शेवटचे स्टेशन कुडाळ !!
जगप्रसिद्ध चित्रकार वॅन गॉगला शहरी जीवन मानवलं नाही. शेवटी तो एका शांत, निसर्गसंपन्न जागेत राहायला गेला. तिथे त्याने आयुष्याची शेवटची वर्षे काढली आणि त्यावेळी त्याने जी मोजकी चित्र चितारली ती जगभर गाजली. इतकी किंमत आली की त्या चित्रांचे स्मगलिंगही झाले.
बुद्ध बोधीवृक्षाखाली बसला असताना त्याला आत्मसाक्षात्कार झाला. श्रीकृष्ण अनेकांमध्ये राहिला, अनेक लढाया लढला. शेवटी तो एका वृक्षाखाली बासरी वाजवत बसला असताना एका शिकाऱ्याचा चुकून बाण लागला आणि त्याचा शेवट झाला. एकूणच, अनेकांना शेवटी निसर्गाकडे जावे लागते. कविवर्य बा.भ. बोरकर ह्यांनी त्याहीपुढे जाऊन असे म्हटले होते की माझ्या मृत्यूनंतर माझा देह समुद्रात फेकून द्या. म्हणजे तिथल्या जीवांच्या अन्नाची सोय होईल.
प्रसिद्ध लेखक व्यंकटेश माडगूळकर ह्यांनीही असे लिहिले आहे की मी शेवटी एका झाडाखाली राहीन. एक दुर्बीण, चित्र रेखाटायला एक वही हेच माझं सामान असेल. आसपास जे पिकेल ते खाईन. जमलं तर लमाणांच्या मागे फिरत राहीन.
शहर सोडून गावाकडे जावे असे विचार माझ्याही मनात येतात. प्रत्यक्ष गेलो नाही तरी असे विचार आले तरी खूप छान वाटतं.
कुडाळ हे आता माझं गाव बनलं आहे. कुडाळपासून साधारण १० किलो मीटरवर तुळसुली गाव आहे तिथे माझ्या पत्नीच्या हिश्शात आलेल्या जागेत आम्ही घर बांधलं आहे. कोकणातील गावांमध्ये एकाच आडनावाची माणसे दिसतात. त्यामुळे आमच्या तुळसुलीत सगळे वारंग आहेत.
गावातल्या घराचं बांधकाम होताना मला पाहता आलं आणि कोकणातील माणसे, त्यांचे अपार कष्ट ह्याचे दर्शन झालं. कोकणातील घरे जांभ्याची असतात. लाल मातीपासून दगड घडवले जातात. जांभ्याचे बांधकाम अनेक पिढ्या टिकते. बांधकाम करायला मजूर यायचे तेव्हा त्यांना सकाळी पेज आणि एखादी भाजी किंवा माशाची तुकडी देत असू. कष्टाळू कोकणी माणसाची ही न्याहारी असते. पौष्टिक आणि हलका नाश्ता केल्यानंतर त्यांचे हात भराभर चालतात. घराच्या चार भिंती बांधून झाल्यावर दरवाजाची चौकट उभी केली तेव्हा घराला नारळ वाहिला, नंतर पाष्टीची पूजा घातली. भरभरून देणाऱ्या देवाचे आभार मानण्याच्या अनेक प्रथा गावात आहेत.
माझं घर चारही बाजुंनी झाडांनी वेढलं गेलं आहे. एका बाजूला आंब्याचं झाड आहे आणि समोर मोठा फणस उभा आहे. ह्या फणसाच्या बुंध्यापासून वरपर्यंत फणस लागलेले असतात. ह्या झाडांवर नवरंग, चातक, तिबोटी खंड्या, पावशा असे पक्षी येतात. ह्या पक्षांचं निरीक्षण करत बसलो की स्वतःचा विसर पडतो. हे पक्षी जे दाणे मिळतील ते टिपतात. उद्यासाठी चार दाणे राखून ठेवू असे ते करत नाहीत. पशु पक्षी आणि माणूस ह्यांमधे हा मोठा फरक आहे. पशु पक्षी काहीही साठवून ठेवत नाहीत आणि माणूस आयुष्यभर साठवत राहतो. कशासाठी, तर सुख समाधान मिळावं म्हणून. ह्या सुख समाधानापोटी अनेकांनी गाव सोडलं आणि शहरात जाऊन जास्तीत जास्त साठवणूक करण्याचा सपाटा लावला. घरे, गाड्या, इमारती, रस्ते, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू अशी प्रचंड निर्मिती होत राहिली. पण सुख समाधान काही हाती आलं नाही. शेवटी आपला गावच बरा अशी म्हणण्याची वेळ आली. म्हणून शहरात गेलेला कोकणी माणूस वेळ मिळेल तेव्हा गावाकडे येतो. पूर्वजांनी लावलेले आंबे, फणस, काजू, कोकम त्याला खुणावत असतात. जांभ्याची घरे, कौलारू मंदिरे, सागरी किनारे अशी निसर्गसंपन्न कोकणभूमी मनाला एकाचवेळी आनंद देते आणि शांतताही!!
