Android app on Google Play

 

पानिपत चित्रपट परीक्षण: सोपी करून सांगितलेली गुंतागुंतीची कथा!!

 

माझे हे परीक्षण वाचण्याआधी महत्वाची सूचना:
मी पानिपत "चित्रपटाचे" हे परीक्षण लिहिले असून खरोखर घडलेले पानिपत युद्ध आणि त्या संदर्भातील इतिहासातील खरेखोटेपणा याचे परीक्षण लिहिलेले नाही आणि त्याबद्दल लिहिण्याची माझी पात्रताही नाही, याची कृपया नोंद घ्यावी. ऐतिहासिक, पौराणिक, बायोपिक, फँटसी आणि सत्य घटनांवर आधारित, तसेच सत्य-असत्य मिश्रण (फॅक्ट-फिक्शन) असेलेले मराठी, हिंदी आणि इंग्रजी असे चित्रपट/सिरीयल मी जरूर बघतो (असोका, 300, टायटॅनिक, सिरीयाना, पद्मावत्त, फर्जंद, फत्तेशिकस्त, बाजीराव मस्तानी, पोरस, बाहुबली, अलेक्झांडर, सूर्यपुत्र कर्ण वगैरे) आणि महत्वाचा मराठी इतिहास पडद्यावर मांडणारा हा चित्रपट असल्याने अर्थातच हा चित्रपट सुद्धा मी रिलीज झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी (७ डिसेंबर) बघितला. पण वेळेअभावी चित्रपट परीक्षण लिहायला एक दिवस उशीर झाला म्हणजे 8 डिसेंबर (रविवार). तोपर्यंत बऱ्याच वाचकांनी मला विचारणा केली की माझ्याकडून परीक्षण कधी येईल, शेवटी लिहायला घेतले. आणि हो, अजून पर्यंत मी विश्वास पाटील यांची पानिपत कादंबरी वाचली नाही, पण वाचणार आहे! चित्रपट बघतांना पेशवे आणि त्यांच्या इतिहासाबद्दल थोडा तरी होमवर्क केलेला असला पाहिजे नाहीतर काही गोष्टी समजणार नाहीत!

आधी पानिपत चित्रपटाभोवती असलेले काही वादग्रस्त मुद्दे बघूया:
ट्रेलर रिलीज झाल्यापासून विविध विवादांत अडकलेला पानिपत चित्रपट अखेर 6 डिसेंबरला प्रदर्शित झाला. अर्जुन कपूरला सदाशिवराव पेशवे यांच्या भूमिकेसाठी निवडल्याबद्दल दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचेवर टीका झाली, तसेच पानिपत कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांनी त्यांच्यावर कथा चोरीचा आरोप केला, पानिपत नेमका कोणत्या ऐतिहासिक कालखंडावर आधारित आहे हे माहिती नसतांना काहींनी तो पद्मावत आणि बाजीराव मस्तानीचा मिक्स चित्रपट आहे अशा प्रकारच्या टीका केल्या. तसेच कुठेतरी मी बातमीत वाचले की अहमदशाह अब्दाली भारतात आला तेव्हा तो फक्त 25 वर्षांचा होता आणि त्याच्या भूमिकेत संजय दत्त खूप थोराड वाटतो त्यामुळे या गोष्टीसाठी पात्रनिवड करणाऱ्यावर टीका झाली पण याबद्दलचे नेमके सत्य असत्य काय हे मला माहिती नाही.

पानिपतबद्दल इतरांनी केलेल्या परीक्षणाबद्दल थोडेसे सांगून परीक्षणाला सुरुवात करतो:
चित्रपट बघण्याआधी मी अनेक परीक्षण वाचले आणि युट्यूबवर बघितले. काही परीक्षण हे मुद्दाम आकस बुद्धीने विरोधासाठी विरोध म्हणून केलेले दिसले जसे की तीन तास खूप बोअर होतात, एकही लक्षात राहण्यासारखा डायलॉग नाही, गाणे आणि संगीत चांगले नाही असे बोलले जाऊ लागले पण मला चित्रपट पाहिल्यावर या तिन्ही गोष्टी खोट्या असल्याच्या आढळून आल्या. संगीत (गाणे आणि पार्श्वसंगीत) अतिशय छान आहे, चित्रपट मुळीच बोअर होत नाही (उलट मला वाटत होते की एवढ्यात चित्रपट कसा संपला?) आणि लक्षात राहण्यासारखे अनेक डायलॉग आहेत. चित्रपटगृहात हर हर महादेव, सदाशिवराव पेशवा की जय अशा घोषणा ऐकू येतात तसेच एकदा नव्हे तर अनेकदा प्रेक्षकांतून शिट्ट्या आणि टाळ्या येतात. एका गाण्यात सर्वजण शिवाजी महाराजांची आठवण तबकात त्यांची पगडी ठेऊन करतात तेव्हा चित्रपटगृह शिवाजी महाराज की ज्जय या घोषणांनी दुमदुमून जाते.

