श्रीकृष्ण कथामृत - आठवा सर्ग
( कंसोद्धार )
हे पार्वतीश करुणाघन शूलपाणे
द्वेष्यः प्रियो न तव कोऽपि समानबुद्धेः
अंगीकरोषि भगवन् गरलेन्दुसर्पान्
किं निष्ठुरोसि वद केवलमस्मदर्थे ॥१॥
टीका भागवती यदीय धरिली डोक्यावरी पंडितीं
भक्तीनें वश तो भरीत सदनीं पाणी सखा श्रापती
श्रीज्ञानेश जणो पुनः क्षितितलीं आले जनोद्धारणीं
त्या श्रीसद्गुरुएकनाथ - चरणीं मी येत लोटांगणीं ॥२॥
गगन भासतें उदासवाणें
जरी उजळिलें दिशांस अरुणें
प्रसन्नता झाकीत निजमुखा
अभ्रांचा कीं घेउन बुरखा ॥३॥
फुलें न फुलतीं तरू न डुलती
पक्षी कोणी नच किलबिलती
वारा घालित नव्हता विंझण
भ्रमर शांत जणुं गळले पैंजण ॥४॥
पान्हवती ना दुधाळ गाई
वत्सांही उत्सुकता नाहीं
स्मित उमटे ना शिशुवद नावर
आवडतेंही गमे न रुचकर ॥५॥
खिन्न मानसीं गोकुलवासी
असे होत कां नुमगे त्यांसी
श्याम आमुचा कुशल असेना
हीच एक शंका सकलांना ॥६॥
शोध घ्यावया व्याकुल कांहीं नंदगृहासी आले
तो परका रथ दारीं दिसतां हृदयीं शंकित झाले ॥७॥
कळलें कोणी कंसाकडुनी
कालच आला होता रजनीं
रामकृष्ण न्याया मथुरेसी
वार्ता नहीं परी पुरेसी ॥८॥
ऐकुनिया हें हृदय हिसकलें
जात, असें गोपांस वाटलें
गृहीं रिघाले आतुर होउन
दिसलें कांहीं तेह विलक्षण ॥९॥
तात नंद गंभीरपणानें
शून्यीं बघती निश्चल नयनें
भव्याकर्षक पुरूष कुणी तो
अधोवदन भूमीस रेखितो ॥१०॥
अश्रू ढाळी मूक रोहिणी
दीन यशोदा रडे स्फुंदुनी
हुंदका न मावे हृदयासी
कुरवाळी विलगल्या हरीसी ॥११॥
तिच्या कटीसी दोहातांनीं वत्सल विळखा घेई
वदे श्रीहरी गद्गद कंठें, “ जाऊं ना मी आई ” ॥१२॥
“ बाळ ” एवढें वदली आई
पुढें मुखांतुन शब्द न येई
“ माय ! असें कां बरें करावें ”
वदे श्याम मधु मंजुळ भावें ॥१३॥
“ येइन ना मी पुनः परतुनी ”
“ फसवितोस तूं, ” बोलत जननी
“ पाप असे रे कंसापोटीं
तो तव घ्या ” वच विरलें ओठीं ॥१४॥
बलरामें तंव म्हटलें तीतें
“ शोक आवरी हा प्रियमाते
हरीस कोठुन भय कंसाचें
ज्ञात न कां तुज प्रताप याचे ॥१५॥
जयें तुडविला नाग कालिया
सहज वारिली राक्षसमाया
चेंडूसम धरिला गोवर्धन
निर्भय यासी सगळें त्रिभुवन ॥१६॥
परतुन येऊं धुळीस मिळवून दुष्टांच्या उन्मादा
संशय वाहूं नकोस जननी, दे शुभ आशीर्वादा ” ॥१७॥
“ करूं नको रे साहस बाळा,
आपण तरि समजवा न ! याला ”
वदे करुण - विव्हला यशोदा
काय म्हणावें सुचे न नंदा ॥१८॥
शिर ठेउन मातेच्या चरणीं
निघतां बोलत शार्ङ्गपाणी
“ त्वरा करा, उद्धवजी, आतां
तुम्हीहि चलता ना हो, ताता ” ॥१९॥
निश्चय हरिचा पाहुन देवी
यशोमती अक्रूरा विनवी,
