व्यक्ती चित्रण - प्रो. रंजन लाखे सर
माझे शिक्षण पहिली ते दहावी गर्ल्स हायस्कूल मध्ये झाले. शिकवायला शक्यतो शिक्षिका आणि कवचित एखादं दुसरे शिक्षक होते. शाळेचा सगळा परिसर फक्त मुलींनी आणि त्यांच्या बडबडीने गजबजून जायचा. दहावी होई पर्यंत कोणत्याच मुलाशी संपर्क फारसा नवहता. मग अकरावी साठी कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतली ते कॉलेज होते देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स ! साल होते ते 1991 . मी आणि माझी मैत्रीण दोघींनी एकत्र ऍडमिशन घेतली होती म्हणून निदान पहिला दिवस तरी एकत्र जाऊ अस मी मैत्रिणीला म्हणाले. मग आम्ही वेळ ठरवून एकत्र कॉलेज ला आलो कारण आता इथे शिकण्या साठी मुलं ही असणार आणि आम्ही गर्ल्स स्कुल मधून आलेलो अगदी भांबावून गेलेलो. इतके मोठे कॉलेज आणि भरपूर मुलं मुली सगळे अनोखळी कसे तरी क्लास रुम कडे पोहोचलो. बाकावर बसे पर्यंत हृदयात धडधड सुरुच होती. आणि वर्ग सुरु झाल्याची बेल वाजली. आता कोण शिक्षक येतात या कडे आम्हा सर्वांचे लक्ष लागले होते. पाचच मिनिटात एकदम कडक इस्त्री केलेला शर्ट आणि पॅन्ट घातलेले रुबाबदार दिसणारे सर वर्गात आले. छान पैकी त्यांनी इन सुद्धा केले होते.अगदी चापून चोपून सेट केलेले केस. हेयर स्टाइल अशी की सरांपुढे त्या काळचा अनिल कपूर फिका पडावा अशी! वयाने म्हणाल तर तेव्हा आमच्या पेक्षा साधारण दहा वर्षांनी मोठे असतील. म्हणजेच साधारण 25/26 वर्षाचे वाटत होते. दिसायला टकाटक होतेच पण एकाच गोष्टीची कमी होती ती म्हणजे हास्य. सरांचा चेहरा पूर्ण निर्विकार,शांत कधी हसतात की नाही अशी शंका यावी. असो पण शिक्षक या पेशाला शोभत होते. आणि कोणास ठाऊक आज कॉलेज चा पहिलाच दिवस असल्या मूळे सर असे शांत असतील बघू थोडया दिवसांनी कसे वागतात. मग सरांनी बोलायला सुरवात केली. वा सरांचा आवाज एकदम भारदस्त धीरगंभीर असा. बोलले मी प्रोपेसर रंजन लाखे मी तुमचा क्लास टिचर आहे आणि कॉमर्स हा विषय मी तुम्हाला शिकवणार आहे.मग आम्हा सगळ्याची ओळख परेड झाली. सर म्हणाले आज आपण असच इतर विषयांवर गप्पा मारू उद्या पासून अभ्यासाला सुरवात करू. सगळे एका सुरात म्हणाले चालेल सर. मुलांचं काही माहीत नाही पण लाखे सर आम्हा मुलींना जाम आवडले होते त्यांचे बोलणे ऐकत राहावे इतके सर छान बोलायचे. तो लेक्चर संपला तसे सगळे बोलू लागले काय भारी आहेत ना सर ,बोलतात पण किती छान. या मुलींच्या गप्पा. दुसऱ्या दिवशी सर पहिल्याच लेक्चर ला आले आज अभ्यास सुरू केला. वाणिज्य सारखा कंटाळवाना विषय सुद्धा सर अगदी छान आणि गमती जमती सांगत शिकवत असत. आम्हला कंटाळा आला की आम्ही सर आज थांबुया का इथेच प्लिज सर असा गलका केला की सर हसुन म्हणायचे बर थांबुया. पण अगदी मोजकेच हसायचे सर काय माहीत हास्याचे आणि सरांचे नेमके वाकड काय होते. सरांना कधी ही मनमुराद खळखळून हसताना आम्ही पाहिले नाही. लेक्चर ऑफ दिल्यावर सर एकटेच शान्त बसलेले दिसायचे जणू स्वहता मध्ये मग्न असायचे . त्यांच्या डोळ्यात दुःखाची किनार नक्की जाणवायची कदाचित त्यामुळेच ते मनमुराद हसत नसतील का असा प्रश्न पडायचा. मी तेव्हा