Get it on Google Play
Download on the App Store

ऊन वारा पाऊस, थंडी : जीवनाचा आविर्भाज्य भाग

वातावरण भरून आले होते.ढग काळे कुट्ट झाले होते.कोणत्याही क्षणी पाऊस धो धो कोसळेल. अशी स्थिती होती.जवळपास पिंपळनेरच्या अलीकडील मळ्यातून काही काम करून आम्ही परतत होतो.पिंपळनेर म्हणजे वडनेर भैरव पासून चार साडेचार किमी अंतरावर असलेले व वडनेरचाच भाग असलेले एक गाव.बहुतेक कांद्याच्या चाळीवरील, कांदा निवडण्याचे काम करून आम्ही घरी परतत होतो.माझ्यासोबत अजून कोणीतरी एक जण होता.आणि बघता बघता ढगांनी आपले संयमाचे बांध फोडले,आणि जशी वाट सापडेल त्या दिशेने पाऊस जोर लावू लावू कोसळत होता.पाऊस कोसळत होता त्याच्या त्याच्या धुंदीत,मस्तीत. स्वतःला मोकळं करवून घेत होता,आम्ही पावसात सापडलो होतो, पूर्ण भिजलो होतो.

पण त्या आक्रसून पडणाऱ्या पावसाबद्दल एक चिकार वाईट शब्द नव्हता तोंडात की काही तक्रार नव्हती.हल्ली मीडियावर विशेषतः टी व्ही चॅनेल वर थोड्याशा साचलेल्या पाण्याला व मुसळधार नसलेल्या पावसालाही रौद्र स्वरूपाचा पाऊस,भयाण पाऊस असल्याचे सांगून आपापली हाय कव्हरेज बातमी म्हणून दाखवतात.तो भाग वेगळा.पण आज टी. व्ही. वर दाखवल्या जाणाऱ्या, सांगितल्या जाणाऱ्या भयाण पावसाच्या कितीतरी पट तो पाऊस कोसळत होता. आम्ही घरापासून अडीच तीन कि.मी.मागे असावो. आमची वये देखील 13,14 च्या आसपास असावी.त्या पावसाचा जेवढा जोर होता तेवढाच तो झेलण्याचाही आमचा जोर होता.पाऊस आणि आम्ही एकरूपच झालो होतो जणू.आम्हाला काळजी नव्हे.तर मजा वाटत होती.

ते मोठे मोठे टपटपा पडणारे थेंब आम्ही अंगाखांद्यावर खेळवत होतो.धरती त्या थेंबाना अलगद झेलून पुन्हा वर उसळवत होती.झाडांची पाने त्या थेंबांचे होणारे सपासप वार आपल्या अंगावरती घेऊन एकप्रकारे आनंदाने नृत्य करत होती.हे बेभान होऊन सृष्टीचा अनोखा नाद पाहून खरे तर मी ही बेभान होऊन गेलो होतो. तोंडातून निघत होते,अरे वा अजून पड.आमच्या मागेच थोड्या अंतरावर आमच्याच वयाच्या किंबहुना एखाद दोन वर्षाने मोठ्या असाव्या..

दोन मुली लाकडाच्या मोळ्या घेऊन तरातरा चालल्या होत्या.त्याही पूर्ण ओलेचिंब भिजलेल्या, डोक्यावरची लाकडे भिजलेली.पण त्याही ह्या पावसाच्या थेंबांशी एकरूप झाल्या होत्या असे दिसत होते.आई ग..म्हणून हसत हसत म्हणत होत्या–किती जोराचा पाऊ-से. त्यांचे हास्य ह्या पावसाशी एकरूप झाले होते.आम्ही थोडावेळ एका झाडाखाली थांबलो.पण त्या मुली तरातरा चालतच राहिल्या.ओल्या सरपणाची ना त्यांना कसली चिंता होती.कोसळणाऱ्या पावसाची ना काही तक्रार होती.

ना विजांचा कडकडाट,ना सुसाट वेगाने धावणारा वारा, वादळाचा अडथळा, फक्त धो धो कोसळणारा पाऊस व आमचं त्यात ओलंचिंब होऊन घराकडे परतणं..

असा हा त्याकाळी सृष्टीला नखशिखांत भिजवणारा, धरतीला ओलेचिंब करणारा,नद्यानाल्यांना भरभरून देणारा पाऊस हा हृदयात साठत गेला नि तो माझा केव्हानिक सखा झाला.

पावसाचं व माझं नातं असं खुप बालपणापासूनच अगदीच घट्ट बनत गेलं.

मला लहानपणी पावसात जास्त बाहेर निघू दिलं जात नव्हतं.वाऱ्या वावधानाचा व कडाडणाऱ्या विजांचा पाऊस सुरू झाला की मला गोधडीत झाकून मावशीच्या घरी पोहोचवायचे,मी मेंधाळु होतो असे घरच्यांचे म्हणणे. मेंधाळू म्हणजे काय ते मला आजपर्यंत कळलेले नाही.किंवा मग आमच्या शेजारीच भोले ट्रान्सपोर्ट कंपनीचे ऑफिसकम गोडाऊन होते.तिथे मला न्यायचे.व वाड्यातील बरेच माणसे तिथे आश्रयाला यायची.तिथेच गप्पा, टप्पा विनोद चालायचे.