“ हृदय करितसे तुमचें स्वाधिन
पदर पसरितें आणा परतुन ” ॥२०॥
रामकृष्ण मथुरेस निघाले
क्षणांत हें चहुंकडे कळालें
धांवत आलें गोकुळ सारें
तशीच उघडी टाकुन दारें ॥२१॥
यशोमतीचें हृदय - रत्न तें चढे रथावर वेगें
गोपाळासह नंद निघाला गाड्यांतुन त्या मागें ॥२२॥
बसे पुढें अक्रूर धुरेवर
अश्व जाहले गमना तत्पर
तोंच वेढिला रथ गोपींनीं
कृत - निश्चय जणुं बहुशंकांनीं ॥२३॥
कुणी ओढुनी धरिलीं चाकें
रथासमोरी पथांत वाके
मिठ्या मारिल्या अश्वपदांसी
लोळण घेती कुणी महीसी ॥२४॥
ध्वनी तयांच्या शोकांतुन ये
‘ जा जाणें तर तुडवित हृदयें
प्राण आमुचा टाकुन जाई
देहाची मा क्षितीच काई ॥२५॥
हास्य हरीच्या जें मृदुओठीं
स्नेहमयी जी विलोल दृष्टी
मधुमंजुल जें प्रेमल भाषण
तेंच असे व्रजमणीजीवन ॥२६॥
श्याम जीवनाधार तयांचा सोडुन निघतां दूर
कसाविस झाल्याविण केवीं राहिल कोमल ऊर ॥२७॥
“ श्याम कसा रे होशी निष्ठुर
क्रूर असे हा नच अक्रूर
तात, नंद, तुम्हांहि कळेना
कसा धाडिता अमुचा कान्हा ” ॥२८॥
शुद्ध आपुलीही त्या नव्हती
नयनीं अविरत अश्रू स्रवती
उष्णश्वासें ओठहि सुकले
अक्रूराचें हृदय द्रवलें ॥२९॥
गायवासरें अश्रू ढाळिती
पक्षी फिरती रथाभोंवतीं
चराचरांची बघतां प्रीती
विस्मित झाला तो निज चित्तीं ॥३०॥
रथावरुन भगवान उतरले
व्रजरामांसी हृदयीं धरिलें
पुसुनी अश्रू निज शेल्यानें
शांतविती त्या गोड वचानें ॥३१॥
खुणावितां अक्रूरा तो रथ हळूं काढी पुढतीं
फिरवित निजकर गाईपाठीं बोलत करुणामूर्ती ॥३२॥
“ गोपींनों तुमच्या प्रेमाला
सदाच आहे मी विकलेला
देहानें जरिही परदेशीं
परी मनें नित तुमच्यापाशीं ॥३३॥
तुम्हां सोडुनी जात दिसे जें
सुखें न तें उर फुटतें माझें
परि न इष्ट कर्तव्य चुकविणें
म्हणुन जातसें निरूपायानें ॥३४॥
देह वेगळाले जरि दिसती
तरीहि आहों अभिन्न - चित्तीं
यास्तव शोक उगीच करा नच
हंसत मुखानें निरोप द्या मज ॥३५॥
पुनः त्वरित यद्दर्शन व्हावें
पोंचवीत त्या दूर न जवें
म्हणुन फिरा गे परत गृहासी
वदुन असें झट चढे रथासी ॥३६॥
कृष्ण - दर्शने तन्मयवृत्ती, बोल न कानीं शिरती
निघतां रथ परि ‘ श्याम, श्याम रे ’ गोप - वधू हंबरती ॥३७॥
वदती गोपी, “ लव थांबव रथ
बघुं दे कृष्णा पुरव मनोरथ ”
कृष्ण म्हणे, “ चल पुढें, त्वरा कर ”
दुध्यांत पडला तइं अक्रूर ॥३८॥
शंकाकुल तो म्हणे मनाई
“ कंस असे कीं क्रूर विशेषीं
धोका जर पोंचला हरीतें
प्राणा टाकिल सारें व्रज तें ॥३९॥
तळतळाट तो माझ्या माथीं,
कारण मी कंसाचा साथी
निंदितील मज सदैव सज्जन
लज्जास्पद मग होइल जीवन ” ॥४०॥
निज सामर्थ्यें परी हरीने