म्हणून म्हणतात - कोकणात जन्म घेऊक नशीब लागता. कोकणात जन्म घेण्याइतका मी नशीबवान नसलो तरी तिथे जाऊन राहता येईल इतके भाग्य माझ्या वाट्याला आले आहे.
बरेच मुंबईकर रात्रीचा प्रवास करून कोकणतात पोहोचतात. " फाटे इलो काय" ह्या शब्दाने तिकडची मालवणी मंडळी स्वागत करतात. आपल्याला जरी मालवणी बोलता येत नसेल तरी कानाला ऐकताना खूप गोड वाटते. 'आवशीचो घो' हा शब्द तिथे फुल स्टॉपसारखा वापरतात. वाक्याच्या मागे पुढे तो येतोच. आणि शिव्या हा तर मालवणी भाषेचा अलंकार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणी माणसाने बोलता बोलता शिवी दिली नाही तर तो खूप वर्षे शहरात राहिल्यामुळे बिघडला असे मानले जाते. पण देवाक गाऱ्हाणं घालतात तेव्हा ही मालवणी भाषा फार रसाळ बनते.
आमच्या गावात गोठणाईदेवीचं मंदिर आहे. शहरातून गावात आलेल्या माणसाने इथे गार्हाणे घालावे अशी प्रथा आहे. गावाचा गुरव देवापुढे आपल्याला नेतो आणि स्पष्ट शब्दात
" हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा शहराच्या देवा महाराजा..........असे उच्चारतो,
त्याच्यामागे आपण फक्त "होय महाराजा" असं म्हणायचं.
आपल्या मागण्या काही मागण्या असतील तर त्या गुरावाला सांगायच्या, मग तो देवाला सांगतो.
" कोणाक पोर होत नसात तर त्याक पोर होऊ दे, काम धंद्यात सर्वानका यश दे, पोरा टोराक शिक्षणात यश दे, कोणाचा लग्न जुळत नसात तर ता तुझ्या क्रुपेन जमानदे रे महाराजा.."
असे ते गार्हाणे असते.
मला नेहमी असे वाटते की देवाने इतके सुंदर कोकण दिले त्यामुळे आणखी मागणी काही करू नये. आता गावाला जाईन तेव्हा हे कोकण असेच राहू दे हीच मागणी करेन. गुरव ती मागणी देवाला सांगेल आणि देवच स्वतः म्हणेल, ' होय महाराजा'
आमच्या गावाला एक वेस आहे, तिथे वेशीकराचं मंदिर आहे. ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं की वेशिकराला ट्यूब, बल्ब असे दिवे चालत नाहीत. गावकर्यांनी मंदिरात दिव्याची सोय केली, पण दरवेळी काहीनाकाही अडचण येऊन दिवे पेटले नाहीत. मंदिराच्या भिंतीवर वायर फिरवली होती ती तशीच आहे. पण ह्या वायरने कधीच दिवा पेटला नाही. एकाअर्थी हे बरेच झाले. रात्री पाय मोकळे करायला आम्ही गेलो की तिथे फक्त चंद्राचा प्रकाश असतो. आसपास असलेल्या काजू-नारळाच्या झाडांच्या आकृत्या दिसतात. त्यांवर काजवे चमकत असतात आणि सगळीकडे शांतात पसरली असते. नाहीतरी दिवस मावळल्यावर आपल्याला शांतताच हवी असते ना.
आमच्या घराच्या वरच्या मजल्यावर गॅलरी आहे. इथून कुठेही नजर टाकली की झाडे दिसतात. समोर बांबू दिसतो. हे बांबू दोनदा तोडून झाले तरी पुन्हा उगवले
पावसाळा असेल तर गॅलरीच्या छपरावरून येणारे पाणी खाली पडते आणि असे वाटते की पाण्याचा एक पडदा समोर लावला आहे. श्रावणात इथला निसर्ग फारच खुलतो. पावसाच्या सरी येऊन गेल्यावर ऊन पडते आणि फुले, पाने, वेली चमकू लागतात. पक्षी घरटी सोडून बाहेर येतात आणि त्यांची मंद किलबिलाट ऐकू येते. हे वर्णन मी एका लेखात लिहिले होते, ते वाचून एका pychologist ने सुचवले की गॅलरीत एकदा योगासने करून पहा, शवासन करून झाल्यावर आसपासच्या सृष्टीकडे पहा. त्यावेळी जो अनुभव येईल तो शब्दात मांडता येणार नाही इतका अनोखा असेल.
गावात एक डांबरी रस्ता आहे. दिवसातून दोनदा इथून कुडाळमध्ये बस जातात. बस तितकीच रहदारी. इतरवेळेला रस्त्यावर फार कोणी नसतं. दुतर्फा काजू, रातांबे लागलेले आहेत. हिरव्यागार वनराईतून गेलेल्या रस्त्यावरून चालत जाण्याचा आनंदच काही और असतो. चालताना पेव नावाचे गावत उगवलेले दिसते. हे गवत भराभर वाढत जाते. " पेव फुटले" ही म्हण ह्या गवतावरून तयार झाली असावी. ह्या रस्त्यावर एखादा गावकरी भेटला तर त्याच्या तोंडून मालवणी मिश्रित मराठीत गावाकडच्या सुरस गोष्टी ऐकता येतात. भांगसाळ नदीत मगर आली होती, तिने गाय खाल्ली. मग वनविभागवाले आले आणि मगरीला कसे पकडले ही कथा ऐकायला मिळते.
