!! मैत्री !!
मैत्री नको चंद्रासारखी
दिवसा साथ न देणारी
नको सावल्यासारखी
कायम पाठलाग करणारी
मैत्री हवी अश्रू सारखी
सुख दुःखात साथ देणारी
प्रत्येक व्यक्तीला सर्वात जवळचा असा कोणी वाटत असेल तो म्हणजे मित्र. मित्रा शिवाय मनातल्या भाव-भावनांना दुसरं कोणी समजून घेईल का ?
आपल्याला मित्र असावा असं वाटणं स्वाभाविक आहे.पण मैत्री करताना पहिल्यांदा स्वत:हा चा मित्र व्हावं लागतं. कुण्या अनोळखी व्यक्तीशी मैत्री जुळवण्यासाठी गरज असते ती स्वत:हा वर विश्वास ठेवण्याची,जाती-पाती बंधने झुगारण्याची,संशयाचे काळे पडदे बाजूला सारण्याची,विशाल हृदय,सवेदनशील मन जपण्याची, दुसऱ्याला व्यवस्थितपणे समजून घेण्याची.मैत्री म्हणजे एक विसावा,मैत्री म्हणजे एक सहारा आयुष्य रुपी खोल सागराचा,मैत्री म्हणजे एक हिरवागार किनारा.
मैत्री व्हायला वेळ लागत नाही, पण खरा मित्र व्हायला वेळ लागतो!!! खरंच मैत्री कधी कोणाशी कशी होईल काही सांगता येत नाही.शाळेत गेल्यावर आपल्याला पहिल्यांदाच बाहेरच्या जगाशी ओळख होते.मैत्री ची सुरूवात ही शाळेपासूनच होते.एकाच बाकावर बसून एकमेकांना मदत करत, खेळताना रागवत,आपण सुरुवात करतो ती मैत्री ला.
मैत्री मध्ये एकमेकांबद्दल मनापासुन काळजी असते,प्रेम वाटायला पाहिजे.ती भावना मनात रुजायला हवी तरच मैत्री चिरकाल टिकते.आपले नातेवाईक जन्मतःच मिळालेले असतात पण आपले मित्र-मैत्रिणी तरी आपण निवडू शकतो ही देवाची कृपाच म्हणावी लागेल अनेक वेळा रक्ताच्या नात्यापेक्षा स्नेहाचे नाते अधिक जवळचे होऊन जाते.
सखी,बहीण व भाऊ आपल्याला समजून नाही घेऊ शकत पण एखादा जिवाभावाचा मित्र आपले मन अधिक ओळखतात त्याच्याशी आपण मोकळे हितगुज करू शकतो पण अशी मैत्री जीवापाड जपावी लागते.
आजच्या काळात फोन,मोबाईल, इंटरनेट यामुळे जग जवळ आले असले तरी माणसे एकमेकांपासून दूर जाऊ लागले आहेत. अनेक जण पुस्तकांसोबत ही मैत्री करतात तर काही जण निसर्गाला आपला मित्र मानतात तर काहीजण मुक्या प्राण्यांमध्ये आपले मित्र शोधतात.कधी कधी अशी मैत्रीही आपल्याला निर्मळ आनंद देतात.आपल्या मैत्रीमुळे आपण कोणाला आनंद देऊ शकलो नाही तर दुःख ही देऊ नये .मैत्री ही दोन्ही बाजूने परिपूर्ण हवी. मैत्री मध्ये रुसवे,फुगवे, भांडण- तंटा,मान,आदर,सगळं कसं भरभरून असायला हवं.
मैत्री खास लोकांबरोबर होत नाही तर ज्यांच्या बरोबर होते ते खास होतात.......
श्री.गोसावी अतुल.
फोन नंबर:- ८९७५९०२०११.