मोह नाशिला सहजपणानें
अनंत विश्वें होती जातीं
याच्या निमिषोन्मेषा वरती ॥४१॥
सादर वंदुन सहर्ष मग रथ आणी मधु नगरीतें
त्यातें भय कां कंसापासुन पटलें अक्रूराते ॥४२॥
नगरीं येतां बोलत सादर
हात जोडुनी, “ हे परमेश्वर
पद लागावें मम सदनासी
कृतार्थ करणे मज हृषिकेशी ॥४३॥
परब्रह्म साकार सांवळें
अतिथि जरी दासाचे झालें
धन्य धन्य ही गृहस्थता मम
मजकरितां घ्या हरि इतुके श्रम ॥४४॥
“ अक्रुरजी ! हें हवें कशासी
मी का परका असे तुम्हांसी
परि ज्यासाठीं मज कंसानें
आणविलें तें करूं त्वरेनें ॥४५॥
स्वस्थमनें मग पाहुणचार
घेउन राहूं इथेंच तोंवर
कांहीं करणें असती गोष्टी
कळवा कंसा उद्यांच भेटी ॥४६॥
नगरीच्या बाहेर उपवनीं परिवारासह वसले
रामकृष्ण जे धर्मोद्धारा भूलोकीं अवतरले ॥४७॥
दुसरे दिवशीं वदे मुरारी
“ चलान दादा पाहूं नगरी
नागरिकांच्या काय भावना
असती तेंही कळे आपणां ॥४८॥
जरी प्रजेची राजावरती
असेल उत्कट निश्चल भक्ती
तरी तयासी अशक्य वधणें
सहज सुलभ अन्यथा त्याविणें ॥४९॥
कसें होतसें अपुलें स्वागत
त्यावरुनी हें होइल निश्चित ”
गोपाळांसह मग परमेश्वर
येत बघाया तें मथुरापुर ॥५०॥
भाग्योदय होण्याच्यापूर्वीं
शुभविचार ये हृदयीं जेवीं
तेवीं परमात्मा मधुसूदन
मथुरेमाजीं करी आगमन ॥५१॥
रत्नखचित कांचनमय तोरण गोपवेश भगवंता
तेजोवलयांकित मुनिवरशी शोभा देई शिरतां ॥५२॥
नानारीती नटुन साजिरी
वासकसज्जा प्रिया आदरी
तेवीं मथुरापुरी अलंकृत
करी हरीचें प्रेमें स्वागत ॥५३॥
महानदीशी अगस्त्योदये
वेगळीच कीं प्रसन्नता ये
तसें हरीचें होतां दर्शन
तत्सुंदरता झाली शतगुण ॥५४॥
हरुनी घेउन रजकापासुन
राजवेष हरि करीत धारण
गोपवेश असतां जो सुंदर
हा घालिल मग त्यांत किती भर ॥५५॥
पथीं चालतां नंदकुमार
जनहर्षासी येत बहार
हरिचरणावर तयीं वाहिली
आदर - भावांची सुमनांजलि ॥५६॥
हरिकीर्तनें प्रथमच होत्या मोहविल्या पुरनारी
आज नेत्रफल लाभणार, मग गडबड झाली भारी ॥५७॥
कमळ - दळे विकसुनी प्रभातीं
सुंदरता जणुं प्रकटे वरतीं
तशीं गवाक्षें उघडीं होतीं
पुररमणी त्यामधें शोभती ॥५८॥
श्रीकृष्णाचें होतां दर्शन
आज वाटलें कृतार्थ लोचन
आनदाश्रू अर्ध्य जाहलें
कटाक्ष नच तीं नील उत्पलें ॥५९॥
भरुन ओंजळी फुलांफुलांनीं
कृष्णावर उधळितात रमणी
काय सर्व वासना भावना
हरिप्रती वाहती अंगना ॥६०॥
हांसत गालीं जयीं श्रीहरी
स्नेहल नयनें पाहत नारी
तईं वाटलें त्यास आपुलें
जीवन आजी सफल जाहलें ॥६१॥
कंस सेविका कुब्जेनें बहु सन्मानें प्रेमानें
जलद्रनीलतेजा अर्पियलें मलय - चंदनी उटणें ॥६२॥
उंच - सखलही भूमीं जेवीं
