कोकणातील रहस्यकथा
कोकण आणि कोकणातली भुते ही खूपच फेमस. मला आठवतंय, जेव्हा पण मी सुट्टीत मामाच्या गावाला जायची. आम्ही सगळी भावंडं रातभर बसून एकमेकांना भुतांच्या गोष्टी सांगत असु. प्रत्येक जण त्यांनी ऐकलेले, त्यांनी वाचलेले आणि काहींनी अनुभवलेले ही प्रसंग सांगत असायचे. आम्ही घरातल्या खळ्यात बसून हा कार्यक्रम करत असू. त्यातच आमच्या गोष्टी ऐकुन आजोबा, आजी, तसेच शेजारच्या घरातलं कोणी त्यावेळेला तिथे बसलेलं असेल तर तो व्यक्तीही त्याचे अनुभव सांगत असे. मग गोष्टी खूपच रंगायच्या आणि ऐकताना अजून मजा यायची.
असच एक दिवस आजीने आम्हाला सांगितलेली एक गोष्ट मला चांगली आठवते. ती अशी की, "माझे आजोबा त्याकाळी कामानिमित्त मुबंईत असायचे. तेव्हा आमच गावचं घर खूप मोठं होतं. शाळेचे वर्ग भरतील एवढं. पण घरात मात्र तेव्हा आजी, पप्पा आणि काकाचं राहायचे. पप्पा आणि काका खूप लहान होते. तेव्हा शेजारची एक मुलगी आजीसोबत रात्री झोपायला येत असे. तेव्हा घड्याळ ही नव्हते. त्यामुळे नक्की किती वाजले हे कळन ही कठीण. तेव्हा आमच्या घराच्या पाठल्या दाराला एक आंब्याचे झाड होते. खूप आंबे धरायचे त्या झाडाला आणि ते खूप गोड ही असायचे. त्यामुळे वाडीतल्या सगळ्यांची नजर त्या झाडाकडे असायची. पण आजी उठेपर्यंत खाली पडलेले आंबे कोण ना कोण घेऊन जात असे. मग तिला खायला मिळायचेच नाहीत. म्हणून एकदा तिने पहाटे पहाटेच उठून आंबे गोळा करून आणायचे असे ठरवले. ती तशी लवकर उठली आणि खिडकीतून बाहेर बघितलं तर तिला उजाडलं असं वाटलं, मग तिने शेजारी झोपलेल्या मिनूला जी तिच्याबरोबर झोपायला यायची तिला पण उठवलं आणि बोलली, "मिनग्या उठ, उजाडला सा वाटता, चल कोणी येऊच्या आधी आंबे गोळा करून आणूया." मग काय मिनू पण उठली. पप्पा आणि काका दोघे गाढ झोपले होते. दोघी पाठल्या दाराला गेल्या आजीने हळूच दाराला बाहेरून कडी लावली. बाहेर थोडा उजेड तर दिसत होता. दोघी आंब्याच्या झाडाजवळ गेल्या, तर भरपूर आंबे पडलेले होते. दोघी ते वेचत चाललेल्या. त्यांची ओटी भरली तरी आंबे काही संपत नव्हते. अजून पडत होते. इतक्यात आजीला काठीचा आवाज आला आणि जणू काही त्यावर कोणी घुंगरू बांधले असतील अगदी तसा. आजीने आवाज ऐकला. पण आंबे वेचण्याच्या नादात तिने दुर्लक्ष केला. परत आवाज आला. आता मात्र आजी सावध झाली. कारण आंबे सुद्धा जास्तच पडत होते. तिने मिनू घाबरेल म्हणून "मिनग्या चल मॉप झाले आंबे, उद्या येवुया" असे बोलून पाठल्या दाराची कढी काढली. आणि दोघी आत आल्या. तसा तो घुंगुरांचा आवाज हळूहळू कमी कमी होत गेला. आजीने आंबे टोपलीत टाकले आणि हाथ-पाय धुवून अंथरुणात झोपली आणि मिनू ला म्हणाली,"मिनग्या, मेल्या, उजाडला नाय अजून, मध्यांरात हा, चांदना पडलेला म्हणून उजाडला असा वाटला. ती त्याची वाट हुती आणि आपण त्याच्या वाटेवर आंबे गोळा करीत हुताव. म्हणून आंबे पण मॉप पडत हुते. नशीब आपला चांगला म्हणून माका सुचला, नाहीतर आपला काय खरा नव्हता."
