लॉकडाऊन , मी आणि माझं मनस्वास्थ्य
देश लॉकडाऊन हा शब्द आयुष्यात कधीच ऐकला नव्हता . आणीबाणी ऐकली . थोडीफार अनुभवली. पण लोकांच्या तीव्र विरोधामुळे, टीकेमुळे ती लवकरच उठली . पण आता जे घडलं ते सगळंच अघटित ! आयुष्यात दोन मोठे महापूर पहिले. लोकांचे हाल झाले. अनेक जण एकमेकांच्या मदतीला धावले व यातून सगळेच पुन्हा सावरले, उभे राहिले . आता आलेले संकट हे जागतिक आहे.
मी कागवाड सारख्या लहान गावात राहते. येथील जीवन सुरक्षित . पण मार्च १०-१२ तारखेला covid १९ या व्हायरस ची बातमी वाचली. लहान असलेली बातमी बघता बघता प्रचंड मोठी बातमी झाली. जवळ जवळ सर्व युरोपीय देश या महामारीत सापडले. सगळे नीट समजायच्या आत परदेशात लोक पटापटा मरायला लागले.
व्हाट्स अँप वर कोरोना शिवाय दुसरा मेसेज नसायचा. काळजी कशी घ्यायची, काय खायचे,काय प्यायचे, एक ना दोन. मन गोंधळूनच जाणार ना?
मी रोज न चुकता सहा वाजता फिरायला जाते. लॉकडाऊन जाहिर झाले आणि माझे बाहेर फिरणे बंद झाले. वृद्ध माणसांनी अधिक काळजी घ्यायला हवी हा सर्वांचा संदेश, मी पण विचार केला की आपणच आपली काळजी घेणं आवश्यक आहे. दुसऱ्याला आपल्यापासून उपद्रव नसावा. म्हणून मग मी नेहमीच्याच वेळी पण अंगणात फिरायला सुरुवात केली. बाहेर फिरायला जाणे हे जेवढे उत्साहवर्धक असते तसे अंगणातले फिरणे नाही, दुधाची तहान ताकावर भागवायची! आई-वडिलांच्या संस्कारामुळे मी तशी धीट स्वभावाची झाली आहे. घरात कुणीही आजारी पडले तर न घाबरता त्यांच्या बरे होण्याकडे अनेक तऱ्हेने प्रयत्न करते.
आता व्हायरसमुळे मोकळेपणा हा शब्दच संपला . कॉलनीत माझ्या मैत्रिणी आहेत पण लॉकडाऊन मुळे आमचे एकमेकींकडे जाणे बंदच झाले. फोनवर मनमोकळ्या गप्पा होत नाहीत. वयातल्या अंतरामुळे घरातल्यांशी फारसे बोलणे होत नाही त्यामुळे नाही म्हटले तरी थोडा एकलकोंडेपणा आलाच. पण एवढं मात्र खरं की, मी अध्यात्म वाचलेलं असल्यामुळे माझी मनःस्थिती मी बिघडू दिली नाही. माणसाच्या जीवनाला अध्यात्माची बैठक असली म्हणजे त्याचे मन भयभीत होत नाही. ते संकटाशी मुकाबला निश्चितच करू शकते. सुरक्षित अंतर, स्वछता , मास्क वापराणे, योग्य आहार यामुळे या व्हायरस ला आपण सगळेच दोन हात दूर ठेवू शकतो ही खात्री आहे.
मी करीत असलेले सामाजिक काम लॉकडाऊनमुळे बंद पडले. मतिमंद मुलांकडून शाळेत ज्या कलावस्तू बनवून घेतल्या जातात त्या विक्रीच्या माध्यमातून समाजापुढे आणते. हेतू हा की, या मुलांना थोडेफार अर्थार्जन व्हावे. या कामामुळे मला मानसिक समाधान मिळत होते. ज्या शरीरातीलं मन आनंदी, समाधानी असतं ते शरीर निरोगी राहतं. म्हणून मी दुसरेच एक काम निवडले. दोन विद्यार्थ्यांच्या कडून मी ऑनलाईन गीता अध्याय पाठ करून घेते आहे. यामध्ये माझा एक तास छान जातो. श्री वामनराव पै म्हणतात तसे आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. या गोष्टीची मनाशी पक्की खूणगाठ असल्यामुळे टीव्हीवरील बातम्यांमुळे मी फारशी सैरभैर होत नाही. बातम्या ऐकताना थोडी मनाची चलबिचल होते पण पुन्हा मन स्थिरावते .
अस्वस्थता यावी अशी नुकतीच एक घटना कागवाडला घडली. ३ मार्च ला अजमेर ला गेलेले काही मुस्लिम बांधव लॉकडाऊनमुळे अडकून पडले. त्यातील ३० लोक कर्नाटकातील. नुकतीच ही मंडळी परतली आहेत. त्यांना निपाणी जवळ क्वारंटाईन केले आहे. त्यातील ४ जण कागवाडचे असून ते पॉझिटीव्ह आहेत. त्यांचे आई-वडील कागवाडला असतात. ते आपल्या मुलगा-सून आणि नातवंडांना भेटायला गेले. वावड्या उठल्या की आई वडिलांनी जेवणाचा डबा नेला होता व सर्वजण तेथे एकत्र जेवले. तिकडून परत आल्यावर येथे तीन चार ठिकाणी ते आई वडील सामान घेण्याच्या निमित्तानी फिरले. ही बातमी समजल्यावर आता आई-वडिलांना क्वारंटाईन केले आहे. पण त्यांना कोरोन झाला आहे की नाही हे लक्षणे दिसल्यावरच कळणार. तेव्हा सत्य काय असत्य काय हे ते त्या परमेश्वरालाच माहीत!
हे सर्व घडत असताना या स्पर्धेची जाहिरात व्हाट्सअँप वर वाचली. मी लिहायला लागले. कॉलेज मध्ये शिकणारा माझा नातू म्हणाला आजी, तू या वयात शाळा-कॉलेज मधील मुलांप्रमाणे स्पर्धेत कशी काय भाग घेतेस गं? मी नुसती हसले व मनात म्हटले, मन आनंदी ठेवण्याचा हा एक उपाय आहे.