Get it on Google Play
Download on the App Store

वेडी संन्यासिनी

"पंतानी तत्काळ कासारवाडीकडे कूच करण्याचा आदेश दिला आहे. महाराज स्वतः आपल्या अंगरक्षकासहित येणार आहेत" शिवाने आखाड्यात येऊन माहिती दिली. सोमनाथ आणि कासीम त्यावेळी इतर मावळ्यांना तलवारबाजीचे धडे देत होते. महाराज स्वतः कूच करणार म्हटल्यावर वेळ न दवडता सोमनाथ आणि कासीमने तत्काळ ताबेल्याकडे धाव घेतली. महाराजांचे घोडे आधीच तबेल्यातून निघाले होते. "काय बरं घडले असेल ?" कासीमने सोमनाथला विचारले. "कासारवाडी इथून फक्त ५ मैलांवर आहे. काही साधी गोष्ट असती तर महाराज स्वतः गेले नसते".

"महाराज येत आहेत" अशी हाक बुरुजावरून आली आणि महाराज, त्यांची माता, मंत्रीगण आणि जवळ जवळ १५ रक्षकांचे घोडे भरधाव किल्ल्याबाहेर पडले. मागोमाग इतर मावळेसुद्धा घोड्यावरून कूच करू लागले. कासीम आणि सोमनाथने सुद्धा घोड्याला टांच दिली.

कासारवाडीच्या वेशीवर एक शिवमंदिर होते त्याच्या पुढे सर्व लवाजमा थांबला. महाराजांनी आपला घोडा पुढे नेला वर फिरवून सर्व उपस्थित मंडळींशी नजर मिळवीली. अवघ्या १६ वर्षांचे महाराज एका तपस्व्याप्रमाणे तेजस्वी वाटत होते.

उपस्थित लोकांमध्ये अमात्य, सेनापती, महाराजांचे सल्लागार, प्रमुख न्यायाधीश, इत्यादी सर्व विशेष पदाधिकारी होते. सर्व लोक स्तब्ध होऊन महाराज आता काय बोलतील ह्याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करत होते. इतक्यात दोन प्रचंड शरीराच्या मल्लांनी एका बारीक आणि फाटक्या कपड्यांतल्या एका कैद्याला उचलून मंदिरातून बाहेर आणले. मंदिरातून महाराजांचे हेरखात्याचे प्रमुख खंडोजी बाहेर आले. त्यांनी झुकून महाराजांना नमस्कार केला व नंतर आईसाहेबांना प्रणाम केला.

महाराज घोड्यावरून खाली उतरले. आईसाहेब सुद्धा घोड्यावरून उतरल्या. त्यांनी सर्व मंडळीकडे नजर फिरविली. भर उन्हात सर्व लोक कुतूहलाने त्यांच्याकडे बघत होते. आईसाहेब म्हणजे सर्व मंडळीसाठी वात्सल्यमूर्ती होत्या पण त्याच वेळी राजकारणातील त्यांचे बारकावे उरात धडकी भरविणारे होते. जो वसा घेतला आहे त्यासाठी ही स्त्री साक्षांत दुर्गा होऊ शकते याचा अनुभव सर्वांनाच होता.

"आमच्या मुलखातून दुर्जन मुघलांना पळवून लावण्याचा आणि न्यायावर आधारित हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचा प्रण आम्ही केला आहे हे तुम्हाला पुरेपूर ठाऊक आहे. माणसाचे आयुष्य छोटे असते आणि ह्या छोट्या आयुष्यात एवढा मोठा प्रण करणे मुश्किल आहे. ह्या ध्येयाचा पाठलाग करत असताना कर्तव्यात झालेली कसूर अजिबात खपवून घेतली जाणार नाही. राजमाता म्हणून माझ्या तोंडचा घास मी माझ्या मराठ्यांना देईन पण आपल्या लोकांचा घात करणाऱ्या मराठ्याला जिवंत ठेवणे मला शक्य नाही." आईसाहेब बोलत्या झाल्या. सर्वांची नजर त्या कैद्यावर गेली. ‘हाच काय तो घरभेदी’ हा विचार सर्वांच्या मनात आला.

