भाग १
श्रीकांत साठे भरतपूरच्या एस.टी. स्टॅण्डवर उतरला तेंव्हा संध्याकाळचे पाच वाजत आले होते. त्याने अंगाला आळोखे पिळोखे देत आजूबाजूला नजर फिरवली. स्टॅन्ड काही फार मोठे नव्हते, पण छान टुमदार छोटीशी इमारत, आजूबाजूची स्वछता, पलीकडे झाडांची रांग मस्त वाटत होते. खास कोकणातील देखावा. बँक ऑफ बरोडाच्या भरतपूर शाखेत श्रीकांतची बदली झाली होती. बँकेतील अंतर्गत राजकारणाचा परिणाम म्हणून स्पष्टवक्ता, अन्यायाचा प्रतिकार करणारा खमका व्यक्ती म्हणून बँक कर्मचाऱ्यांचा कंपूत प्रसिद्ध असलेला श्रीकांत साठे ला वरिष्ठांनी दूर कोकणात भरतपूरच्या शाखेत पाठवले होते. श्रीकांतची घरची परिस्थिती तशी चांगली होती. ऍडिशनल कलेक्टर म्हणून रिटायर झालेल्या नीलकंठ साठेंचा श्रीकांत हा एकुलता एक मुलगा. बदली नाकारून राजीनामा दिला असता तरी काही बिघडलं नसतं. पण मध्यंतरी पल्लवी आणि त्याच्यातील ब्रेकअप मुळे श्रीकांत मनाने बराचसा डिस्टर्ब् झाला होता. अनेक वर्ष एकमेकांसोबत वेळ घातल्यानंतर पल्लवीने ऐनवेळी घरच्यांच्या पसंतीनुसार एका अमेरिकेत असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनीअर बरोबर लग्न करून परदेशी जाण्याचा निर्णय श्रीकांतला मनाने उध्वस्त करून गेला होता. त्यामुळे काही वर्ष पुण्याबाहेर काढायला काही हरकत नाही असा विचार करून त्याने ही बदली स्वीकारत रत्नागिरी जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण असलेल्या भरतपूरला जायचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज तो भरतपूर मध्ये दाखल झाला होता. सकाळी पुणे ते रत्नागिरी हा आठ तासांचा प्रवास आणि त्यानंतर एक तासाचा भरतपूरचा प्रवास करून त्याचं अंग अगदी अवघडून गेलं होतं.
श्रीकांतने मोबाईल काढून अगोदरच बोलणे केलेल्या अल्ताफभाई या इस्टेट एजंटला फोन केला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे रिक्षा करून तो त्यांच्या ऑफिसवर पोहोचला. अल्ताफभाईंनी श्रीकांतचे अगदी मनापासून स्वागत केले. तसेही कोकणी माणूस हा अगत्यशील असतोच, आणि त्यात इस्टेट एजंट म्हणून काम करताने अगत्य महत्वाचे. अल्ताफ तर या कामात चांगलाच मुरलेला होता.
'या साठे साहेब, बसा, काय घेणार? चहा कॉफी कि काही थंड.?
'चहा चालेल' श्रीकांत म्हणाला.
अल्ताफभाईंनी शेजारच्या हॉटेलवाल्याला चहाची ऑर्डर दिली आणि पुन्हा येऊन बसत बोलणे सुरु केले.
त्यांनी श्रीकांतला राहण्यासाठी दोन तीन जागा सुचवल्या. श्रीकांतने अगोदरच सांगितल्याप्रमाणे एक गावाबाहेरचा निवांत बंगला पसंत केला. एकटा राहणार असला तरी श्रीकांतला एकटेपण नेहमीच आवडायचे.
'साठे साहेब, त्यापेक्षा तुम्ही या शहरातल्या जागा बघा ना' अल्ताफभाई म्हणाले.
