Get it on Google Play
Download on the App Store

भाग २

त्यांचा हा प्रश्न ऐकून महादू गडबडला अन तत पप करू लागला, अन अचानक त्याच्या डोक्यात आयड्या सुचली. सावरत तो म्हणाला 'धुरपतीची तळेगावची मावशी लै आजारी हाय, तिला संगनमेरी आडमिट केलंय. तिलाच भेटाया जायचं हाय. धुरपीवर तिचा लय जीव हाय अन धुरपीने पण लय गळ घातल्या, ती एकटी तरी कशी जाणार?

हा मुद्दा मात्र शिरपत अण्णाला पटला अन 'बरुबर हाय, अशा वक्ताला जाया पाहिजे, या जाऊन' म्हणत त्यांनी गाडी पुढे काढली. महादू हणम्याजवळ गेला अन त्याला विचारलं कि तो उद्याच्याला मोकळा असल तर वस्तीवर दिसभर राहणार का?

हनमा म्हणाला 'व्हय तात्या, बिनघोर जावा, राहतो मी वस्तीवर अन जनावरांचं चारापाणीबी बघतो.' खुश होत महादू म्हणाला 'मंग उद्या सकाळ्च्याला लवकर ये, मला नवाची येष्टी पकडायची हाय.' महादू निघणार एवढ्यात हणम्यान शिरपत अण्णांचा अंदाज घेत हळूच महादुला म्हटलं 'तात्या, वाईच जरा दहा रुपये असतील तर देता का, उन्द्याच्या रोजातून कापून घ्या, जरा अडचण हाय' त्याची अडचण काय हाय हे महादूला चांगलं माहित व्हतं पण त्याला आनंदच एवढा झाला होता कि त्याने पटकन दहा रुपये काढून गपचूप हणम्याच्या हातावर ठेवले. पुन्हा अण्णांच्या डोळयांसमोर जायला नको म्हणून तो तसाच खालच्या बांधाने आपल्या वस्तीकडे आला. धुरपतीला ही आनंदाची बातमी सांगून तो नव्या जोमानं कामाला लागला.

...........उद्या संगमनेरला जायचं या कल्पनेनं दोघांनाही अगदी उधाण आलं होतं. त्याच आनंदात दोघंही सरासर काम उरकत होते. महादुला तर इतका आनंद झाला होता कि त्या नादात त्याने गिन्नी गवताचे एक ऐवजी दोन भारे कापून काढले. लक्षात आल्यावर स्वतःशीच खुदुखुदू हसला. दिवस मावळला. बाहेरची कामं उरकून दोघं घरात आली. धुरपती चुलीकडं वळली अन महादूनं कपाट उघडून उद्या कुठले कपडे घालायचे याची तपासणी सुरु केली. त्याची लगबग बघून धुरपती गालातल्या गालात हसत होती. तिलाही हुरहूर लागली होतीच. जेवून खाऊन सगळी आवराआवर करून दोघं झोपले पण दोघांनाही झोप काही येत नव्हती. या कुशीवरुन त्या कुशीवर असे करत बऱ्याच वेळाने त्यांचा डोळा लागला.

..........पहिला कोंबडा आरवला तसा महादू ताडकन जागा झाला. त्याने उशाशी ठेवलेला कंदील मोठा केला. आळोखे पिळोखे देत तो उठला अन कपाट उघडून आपले कपडे बाहेर काढले. त्या आवाजाने धुरपतीलाही जाग आली. बाहेरचा अंदाज घेत ती म्हणाली 'अहो धनी, अजून किती येळ हाय, कशाला उठलाईस एवढ्या लवकर? पण महादुने तिला काही उत्तर दिले नाही. तो चुलीजवळ गेला अन धुरपतीने रात्री राखेत पुरून ठेवलेले दोन-तीन पेटते कोळसे त्याने बाहेर काढले. काड्यापेटी वाया जाऊ नये म्हणून रात्रीचे धगधगते कोळसे राखेत पुरून ठेवायचे अन सकाळी त्यानेच चूल पेटवायची ही धुरपतीची सवय त्याला माहित होती. जराशी फुंकर घालताच ते कोळशे फुलले. त्याने एक पितळेचा पसरट बुडाचा तांब्या घेतला आणि त्यात ते पेटते कोळशे टाकले. त्यावर अजून दोन चार वाळके कोळसे टाकले अन फुंकणीने वारा घालत चांगले फुलवले. तांब्या खालून चांगलाच गरम झाल्यावर त्याने आपल्या अंथरुणावरच शर्ट पसरला अन तांब्याने त्याला इस्तरी करू लागला. त्याची ती आयड्या धुरपती कौतुकाने पाहत होती. उठता उठता त्याला टोमणा मारत म्हणाली 'अगदी ल्हान पोराच्या वर लगबग चाललीय' असं म्हणत ती आपल्या कामाला लागाली.