सोमनाथने त्या कैद्याला तत्काळ ओळखले. "अरे हा तर आपला तानाजी" सोमनाथ कासीमच्या कानात कुजबुजला. "गप्प बैस, महाराज बोलत आहेत" कासीमने दबल्या स्वरांत सांगितले.

"तानाजी भोसलेला मी एका खास कामगिरीवर रत्नागिरी मुलुखांत सरदार गोविंद देशपांडे आणि वाटाड्या एकोजी बरोबर पाठवले होते. गोविंद आणि एकोजी ह्यांचा पत्ता नाही. तानाजीने त्यांना धनलोभाने मारले हा आरोप आहे. तानाजीने आरोप मान्य केला नसला तरी आमच्या हेरांनी रक्ताने माखलेल्या स्वरूपांत तानाजीला कैद केले होते. एकोजी आणि गोविंदचे घोडे तानाजीच्याच बाजूला होते. तानाजीच्या म्हणण्याप्रमाणे कुणा एका राक्षसाने गोंविंद आणि एकोजीचा शिरच्छेद केला व ह्याला जिवंत सोडले. हेरगिरीच्या कामांत हेराची मानसिक स्थिती फारच महत्वाची असते. तानाजीवर आपल्या सहकाऱ्याचा खून करण्याचा जो आरोप आहे तो सिद्ध झाला नसला तरी तानाजी हेरगिरीच्या कामासाठी पूर्णपणे निरुपयोगी ठरला आहे. हेरगिरीच्या नियमाप्रमाणे तानाजीने कामात कसूर आणि भित्रेपणा दाखविल्याबद्दल मी मृत्युदंडाची शिक्षा ठोठावत आहे. काही शेवटचे शब्द असेल तर आताच बोल " असे म्हणून महाराजांनी आपली तलवार बाहेर काढली.

"मी कामात कसूर केली, मी घाबरलो, महाराजांनी जो विश्वास दाखविला त्याला मी सिद्ध करू शकलो नाही. गोविंद आणि एकोजीचा खून झाल्यानंतर मी परत आलो नाही, मला पळून जायचे होते. मी सर्वांची माफी मागतो. पण राक्षस खरोखरच आहे. त्यानेच सरदार गोविंद आणि एकोजीला मारलं" तानाजी अस्पष्ट शब्दांत बरळत होता.

महाराजांनी मल्लांना खूण केली, त्यांनी तानाजीला गुढघ्यावर बसविले. महाराजांची तलवार विजेसारखी चमकली आणि तानाजीचे मृत शीर गडगडत दूर जाऊन पडले. सोमनाथचा घोडा रक्त बघून बिथरला, सोमनाथला त्याला सावरण्यासाठी बरीच मेहनत करावी लागली.

" याच्या शरीराचा अंतिम संस्कार करून याच्या परिवाराला आमच्या कोशातून पुढील एक वर्षाचे वेतन द्या" महाराजांनी हुकुम दिला व घोड्यावर बसून ते आपल्या अंगरक्षकासोबत किल्याकडे निघाले. मंत्री, किल्लेदार इत्यादी मंडळी महाराजांमागे निघाले. सोमनाथ आणि कासीमने एकमेकांकडे पाहिले , सारे लोक निघून गेले तरी दोघे मात्र मागेच घुटमळत राहिले.

"तानाजी इतका भित्रा नव्हता. नक्कीच त्याने काहीतरी भयानक पहिले असेल. " सोमनाथने कासीमला म्हटले.