'नको, मला जरा एकटे राहणेच आवडते. बंगल्याच्या मालकाचा काही प्रॉब्लेम नाही ना? श्रीकांतने विचारले.
'मालकाचा प्रॉब्लेम नाही पण'........... अल्ताफभाई जरा आढेवेढेच घेत बोलत होते.
'साठे साहेब, जरा स्पष्टच बोलतो. त्या बंगल्यामध्ये चार-पाच वर्षांपूर्वी मालक आणि मालकिणीनेच आत्महत्या केली होती. तेंव्हापासून त्या बंगल्याबद्दल गावात फार चांगले बोलत नाहीत'
'एवढंच ना, मग मला काही हरकत नाही. मी नाही भूतां-खेतांना घाबरत' असे म्हणत श्रीकांत मोठयाने हसला.
'ठीक आहे, तुम्ही म्हणताच आहात तर उद्या दाखवतो तुम्हाला बंगला'
'उद्या कशाला? आत्ताच जाऊ या की' श्रीकांत म्हणाला.
संध्याकाळ होत आल्याने खरेतर अल्ताफभाईंची यायची इच्छा नव्हती. पण श्रीकांतला नाहीही म्हणता येत नव्हते. श्रीकांत एका नामांकित बँकेचा मॅनेजर म्हणून इथे रुजू होत होता आणि अल्ताफभाईचे खातेही त्याच बँकेत होते.
'ठीक आहे,चला जाऊ या, म्हणत अल्ताफभाईने ऑफिसचे शटर ओढून घेतले आणि अल्ताफभाईंच्या मारुती-अल्टो मधून दोघे निघाले.
एसटी स्टँडला वळसा घालून एम.जी. रोडने दोघे जात होते. जाता जाता अल्ताफभाई श्रीकांतला आजूबाजूच्या परिसराची ओळख करून देत होते. काही वेळाने त्यांनी नरवीर तानाजी चौकातून उजवीकडचा रस्ता पकडला. पुढे पुढे वस्ती एकदम विरळ होत गेली. रस्ताही कधीकाळी केलेला खडीचा होता. काही वेळाने ते पुन्हा एकदा छोट्या कच्च्या रस्त्यावर वळले आणि समोर एक टुमदार बंगला दिसू लागला. 'अनुग्रह' असं बंगल्याचे नाव उठून दिसत होते. गेट जवळ अल्ताफभाईंनी गाडी थांबवली. श्रीकांत बंगल्याचे निरीक्षण करत होता. अल्ताफभाईंच्या म्हणण्यानुसार चार पाच वर्ष इथे कोणीही राहत नव्हते, तरी पण बंगला अगदी महिन्याभरापूर्वी रंगवल्यासारखा चकाकत होता. अल्ताफभाईंनी खिशातून तीन चाव्या असलेला जुडगा काढला आणि त्याची एक चावी शोधून गेट उघडले. गेट अगदी कालच तेलपाणी केल्यासारखे अलगद आवाज न करता उघडले. दोघांच्याही मनात वेगवेगळे विचार खेळत होते.
श्रीकांत ला बंगला अगदी मनापासून आवडला. अल्ताफभाईंनी दुसरी चावी शोधून दरवाजा उघडला आणि दोघांनीही आत प्रवेश केला. समोर बघून दोघेही आश्चर्यचकित झाले. समोरचा फर्निचरने सुसज्ज असलेला हॉल, पलीकडे किचन, एका बाजूला संडास बाथरूम, त्याला लागून एक छोटी स्टडीरूम, आणि एक मास्टर बेडरूम. सगळीकडे बघितल्यावर असे बिलकुल वाटत नव्हते कि इथे अनेक वर्ष कुणी राहत नाही.
