बाजूला एक विवाहित जोडी बसलेली होती. त्यादिवशी निकिताने मला अनेक प्रश्न विचारले. आम्ही जास्तीत जास्त गप्पा मारल्या, अचानकपणे मागच्या बाकावरून आवाज आला, "निकिता". 'येस पप्पा निकिता म्हणाली.' मी हादरलो. पण निकिता हसत होती. ते पाहून मला आश्चर्य वाटले... "चला आता तुम्हाला भूक पण लागली असेल ना" असं म्हणतं ते दाम्पत्य आमच्या समोर आले. आता मला समजलं होतं की, हे मागे बसलेली जोडी निकिताचे मम्मी-पप्पा होते. आणि त्यांना बघायचं होतं की, मी कसा मुलगा आहे ते. निकिताने मला तिच्या मम्मी पप्पा ची ओळख करून दिली. आणि आम्ही त्यांच्या घरी जेवायला गेलो. जाताना निकिताने मला सांगितलं की, तिने मम्मी पप्पाला माझ्याबद्दल सर्व सांगितलेलं होतं. आणि त्यांना मी कसा आहे ते बघायचं होतं? त्यामुळेच ते आज गार्डनमध्ये आले होते. त्यांच असं ठरलं होतं की, मी जर त्यांना पसंत असेल तर ते आम्हाला जेवणाची ऑफर करणार अन्यथा न बोलता वापस जाणार. परंतु त्यांनी ऑफर दिली होती. म्हणजेच माझं व निकिताच नातं त्यांना मान्य झालं होतं. त्यावेळी सुद्धा त्यांच निकितावर किती प्रेम आहे, हे प्रतिबिंबीत होत होतं. आम्ही गाडीतून पारीजातक सोसायटीत आलो. आणि लिफ्टमध्ये वरती चाललो होतो. निकिता तिच्या मम्मी पप्पाला म्हणाली की, आम्ही बिल्डिंगच्या टेरेस वरती जाणार आहे. त्यामुळे तिचे मम्मी-पप्पा चौथ्या मजल्यावर फ्लॅटमध्ये गेले. व आम्ही टेरेसवर गेलो. निकिता रोज सायंकाळी या ठिकाणी येत असतं परंतु आम्ही भेटल्यापासुन तीचं सातत्य खंडित झालं होतं. तिने मला तिची तेथील फेवरेट जागा दाखवली. आणि तिथे एक जुना बेड होता त्यावर ती झोपायची आणि आकाशातील चांदण्या पाहायची.
आम्हीही त्या बेडवर झोपलो होतो, ती माझ्या हृदयावर आपलं डोकं टेकून झोपली होती. आम्ही दोघे आकाशाकडे बघत होतो. आणि निकिता माझा हात हातात घेत म्हणाली, "जीवन किती सुंदर आहे ना, आणि काही लोक हे जीवन रडण्यात व्यर्थ घालवतात", मला तुझ्याकडून एक वचन हवय देशील का? वचन? कसलं वचन हवयं तुला? माझं सर्व जीवणचं तुझ आहे. मग वाचनाचं काय घेऊन बसलीस? तरीही बोल कसलं वचन हवयं तुला ? मी म्हणालो. कोणासाठी जगणं अवघड आणि मरण सोप्प अशीही वेळ जीवनात कधी कधी येते; आणि अशावेळी तू जगण्याचा मार्ग निवडावा, निसर्गाने दिलेले जीवन जोपर्यंत तो वापस घेत नाही, तोपर्यंत तू आनंदानं जगावं हेच वचन हवयं मला. आणि मीही तिचा हात हातात दाबत, तिचं वाक्य पूर्ण करत म्हणालो, "तुझ्या सोबतच हे आयुष्य आपलं अनंत असावं." असं म्हणून मी तिला वचन दिलं. तिनं लगेच विषय बदलला. आणि ती आकाशातील ताऱ्यांकडे बोट करत म्हणाली, तो बघ एक नवीन तारा. नवीन तारा? तुला कसं माहित की तो नवीन तारा आहे? मी म्हणालो. असं म्हणतात, की ज्यांच आयुष्य संपते ते आकाशात तारे बनून चमकतात. आणि जो तारा जास्त लुकलुकतो, तो नवीन असतो. आपली माणसं आपल्यापासून कायमची कधीच दूर जात नसतात तिथे वर आकाशात असतात.