"सरदार गोविंदसुद्धा सहजसहजी मरणाऱ्यांपैकी नव्हता. त्याला मारणारा माणूस सुद्धा तेवढाच तलवारबाज असला पाहिजे, तानाजीने त्याला मारणे शक्य नाही" कासीमच्या चेहऱ्यावर उद्विग्नता जाणवत होती. तानाजीला दोघे लहानपणापासून ओळखत होते. कासीमचे वडील तोफा बनवण्याचे काम करत असत. महाराजांच्या वडिलांनी कासीमच्या वडिलांना कामावर ठेवले होते. कासीम लहानपणापासूनच इतर मराठ्यांच्या मुलांबरोबर मोठा झाला. कासीमला तलवारबाजीत रस नव्हता पण वडिलांप्रमाणे तो सुद्धा लोहार बनून अवजारे आणि शस्त्रे घडवत असे. सोमनाथ पोरका होता तर तानाजीचे वडील नाशिकच्या लढाईत मारले गेले होते. कासीम, सोमनाथ आणि तानाजी लहानपणी शिकार करायला जात असत. कासीम फासे, पिंजरे बनवायचा तर जनावरांचे ठावठिकाणे शोधून काढण्याचे काम तानाजीचे होते.

सोमनाथ आणि कासीम एकही शब्द न बोलता आपले घोडे मंद गतीने चालवत होते. सोमनाथ काहीच बोलत नव्हता, आपला मित्र असा भित्रा निघावा व कर्तव्यात कसूर ठेवायचा गंभीर आरोप मान्य करून आपल्या समोर मारला जावा याचे त्याला वाईट वाटत होते. सोमनाथला सरदार बनायचे होते. स्वतःचे सैनिक घेऊन कधीतरी एखादा किल्ला मराठी साम्राज्यासाठी काबीज करावा असे लहान स्वप्न त्याने उरात बागळले होते. आजपर्यंत लढाईचा विशेष अनुभव त्याने घेतला नव्हता ,पण लढाईत मित्र गमावण्याचे दुखः काय असते ह्याची समज मात्र आज आली होती. हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नात हयगय करून घेतलेली सहन होणार नाही हे महाराजांनी स्पष्ट केलंच होतं. तानाजी गेला तर काय आपण त्याची उणीव भरून काढू असा विचार सोमनाथने केला.

महाराजांचा ताफा आणि इतर मंडळी आधीच किल्ल्यात पोचली होती. सोमनाथलासुद्धा किल्ल्याचे प्रवेशद्वार दिसत होते. इतक्यात त्याला एक विशेष गंध आला. कासीमलासुद्धा कदाचित तो वास आला असेल. काही क्षणांनी तो वास अधिकच उग्र झाला, घोडेसुद्धा पुढे चालायला बिथरू लागले.

कासीमने अर्थपूर्ण दृष्टीने सोमनाथला इशारा केला , तलवार म्यानातून बाहेर काढली व आपले घोडे बाजूच्या झाडीत घुसवले. आजुबाजूच्या झुडुपांत बराच वेळ शोधूनसुद्धा त्यांना काहीच सापडले नाही. वास मात्र अधिकाधिक तीव्र होत होता. "मागे फिरून अजून लोकांना घेऊन येऊ" सोमनाथने सागितले. कासीमने सहमती दर्शवली. दोघांनी घोडे मागे फिरविले व पुन्हा जंगलातून वाट काढत ते किल्ल्याच्या वाटेवर आले.

"मला शोधत होतात की हरामखोरांनो?" एका भसाड्या आवाजाने त्यांचे लक्ष्य वेधले. त्या आवाजाबरोबर वास सुद्धा तीव्र झाला व कासीमचा घोडा पुन्हा बिथरला. समोर मृगजीनात लपेटलेली एक स्त्री उभी होती. वयाने तरुण वाटत होती पण वेषाने संन्यासी. केसांच्या जटा झाल्या होत्या, धुळीने माखलेले शरीर, हातांत एक झोळी असा अवतार घेऊन ती रस्त्याच्या मधोमध उभी होती. तिचा एकूणच अवतार बघून ती कोणीतरी वेडी किंवा संन्यासी असावी असा कयास दोघांनी बांधला. तो गंध मात्र कुठून येत होता हे समजत नव्हतं.

" इथे कोणीतरी पोरगा म्हणे स्वतःला महाराज म्हणायला लागलाय , तुम्ही त्याचेच चमचे ना?" ती संन्यासी उपहासानेच म्हणाली.