शशिकिरणें समचारु दिसावी
वृत्तिगता कुटीलता जशी वा
निमे गुरूंची करितां सेवा ॥६३॥
तसें कृपा करितां वनमाली
विकृतशरीरा सुंदर झाली
वंदनीय पुरूषांचा आदर
करितां विफल न जात खरोखर ॥६४॥
मोहक जें वाटतें कुठेंही
स्मित तें रमणीवदनीं येई
निवडुंगाचें पुष्पहि सुंदर
वानूं किति मल्लिका - फुलें जर ॥६५॥
वदे श्रीहरी तइं रामातें
“ लोक बहुत विटले कंसातें
प्रजाहिताहुन निज प्रतिष्ठा
अधिकतरा वाटत या दुष्टा ॥६६॥
नकोत ते निर्बंध निर्मिले
हवेत जे ते यास न सुचले
जीवित, वित्त न उरे सुरक्षित
राज्य नसे हें स्मशान निश्चित ॥६७॥
येतां आपण जनीं उदेली भाविसुखाची आशा
ती पुरवाया अवश्य आम्हां करणें खलनृपनाशा ” ॥६८॥
ज्या यज्ञाचें करुन निमित्त
कंसें आणविला व्रजनाथ
धनुर्याग मंडपीं तया ये
श्याम कांपवित खल - जन हृदयें ॥६९॥
वेदीवरचे चाप उचलुनी
कडकन मोडी हरि लीलेनी
गोष्ट नसेही तयास नूतन
रघुनंदन तो हा यदुनंदन ॥७०॥
दुष्ट आड जे आले होते
धनुखंडें दंडिलें तयांतें
गोप गर्जती जयजयकारा
ऐकुन झाला कंस घाबरा ॥७१॥
पीडण्यांत जो शूर कुवलयें
असा मत्त गज एक पुढें ये
चालुन हरिचे अंगावरती
पुरवासी जन डोळे मिटती ॥७२॥
दिसावया श्रीहरी कोवळा मदयुत करी प्रचंड
परंतु सानचि वज्र करितसे पर्वतास शतखंड ॥७३॥
चवताळुम तो चालुन येई
चपल सांवळा हुलके देई
धाप लागली गजास पाहुन
मुष्टीनीं त्या करीत ताडन ॥७४॥
चिडुन धांवला गज तो शेखीं
दांत हरीवर मदांध रोखी
तेच धरुन मोडिले हरीनें
इतर मतें जणुं वेदांतानें ॥७५॥
गतप्राण जाहला मतंगज
कंस करी मल्लांसी हितगुंज
रंग - सभे तो येत मुरारी
गजदंता मिरवीत शरीरीं ॥७६॥
मल्ल दोन मुष्टिक चाणूर
चालुन आले गिरिधर हरिवर
दाव अम्हां बल तुझ्या भुजांचें
मदोन्मत्त गर्जतात वाचें ॥७७॥
रक्त ओकवित रामहरीनें क्षणांत त्यां लोळविलें
जणु कंसाच्या धैर्यगडाचे बुरुज दोन ढासळले ॥७८॥
मल्ल - उरावर विजयी श्याम
पर्वतशिखरीं उदित रवीसम
दर्शनीय हो नागरिकां कीं
कंस उलुकसा नयना झांकी ॥७९॥
गोप, नंद, पुरजन, संसदिं जे
धनिक, दरिद्री, हुजरे, राजे,
बाल, वृद्ध, नर, नारी, यांना
दिसे भिन्न हरि जशी भावना ॥८०॥
डौल मिरवितें शीड झुकावें
तुटल्यावरती जसे तणावे
तशी मान ताठर कंसाची
लवे कळा ये मुखा मढ्याची ॥८१॥
मग लागे वडबडूं हवे तें
“ विध्वंसा रे यदुवंशातें
चिरडा या कारट्यास सत्वर
पेटवुनी द्या घरघर मंदिर ॥८२॥
गदा, ढाल, तलवार कुठें द्या मीच ठेचितों यातें
खोड जित्याची मेल्यावांचुन केव्हांही नच जाते ॥८३॥
सिंहासम झेप घे श्रीहरी
केस धरी कंसाचे स्वकरीं
ओढुन त्या फेकिलें महीवर