दिवस वर आला होता. पण हणम्याचा काही पत्ता नव्हता. किती वाजले असतील असं मनाशीच बोलत त्याने रेडीव लावला. त्यांच्याकडं घड्याळ नव्हतं. रेडिओच्या बातम्यांमधून किती वाजले कळत होतं. रेडिओ लावताच ओळखीचा आवाज आला 'प्रियम आकाशवाणी, संप्रती वार्ताह शुभयंता. प्रवाचिका मंगला कौठेकराहा'

'अगं धुर्पा, आठ वाजल्या, ह्या हणम्याचा अजून पत्त्या न्हाई' महादू काळजीने म्हणाला.

'ईल वं, अजून माझं पण आवरायचं हाय, येष्टी चा काय भरुसा, नवाला इति का दहाला' असं म्हणत तिने काम चालू ठेवलं. तेवढ्यात लांबून हणम्याला येताना पाहून महादूचा जीव भांड्यात पडला. तो धुरपतीला घाई करू लागला. बंडीच्या आतल्या कोपरीच्या खिशात हात घालून त्यानं कालच काढून ठेवलेले पैसे चाचपून बघितले. तोवर धुरपती तयार होऊन, हातात पिशवी घेऊन बाहेर आली. हणम्या जवळ आला. दोघांना अगदी नटून थटून तयार झालेला पाहून हसत हसत म्हणाला 'तात्या, म्हतारीला पाह्यला निघलाय का कोणाच्या लग्नाला?

'तू तुझं काम कर बघू गुमान, अन काही घोटाळा करू नको; असं हणम्याला दम देत महादूनं घराला कुलूप घातलं, दोनदा ओढून बघितलं अन 'आलोच जाऊन संध्याकाळपत्तुर' असं हणम्याला म्हणत सायकल बाहेर काढली. दोघं पायवाट संपून पान्धीला लागली तशी महादूनं सायकलवर टांग टाकली. धुर्पा कॅरेजवर बसली अन जोडी सुसाट गावाकडं सुटली.

 

गावात येताच महादुनं गडबडीने सायकल इठ्ठलच्या पान टपरीच्या मागं लावली, अन लक्ष ठेव रं' असं सांगितलं. स्टॅन्ड म्हणजे एक पत्र्याचं मोडकं शेड होतं. दोघं तिथे उभी राहिली. तेवढ्यात येष्टी आलीच अन खंडीभर धुराळा उडवत स्टॅण्डसमोर थांबली. एक बाई खाली उतरली अन महादू व धुर्पा गाडीत चढली. गाडीत काय लै गर्दी नव्हती. महादू अन धुर्पा पाठीमागेच बसली. गाडी सुटली तसा त्या प्रवासाचा आनंद दोघांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. कण्डक्टरनं तिकीट, तिकीट म्हणताच महादूनं खिशातून दहाची नोट काढून दिली. दोघांचे चार रुपये वीस पैसे घेऊन कंडक्टरनं बाकीचे पैसे परत दिले. महादुने ते पैसे अन तिकीट जपून आतल्या खिशात ठेवून दिलं. धुरपती लहान मुलीसारखी ती मागे मागे पळणारी झाडं बघून हरकून गेली होती. महादू तिला आजूबाजूची काहीबाही माहिती सांगत होता. त्यांच्या गप्पा ऐकून कण्डक्टरही गालातल्या गालात हसत होता. पण यांना त्याची फिकीर नव्हती.