आमच्या घराच्या पाठल्या दाराच्या आंब्याकडून देवचाराची जाण्याची वाट होती म्हणजे आताही आहे आणि ह्या दोघी त्याच्या वाटेवरच आंबे गोळा करीत होत्या. त्यामुळे त्याची वाट अडली गेली. त्याने दोन वेळा इशारा केला. पण आजीचं नशीब चांगलं की, ती दुसऱ्या इशाऱ्यावरचं सावध झाली. असं म्हणतात, देवचार हा गावाचा राखणदार असतो. हातात घुंगरांची काठी, गुडघ्याभर धोतर, सुडौल शरीरयष्टी आणि डोक्यावर पगडी ह्या पेहरावात तो मुख्यतः आढळतो. काही वेळेला सरपटणाऱ्या प्राण्यांच्या स्वरूपातही त्याचे दर्शन होते असे म्हटले जाते. कोंकणातल्या प्रत्येक गावात एक महापुरुष आणि एक ग्रामदेवतेचे मंदिर असतेच. ह्या दोन्ही मंदिरांमधला रस्ता म्हणजेच देवचाऱ्याचा मार्ग. गावाच्या एका वेशीपासून दुसऱ्या वेशीपर्यंत असा ह्याचा एक ठराविक मार्ग असतो. त्या मार्गात कोणी अडथळा आणला, अथवा काही चुकीची गोष्ट करण्याचा प्रयत्न केला तर तो त्याला योग्य ती शिक्षा देतो.एखादा वाटसरू वाट चुकला तर त्याला योग्य ती दिशा देण्याचे काम हा देवचार करतो. शक्यतो तो कोणालाही हानी पोहोचवत नाही पण जर कोणी त्याच्या वाट्याला गेलं तर त्याची गयही तो करत नाही. खरं खोटं देव जाणे.
एकदा गावातल्या एका आजोबांनी त्यांनी स्वतः अनुभवलेला एक किस्सा सांगितलेला तो असा, एकदा ते तालुक्याच्या कामाला दुसऱ्या गावात गेले होते. तेव्हा त्यांना तिथून परत येताना खूपच उशीर झाला म्हणजे अगदी रात्र झाली. त्यांची शेवटची एसटी पण चुकली. मग काय चालत जाण्याशिवाय त्यांना पर्यायच नव्हता. आमचे गाव पण तिथून ७-८ किलोमीटर वर असेल. त्याकाळी रस्त्यावर लाईट नसायच्या. त्यामुळे रस्त्यावरून चालताना अंधार गुडूप असायचा. पण आजोबा खुपच धिरिष्ट. अर्ध्या रस्त्यापर्यंत कोण ना कोण त्यांच्याबरोबर होतं. पण नंतर पुढे फाटा लागला आणि तिथे एक रस्ता दुसऱ्या गावाकडे आणि एक रस्ता आमच्या गावाकडे जात होता. आता मात्र आजोबा पुढे एकटेच जाणार होते. त्या फाट्यापासून थोडे अंतर चालत असताना त्यांना अचानक पावलांचा आवाज आला. जणूकाही कोणीतरी त्यांचा पाठलाग करत आहे. पण आजोबा त्या आवाजाकडे लक्ष न देता चालतच होते. त्यांना थोडा फार अंदाज आला होता की, घर यायला अजून वेळ आहे. एव्हाना मध्यांरात्र ही झाली होती. त्यांनी मुख्यरस्ता सोडला आणि ते पायवाटेला लागले. ती वाट माळावरून घराकडे जाणारी जवळची वाट होती. ते कुठेही न थांबता झरझर चालत होते. पण मधेच ते वाट चुकले. कशी हे त्यांना पण नाही समजले. ते परत परत फिरून त्याच जागेवर येत होते. बहुतेक त्यांना चकवा लागला होता. आजोबांना काहीच कळत नव्हते काय करावे ते. त्यांनी कुलदेवतेला साकडं घातलं. तेवढ्यात त्यांना अचानक एक उंच, धिप्पाड माणूस भेटला आणि त्याने तुम्ही इथे कसे, वगैरे प्रश्न विचारले. तेव्हा आजोबांनी त्या माणसाला सगळी हकीकत सांगितली. तेव्हा त्या माणसाने आजोबांना बोलता बोलता कधी त्यांना घराजवळ सोडले हे आजोबांना कळलच नाही. आजोबा पण समोर घर बघून खुश झाले आणि ते त्या माणसाला काही बोलणार इतक्यात तो माणूस त्या जागेवर नव्हता म्हणजे अचानक गायब झाला. आजोबा थोडे गोंधळले आणि घरापर्यंत पोहचल्याबद्दल त्यांनी कुलदैवताचे आभार मानले. पण तो माणूस कोण होता ते मात्र आजपर्यंत एक रहस्यच आहे.