एकदा गावातला एक मुलगा मासेमारी करायला संध्याकाळी मालवणच्या बोटीवर गेला आणि दारू प्यायल्यामुळे समुद्रात पडला. रात्री कुणालाच कळलं नाही. समुद्रात पडताच मुलाची नाश उडाली आणि तो सकाळपर्यंत हातपाय मारत राहिला. सुदैवाने, दुसऱ्या बोटीतील मच्छिमारांनी त्याला पाहिलं, बोटीवर घेतलं आणि तो वाचला. तो मुलगा लगेच रेड्डीला गेला आणि मृत्यूच्या दाढेतून परत आणलं असं म्हणून गणपतीचे आभार मानले आणि पुन्हा कधीही दारू पिणार नाही असे वचन दिले. कोकणी माणूस अशा गप्पांमध्ये रमतो आणि आपल्यालाही रमवतो. कुठे कोरोना पसरला, शेअर बाजारात काय झाले, माझे वजन किती, शुगर आहे की नाही ह्याचे टेन्शन घेऊन आपण फिरत असतो, कोकणी माणूस उगीच टेन्शन घेऊन फिरत नाही.
आम्हाला किराणा सामान घ्यायला कुडाळमध्ये जावे लागते. कोणत्याही ठिकाणी गेल्यावर मी तिथला बाजार आवडीने पाहतो. त्या बाजारात संपूर्ण परिसर कसा आहे त्याचा अंदाज येतो. आसपासची सगळी माणसे तिथे जमतात. तिथे जे पिकतं ते विकायला आलेलं असतं. उन्हाळ्यात कुडाळच्या बाजारात गेल्यावर अनेक प्रकारचे हापूस आंबे मिळतात. आगळ, जाम, भाजीचे फणस, कुळीद घेता येतात. कुडाळजवळ पिंगुळी गाव आहे. तिथे आदिवासींनी विकसित केलेली चित्रशैलीची दखल जगभरातील चित्रकला जाणकारांनी घेतली आहे. तसेच राऊळ महाराजांचा मठही प्रसिद्ध आहे.
कुडाळपासून सावंतवाडी, निवती, भोगवे, मालवण, देवबाग, तारकर्ली, वेंगुर्ला ही ठिकाणे जवळ आहेत. गेल्या वर्षी तारकर्लीला स्कुबा डायविंग केले होते. डायविंग शिकवणाऱ्यानी सिंधुदुग किल्ल्यामागे नेले आणि सागराच्या तळाशी उतरवले. पाण्याखाली अनेक रंगीबेरंगी मासे आसपास फिरत होते. शेवाळ आणि इतर सागरी वनस्पती पाहिल्या.किनाऱ्यावर आल्यानंतर सुरमई आणि सोलकढीचा स्वाद घेतला होता.
एकदा सायंकाळी मालवणच्या किनाऱ्यावर होतो. समोर समुद्रात सिंधुदुर्ग किल्ला दिसत होता. सूर्य अस्ताला निघाला असल्यामुळे निळाशार समुद्र लालसर बनला होता. तितक्यात किनाऱ्यावर एक बाई माशाची पाटी घेऊन आली. थोड्या वेळात आणखी मासे विक्रेते आले. हा हा म्हणता बाजार भरला. पापलेट, बांगडा, सुरमई, हलवा, कोळंबी, रावस, जिताडा ह्यांचे ढीग लागले आणि मला कळले की तिथे सायंकाळी माशांचा लिलाव होतो. बाहेरून व्यापारी येतात आणि मोठ्या प्रमाणावर मासे घेऊन जातात. ज्यांना थोड्या प्रमाणात मासे न्यायाचे असतील त्यांना ते थर्माकोलच्या खोक्यात बर्फ टाकून पॅक करून देणारेही असतात. ज्यामुळे दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत मासे मुंबई, कोल्हापूर किंवा पुण्यात नेता येतात. इथे येणारे पर्यटक पुन्हा शहराकडे जायला निघतात तेव्हा त्यांचा पाय निघत नाही. इथेच कायमचे राहावे असे त्यांना वाटते. दरवेळा कुडाळला गेलो की मलाही असेच वाटते.
आपण लोकल ट्रेनने प्रवास करतो तेव्हा अनेक स्टेशनांची अनाऊंसमेन्ट ऐकू येते आणि शेवटी आपले स्टेशन येते. अनेक स्टेशन्स पालथे घातल्यावर आपले मुक्कामी स्टेशन येते. इथे विसावा असतो.
कल्याण सोडून असा विसावा कुडाळमध्ये घ्यावा असे मला वारंवार वाटत आहे.
- निरेन आपटे
ऑनलाईन पुस्तक: अमृताशी पैजा
https://www.facebook.com/niren.apte