अर्ध्या पाऊण तासानं गाडी संगमनेरच्या स्टॅण्डवर येऊन थांबली. दोघंही खाली उतरली. धुरपती बावरून अगदी महादूच्या जवळ जवळच राहत होती. महादुही बावरला होता पण बायकूसमोर लै माहिती असल्याचा आव आणत होता. गणपत टेलरनं सांगितल्याप्रमाणं डाव्या हाताच्या रस्त्यानं ते दोघं स्टँडच्या पाठीमागे आली. समोरच शेतकी संघाचं दुकान दिसलं. महादू चाचपडतच आत शिरला. त्याला इकडं तिकडं बघताने पाहून एका माणसाने काय पाहिजे म्हणून विचारलं. महादुने सांगितल्याप्रमाणे त्यानं दहा गुंठ्यासाठी एक पावशेरची तंबाट्याच्या बेण्याची पुडी दिली. पैसे देऊन दोघं बाहेर पडले. याअगोदर महादू दोन-चार वेळा संगमनेरला आलेला होता. त्यामुळं त्याला काही रस्ते माहित होते. पण नवीन झालेल्या बिल्डिंगीनमुळे चुकायला होत होतं. चालता चालता त्यांना खमंग जिलेबीचा वास आला. उजव्या हाताला 'जोशी हॉटेल' दिसत होतं. महादूनं धुर्पाचा हात हातात धरला अन तिला हॉटेलात नेलं. चार चौघात नवऱ्यानं असा हात धरल्याने धुरपती अगदी संकोचून गेली होती. आत येऊन बसताच पोऱ्याने टेबलावर फडका मारत 'बोलो साब, क्या मांगता है' म्हणून इचारलं. आपल्याला 'साब' म्हनल्याचं ऐकून खुश होत महादूनं वट्टात त्याला पावशेर जिलबी अन पावशेर फापडा आणायला सांगितलं. जोशींची जिलबी म्हणजे एकदम फेमस. गरमागरम जिलबी समोर येताच दोघांनी त्यावर ताव मारला. बावरलेली धुर्पा आता बरीच सावरली होती. जिलबी झाल्यावर महादूनं शेव चिवड्याची ऑर्डर दिली. 'अहो, बस झाला कि आता' असं धुर्पा म्हणाली खरं पण शेव चिवडा समोर येताच तिचा नकार गळून पडला. महादुला अजूनही मिठ्ठा वडा घ्यायचा होता पण बायकोने डोळे वटारल्यावर मात्र बिल देऊन बाहेर पडला. 'किती पैसं झालं वो? धुरपतीने उत्सुकतेनं इचारलं.

'ते नको इचारू, तुला काही घ्यायचं असल तर तेवढं फकस्त सांग' असं म्हणत महादू हसला.

'आज लईच बायकूवर पिरेम उफाळून आलंय' असं म्हणून एक लटका मुरका मारत धुरपती पुढं चालू लागली. महादुही चालू लागला. काहीवेळाने समोरून येणाऱ्या एका माणसाला थांबवत महादू म्हणाला 'दादा, शिनेमा थेटर कुठं हाय हो? त्या माणसाने महादू आणि धुरपतीकडे निरखून पाहिलं, चागंली खानदानी शेतकरी जोडी दिसतेय म्हटल्यावर त्याने व्यवस्थित सांगितले. 'असं करा पाव्हणं, ह्या रस्त्याने सरळ जात राव्हा, समोर एक मोठा आडवा रस्ता येईल, तिथून डावीकडे वळलं कि 'राजेंद्रच' कपड्याचे दुकान दिसेल. त्याच्या थोडं पुढे गेलात कि 'राजस्थान' थेटर दिसेल' पुढे कोणाला अजून विचारा' असं सांगून तो माणूस पुढे गेला अन दोघं त्याने सांगितलेल्या रस्त्याने चालू लागले.