'वा! अल्ताफभाई, तुमची सर्व्हिस आवडली आपल्याला. सर्व फर्निचर सह बंगला भाड्याने द्यायचा.' श्रीकांत म्हणाला. यावर अल्ताफभाई मात्र ओढग्रस्तीने खोटं खोटं हसले. त्यांना चांगले आठवत होते कि बंगला ताब्यात घेताने इथले सगळे जुने फर्निचर लिलावात विकलेले होते आणि तरीही हे सर्व आले कुठून?
'साठे साहेब, मला वाटतं या बंगल्यात एकटे राहण्यापेक्षा तुम्ही गावातील जागा बघा'
'अहो काय हे अल्ताफभाई, एवढा सुसज्ज छान बंगला सोडून कशाला दुसरीकडे जायचे? श्रीकांत म्हणाला.
'बघा साहेब, मी आपले तुम्हाला अजून एकदा आठवण करून देतो कि, या बंगल्याबद्दल चांगले बोलले जात नाही.' अल्ताफभाईंनी पुन्हा एकदा त्याला आठवण करून दिली. खरेतर व्यवसाय म्हटल्यावर मिळतंय गिर्हाईक तर कशाला सोडा असा सोयीस्कर विचार अल्ताफने अगोदर केला होता. पण श्रीकांतच्या एकंदरीत पर्सनॅलिटीवरून त्याला त्रास होऊ नये असे अल्ताफला वाटत होते.
'नका काळजी करू अल्ताफभाई, मला नाही फरक पडत' श्रीकांत निग्रहाने म्हणाला.
'बरं ठीक आहे, चला निघूया'........ दरवाज्याकडे वळत अल्ताफभाई म्हणाले.
'मी काय म्हणतोय, एवीतेवी सर्व सोयी आहेच तर आजपासूनच मी राहतो इथंच' श्रीकांत म्हणाला.
'बघा बुवा, हवे तर राहा, पण मला मात्र आता निघायला हवे' घड्याळाकडे पाहत अल्ताफभाई म्हणाले. त्यांना तिथून कधी एकदा बाहेर पडतोय असे झाले होते.
'बरं इथे खाण्यापिण्याची जवळपास काय सोय होईल? श्रीकांतने विचारले.
'आता आपण मागच्या चौकात वळलो तिथे तुम्हाला सर्व काही मिळेल, हो पण तिथपर्यंत चालत जायला लागेल. इकडे रिक्षा वाले सहसा येत नाहीत आणि त्यांना गिर्हाइकंही मिळत नाही.
'मग मला चौकात सोडा, रात्री जाण्यापेक्षा आजच्या दिवस काहीतरी पार्सल इथेच घेऊन येतो. श्रीकांत म्हणाला.
पडत्या फळाची आज्ञा घेत अल्ताफभाईंनी दरवाज्याला कुलूप घातले आणि चाव्या श्रीकांत कडे दिल्या. पुन्हा गाडीवर बसून दोघेही नरवीर तानाजी चौकात आले. तिथे अल्ताफभाईंनी श्रीकांतला सोडले. समोरच असलेल्या हॉटेलकडे बोट दाखवत श्रीकांतला म्हणाले 'समोरच्या हॉटेल मध्ये तुम्हाला सर्वकाही मिळेल.' आणि पलीकडे हवे तर बार-रेस्टॉरंट पण आहे.' असं सांगत अल्ताफभाईंनी श्रीकांतचा निरोप घेतला, पण तरी जाता जाता 'काळजी घ्या, साठे साहेब' असा इशाराही दिला.
श्रीकांतला त्या रस्त्याने एक फेरी मारावी असे वाटले होते, पण पहिलाच दिवस आहे, अंधार पडायच्या आत घरी पोहोचावे असा विचार करत त्याने समोर दिसणाऱ्या 'कोकण-किनारा' हॉटेल मध्ये प्रवेश केला. गल्ल्यावर एक पन्नास साठ वर्षाचे सात्विक दिसणारे गृहस्थ बसलेले होते. आत येणाऱ्या श्रीकांतला त्यांनी नमस्कार केला, आणि अगत्याने 'या या साहेब' म्हटले. त्यांच्या अगत्याचा हलकेच हसून स्वीकार करत आत जाण्याऐवजी श्रीकांत काउंटरलाच उभा राहिला आणि समोर ठेवलेल्या मेनूकार्डवर नजर टाकू लागला.