गुडघा रोवी उरांत गिरिधर ॥८४॥
दिसे श्रीहरी उग्रमनोहर
असतां कंसाच्या छातीवर
प्रलयाचें तांडव भूवर कीं
सतेज मनि जणुं सर्पमस्तकीं ॥८५॥
गळा दाबुनी चढवी ठोसे
रक्ताचे तो देत उमासे
हात पाय झाडी तडफडुनी
बघती सारे चकित लोचनीं ॥८६॥
अंती कंसें प्राण सांडिलें
नाना मथुरालांछन सरलें
देवकिचें दुर्दैव निमे वा
सज्जनतेची कीड मरे वा ॥८७॥
कंसाचा वध होतां जयजयकार करी जन सारा
स्वर्गीं दुंदुभिनाद होत सुर वर्षिति सुमसंभारा ॥८८॥
नंदानें धरिलें हृदयासी
प्रेमभरानें गोविंदासी
उचलुन घेउन हरिसी स्कंधीं
गोप नाचती अत्यानंदी ॥८९॥
रामकृष्ण धांवले त्वरेंसी
सोडविण्या जननी - जनकांसी
द्वारपाल येती काकुळती
पदीं लोळुनी क्षमा याचिती ॥९०॥
दुःख वीस वर्षांचें सरलें
देवकीस कळलें, नच पटलें
डोळे लावुन बसली होती
हरिच्या वाटेकडे परी ती ॥९१॥
राख होत होती आशांची
तिचिया एक तपावर साची
आज फुलोरा येइल त्यासी
हें न वाटलें सत्य तियेसी ॥९२॥
दार उघडुनी तों कारेचें प्रवेशला हरि आंत
सत्यहि परि माउलीस गमलें दिसतें तें स्वप्नांत ॥९३॥
धांवत येई त्वरें श्रीहरी
बेड्या तोडुन दूर झुगारी
जननीचरणीं ठेवितसे शिर
येत देवकी मग भानावर ॥९४॥
आज उग्र तप सफल जाहलें
भागनांस मग हृदय न पुरलें
वत्सलतेच्या सहस्र धारा
पट फोडुन वर्षती झरारा ॥९५॥
हृदयीं धरुनी घट्ट हरीसी
शतशत चुंबन घे प्रेमेसी
थांबवितों परि इथेंच वर्णन
दृष्ट वचें लागेल म्हणून ॥९६॥
बंधमुक्त करितां बलरामें
वसुदेवें निजपुत्रा प्रेमें
कृश हातांनीं कुरवाळीलें
नयन जलानें भरूनी आले ॥९७॥
नामगजर घोषीत हरीचा सारे मथुरा - वासी
जमले तेथें मिरवीत नेण्या राजगृहास तयासी ॥९८॥
एक वृद्ध नर पुढती येउन
वदे करोनी नत अभिवादन
“ त्रिवार जय जय अपुला देवा
धन्य अम्ही करितां पदसेवा ॥९९॥
कंस वधुन नच केवळ अमुचें
दुःख दूर केलें जगताचें
सदा अम्हां देण्यास विसांवा
राजमुगुट हा शिरीं धरावा ॥१००॥
नसतां राजा प्रजा जशीं कां
कर्णधार नसल्यावर नौका
राजकृपेच्या वर्षाखालीं
नीति धर्म - सौख्यास नव्हाळी ॥१०१॥
तुम्ही रिक्त केलें सिंहासन
आपणची व्हा तयास भूषण
शंकर एकच हर भव जेवीं
अमान्य नच ही विनती व्हावी ॥१०२॥
राजमुकुट ठेविला जनांनीं परमात्म्याच्या चरणीं
तेज अधिकची चढलें रत्नां श्रीहरिपदनखकिरणीं ॥१०३॥
वदे श्रीहरी मंजुल वाणी
राज - मुकुट नि करीं घेउनी
“ प्रेम एवढें करितां मजवर
धन्य लोक हो तुम्ही खरोखर ॥१०४॥
कंस निमाला तरी मोकळें
सिंहासन हें नसें जाहलें
महाराज जे उग्रसेनजी
नृपति येथ ही दृढमति माझी ॥१०५॥
चोर जरी ने लुटुनी मत्ता
प्रथम धन्याची नष्ट न सत्ता. ”