गप्पा मारता मारता आम्ही दोघेही रोमँटिक मूडमध्ये आलो. आज आम्ही जशा स्थितीत होतो तशी वेळ याआधी कधीच न आल्याने आम्हा दोघांचाही हा संगम अद्भुत होता. जीवनाचे सारे सुख जणू याच क्षणांत एकवटलेलं असावं. आणि ते आज पूर्ण लुटायचं आम्ही ठरवलं होतं. आम्ही एकमेकांच्या प्रीतीत इतके मुग्ध झालो होतो की, आम्ही खुल्या आकाशाखाली आहोत; याचंही भान राहिलं नव्हतं. वरती येताना निकिताने टेरेसचा गेट बंद केल्याने वरती कोणी येणार नाही, याची कल्पना असल्याने आम्ही निश्चिंत होतो. आम्ही बेधुंद होऊन जिवणाच सुख उपभोगत होतो. आम्हाला टेरेसवर येऊन खूप वेळ झाला होता. आमच्यात संभोग झाला होता. निकिताने तिच्या केसांची व कपड्यांची सावरासावर केली अन् आम्ही जेवणासाठी खाली आलो. निकिताच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज चढलं होतं जणू ती तार्यासारखी प्रकाशमान झाली होती. आम्ही जीवणाची सर्व सुखं अनुभवून तृप्त झालो होतो. निकिताचे मम्मी पप्पा आमची जेवणासाठी वाटच बघत होते. आम्ही फ्रेश होऊन जेवणाला सुरुवात केली. जेवण करताना आमची अनेक विषयांवर चर्चा झाली, विशेष म्हणजे आमच्या लग्नाबद्दल तिच्या मम्मी पप्पांचा होकार मिळाला होता. जेवण झाल्यावर निकिताचे पप्पा स्वत: मला सोडायला खाली येणार होते. त्यांनी राहण्याचा खूप आग्रह करूनही मी न थांबण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही खाली यायला निघालो होतो, निकिताचे पप्पा थोडेसे भाऊ होऊन बोलू लागले. निकिता आमचा जीव आहे. ती आम्हाला आमच्या प्राणाहूनही प्रिय आहे. अशी मुलगी खुप भाग्याने मिळते. तिच्या सहवासात स्नेह वाढत जातो. मी कधीही तिच्यावर रागावलो नाही, तिला हवी ती गोष्ट पुरवायला आम्ही नेहमी तयार असतो, तिच्या सुखातच आम्हाला आमचं सुख वाटतं, पण अलीकडे ती जरा अबोल झालीये. तिचं बोलणं कमी झालयं, तिच्या वागण्यात बदल झालायं, कारण ती आता मोठी झालीये. तरीही ती आमच्यासाठी लहानच आहे. तिला हवं ते सुख दिलं पण प्रत्येक सुख आई-वडील पूर्ण नाही करू शकत. आता ती तुझी आहे तिला नेहमी आनंदी ठेवशील ना? अस म्हणतं त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या... "हो तिला नेहमी आनंदात ठेवीन, तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करीन, असं वचन देतो मी तुम्हाला", असं मी म्हणालो. तोपर्यंत आम्ही ग्राऊंडच्या बाहेर रिक्षा स्टॅन्ड पर्यंत आलो होतो. मी त्यांना नमस्कार करून रिक्षात बसलो आणि निघालो.