पाऊस यायची लगबग सुरू झाली की आमची माझ्या वडीलांची घर सावरण्याची तयारी सुरू होत असे.

छतातून पावसाच्या धारा घरात अलगद येत असत व त्या धारा घरातली सगळी भांडी लावून बगुने,हांडे,बादल्या लावुन ते पाणी त्यात साठवून मग बाहेर फेकून द्यायचे.

बाहेर छतावरून पडणारा पाऊस देखील असा आम्ही भांड्यात गोळा करत असू.

वडील ज्यांना मी काका म्हणतो, ते एवढ्या पावसातही बाहेर घराच्या बाजूने एखादी छोटीसी नाली खोदून इकडून तिकडून येणाऱ्या पावसाला बाहेर जाण्यास रस्ता करून देत असे.

हे सगळं झेलणं, झेलणं नव्हतं तर हे जगणं होतं आमचं. जगणं असंच असतं,हे मनावर ठसलं होतं.प्रकृतीचे हे तडाखे नव्हते तर प्रकृतीशी जोडले जावून प्रकृतीमय होण्याचे हे जीवन होते.ही प्रतिकुलता नव्हती.तर हीच अनुकूलता होती.

पावसासोबत असो किंवा ऊन वारा थंडी असो ज्यांचा आपल्या शरीरावर आघात होतो आजकाल. पण हा आघात त्यावेळी कधी झालाच नाही.उलट ह्या सर्वांशी मैत्रीपूर्ण नाते मात्र जडत गेले आणि भावी आयुष्यात आजही ऊन वाऱ्याचे चटके,वादळाचे फटके पावसाचे तडाखे ह्यांची बालपणापासून सवय असल्याने हा जीवनातील एक आविर्भाज्य भाग आहे असेच वाटते.आणि जीवनात हे हवेच. ह्या अनोख्या नात्यामुळे आजही जीवनातल्या अनेक गोष्टी ज्याना समस्या म्हणून मान्यता आहे त्याकडे समस्या म्हणून न बघता तो जीवनाचा एक भागच आहे ह्या नात्याने राहता येते,त्यामुळे जीवन हे भारहीन बनून जाते.जीवन एक गाणे बनून जाते.

बालपणात अशी ही अँटॅचमेन्ट होती माणसांची एकमेकांशी,हीच अँटॅचमेन्ट होती जगण्याशी,अँटॅचमेन्ट होती प्रकृतीशी,कष्टाशी, खोपे बांधण्याची,खोपे उस्तरण्याची. पावसाळ्यात मातीतले बरेचसे खेळही चाले.एखादा दाभन किंवा तसदृश्य वस्तू घेऊन तो लांब जमिनीवर फेकायचा व तो खुपसवायचा.तो खुपसला नाही की आऊट.काही जण गावात किती तरी लांब पर्यंत त्यांचा दाभन बाजूला पडतच नव्हता.मग विटी दांडू,लिंगोरचा वगैरे खेळ.हे खेळ जमीन,माती,पाणी,ह्या प्रकृतीच्या घटकांशी समरस होणारे होते.

आज ह्या फ्लॅटबंद संस्कृतीत आपण खरेच इतक्या समाधानाने,इतक्या आपुलकीने, एकमेकांना समजून घेत,आपुलकीने, मुक्तपणे जगतो का?
आपण जगत आहोत अनेक भार सहन करत.बुद्धीवर भार आहे.मनावर भार आहे.शरीर सुद्धा एक भार बनलेले आहे.निसर्गाच्या खऱ्या खुऱ्या नृत्यापासून आपण खुप दूर चाललो आहोत.प्रकृतीशी आपला संपर्क तुटत चालला आहे.आपण विभक्त होतो आहोत.

तुटत आहोत.आणि ताणतणावांनी युक्त,प्रचंड स्पर्धा,रस्सीखेच, महत्वाकांक्षा या गर्तेत खोल अधिकाधिक बुडतच चाललो आहोत.असे एकीकडे भयाण चित्र दिसते.सिमेंट काँक्रीट च्या जंगलात ,आधुनिक जीवनशैली च्या नावाखाली आपण जगतो आहोत.पण हे जगणं जगणं आहे का?की नुसतंच भार वाहणंआहे.

आपल्या निसर्गविरोधी कृत्यांचे अनेक दुष्परिणाम मानवास भोगावे लागत आहेत, त्यातील कोरोना हे एक प्रातिनिधिक रूप आहे,इतरही कित्येक आजारांना माणूस अकाली बळी पडतो आहे.त्याचे कारण निसर्गापासून आपण आपल्याला तोडत चाललो आहोत.

आणि म्हणून मुक्त श्वास जो ह्या प्रकृतीने निसर्गाने मुक्तपणे बहाल केलाय तो अंगिकारून निसर्गाच्या सानिध्यात जेव्हा पुन्हा प्रवास सुरु होईल तेव्हा कित्येक व्याधींपासून आपण मुक्त होऊ शकू.

लेखक:सुभाष पवार
9767045327