उग्रसेन मग सोडवुनी कीं
राजमुगुट ठेविला मस्तकीं ॥१०६॥
मुकुंद करि जयघोष तयाचा
चकित जाहला जन मथुरेचा
निःस्पृहता उपकारशीलता
बघुन हरीची नमला माथा ॥१०७॥
जनतेनें मग निज - हृदयाच्या सिंहासनीं हरीसी
वृत्तिजलें न्हाणुनी बसविलें ना म्हणवे न तयासी ॥१०८॥
ग्रहणमुक्तशशिकिरणें जेवीं
रजनी अभिनव तेजा मिरवी
तशीच उज्ज्वल मथुरा झाली
उ ग्र से न नृ प स त्ते खा लीं ॥१०९॥
धर्मनीतिसीमा संभाळुन
मथुरा व्यवहाराचें वर्तन
उभय - तटा उल्लंघि न साचा
जसा स्वच्छ शरदौघ नदीचा ॥११०॥
प्रदीप्त झाल्या यज्ञज्वाला
वृत्तींना परि संयम आला
निनता विद्या स्थिर हो लक्ष्मी
सुख रमलें सात्त्विकता - धामीं ॥१११॥
हरिप्रसादें पापकारिणी
मधुरा झाली मोक्षदायिनी
करितां जेवीं अनन्यभक्ति
दुराचारही सज्जन होती ॥११२॥
सर्व पडे जें ब्रह्मगिरीवर जल तें होतें गोदा
हरिचरणावर तसेंच सारें, भज भज मन गोविंदा ॥११३॥
विप्र थोर बाहुन सन्मानें
वसुदेवानें मग थाटानें
पुत्रांचें केलें उपनयन
कृष्ण दिसे पुनरपि बटुवामन ॥११४॥
मु ख बा हू रू च र णां पा सु न
निर्भित ज्याच्या चारहि वर्ण
महत्त्व त्या नच संस्कारांचें
पालन केलें जनरीतीचें ॥११५॥
निरोप घेतां श्रीकृष्णाचा
शोकें भरला उर नंदाचा
दुरावती हा वसुदेवात्मज
दुःख तयासी बोलवे न निज ॥११६॥
“ तात, नंद, लव दुःख करा ना ”
वदे श्रीहरी नमुनी चरणां
“ तुमचा होतों राहिन तुमचा
अन्यथा न मम समजा वाच ” ॥११७॥
घट्ट धरोनी हृदयीं कृष्णा चुंबुन मुख वात्सल्यें
मागें मागें बघत कसें तरि नंद गोकुला आले ॥११८॥
एकटेच पाहुन नंदासी
करिती आकांता व्रजवासी
कंसवधासह अद्भुत विक्रम
ऐकिलियावर लव निवळे श्रम ॥११९॥
परी हरीची भेट न झाली
ही तळमळ तिळभर न निमाली
“ हाय, जिवलगा, मेघश्यामा,
फसविलेंस ना अंतीं आम्हां ॥१२०॥
गंध फुलांचे उडुनी गेले
गळुनी पानें वन वठलेलें
खिन्न उषा ही उदास संध्या
सुके न जीवन - सरिता निंद्या ॥१२१॥
वेद सर्वही तव निश्वसितें
काय शिकावें गुरूसदनातें
दूर अम्हांपासुन परि व्हाया
निमित्त हरि हें करिशी वाया ॥१२२॥
अम्ही दरिद्री दीन खेडवळ
रूपाचें ही जवळ नसे बळ
म्हणुनी कां वद तुजसी आला
कंटाळा अमुचा घननीळा ॥१२३॥
गोड गोडशा देउन थापा
घेतलेस येथून निरोपा
आणि अतां टाळिसी अम्हांसी
परि नच सुटका होइल तैसी ॥१२४॥
असूं सकल भाबड्या म्हणुन डाव हा साधला
अम्हां फसवुनी व्रजामधुन येत जातां तुला
न त्यांत परि चातुरी लवहि वा नसे धाडस
हृदांतुन निघोन जा, मग तुझें खरें पौरुष ” ॥१२५॥
‘ कंसोद्धार ’ नांवाचा आठवा सर्ग समाप्त
लेखनकाल :-
फाल्गुन, शके १८६९