"म्हणून कोणी महाराज होत नसतो. आमच्या महाराजांनी तोरणा जिंकलाय. आणि आम्ही काही चमचे नाही, सैनिक आहोत. तुझ्यासारख्या वेड्या संन्यासी लोकांनी सुरक्षित राहावे म्हणून आपले महाराज आपले जीवन धोक्यात घालीत आहेत. आज आमच्या जागी म्लेंच्छ सैनिक असते तर कपडे फाडून फिरवले असते तुला" सोमनाथ बोलला. कासीम मुसलमान असला तरी त्याला संन्यासी ब्राह्मण वगैरे लोकांची भीती वाटायची पण सोमनाथला अजिबात कुणाची फिकीर नव्हती.

"हो का? ती कमरेला असलेली तलवार कधी कुणावर चालवली तरी आहे का ? की ह्या फुशारक्या लुटूपुटुच्या लढाईच्याच आहेत?" असे म्हणून ती संन्यासी आपले पांढरे शुभ्र दात दाखवून फिदीफिदी हसली. ते हसणं बघून कासीमच्या अंगावर काटा आला.

सोमनाथच्या भुवया ताणल्या गेल्या, सोमनाथला राग यायचा तेव्हा तो नेहमी आपले ओठ दाबायचा. "सामान्य जनतेला कधीही विनाकारण हात लावायचा नाही” असा महाराजांचा स्पष्ट आदेश होता आणि अबला नारीवर हात उगारणे म्हणजे तर तानाजीला स्वर्गांत भेटायला जाण्यासारखे होते.

"अरे ठोंब्या ज्या महाराजांवर तू प्रेम दाखवतो आहेस तो खराच राजा आहे का नाही ते बघायचेय मला , आणि तू स्वामीभक्त म्हणवतोस ना स्वतःला ? एक दिवस स्वामीभक्ती आणि स्वतःचे धन ह्यापैकी काहीतरी एक निवडण्याची वेळ येईल तेव्हा बघूया तू काय करतोस " फिदीफिदी हसून झाल्यावर ती संन्यासी शांत स्वरांत म्हणाली.

"हिच्या नादी न लागता आपण परत जाऊ, ह्या संन्याशी लोकांकडे किती शक्ती असू शकते आपल्याला कल्पना नाही" कासीमने सोमनाथला म्हटले.

"हं … बरोबर आहे, ह्या वेडीच्या नादाला लागून फायदा नाही, पण हा घाणेरडा वास काय आहे ते तर बघू ." असे म्हणत सोमनाथने आपला घोडा तिच्याजवळ नेला. घोडासुद्धा तिला घाबरत होता. घोडा जवळ येताच नागाप्रमाणे तिने फुत्कार सोडला व ती चटकन मागे गेली तिच्या आवाजाने पुन्हा घोडा बिथरला.

"मला न्या त्या पोराकडे आधी … मग कळेल वासाचे रहस्य काय आहे ते. नाही तर तुम्हा दोघांची कुंडली इथेच मांडून टाकेन हरामखोरांनो" ती पुन्हा खेकसली.

सोमनाथ आणि कासीमजवळ दुसरा पर्याय नव्हता. तिला येणारा तो वास असह्य होता व घोडे तिला आपल्या पाठीवर घेणे शक्य नव्हते त्यामुळे ती पायीच निघाली व हे दोघेजण तिच्या मागे मागे चालू लागले.

"महाराजांना भेटायला वेडी संन्यासी?"  प्रमुख पंडित दुर्गभट्ट कपाळावर आठ्या टाकून विचारते झाले. "एकदम वेडी वाटते पण एक विशिष्ट वास येतोय तिला, काहीतरी बात नक्कीच आहे" रक्षकाने भट्टांना सांगितले. "मी महाराजांना विचारतो, तिला बाहेरच ठेव" भट्टांनी तिला बाहेरच उभं ठेवायचा आदेश दिला.