'म्हंजी खरंच आपुन शनिमा बघणार हाय व्हय? धुरपतीने पदर तोंडावर घेत कौतुकाने इचारलं.

'मग, तुला काय वाटलं, आपुन काय उगाच गमजा करत नसतु' छाती फुगवत महादू म्हणाला अन ऐटीत चालू लागला. काहीवेळाने मोठा आडवा रस्ता आला. तिथून ते डाव्या हाताला वळले. राजेंद्र स्टोअर्स ची तीन मजली इमारत दिसली. अजून एकाला इचारत ते दोघं बरोबर राजस्थान थिएटरला पोहोचले. धर्मेंद्र-रेखाच्या 'किस्मत' या सिनेमाचे भव्य पोस्टर लागले होते. एवढं मोठं चित्र धुरपतीने पहिल्यांदा पाहिलं असल. महादू दोन-तीन वर्षांपूर्वी इथं एकदा आला होता. तिकीट बिकीट कुठं काढायचं ते त्याला माहित होतं. त्याने दोन बाल्कनीचे तिकीट काढले. बाल्कनीत काय फार गर्दी नव्हती. बॅटरीवाल्याने त्यांना त्यांचे शीट दाखवले. त्यांना जागाही पार मागची मिळाली होती. थोड्याच वेळात सिनेमा सुरु झाला. धुरपती आश्चर्याने बघत होती. पडद्यावर धर्मेंद्र रेखाचं 'राफ्ता राफ्ता देखो आँख मेरी लडी है' हे गाणं बघत दोघंही आनंदाने डोलत होते. गाण्याच्या शेवटी धर्मेंद्रने 'अगं ये जवळ ये लाजू नको' असं म्हणताच रंगात येत महादुने धुरपतीच्या खांद्यावर हात टाकून तिला जवळ ओढले. तशी धुरपती एकदम दचकली अन दूर सरकली. लग्नाला एवढी वर्षे उलटली तरी चार भिंतीच्या बाहेर आपल्या नवऱ्याने आपल्याला स्पर्श कधी केला नव्हता. आज मात्र महादू लैच रंगात आला होता. थोड्यायेळाणे इकडंतिकडं बघत धुरपतीच जरा जवळ सरकली आणि आपल्या धन्याच्या खांद्यावर मान टाकून सिनेमा बघू लागली. तेवढ्यात 'टर्रर्रर्र ' आवाज करत बेल वाजली. अन दचकून दोघं लांब झाली. इंटरव्हल झाला होता. बाहेरून खमंग तळलेल्या पदार्थांचा वास येत होता. महादू बाहेर आला अन त्या गर्दीत घुसून त्याने चार पाववडे बांधून घेतले. आत येऊन दोघंही ते खाऊ लागले. हा पाव वडा दोघांनीही पाहिल्यान्दाच खाल्ला होता. जाम भारी लागत होता. सिनेमा पुढे सुरु झाला. धर्मेंद्रची फायटिंग बघून दोघंही आनंदाने दाद देत होते. तासाभराने सिनेमा संपला. दोघेही हा अनोखा आनंद मनाशी साठवत बाहेर आले. परत येताने महादुला 'राजेंद्र' कापड दुकान दिसलं. महादुने धुरपतीला बळेबळे ओढतच दुकानात नेलं. धुरपतीला आज सगळंच आक्रीत बघायला मिळत होतं. महादूच्या सांगण्यावरून दुकानदारानं ढीगभर नऊवारी साड्या तिच्यासमोर टाकल्या. त्या पाहून तर ती अजूनच गोंधळून गेली. महादू तिला 'घे घे' म्हणत आग्रह करत होता. कोणची घ्यावी हे काही तिला कळत नव्हतं. सगळ्याच साड्या चांगल्या वाटत होत्या. तिची अडचण पाहून काउंटरमागची एक बाई पुढं झाली अन तिने एक एक साडी दाखवत धुरपतीला शोभेल अशी मस्त मोरपंखी नऊवारी साडी शोधून दिली. ती अंगावर टाकत भल्या मोठ्या आरशात स्वतःला बघून धुरपती मोहोरून गेली. तिने ती साडी पसंत आहे म्हणून सांगितलं. मग तिनेच महादुलाही आग्रह करून त्यालाही स्वतःला कपडे घ्यायला राजी केलं. महादुने स्वतःसाठी मस्त टेरिकॉटचा शर्ट, एक मफलर अन पांढरीफेक मसराई धोतर जोडी निवडली. महादुला आज पैशाची चिंताच वाटत नव्हती. त्यांना जो आनंद मिळत होता त्याच्यापुढं पैशाला काही किंमतच नव्हती.