खरंच धन्य आहे ती निकिता जिला असे आई-वडील मिळाले, जे तिच्यावर इतकं प्रेम करतात. मी काहीच नसताना केवळ निकिताला मी, व मला निकिता आवडल्याने त्यांनी आम्हाला लग्नाची संमती दिली. मुलीच्या प्रेमावर इतका मोठा निर्णय घेणारे तिचे आई-वडील खरंच महान असल्याचे मला भासल होतं. आणि अचानक माझ्या लक्षात आलं की, आपण तर निकिताच्या व तिच्या आई-वडिलांपैकी कुणाचाच मोबाईल नंबर घेतला नव्हता. का? कधी गरज पडली नाही. पण मी उद्या घेईल असं मनाशीच ठरवलं. आता मी घरी आलो होतो. मला उशीर होणार होता, हे मला पण माहित नव्हतं परंतु आज उशीर झाला होता. घरी आलो आणि डायरेक्ट झोपून गेलो. सकाळी उठलो नेहमीप्रमाणे आवरलं पण आज वेगळंच वाटत होतं, जी मनाची प्रसन्नता असायची ती आज नव्हती. काही करावं वाटत नव्हतं. मनाची इच्छाच जणू मेली होती. तरीपण मी उगाच उत्साह आणण्याचा प्रयत्न करीत होतो. आज आम्ही ठाण्याला जाणार असल्याचं भावाने सांगितलं. निकिताबद्दल घरी सांगावं असं मला वाटत होतं; पण मी निश्चय केला की, उद्या निकिताला घरी घेऊन येऊ आणि सगळ्यांना सांगूदेखील. इच्छा नसतानाही मी ठाण्याला गेलो जाताना वाटलं होतं की लवकर परत येऊ आणि निकिताला भेटायला जाऊ. पण आज घरी यायला फार उशीर झाल्याने निकिताला भेटायला जाणच झालं नाही. आज मला मोबाईल नंबर सुद्धा घ्यायचा होता. पण आज मनही तिकडे जायला नको म्हणत होतं. का कुणास ठाऊक? आज रात्री मला झोपच लागली नाही. रात्रभर विचित्रच स्वप्न पडत होते. निकिता आणि मी भेटण्यासाठी आलो असता मध्येच जमीन फाटून तिच्यातून लाव्हारस बाहेर येत असे, कधी कधी दरीच आडवी येत असे, तर कधी हिमालयच मध्ये उभा टाकत असे. मन काहीसे उदास होते, पण आज सकाळीच मी तिला भेटायचं ठरवलं होतं. आणि त्यासाठी मी निघालो होतो. मी पारीजातक सोसायटीमध्ये आलो, हे काय? हे कसलं भयान दृश्य होतं? आज पारीजातक सोसायटी फुलासारखी नसून काट्यासारखी भासू लागली होती. जसं हिरवगार जंगल वाळवंट झालं असावं, मी आतमध्ये गेलो. रोज जिथे मुले खेळत असायची आज तिथे कोणीच नव्हते. तिथे आज स्मशान शांतता भासत होती. माझे पाय जड बनू लागले होते. रात्रीचे स्वप्न डोळ्यासमोर हजेरी देऊन जात होते. मला काहीच कळेना मी लगेच निकिताचा फ्लॅट गाठला. पण हे काय? इथे तर लाॅक आहे.
कुठे गेले असतील हे सगळे माझ्या मनाला कशाचा अंदाज बांधता येईना. निकिताने तर मला कुठे जायचं आहे, असं काही सांगितलंच नव्हतं. वाटलं कि कुठे शॉपिंगला गेले असतील पण इतक्या सकाळी सकाळी. मग वाटलं की आता कुणाला तरी विचारावे इतक्यात बाजूच्या फ्लॅटचा दरवाजा उघडला आणि आतून एक आंटी बाहेर आल्या. त्यांना मी सगळी मंडळी कुठे गेल्याचा विचारलं. क्षणभर त्या स्तब्ध झाल्या आधी त्यांनी मला विचारलं की, तू त्यांचा कोण? मी म्हणालो, मी निकिताचा फ्रेंड आहे. त्यांनी मला घरात बोलावलं. मला बसायला सांगितलं. पाणी प्यायला दिलं. मला काहीच कळेना कि नेमकं काय झालं आहे ते? त्यांनी मला घरात बोलवल्यामुळे मला असं वाटलं की, निकिताने त्यांना सांगितलं असावं की माझा फ्रेंड येणार आहे त्याला थांबवून ठेवा. कदाचित माझ्याबद्दल काही कळवलं असेल. त्या आंटीही माझ्या समोरच्या सोफ्यावर बसल्या. आणि म्हणाल्या, "क्षणात काय होईल? आणि काय नाही? ते सांगता येत नाही. निकिताला कसलातरी आजार होता. तो तिने मम्मीपप्पा पासून लपवला होता. कदाचित तिला माहिती असावं कि ती जास्त काळ जगणार नाही ते. आणि त्यातच काल दुपारी ती हे जग सोडून गेली. हा धक्का तिचे पप्पा सहन करू शकले नाही आणि तेही हृदयविकाराच्या झटक्याने आपल्या मुली सोबतच गेले. एकाच वेळी मुलगी आणि पती असे दोन व्यक्ती गमावल्याने तिची मम्मी या सदस्याने कोमात गेली."
हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. मला काय करावे तेच सुचेना. मी बधिर झालो होतो. असं कसं होऊ शकतं? दैव इतकं निर्दयी कसं असू शकतं? इतकं कि ते सहन पण न व्हावं? ज्याची कल्पनाही करू शकत नाही, असं काहीतरी घडलं होतं. पण मग हे ऐकून माझे प्राण का गेले नाही? प्राण जरी गेले नसले तरी मी पूर्ण मेलो होतो. माझ्या डोळ्यातून वाहणारे पाणी बाहेरील व्यक्तीला पाणी दिसत होते पण ते मला लाव्हारसाप्रमाणे चटके देऊन जाणारे भासू लागले होते. मनात विचार आला की, आपणही निकिता जवळ जावं, हा जीव नकोसा वाटत होता, तिच्या मम्मी-पप्पांनी तर कुठलीच कसर सोडली नव्हती, ते पण तिच्या सोबतच गेले होते. मग आपण कोणतं कर्तव्य बजावतोय? आत्महत्या करावी असा विचार मनात ओढवला. तत्क्षणी निकिताला दिलेलं वचन आठवलं, निसर्गाने दिलेल जीवन तो वापस घेईपर्यंत आनंदात जगायचं. तर तिला माहीत होतं की, ती जास्त दिवस जगणार नाहीये ते. म्हणूनच तर तिने हे वचन घेतलं होतं. पण तिने मला तरी नाही का सांगायचं? ती म्हणाली होती की, कधी कधी जीवनात असा प्रसंग येतो जेव्हा जीवन जगण्यापेक्षा मरण सोपं वाटतं. आणि आज तो प्रसंग माझ्या समोर आला होता. मला आता प्रत्येक क्षण असह्य होत होता. तिच्याशिवाय श्वास घेणही स्वार्थी वाटत होतं, परंतु आता निकिता राहिली नव्हती, हे सत्य होतं. जरी ते पचवणं अवघड असलं तरी. आणि आता उरलं होतं तर फक्त तिला दिलेलं वचन. या वचनाचं पालन करणं हेच माझ्या प्रेमाच प्रतीक ठरणार होतं. मी त्या आंटींना विचारलं की, आता निकिताची मम्मी कुठे आहे? "त्या कुठे आहेत, ते मी सांगू शकत नाही. पण मला कळालं की मी तुला सांगेन" असं त्या म्हणाल्या. मी त्यांना माझा मोबाईल नंबर दिला आणि म्हणालो काहीही कळाले तर नक्की सांगा.
आता मी मृतवत झालो होतो. निकिता व तिचे मम्मी-पप्पा माझ्या नजरेसमोरून एक क्षणही हटत नव्हते. आता माझ्या डोंबिवलीला राहण्यात काही अर्थ नव्हता. तिथे मला राहावसं वाटत नव्हतं. मी लगेच गावी परत आलो. दोन वर्ष अशी घालवली जणू 200 वर्ष. पण आज दुपारी त्या आंटीचा कॉल आला होता, आणि त्यांच्याकडून कळाले की निकिताची मम्मी कोमातून बाहेर आली आहे. आणि त्या परत घरी आल्या आहेत. मला खुप बरं वाटलं जणू निकिताने त्यांना माझ्यासाठी परत पाठवलं असावं, मी रात्रीच्या गाडीने डोंबिवलीला जाण्याचं ठरवलं होतं. त्यांच्यासोबत राहिल्यानं त्यांनाही जगायला आधार मिळेल आणि माझही दुःख जरा कमी होईल... परंतु दैव जेव्हा सुड घ्यायचं ठरवतं तेव्हा ते निष्ठुर बनतं, कोणत्या जन्माची परीक्षा घेत असावा देव? आत्ता परत आंटीचा फोन आला होता की, निकिताच्या मम्मीने आत्महत्या केली. आता मला घरात रडताही येत नव्हतं म्हणून मी गच्चीवरच्या अंधाराचा आधार घेतला आणि आकाशात त्या तीन तार्यांना शोधण्याचा प्रयत्न करू लागलो.