अजून एक गोष्ट मला माझ्या काकांनी सांगितलेली मला आठवतेय. एकदा काका आणि त्यांचे मित्र दोघे रात्री जंगलात शिकारीला गेले होते. त्यांचे मित्र एका बाजूला आणि काका त्यांच्यापासून थोड्या अंतरावर बसले होते. खूप वेळ झाला तरी त्यांच्या हाताला काहीच लागले नाही. काका जिथे बसलेले त्या झाडाच्या बाजूलाच मंदिर होते. त्यांना जाताना त्या मंदिराच्या बाजूला कोणीतरी दिसले. पण काकांना वाटले पुजारी असेल. म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले. कारण कधी कधी तो पुजारी मंदिरात झोपत असे. काका निराश होऊन जात असताना. त्यांचा कोणतरी पाठलाग करत आहे असे त्यांना जाणवले व काही वेळातच तो माणूस उंचीने मोठा मोठा होत आहे असा त्यांना भास झाला. तरी काका न थांबता चालतच राहिले. थोडे अंतर चालल्यावर तो माणूस अचानक थांबला आणि काकांना म्हणाला,"इथे इतक्या रात्री परत कधी फिरकू नकोस" आणि गायब झाला. त्याने काकांना काही केले नाही पण कदाचित काका जिथे बसलेले ती त्याची जागा असेल आणि कदाचित त्याची ठराविक वेळ ही असु शकते आणि काका तिथे त्याच्या त्या वेळेला त्याच्या जागेवरच होते. त्याला ते आवडले नसेल आणि म्हणून त्याने काकांना घाबरवण्याचा ही प्रयत्न केला पण काका घाबरले नाही. ते चालतच राहिले. त्याची हद्द पण काही अंतरापर्यंत होती व जसे काका त्याच्या हद्दीच्या बाहेर गेले. तशी त्याने काकांना समज दिली. असे काका म्हणाले होते. देव जाणो तो रहस्यमय माणूस कोण होता.
पण त्याच गावात तो रहस्यमय उंच माणूस परत एकदा दिसलेला. म्हणजे झाले असं की, त्या गावात डोंगरावर एक तळ आहे. छोट्या छोट्या झऱ्यांमुळे ते नेहमी भरलेलं असतं. असंच एकदा गावातील ३-४ मुलं तिथे संध्याकाळी आंघोळीला गेली होती. ती अंधार पडायच्या आत घरी सुद्धा आली. पण घरी आल्यावर एकाला आठवले की, तो त्याचे घड्याळ तिथेच विसरला. तो पर्यंत रात्र झाली होती. मग काय, सगळे जण त्यापैकी एका जवळ रिक्षा होती, त्या रिक्षातून परत त्या जागी निघाले. रिक्षात सगळ्याची मस्ती चाललेली. पण अचानक अर्ध्या रस्त्यात आल्यावर त्यांना त्यांच्या रिक्षासमोरून एक उंच माणूस गेल्याचा भास झाला आणि काही कळायच्या आत तो गायब झाला. जो रिक्षा चालवत होता त्याने त्याला स्पष्ट बघितले. पण काही न बोलता तो रिक्षा चालवत राहिला. मग जेव्हा ते सगळे त्या तळ्या जवळ राहिलेलं घड्याळ घेऊन घरी आले. तेव्हा एकमेकांना त्यांनी रस्त्यात बघितलेल्या माणसाबद्दल विचारले. तेव्हा अजून एकाने मी पण बघितले ह्या गोष्टीला दुजोरा दिला. कोण असेल ना तो उंच माणूस????
~समाप्त~
तुमच्याजवळ पण जर अशा काही कोकणातल्या रहस्यकथा असतील तर सामायिक (share) करायला विसरू नका. तसेच ही कथा आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणीबरोबर ती नक्की share करा.
धन्यवाद