हातात छापील रंगीत चकचकीत पिशव्या घेत दोघं बाहेर पडली. धुरपतीने घरून आणलेली विणलेली कापडी पिशवीही त्या प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकली. रस्त्यात दोघांनी अजूनही काहीबाही खरेदी केलं होतं ते सगळे सांभाळत दोघं स्टॅंडकडं निघाले होते. तेवढ्यात महादुला स्टँडच्या अलीकडे 'स्वल्प-विराम' हॉटेल दिसले. ते बघून महादूची भूक चाळवली. धुरपती नको नको म्हणत असताने त्याने तिला हाटेलात नेलं. ऑर्डर देताच गरम गरम मिसळ समोर आली. त्या झणझणीत मिसळीबरोबर महादूनं मलाई बर्फीची पण ऑर्डर दिली. इथली बर्फी लैच भारी होती. पोट भरल्यावर वरून दोघांनी एक एक मस्त पेशल चहा मारला अन बिल देऊन बाहेर पडले. आता मात्र धुरपतीला आपल्या घराची, जनावरांची ओढ लागली होती. महादूच्या मनात अजून कुठं कुठं फिरायचं होतं.

'आवो, आता बास झाली ही जीवाची म्हमई. आपुन आता लगीच घराकडं जाऊया' असं धुरपती काकुळतीने म्हणाली. मग महादुनही आपला मोर्चा स्टॅंडकडं वळिवला. त्यांच्या नशिबानं पाचची 'समशेरपूर' एसटी उभीच होती. दोघं गाडीत बसली अन लगेच एसटी सुटली. येतानाचा उत्साह आता बराच कमी झाला होता. दिवसभराच्या दगदगीने अन खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्याने धुरपतीचा डोळा कधी लागला तिचं तिलाच कळलं नाही. थोड्याच वेळात आपल्या नवऱ्याच्या खांद्यावर मान टाकून ती समाधानाने गाढ झोपी गेली होती. महादूनं एकदा प्रेमाने आपल्या खांद्यावर मान टाकून झोपलेल्या धुरपतीकडं पाहिलं. त्याला खूप समाधान वाटलं आज इतकी वर्ष झाली लग्नाला, दोन पोरंही झाली, पोरगी लग्न करून पिपळगावला अन पोरगा नौकरीला म्हणून पुण्यालाही गेला. पण आजपात्तुर आपण कधी एवढ्या आनंदात आपल्या साठी अन आपल्या धुर्पा साठी जगलो नाही. त्याने मनोमन आपल्या दोस्ताला गणपत टेलरला धन्यवाद दिले. टेलरनं ही आयड्या आपल्याला सांगितली अन म्ह्णूनच आज आपल्याला ही 'जीवाची मंबई' करता आली. तो खिडकीतून बाहेर बघत होता. गाडीच्या वेगाबरोबर त्याचे विचारही पळत होते, अन त्या विचारातच त्याचाही डोळा लागून गेला. अन तोही धुरपतीच्या डोक्याला डोकं लावून झोपी गेला. .............

अनिल दातीर. सातारा.
(९४२०४८७४१०)

जीवाची मुंबई

अनिल दातीर
Chapters
भाग १ भाग २