कविता लिहायचे . एक दिवस असेच लेक्चर ऑफ देऊन सर शान्त बसले होते. माझ्या मनात आले की आपली कविता सरांना दाखवावी बघू काय म्हणतात. म्हणून मी सरांकडे गेले म्हणाले सर मी कविता करते प्लिज तुम्ही ही कविता वाचून सांगा कशी आहे. हो बघू म्हणत सरांनी माझी वही घेतली. कविता वाचली ती एक दर्द भरी कविता होती. सर म्हणाले , खूपच छान लिहिली आहे कविता. मला ही भारी वाटत होते की सरांना कविता आवडली. मी माज्या जागेवर आले सरांकडे पाहिले तर सर परत शून्यात आपल्याच दुनियेत मस्त मौला झालेले. मला वाटत होते की काहीतरी नक्की आहे जे सरांना सलते आहे. मग जेव्हा जेव्हा मी नवीन कविता लिहायचे तेव्हा आवर्जून सरांना दाखवायचे सर मना पासून कवितेचे कौतुक करायचे म्हणायचे तुम्ही इतकं छान लिहिता मग कॉमर्स साईड ला का आलात. मी हसत राहायचे फक्त. वार्षिक स्नेहसंमेलनात तेव्हा सरांना नाव ठेवण्याची (फिशपौंड म्हणायचे त्याला) पद्धत असे रंजन लाखे सरांना सगळयाच क्लास मधून अकरावी,बारावी भरपूर फिशपौंड मिळायचे . आम्ही सरांना दिलेला फिशपौंड असा होता "" सांसो की जरूरत है जैसे जिदगी के लिये ,बस लाखे सर ही चाहीये कॉमर्स के लिये "! सर सर्वांचे आवडते आणि लाडके बनले होते.सरांचे वैशिष्ट्य म्हणजे सर कायम इन करून व्यवस्थित यायचे. दिसायला स्मार्टच होते. न जाणो किती मुलींचे ते क्रश होते. अकरावी बारावी दोन वर्ष लाखे सर आम्हाला शिकवत होते पण त्यांचे वागणे जरा सुध्दा बदलेले नव्हते. सर्वांशी ते शांत आणि आदरांनी बोलायचे भले मग तो विद्यार्थी असो वा विद्यार्थीनी !माझ्या कविता सगळ्याच सॅड कॅटेगरी मधील होत्या त्या वाचून सर ही काही क्षण विचारात हरवायचे . मला कित्येकदा वाटले की नक्की सरांचा ब्रेकअप झाला असणार त्या शिवाय सरांना माज्या या सॅड कविता का आवडत असतील. सरांबद्दल आम्हा सर्वाना ही खूप आदर वाटायचा. सर आम्हा सर्वांशी मित्रत्वाच्या भावनेने वागत असत. आम्ही फर्स्ट इयर ला आलो आता रंजन लाखे सर शिकवायला नसतील ही खंत वाटत होती. सर आमचे एकमेव आवडते बनले होते. सरांचे लेक्चर ऐकायला जी मजा यायची ती इतर दुसऱ्या सरांच्या लेक्चर ला येत नसे. सर कॉलेज मध्ये दिसायचे मग बोलायचे आवर्जून अभ्यासाची चौकशी करायचे. पण जेव्हा सरांना बघत असू तेव्हा तेव्हा सर असेच धीरगंभीर आपल्याच विचारात मग्न असायचे काहीतरी नक्की होते पण ते समजणे अवघड होते. आज ही सर तसेच आठवतात मोजकेच हसणारे आणि कुठेतरी हरवलेले आणि माज्या कविता आवडीने वाचणारे.. आता इतक्या वर्षात सर कुठे असतील माहीत नाही. हजारो विद्यार्थी त्यांनी घडवले असतील प्रत्येकाच्या आठवणीत असतील रंजन लाखे सर! भले सरांच्या लक्षात आम्ही कोणी नसू पण सर आमच्या समरणात नक्की राहतील.आणि आयुष्यात अशी खूप कमी लोक भेटतात जी आयुष्यभर लक्षात राहतात..स्मृतिगंधा सारखे...हा कधी सर अचानक पणे भेटले तर या वेळेस मी सरांना नक्की विचारेन सर आता तरी खळखळून हसता की नाही? थोरपदाला गेलेला प्रत्येक माणूस प्रथम आठवण करतो - तो आपल्या शिक्षकाची, जीवनात उभे करणार्या गुरुजनांची, त्याच्या काळजावर शिक्षकाचे नाव कोरलेले असते, ही काही सामान्य बाब नाही.