महाराज दक्षिण बुरुजावर फेरफटका मारत होते. भट्ट स्वतः वेड्या संन्यासिनीची खबर घेऊन त्यांच्याजवळ गेले. सूर्यास्ताची वेळ होती. लालसर रागाची किरणे सर्व रयतेवर पसरली होती. रात्रीच्या पहाऱ्याची तयारी सुरु झाली होती व सेवक मशाली पेटवण्याची तयारी करत होते.

"काय भट्ट तुम्ही इथे कसे ? सर्व कुशल आहे ना ?" महाराजांनी विचारले. भट्टानी वाकून महाराजांना प्रणाम केला. "कासीम आणि सोमनाथला किल्ल्याबाहेर एक संशयास्पद वेडी संन्यासिनी सापडली , तुम्हाला भेटायचे आहे असे म्हणते. तिला तत्काळ अटक करून झडती घेतली पाहिजे असे प्रामाणिक मत मी दुर्गप्रमुखांना दिले होते पण, ती स्त्री असल्याने आधी आपले मत घ्यावे असे दुर्गप्रमुखाने सुचविले" भट्ट बोलते झाले.

"हिंदवी राज्यात संन्यासी लोकांना भय असता कामा नये. बोलवा तिला बघूया ती काय म्हणते. " महाराजांनी आदेश दिला.

महाराजांचा रक्षक आणि भट्ट तिला बोलावण्यासाठी गेले. भट्ट हे वेदशास्त्र पारंगत ब्राम्हण होते. त्यामुळेच की काय भट्ट कधीही भटक्या संन्याशी लोकांवर विश्वास ठेवत नसत , महाराजांनी हे अनेकदा अनुभवले होते. उलट धर्मप्रिय माणूस असूनसुद्धा भट्ट नेहमी अतिशय शंकेखोर स्वभावाचे होते, म्हणूनच महाराजांना त्यांचा सल्ला नेहमी मौल्यवान वाटत असे.

दक्षिण बुरुजावर अंधार पसरायला लागला तशी ती संन्यासिनी उपस्थित झाली , कासीम आणि सोमनाथ तिच्या बाजूलाच उभे होते. महाराजांचे अंगरक्षक डोळ्यात तेल घालून तिच्यावर बारकाईने लक्ष ठेवून होते.

"तूच आहेस का नवा महाराज पोरा?" ती बोलती झाली. तिच्या आवाजांत अजिबात सन्मान नव्हता. ती ज्या पद्धतीने बोलली तेव्हाच बाजूच्या सर्व लोकांच्या भुवया उंचावल्या. वातावरणातली संतापाची लहर महाराजांनी ओळखली व सर्वाना शांत राहण्याचा इशारा केला.

"मी कोण आहे हे आपल्याला ठाऊक आहे पण उलटपक्षी नाही. " महाराजांनी शांतपणे तिला विचारले.

तिच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य पसरले. "मी अग्निशिखा आहे. संपूर्ण भारतवर्षांत फिरत आहे. तो येईल आज नाही तर उद्या असे गुरु भैरवनाथ सांगत होते. पण आज ह्या पोराच्या स्वरूपांत मी त्याला बघितले. राजा, तू काही क्षणांपूर्वीच एकाला देहदंड दिला. पण तो काय सांगत होता ह्याच्याकडे लक्ष नाही दिलेस. मी तुझे कान उघडायला आले आहे. तू जी खेळतो आहेस ना ती लुटूपुटूची लढाई आहे. तोरणा असो वा कोंढाणा यांना काहीही अर्थ नाही. अरे पोरा ही खेळणी आहेत तुझ्यासाठी. खरे युद्ध तिथे आहे , रत्नागिरीच्या देवराईत. तुझे दोन सैनिक त्यांनी मारले एक तू स्वतः मारलास " तिच्या बोलण्यात उपहास, अवहेलना होतीच पण काही तरी स्फुरणीयसुद्धा होते.

महाराजांच्या चेहऱ्यावर काहीही भाव नव्हता. राजा-महाराजांची स्तुती करून धन उपटणारे संन्यासी त्यांना ठाऊक होते. पण ही अग्निशिखा त्यातली वाटत नव्हती. "दोन लोकांची माहिती तुला आहे?" महाराजांनी विचारले.