'काही पार्सल हवे आहे का? मालकांनी चोकशी केली. प्रवासात श्रीकांतचे दुपारचे जेवण फारसे झालेले नव्हते.
'हो, एक पनीर कढई, तीन रोटी आणि जिरा-राईस, एक थम्सअप' श्रीकांतने ऑर्डर दिली.
मालकाने वेटरला बोलावून पार्सल तयार करायला सांगितले.
'बसा साहेब, थोडा वेळ लागेल. आम्ही ताजे ताजे पदार्थच सर्व्ह करतो. काय नवीन आलात काय?
'तुम्ही कसं ओळखलं. श्रीकांत म्हणाला.
'बास का साहेब, अहो गेली ३० वर्ष गल्ल्यावर बसतोय. पहिल्या नजरेत गिर्हाईक ताड़तो आम्ही' असे म्हणत हॉटेल मालक हसले. आत बसण्याऐवजी श्रीकांत काउंटरजवळच्याच खुर्चीत बसला. आणि त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. अजून रात्र न झाल्याने तसे गिर्हाईक फारसे नव्हते, मालकही निवांतच होते.
'मी इथे बँक ऑफ बरोडा मध्ये ब्रँच मॅनेजर म्हणून बदलून आलोय' श्रीकांतने सांगितले. मालकाने त्याच्याकडे आदराने पाहत म्हटले 'वा साहेब, म्हणजे आता आपली भेट होतच राहणार, आमचे खातेही तिथेच आहे. काय घेणार साहेब, चहा कि थंड? श्रीकांत नाही म्हणाला तरी पण मालकाने आग्रहाने पोऱ्याला चहा आणायला सांगितले.
''आणि ऐक रे, ग्लासात नको, कपबशीत आन.' मालकांनी पोऱ्याला तंबी दिली.
वेटरने दिलेला चहा घेत श्रीकांत आजूबाजूचे निरीक्षण करत होता. चौकात बऱ्यापैकी वर्दळ दिसत होती.
'कधीपर्यंत चालू असते हॉटेल? श्रीकांतने विचारले. 'तसे १०-१०.३० पर्यंत असतोच कि आंम्ही' मालक म्हणाले.
'राहायला कुठे सोय केलीय?.... मालकांनी चौकशी केली. 'इकडे त्या कोंढवा रोडला 'अनुग्रह' बंगला आहे ना, तो भाड्याने घेतलाय मी' श्रीकांतने सांगितल्याबरोबर मालकांनी चमकून त्याच्याकडे पहिले. 'त्या अल्ताफ ने दाखवला काय तुम्हाला बंगला? मालकांनी त्राग्यानेच श्रीकांतला विचारले.
'हो, काय झाले?...... 'अहो साहेब, जरा लोकल माणसाकडे चौकशी करायची. त्याला काय गिर्हाईक मिळतंय म्हटल्यावर कशाला सोडतोय'. मालक जरा रागानेच म्हणाले.
'त्या बंगल्यात कोणी राहत नाही, जरा अडचणीचं काम आहे म्हणा नां' मालकांनी सांगितले. पण थोडेसे हसत श्रीकांतच म्हणाला 'अहो, मला अल्ताफभाईंनी कल्पना दिली होती. पण माझा काय अशा गोष्टींवर विश्वास नाही. आणि एवढा चांगला बंगला इतक्या कमी भाड्यात मिळतोय, मग काय हरकत आहे'
' साहेब, तुमचा नसेल विश्वास पण अनेकांना प्रचिती आलीय. तिकडे कुणी फिरकत नाही. पण कोणी गेलेच तर बंगल्यात काही आवाज येतात आणि काही सावल्या दिसतात. बघा, अजून वेळ गेलेली नाही. मी गावात चांगली जागा बघून देतो. हवेतर आजच्या दिवस इथेच वरच्या मजल्यावर माझी आरामाची एक खोली आहे, तिथे राहा.' मालक काळजीने सल्ला देत होते.
