सुपर ओव्हरमध्ये बंगळूरची 'मुंबईवर' "मात"
अबुधाबी इथे खेळल्या गेलेल्या बंगळूर विरुद्ध मुंबई रोमहर्षक सामन्यात सुपर ओव्हरमध्ये बंगळूर संघ विजयी ठरला आहे. अत्यंत अटीतटीच्या या लढतीत सुपर ओव्हरमध्ये *नवदीप सैनीने गोलंदाजीत नाविन्य दाखवत* सुपर ओव्हरमध्ये पोलार्ड, हार्दिक पांड्या आणि रोहीत शर्माच्या मुसक्या आवळत बंगळूर संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि थरारक लढत आपल्या संघाच्या नावे केली. सुपर ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी अवघ्या सात धावांचे तुटपुंजे आव्हान एबीडी आणि कोहलीसमोर होते आणि ते त्यांनी सहर्ष स्विकारत बंगळुरूचा विजय साकारला.
खरेतर विराटचा आरसीबीचा संघ हा कायमच कच्चा निंबू किंवा टिंगलटवाळीचा विषय असतो. मस्कूलर, पॉप्युलर, स्पेक्टॅकूलर, बॅचलर आणि क्रेझ असुनही ज्याप्रमाणे *पप्पू कान्ट डांन्स* असतो त्याप्रमाणेच *आरसीबी कान्ट विन* हा प्रत्येक आयपीएल हंगामात परवलीचा शब्द असतो. शिवाय आरसीबीची धुरा विराट सांभाळतो, ज्याने टीम इंडियाचे यशस्वी सारथ्य केले आहे. तरीपण आयपीएल म्हटले की इतर संघांना त्यांच्या विजयाची शाश्र्वती नसली तरी आरसीबीच्या पराभवाची हमी जरूर असते. त्यातच आंतरराष्ट्रीय स्तरावर *विराटपणे मैदान गाजवणारा कोहली* आयपीएल बाबत नेहमीच शापित राजपुत्र ठरतोय. अशा पार्श्वभूमीवर हा विजय आरसीबीला अमृतासमान भासला असेल तर नवल वाटायला नको.
पहिले फलंदाजी करताना फिंच, पडीकल जोडागोळीने आरसीबीला सुंदर सलामी भागीदारी करून दिली. या दोघांनी दमदारपणे अर्धशतक ठोकत संघासाठी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. आता गरज होती या पायव्यावर टोलेजंग धावइमारत बांधण्याची. मात्र कर्णधार विराट *खोया खोया चाँद* प्रमाणे कधी खेळपट्टीवर आला आणि गेला हे कळलेच नाही. आरसीबी नावाच्या पोपटाचे प्राण विराटमध्ये नाही तर एबीडी नावाच्या अजब रसायनामध्ये दडलेले आहे. *एबीडी आपल्या नावाला जागला आणि तिकडे मुंबई संघाची झोप उडवून गेला.*
एबीडीने चौफेर फटकेबाजी करत अवघ्या २४ चेंडूत ५५ धावा चोपतांना ४ चौकार ४ षटकार ठोकले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या *शिवम दुबेनेही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले* आणि जेम्स पॅटीन्सनच्या अखेरच्या षटकात तिन षटकार उडवत आरसीबीला २०० ची वेस ओलांडून दिली. ट्रेंट बोल्ट, पॅटीन्सन, आर. चहर आणि जसप्रित बुमराह सोबतच कृणाल पांड्यावर आरसीबी फलंदाजांनी कोणतीही दयामाया न दाखवता तुटून पडल्याने वैविध्यपूर्ण गोलंदाजी असलेल्या मुंबई संघाची वाताहत झाली.
प्रत्त्युत्तरात मुंबई संघाचा प्रारंभ अपेक्षेप्रमाणे झाला नाही. कर्णधार रोहीत, युवा सुर्यकुमार यादव, भरवश्याचा क्लिंटन आणि तडाखेबंद फलंदाज हार्दिक पांड्या फलंदाजीत बेरंग ठरले. "बाराव्या" षटकात केवळ ७८ धावांत ४ बळी जाताच मुंबई संघाचे *आता वाजले की बारा* होण्याची चिन्हे दिसू लागली होती. समाधानाची बाब म्हणजे मुंबई संघासाठी इ'शान' किशनने शानदार फलंदाजी करत संघाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. धावगती षटकामागे १५ च्या वर जाताच मुंबई संघासाठी *अभी नहीं तो कभी नहीं* परिस्थिती उत्पन्न झाली आणि खेळपट्टीवर स्थिरावलेल्या इशान किशनच्या दिमतीला फलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून नावाजलेल्या *'आयरन' मॅन 'कायरान' पोलार्डने मैदानाचा ताबा घेतला.*
खरेतर पोलार्डची शरीरयष्टी पाहता तो क्रिकेटपेक्षा बॉक्सिंगच्या रिंगमध्ये जास्त शोभून दिसतो. यजुर्वेंद्र चहल, ॲडम झम्पा या गोलंदाजांसमोर तो २०१२ हॉलीवूड पटातील *पॅंडोरा ग्रहावरचा महाकाय मानव वाटतोय*. तो फलंदाजीला आला की त्याच्या हातातली बॅट टुथपिक सारखी वाटते. सिमारेषेवर विशेषतः लॉंग ऑन, लॉंग ऑफला तो क्षेत्ररक्षणाला असला की एक अभेद्य भिंती प्रमाणे धावांचे रक्षण करतो आणि अशक्यप्राय झेलसुद्धा लिलया घेतो. त्याच्या फटक्यांना वास्तविकत: सिमारेषेचे बंधन मुळीच नसते. त्यातच फिरकीपटू हे त्याचे आवडते खाद्य आहे. अबुधाबीचे मैदान तुलनेत मोठे असले तरी पोलार्डच्या पोलादी फलंलाजीपुढे ते कचकड्याचे ठरले.
एकतर खेळपट्टीवर आधीच स्थिरावलेला आणि फटकेबाजी करणारा इशान किशन उपस्थित होता, त्यातच *पोलार्डची बॅटरी चार्ज होताच त्याने आरसीबी गोलंदाजांना डिस्चार्ज करणे सुरू केले*. मात्र पोलार्डच्या धडाड्यात इशान किशनची सहजसुंदर ९९ धावांची अप्रतिम खेळी झाकोळली गेली. या दोघांच्या भगिरथ प्रयत्नांची सरशी होत असताना नियती मुंबई संघावर रूसली आणि सामन्याचा निकाल अखेर सुपर ओव्हरकडे गेला. मुळचा दिल्लीचा असलेल्या नवदीप सैनीने नवीन *कोरडा चेंडू हाताळताच मुंबई संघाच्या घशाला धावांची कोरड लागली*. चौकार षटकारांचे कारंजे उडवणारे नामचिन फलंदाज एकेक धावेसाठी तडफडू लागले. शेवटी पोलार्डचा बळी घेत सैनीने मुंबई संघाला अवघ्या ६ धावांवर थोपवले आणि इथेच आरसीबीचा विजय सुनिश्चित झाला होता.
दि. २९ सप्टेंबर २०२०
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com