अग्निशिखा पुन्हा फिदीफिदी हसली. तिचे हास्य बघून भट्ट अतिशय कावरेबावरे झाले. दुर्गप्रमुख महाराजांचा चेहरा न्याहाळत होता तर सोमनाथ आणि कासीम स्तब्धपणे ऐकत उभे होते. हिला किल्यात आणून आपण चूक तर केली नाही ना असा विचार सोमनाथ करत होता. हिच्याकडे काहीच माहिती नसेल तर महाराज पुन्हा आपल्यावर भरोसा करणार नाहीत ही भीती सोमनाथच्या मनात होती.

"आणलंय मी त्या दोघांना" ती बोलली. "कुठे?" महाराजांनी कठोर आवाजांत विचारले. झोळीत हात टाकला. महाराजांचे अंगरक्षक पुढे आले, सोमनाथने सुद्धा ती कदाचित काही हत्यार वगैरे काढेल ह्या विचाराने तलवारीवर हात ठेवला.

तिने झोळीतून जे काही बाहेर काढले ते पाहून महाराजसुद्धा दोन पावले मागे सरकले. महाराजांचे अंगरक्षक बाजूला झाले आणि सोमनाथला तिच्या हातातील दोन मुंडकी दिसली. गोविंद आणि एकोजीची मुंडकी कुठल्यातरी पांढऱ्या रंगाच्या लेपाने सारवली होती व अग्निशिखाने त्याचे केस पकडले होते. मग तो वास पुन्हा आसमंतात पसरला. किल्ल्यातील श्वानांनी कदाचित तो वास पकडला होता व त्यांच्या भुंकण्याचा आवाज परिस्थितीचे गांभीर्य जास्तच वाढवत होता.
   
महाराजांनी तसेच इतर सर्वांनी मुंडक्यांकडे पहिले. भट्ट तर शिव-शिव म्हणून दूर जाऊ लागले. त्या निर्जीव शिरांचे डोळे मात्र अंधारात काजव्यांप्रमाणे प्रकाशमान होते. "ही काय भानामती आहे?" महाराजांनी जरबेने विचारले.

"ही भानामती नाही पोरा, तुझी परीक्षा आहे. शत्रू मुघल नाहीत, आदिलशाह नाही, खऱ्या शत्रूपुढे हे दोघे खुर्दा आहेत. खरा शत्रू येत आहे तुला शोधत, वेळीच सावधान हो नाहीतर तुझे मुंडकेसुद्धा इथेच आढळेल" अग्निशिखा महाराजांवर खेकसली.

"पकडा तिला" महाराजांनी हुकुम सोडला. सोमनाथ आणि कासीमने जराही उशीर न करता तिचे हात पकडले. सर्पाप्रमाणे पुन्हा तिने फुत्कार टाकला आणि हात सोडवण्याचा प्रयत्न केला , पण कासीम आणि सोमनाथची पकड जबरदस्त होती.

"मी असल्या जादूटोण्यावर विश्वास ठेवत नाही. जो पर्यंत ह्या दोघांची मुंडकी तुला कुठे सापडली ह्याचे स्पष्ट उत्तर मिळत नाही तोपर्यंत तुला आमच्या तहखान्यात रहावे लागेल" महाराजांनी हुकुम सोडला. भट्ट दुरूनच संमतीदर्शक मान हलवत होते.

अग्निशिखाने धडपड करणे बंद केले, ती अचानक शांत झाली आणि काहीही आदळआपट न करता चालायला लागली. जाता जाता मात्र "ठीक आहे पोरा , तुला माझी आता गरज नसेल कदाचित, पण पडेल तेव्हा लवकर ये" म्हणून पुन्हा एकदा तिने महाराजांकडे कटाक्ष टाकला.

सूर्य पूर्णपणे अस्ताला गेला होता आणि आकाशात नक्षत्रांचा खेळ सुरू झाला होता. महाराज अजूनसुद्धा त्या दोन मुंडक्यांकडे पाहत होते.