'काका, तुम्ही दिलेल्या सल्ल्याबद्दल मी खरंच तुमचा खूप आभारी आहे. पण मला वाटते तिथेच राहावे. मी आजवर कुणाचं वाईट केलेलं नाही, बघू काय होतंय ते' श्रीकांत उठत म्हणाला.
एव्हाना वेटरने त्याचे पार्सल आणून ठेवले होते. श्रीकांतने पाकीट काढून किती झाले म्हणून विचारले, त्यावर मालक म्हणाले 'राहू द्या साहेब, आज तुम्ही आमचे पाहूने' उद्या द्या हवेतर. पण श्रीकांतला हे काही पसंत नव्हते. 'असे नाही काका, घ्या तुम्ही पैसे, मला नाही बरे वाटणार. एवढी आपुलकीने माझी चोकशी केलीत हेच खूप झाले.'
बऱ्याच आग्रहाने मालकांनी पैसे घेतले पण काउंटर शेजारच्या फ्रिजमधून आईस्क्रीमचे दोन कोण त्याच्या पार्सल मध्ये टाकले. आणि म्हणाले 'साहेब, काळजी घ्या. काही वाटले तर कधीही इथे या, मी नसलो तरी पोरांना सांगून जातो, तुमची व्यवस्था होईल.' एवढ्या प्रेमळ माणसाचे पुन्हा एकदा आभार मानत श्रीकांत पार्सल घेऊन हॉटेल मधून बाहेर पडला. चौकातून बंगल्याकडे वळताने त्याने पुन्हा एकदा हॉटेल कडे नजर टाकली. हॉटेल मालक त्याच्याकडेच बघत होते. त्यांना हात करत श्रीकांत रस्त्याला लागला.
एव्हाना दिवस मावळला होता पण संधिप्रकाश मात्र भरपूर होता. रमत गमत श्रीकांत चालला होता. वस्ती संपून निर्जन एरिया सुरु झाला होता. मनातल्या मनात श्रीकांत हॉटेल मालकांच्या बोलण्यावर विचार करत होता. १५ मिनिटानंतर श्रीकांत बंगल्याजवळ पोहोचला. खिशातून चावी काढून त्याने गेट उघडले. आजूबाजूला नजर टाकत तो व्हरांड्यात आला आणि दुसऱ्या चावीने त्याने मुख्य दरवाजा उघडला. तेवढ्यात काहीतरी धाडकन पडल्याचा आवाज झाला. नाही म्हटलं तरी श्रीकांतच्या छातीत धस्स झालं. पण पुन्हा बिनधास्त होत त्याने लाईट लावली. अन समोर बघितलं तर किचनच्या दरवाज्यावरील पडदा हालत असल्यासारखे त्याला वाटले. मघाचा आवाजही किचन मधूनच आला होता. त्याने पुढे होत किचनची लाईट लावली. समोर एक पातेले पडलेले होते. दरवाजा खिडक्या बंद होत्या. पण तरीही त्याने असा विचार केला कि एखादा उंदीर किंवा मांजर पळल्यामुळे पातेले पडले असेल. त्याने पातेले उचलून जागेवर ठेवले. तो पुन्हा हॉलमध्ये आला. केबल कनेक्शन चालू असण्याची श्यक्यता नव्हतीच पण सहज म्हणून त्याने रिमोट घेऊन टी.व्ही. चालू केला आणि 'टाटा-स्काय' सुरु झाले. मनोमन पुन्हा एकदा अल्ताफभाईंच्या सर्व्हिसला दाद देत त्याने कुठलासा एक म्युझिक चॅनल चालू करून ठेवला. आपली बॅग उघडून त्याने टॉवेल आणि इतर कपडे काढले. मग बॅग उचलून तो बेडरूम मध्ये गेला आणि त्याने कपाट उघडून आपले कपडे त्यात ठेवले.
