आजची स्त्री
विषयावर काही लिहायला घेतले कि द्विधा मनस्थिती होते. पुरुषांच्या जोडीने पुढे जाणारी कि हे जग बघण्याआधीच अंधारात जाणारी ह्यापैकी कोणाचे नक्की उदाहरण द्यायचे ह्याचा विचार करावा लागतो. स्त्रियांची बुद्धिमत्ता ही निसर्गताच असते असं खुद्द महाकवी कालिदासानं म्हटलं आहे. असे असूनही 'बायकांना काय कळत ?' बोलून मोकळे होणारे असंख्य लोक समाजात वावरताना दिसतात. एकेकाळी पुरुषांच्या बरोबरीने समाजात स्थान घेणारी म्हणून उदाहरण देण्यात येणारी स्त्री हल्ली मात्र जन्मासाठीच लढताना दिसते. मुळात गर्भाशयात असल्यापासून ते जन्म घेईपर्यंत एवढेच काय ते तिची आयुष्य आहे असे वाटू लागलय. बाळाला जन्म दिल्यानंतर आईमार्फत त्याला अन्नपुरवठा करणारी नाळ कापली जाते, परंतु स्त्री जेव्हा जन्म घेते तेव्हाच तिची नाळ हि समाजाशी बांधली गेलेली असते. पण हे मान्य करण्यास मात्र समाज तयार होत नाही. पुरातन काळापासून आई अथवा माता ह्या शब्दाला एक विशेष महत्व आहे. अनेक शिलालेखांमध्ये मातृदेवतेचे वर्णन दिसते. मुळात एखाद्या जन्माच्या उत्पत्तीचे मूळच त असते. प्राचीन काळात स्त्रीला अनन्यसाधारण महत्व होते. पण आज परिस्थिती पूर्णपणे वेगळी झालीय. बदल घडवून आणण्यासाठी शिवराय, लोकमान्य, भगत सिंग सारखे युगपुरुष जन्माला यावेत असे ओरडून सांगणारा समाज मात्र त्यांना जन्म देणारी हि एक स्त्रीच होती हे मात्र विसरत आहे. आपल्या आई - बहिणींची विटंबना होत असताना, एक दिवस गर्दी करून मेणबत्ती जाळणे एवढेच काय ते चित्र आज दिसतय.
नेहमी स्त्रियांना नाण्यांसारखं जगावं लागत. जश्या नाण्यांना दोन बाजू असतात अगदी तसेच आई - बायको - बहिण - मैत्रीण असे अश्या अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात. पण हे करत असताना हल्ली समाजाने नाण्यांच्या दोन्ही बाजू ह्या गुळगुळीत केल्या आहेत. स्त्रियांच्या शरीराकडे आपल्या डोळ्यांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन बघणारे पुरुष मात्र स्त्री - स्वातंत्र्य ह्या विषयावर बोल्यांचे टाळतात.
आज २१ व्या शतकात नोकरी अथवा शिक्षणाच्या निमित्ताने स्त्रियांनी उंबरठा ओलांडला असला तरी अजूनही अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते. पण ह्या परिस्थितीस स्त्री स्वतःच जबाबदार आहे? हल्ली तिने प्रसार माध्यमांतून केलेल्या प्रदर्शनाचे तर हे प्रतिसाद नाहीत ना? हा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पुढच्या पिढीला जन्म देणाऱ्या ह्या स्त्री ने अश्या गोष्टींमुळे हीच पिढी त्याचे दुष्परिणाम तर भोगणार नाही ना ह्याचा विचार नक्की करायला हवा. स्त्रियांचा आजही वापर करून वस्तू म्हणून हवा तेव्हा उपभोग घेतला जातो. जाहिरातीतून प्रसिद्धीसाठी त्यांचा मादक वावर वाढण्याने अनेक जाहिरातदार त्यांचा वापर करून घेतात. हा त्यांच्या कलेचा नसून त्यांच्या शरीराचा वापर आहे हे त्या मॉडेल मात्र विसरतात. हे खरच निंदनीय आहे. स्त्रियांना नक्कीच प्रसिद्धी मिळावी आणि मिळालीच पाहिजे, पण ती अशी शरीर प्रदर्शनातून नको ह्याचा विचार प्रत्येक स्त्री ने करायला हवा.
पूर्वी स्त्री जशी उंबरठ्याच्या आतच सुरक्षित होती, तिच परिस्थिती पुन्हा उदभवते की काय? असं वाटायला लागलय.
याला जबाबदार कोण? यावर उपाय काय? हे कुठे थांबेल?….अशा प्रश्नाची उत्तरे शोधण्यास व योग्य ती पाऊल उचलण्याची आज खरंच गरज आहे.
आधुनिकतेच्या नावाखाली स्त्रियांचे पुरुषी वागणे,बोलणे, नको तितके “फ़्री” वागणे ,उत्तान कपडे ,फ़ॅशन, तसेच टी.व्ही.-सिनेमात नको ती दृष्ये ,हावभाव ,अंगविक्षेप क्लोजअपने दाखवणे हे देखिल ह्या सर्वाला तितकेच कारणीभूत ठरत आहे.
आणि हो कोणाच्याही वयक्तिक स्वातंत्र्यावर हे भाष्य नाही . . .पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा हि असतेच आणि जेव्हा ती मर्यादा ओलांडली जाते तेव्हा मात्र समाज बोट दाखवायला मोकळा होतो मग ती स्त्री असो वा पुरुष.
आज बलात्कारी स्त्रीला न्याय मिळवताना सुद्धा कोर्टापुढे पुन्हा पुन्हा शाब्दीक बलात्काराला सामोरे जावेच लागते.
प्रश्न हा पडतो, कि अशा घटना आपण टाळू शकतो का?
निश्चितच उत्तर “हो” असेल. आपल्या समोर अनेक आदर्श असताना नाउमेद होवुन चालणार नाही. किरण बेदी, कल्पना चावला, इंदिरा गांधी,अंजली भागवत,पी.टी.उषा, डॊ.राणी बंग, डॊ. अनिता अवचट, सुनिता आमटे,इ अशा अनेक क्षेत्रात भरारी मारलेल्या स्त्रियांनी आपले वर्चस्व सिद्धकरुन दाखवल आहे.
“या देवी सर्व भूतेषू शक्तीरुपेण संस्थिता! नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:”
हे वचन सिद्ध करुन दाखवले आहे. प्रत्येक स्त्री कडे मग ती ग्रामिण असो,किंवा शहरी असो, तिच्यात एक अशी सुप्त शक्ती असते,की कोणत्याही येणा-या संकटाशी दोन हात करु शकेल. निसर्गानेच तिला ही शक्ती दिली आहे. आज स्त्रिला असेच स्वातंत्र्य हवे आहे.
"अबला नहीं सबला है तू, नारी नहीं चिंगारी है तू"
हे आजच्या स्त्रियांनी लक्षात घेतले पाहिजे. स्त्री ही माणूस आहे. तिला माणूस म्हणून जगण्याचा पूर्ण हक्क आहे आणि तो हक्क आजच्या स्त्रीला मिळालाच पाहिजे.
आज पुरुषांच्या बरोबरीने पुढे जाणारी स्त्री अनेक संकटांना सुद्धा सामोरे जातेय, समाजाने सुद्धा ह्या सर्वात तिची साथ दिली पाहिजे. कारण जेव्हा स्त्री जन्माला येईल तेव्हाच तिच्या गर्भातून समाज जन्म घेईल !
Prashik waghmare