पुढील माहिती गुगल साभार..
देवांच्या सेवेसाठी सोडलेली देवदासी परिस्थितीच्या भोवर्यात सापडून जेव्हा भोगदासी बनते तेव्हा समाजानं लादलेलं तिच शापित जीवन तिला कळतं. स्वतःचं पोट भरण्यासाठी देहाचा बाजार मांडल्याशिवाय तिला दुसरा पर्याय उरत नाही. या प्रथेस धार्मिक आणि सामाजिक मान्यता दिलेली असल्याने या प्रथेत विकृती शिरल्याचे दिसते. अनेक कायदे करूनही ही प्रथा संपलेली नाही. बहुसंख्य देवदासींना या प्रथेतून मुक्त होण्याची तीव्र इच्छा आहे. आपल्यावर आलेला प्रसंग आपल्या मुलां-मुलींवर येऊ नये यासाठी त्यांची धडपड चाललेली आहे. मात्र त्यांच्या जागृतीच्या प्रमाणात उपाययोजनांचा अभाव कटाक्षाने आढळतो. म्हणूनच देवदासी प्रथा निर्मूलनाच्या व पुनर्वसनाच्या बाबतीत राष्ट्रीय स्वरुपाच्या कायद्याची गरज आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून मनावरील अंधश्रद्धेच्या दबावाखालील सामाजरचनेत वावरणाऱ्या देवदासी व जोगता हे घटक आजही उपेक्षित आहेत. अशा घटकांना या अनिष्ट रूढी-परंपरेतून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना सन्मानाने जगू देण्यासाठी ४५ वर्षांपासून सुरू असलेल्या चळवळीद्वारे देवाला मुलगी किंवा मुलगा सोडण्याची प्रथा बंद झाली आहे; मात्र त्यांच्या पुनर्वसनाच्यादृष्टीने शासनाने त्यांना अजून वाऱ्यावरच सोडले आहे. गळ्यात कवड्यांच्या माळा, भंडाऱ्याने माखलेलं कपाळ आणि मस्तकावर देवीची मूर्ती घेऊन वावरणाऱ्या या घटकाच्या भाळी जगण्यासाठीचा संघर्ष आजही पाचवीला पुजलेला आहे.