श्रीकांत टॉवेल घेऊन बाथरूम मध्ये गेला. नळ सुरु केला तर एका नळाला गरम पाणी येत होतं. त्या थोड्याशा गार वातावरणात त्याला गरम पाणी खूपच बरं वाटलं. हातपाय धुण्यासाठी गेलेला श्रीकांत मस्त पैकी आंघोळ करूनच बाहेर पडला. बाथरूम मधून बाहेर पडल्यावर त्याला आतापर्यंत न जाणवलेली एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे घरभर रेंगाळणारा मोगऱ्याचा वास. त्याने दीर्घ श्वास घेऊन समाधानाने मान हलवली. त्याने खिडकीतून बाहेर डोकावत बागेत मोगऱ्याचे झाड दिसतंय का हे बघायचा प्रयत्न केला पण एव्हाना बाहेर चांगलाच अंधार झाला होता. सकाळी बघू म्हणत श्रीकांत हॉल मध्ये आला. घरातले सगळे दिवे चालू करून त्याने घरभर एक व्यवस्थित चक्कर मारली. हॉल मधूनच एक जिना वरच्या मजल्यावर जात होता. क्षणभर त्याने वरच्या मजल्यावर एक चक्कर टाकावी असा विचार केला पण नंतर 'बघू सकाळी' असे म्हणत सोफ्यावर बैठक मारली. पण लगेच पुन्हा उठत तो बेडरूम मध्ये गेला आणि बॅगेतून 'ब्लेंडर्स प्राईड' ची बाटली घेऊन आला. ही सोय त्याने पुण्याहून निघतानेच करून ठेवली होती. किचन मध्ये जाऊन त्याने कपाटातील एक ग्लास, फ्रिजमधून थंड पाण्याची बाटली घेतली व पुन्हा हॉल मध्ये येऊन बसला.
समोर टीव्हीवर त्याने कुठलासा एक सिनेमा लावला. छानसा पेग भरून घेतला आणि स्वतःलाच चिअर्स म्हणत तोंडाला लावला. एक घोट घेत 'वा! मस्त! अशी स्वतःलाच शाबासकी देत आरामात रेलून बसला. रोज एक पेग घ्यायची श्रीकांतची नेहमीची सवय. पुण्यातील त्याच्या घरचे वातावरण अगदी अल्ट्रा-मॉडर्न होते. श्रीकांत एखादा पेग रोज घेतो हे श्रीकांतच्या आई-बाबांनाहि कल्पना होती. मूळची ही सवय श्रीकांतच्या बाबांची, निळकंठरावांची. गेली कित्त्येक वर्ष ते नित्यनेमाने एक व्हिस्कीचा मध्यम पेग घ्यायचे. तोही या दोघांदेखत. लपून छपून नाही. पण एक म्हणजे एकच. कधीही एकाचे दोन पेग झालेले नव्हते. त्या छोट्याशा पेगने निळकंठरावांचा मूड छान असतो, जेवण हसत खेळत होते हे कळल्यामुळे लतिकाबाईंची, श्रीकांतच्या आईचीही काही तक्रार नसायची. कधी कधी निळकंठराव खूपच खुशीत असले कि श्रीकांतलाही एखादा अगदी छोटा पेग द्यायचे. लतिकाबाई रागवायच्या. 'अशाने तो बिघडेल, त्याला व्यसन लागेल अशी तक्रार करायच्या. पण 'एवढी वर्षे मी पितो, लागलेय का मला व्यसन? असे म्हणत हसून सोडून द्यायचे. पण त्याचवेळी श्रीकांतला मात्र सल्ला द्यायला विसरायचे नाहीत. 'शिऱ्या, प्रमाणात घेतले कि हे वाईट नाही पण मर्यादा ओलांडली तर मात्र याच्यापेक्षा घातक काही नाही, हे कायम लक्षात ठेव'
घोट घेता घेता श्रीकांतला या प्रसंगाची आठवण झाली आणि आपण आईबाबांना एकटे सोडून आलो याचे क्षणभर वाईटही वाटले. पण खरेतर श्रीकांतचे आईबाबा दोघेही अगदी ठणठणीत होते आणि आपली काळजी घ्यायला समर्थ होते. शिवाय घरात असलेली शोभा मावशी अगदी श्रीकांतच्या जन्मापासून होती, ती या दोघांची काळजी घेणारीच होती. शिवाय अडीअडचणीला, गणपतकाका ड्रायव्हर आणि अनेक वर्षे असलेला सदा माळीही होते.
