Get it on Google Play
Download on the App Store

कर्मयोगिनी

१८व्या शतकाचा पूर्वार्ध! तो काळ असा होता, जेव्हा चूल आणि मूल यापलीकडे स्त्रियांना काही विश्व असेल हे स्त्रियांच्या सुद्धा मनात येत नसे. थोडाफार विरंगुळा असेल तर पहाटेच्या जात्यावरच्या ओव्या किंवा दुपारच्या वेळात जमलेल्या चार जणींच्या गप्पा!! नटणे-मुरडणे आणि पदराआड ओठ लपवून हळूच लाजणे हेच काय ते आयुष्य! आणि अशा काळात पुण्यामध्ये जेमतेम सोळा-सतरा वर्षांची एक युवती सकाळीच उंबरठा ओलांडून बुधवार पेठेतील भिडे वाड्याची वाट चालू लागे. रोज शेणाचे, चिखलाचे गोळे, दगड घेऊन लोक तिच्या स्वागताला सज्ज असत. रस्त्यात त्या चिखल आणि शेणामुळे खराब झालेले आपले लुगडे भिडे वाड्यात येऊन ती युवती बदलत असे. आणि क्रांतीपर्वाच्या अध्यायाचे नवे पान लिहायला सज्ज होत असे. आपल्या पतीच्या सहकार्याने क्रांतीची ठिणगी पाडणारी ती युवती होती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले!!

३ जानेवारी १८३१ रोजी जन्मलेली सत्यवती आणि खंडोजी पाटलांची एकुलती एक कन्या सावित्री! वयाच्या नवव्या वर्षी ज्योतिबा फुलेंची अर्धांगिनी झाली आणि आयुष्यभर हे सहचरिणीचे व्रत अखंड पाळत जगली. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे काम असो की बालहत्या प्रतिबंधक गृहाची धुरा असो, सावित्रीबाईंनी पतीच्या खांद्याला खांदा लावून सारे काही निष्ठेने सांभाळले. बदल स्वीकारणे ज्या काळात दुरापास्त होते त्या काळात त्या क्रांतीची ज्योत बनून झळकल्या. आपल्या पतीच्या मनात असणारा स्त्री शिक्षणाचा कळवळा त्यांनी बरोबर हेरला होता. आज आपण ज्याला feminism म्हणतो त्यासाठी खऱ्या अर्थी पहिल्यांदा पाऊल उचलले ते सावित्रीबाईंनी ! स्त्री मुक्ती चळवळ हा आज जेवढा परवलीचा शब्द आहे तितका तो त्या काळात नव्हता. धैर्य आणि संयमाचे एक धीरोदात्त उदाहरण होऊन जगल्या सावित्रीबाई! स्त्रियांनी शिक्षण घेतले तर घरावर मोठे संकट येईल, समाजाचे नुकसान होईल, धर्म बुडेल अशा अनेक अंधश्रध्दा त्या काळी समाजमनात रुजलेल्या होत्या. त्यांना समूळ नष्ट करायचे तर स्त्री शिक्षण किती सकारात्मक बदल घडवू शकते हे प्रत्यक्ष दाखवायला हवे याची ज्योतिरावांना जाणीव होती. अशा वेळी बदलाची सुरुवात घरापासून करावी असा निर्णय ज्योतिरावांनी घेतला आणि सावित्रीबाईना घरीच शिकवायला सुरुवात केली; आणि इथेच झाला श्रीगणेशा महिलांच्या शिक्षणाचा!

ज्योतिराव फुलेंच्या वडिलांचा आपल्या मुलाच्याच शिक्षणाला विरोध होता. अशात तो स्वतः शिकून सुनेलाही शिकवतो आहे हे सहन न होऊन त्यांनी दोघांना घराबाहेर काढले. पण म्हणून फुले दाम्पत्य डगमगले नाही. सरस्वती पूजनाचे हाती घेतलेले व्रत त्यांनी त्यागले नाही. पुण्यातील भिडे वाड्यात १ जानेवारी १८४८ रोजी फुले पती-पत्नीनी शाळा सुरू केली, तीदेखील खास मुलींसाठी. जिथे स्त्री शिक्षण पाप मानले जात होते तिथे समाज विरोधाला न जुमानता शाळा सुरू करणे म्हणजे किती धैर्याचे काम होते! आज कल्पनादेखील नाही केली जाऊ शकत त्या काळात त्यांना सामना कराव्या लागलेल्या संकटांची आणि विरोधाची. या सगळ्याची पर्वा न करता बेडरपणे त्या शाळेच्या शिक्षक आणि मुख्याध्यापक पदाची धुरा सावित्रीबाईंनी स्वीकारली. देशातली पहिली विद्यार्थिनी मग पाहिली स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका झाली!!

तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली. शाळा सुरू झाली तेव्हा पाच-सहा विद्यार्थिनी येत असत. पण ते वर्ष संपेपर्यंत ही संख्या चाळीसच्या घरात पोहोचली होती. १९४८मध्ये 'इवलेसे रोप लावीयले द्वारी' आणि अवघ्या चार वर्षात अजून एक-दोन नव्हे तर तब्बल अठरा शाळा सुरू करून 'त्याचा वेलू गेला गगनावरी'!! स्त्री ही जात्याच शहाणी, सुज्ञ, परिस्थितीचा योग्य अंदाज घेणारी असल्याने स्त्रियांनाही मनाने जाग येत होतीच. स्त्रियाही एकत्र यायला, मोकळेपणा अनुभवायला उत्सुक होत्याच. त्या दृष्टीने सावित्रीबाईंनी १८५२ मध्ये ‘महिला सेवा मंडळाची’ स्थापना करून स्त्रियांसाठी तिळगूळ समारंभ आयोजित केला होता. याशिवाय बालविवाह, केशवपन, यासारख्या क्लिष्ट आणि महिलांच्या सक्षमीकरणात अडथळा होणाऱ्या अनेक प्रथांविरोधात त्यांनी हिरीरीने केलेले काम आपल्यापासून लपलेले नाही. यज्ञ होता तो एक... ज्याचा  वन्ही फुले दांपत्याने स्त्रियांच्या आणि हजारो तरुणांच्या मनात चेतवला आणि क्रांतीच्या हजारो मशाली पेटवल्या. आजही लाखो कुंडरुपी मनामध्ये धगधगते आहे या यज्ञाची ज्वाला... प्रसन्न हसते आहे पाहून सावित्रीच्या लेकींच्या त्रैलोक्यातील विजयी पताका!!

काळ आपल्या सूर्यगतीने सरकत गेला, बदलत गेला.... उंबराठा ओलांडणेही जिथे आव्हान होते ते स्वीकारून भारतीय स्त्रिया शिक्षण घेऊ लागल्या. काळानुरूप स्वतः:ला बदलवत गेल्या. ओघओघाने आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ लागल्या. मी स्वतंत्र व्यक्ती आहे, मी शिकले तर माझे कुटुंबही सबल होईल या मानसिकतेतून स्वतःला घडवू लागल्या. कालानुरूप येणारी आव्हाने स्वीकारू लागल्या. जरी स्त्री स्वतःला बदलवत गेली तरी तिच्या मूळ आव्हानांत वाढच झाली. आज करियर घडविण्यासाठी ती धडपडतेय. निरनिराळ्या क्षेत्रातल्या संधी, दोन्ही हात पसरून तिला बोलावताहेत आणि तीदेखील त्या संधीचे सोने करत आहे. वंशाचा दिवाच नाही तर ज्योतही कुटुंबाची उन्नती करू शकते हे सिद्ध करतेय. सामाजिक, कौटुंबिक आणि नैसर्गिक वरदानरुपी जबाबदाऱ्यांचे शिवधनुष्य लीलया सांभाळून ती हे सारे करतेय. पुरुषकेंद्री मानसिकता अजूनही समाजातून संपूर्ण गेलेली नाही. त्यामुळे त्याचे काही अंशी स्त्रियांना तरी परिणाम भोगावे लागत आहेत. अन्यायग्रस्त स्त्रियांच्या पाठीशी उभे राहायला आज समाज शिकला असला तरीही,  स्वसंरक्षणासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्वत:ला सक्षम ठेवणे ही तिची सुद्धा जबाबदारी आहे.

सावित्रीबाईंनी ज्ञानज्योत हातात दिल्यावर अगदी लहानशा कालखंडात आश्चर्यकारक प्रगतीचा टप्पा स्त्रीने गाठला. स्त्रीच्या या कर्तबगारीचे महत्त्व आणि स्त्रियांचे योगदान अनेक पातळ्यांवरचे आहे. अत्यंत प्रतिकूल अशा सामाजिक, कौटुंबिक परिस्थितीला न जुमानता कधी संघर्ष तर कधी समन्वय करीत ज्या स्त्रियांनी विकासाच्या वाटा खुल्या करण्याचा ध्यास घेतला, त्यांच्यामुळेच आज एकविसाव्या शतकातल्या स्त्रियांना राजमार्गावरून चालता येत आहे. त्यांचे धैर्य, त्यांचे शहाणपण, त्यांचा निश्चय, त्यांचे कर्तृत्व आणि त्यांची तळमळ या सर्व गोष्टींचे स्त्रीधन आधुनिक स्त्रीला परंपरेने मिळाले आहे. ज्ञानाच्या स्पर्शाने त्याला सोन्याची झळाळी आणली आहे. आपल्या अंतरंगात असणारी दुर्गा आणि तिची प्रचंड ऊर्जा याची जाणीव सावित्रीबाईंनी करून दिली आणि सुरवंटाचे जणू फुलपाखरू झाले. आपल्या पंखांच्या रंगीबेरंगी छटांनी सगळ्या क्षेत्रात भिरभिरत उत्तुंग यशाचे मध चाखू लागले. कीर्तीरुपी आनंद सर्वत्र उधळू लागले. भारतीय स्त्रियांचे सावित्रीबाईंनी मनापासून मातृत्व स्वीकारले, निष्ठेने निभावले म्हणून आज आपण सन्मानाने जगतो आहोत. आज स्त्री म्हणून भरतभूमीत जन्म घेतला आणि सावित्रीबाईंचे कार्य माहिती नाही अशी स्त्री भारतात सापडणे दुरापास्त. करोडो मुलींच्या जगण्याला हक्क मिळवून दिला त्यांनी. त्यासाठी सावित्रीबाईंच्या आजन्म ऋणी असतील सगळ्या दुर्गा भरतभूमीच्या...


~ मैत्रेयी पंडित