पुण्याच्या घरात रमलेले श्रीकांतचे मन पुन्हा भरतपूरच्या बंगल्यात आले. एव्हाना एक पेग संपला होता. श्रीकांत आज जरा जास्तच खुशीत होता. हा बंगला त्याला अगदी मनापासून आवडला होता. शिवाय असा शांत एकांत त्याला नवीनच अनुभूती देत होता. श्रीकांतने घरातला पायंडा मोडत दुसरा पेग भरून घेतला. चॅनल बदलून 'हेराफेरी' हा विनोदी सिनेमा लावला. तशी त्याला काही घाई नव्हती. भरपूर वेळ होता, एकटेपण निवांत एन्जॉय करत तो ब्लेंडर्सचे सिप मारत होता. सगळीकडे रेंगाळणारा मोगऱ्याचा वास मन धुंद करून टाकत होता. त्याचा उगम मात्र त्याला कुठे सापडत नव्हता. तेवढ्यात काहीतरी पडल्याचा धाडकन आवाज झाला. हा आवाज किचनकडूनच आला होता. त्याने टीव्हीचा आवाज म्यूट करून अंदाज घेतला, पण पुढे कुठलाही आवाज आला नाही. किचनच्या दरवाज्यावरील पडदा मात्र मघासारखाच हालत होता. थंडीचे दिवस अगदी सुरु झाले नसले तरी हवा बऱ्यापैकी गार होती. तरीपण हॉल मधला फॅन त्याने अगदी हळू चालू ठेवला होता. पण एवढा वेळ त्या फॅनने पडदा हलला नाही आणि आताच कसा हालतोय याचे त्याला आश्चर्य वाटले. हातातला ग्लास टीपॉयवर ठेवत श्रीकांत उठला आणि किचनच्या दरवाजात जाऊन क्षणभर थांबला. किचनमधली लाईट बंद असली तरी हॉलमधील प्रकाश आत येत होता. तरीपण त्याने बटन दाबून लाईट लावला. आणि बघितले तर मघाशीच त्याने उचलून ठेवलेले तेच पातेले पुन्हा खाली पडलेले होते. त्याने ते उचलून, निरखून बघत पुन्हा जागेवर ठेवले. खिडकी पुन्हा चेक केली. खिडकी व्यवस्थित बंद होती, शिवाय बाहेर वाराही नव्हता आणि वाऱ्याने पडावे एवढे ते पातेलेही हलके नव्हते. एखादे मांजर असते तर एवढ्या वेळात नक्कीच दिसले असते. उंदीर एवढे पातेले पाडू शकेल काय असा मनाशी विचार करत तो पुन्हा हॉलमध्ये येऊन बसला. यावेळी मात्र किचनची लाईट त्याने चालूच ठेवली.
त्या व्यत्ययामुळे नाही म्हटले तरी त्याचा मस्त मूड जरा डिस्टर्ब् झालाच होता. श्रीकांत तसा भिणाऱ्यातला नक्कीच नव्हता. उलट अशा भुताखेतांच्या गोष्टी कोणी सांगायला लागले तर त्याची खिल्ली उडवायला श्रीकांत नेहमी पुढे असायचा. श्रीकांतचा जसा भुतावर विश्वास नव्हता, तसाच देवावरही नव्हता. श्रीकांतच्या मनातील देवाची व्याख्या फार वेगळी होती. देवळात दिसतो त्या देवावर त्याला विश्वास नव्हता. तिथल्या धार्मिक कार्यात होणाऱ्या पूजापाठावरही त्याचा विश्वास नव्हता. सत्यनारायणासारखे पूजाप्रकार म्हणजे तर कुना हुशार ब्राह्मणाच्या डोक्यातून आलेली एक कल्पनाच असून त्या माणसाने ही काल्पनिक कथा लिहून, त्याचा संबंध कर्मकांडाशी जोडून, आणि लोकांच्या मनातील भीती आणि श्रद्धा यांची छान सरमिसळ करून आपली पोटापाण्याची तह-हयात सोय करून टाकली असावी असे श्रीकांतचे स्पष्ट मत होते. पण याचा अर्थ श्रीकांत देवाचे अस्तित्व पूर्ण नाकारणाराही नव्हता. मानवाच्या ताकदीच्या, बुद्धीच्या कल्पनेकडची एखादी अद्वितीय शक्ती अस्तित्वात आहे आणि त्या शक्तीचेच प्रतिनिधीत्व करणारा हा निसर्ग आहे याच्यावर त्याचा विश्वास होता. त्यामुळे श्रीकांत कधी कुठल्या मंदिरात जात नसला तरीही ही धरती, समुद्र, वारा, डोंगर, नद्या, आकाश यांना मात्र तो मनोभावे हात जोडत होता.
श्रीकांतच्या तरल झालेल्या मनात हे विचार भरभर तरळून जात होते. शेवटी गेलेला मूड परत आणण्यासाठी म्हणून बहाणा शोधत त्याने अजून एक पेग भरला आणि सिनेमा बघू लागला. तिसरा पेग संपल्यावर मात्र त्याने ग्लास बाजूला ठेवला. आतामात्र त्याच्या शरीरावर दारूचा अम्मल चांगलाच जाणवू लागला होता. भूकही कडकडून लागली होती. त्याने आणलेल्या पार्सलचे डबे उघडले आणि प्लेट वगैरे घेण्याच्या फंदात न पडता त्याने जेवण सुरु केले. जेवण अतिशय चवदार होते. पुणेरी मिळमिळीत मसाल्यापेक्षा ही किंचित तिखट आणि अस्सल कोकणी चव असलेली पनीरची भाजी एकदम आवडून गेली. डब्यातील गरम गरम जिरा राईसही त्याने संपवला आणि मग मात्र त्याला एकदम सुस्ती आली. समोरचे सगळे आवरण्याच्या नादाला न लागता त्याने बेसिनवर कसेबसे हात धुतले आणि बेडरूम मध्ये जात बेडवर अंग झोकून दिले. येताने टीव्ही मात्र त्याने आठवणीने बंद केला होता. बेडवर पडल्यावर काही क्षणातच त्याला अतिशय गाढ झोप लागून गेली. मधेच कधीतरी किचमधून आलेल्या काहीतरी पडल्याच्या आवाजाने त्याची झोप चाळवली पण उठण्याची तसदी न घेता तो तसाच झोपून गेला. पहाटे पहाटे चांगलाच गारठा वाढला होता. अंगावर पांघरून घ्यावे असे त्याला वाटले पण उठून कपाटातून पांघरून काढायचा कंटाळा आल्याने तसेच पोटाशी पाय घेऊन श्रीकांत पुन्हा झोपेच्या आधीन झाला.