काही डायलॉग सांगतो:
गोपिकाबाई पार्वतीबाईला भर लग्नात टोमणा मारतात:
"बिल्ली भी इतनी फुर्ती से सीढी नही चढती!" म्हणजे पार्वती ही एका सामान्य वैद्यांची मुलगी असून तिने सदाशिव सारख्या पेशव्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले अशा (गैर)समाजातून केलेली ही टीका असते.

तसेच -
"जिस दिल्ली ने छत्रपती शिवाजी महाराज का अपमान किया था, आखिर वह दिल्ली मराठो ने जीत ली!"

दत्ताजी: "बचेंगे तो और भी लढेंगे!"

दिल्ली जिंकल्यानंतर जेव्हा दिल्लीच्या गादीवर बसण्यासाठी पार्वतीबाई सदाशिवराव यांना आग्रह करते तेव्हा ते म्हणतात:
"मै राजनीती के लिये नही, युद्ध के लिये बना हूं!"

आणि खालील काही डायलॉग:
मल्हारराव होळकर: "यहां सब है, मराठा, पंजाबी, मुसलमान वगैरा है, लेकीन हिंदुस्तानी कोई नहीं है!"
आणि
सदाशिवराव: "अपनी संख्या बढा नही सकते पर दुश्मन की संख्या तो कम कर सकते है!"

मराठ्यांचा जोश पाहून घाबरून अब्दाली सैन्य माघारी येते तेव्हा त्या सैन्याला स्वत: अब्दाली कापतो तेव्हा तो टिपिकल संजय दत्त टाईप डायलॉग मारतो:
"अगर भाग कर वापस आओगे तो एक एक का पीछा करके मै सबको मार दूंगा, वापस जाओ और लढो!"

आणखी एक:
अर्जुन कपूर: "युद्ध से किसीका भला नही हुवा!"
संजय दत्त: "सिर्फ ये बात समझने के लिये तुम पुणे से पानिपत तक आये!"

कलाकार आणि अभिनय:
अर्जुन कपूर अभिनयात बराच कमी पडत असला तरी एकूण चित्रपटात, त्यातील कलाकारात आणि कथेत तो सहज सामावून जातो. चित्रपटात ७० टक्के मराठी कलाकार आहेत. संजय दत्त ने भूमिका चांगली वठवली आहे. या चित्रपटात अभिनयाच्या बाबतील आश्चर्याचा सुखद धक्का जर कुणी दिला असेल तर तो म्हणजे कृती सेनॉन हिने! अपेक्षा नसतांना अभिनयाची तिने कमाल केली आहे. सहज सुंदर अभिनयाने तिने मने जिंकली आहेत. शेवटी सदाशिवराव युद्धात धारातीर्थी पडत असतात तेव्हा केवळ आणि केवळ तिच्या चेहऱ्यावरील बदलत जाणारे भाव आणि अश्रू हे बघून आपल्याला भावनिक वाटायला लागते. असाच दमदार अभिनय ठाकरे चित्रपटात जेव्हा तुरुंगातून बाळासाहेब ठाकरे मीनाताई (अमृता राव) यांना पत्र पाठवतात आणि ते पत्र वाचतांना अमृता राव ने चेहऱ्यावर बदलत जाणारे जे भाव दाखवलेत त्याची आठवण आल्यावाचून रहात नाही. मोहनीश बहल नानासाहेब पेशवे आणि अभिषेक निगम विश्वास राव यांच्या भूमिकेत अगदी शोभून दिसतात. रवींद्र महाजनी आणि गश्मीर महाजनी हे दोघेही (पिता पुत्र) यात आहेत. मिलिंद गुणाजी आहे पण खूप छोटी भूमिका आहे. झीनत अमान आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या भूमिका छान. मस्तानीचा मुलगा समशेर, तोफ प्रमुख गारदी आणि नजीब हे पण लक्षात राहतात. शुजा-उद-दौला पण त्याच्या घोगऱ्या आवाजामुळे लक्षात राहतो.

कथेतील बेट्रायल किवा विश्वासघाताबाद्द्ल:
चित्रपटाच्या शिर्षाकाबाबत सांगायचे झाले तर: पानिपतच्या पुढे एक लाईन आहे - "द ग्रेट बेट्रायल" म्हणजे "प्रचंड विश्वासघात" हे कथेत योग्य पद्धतीने मांडले आहे. मराठ्यांना पुण्याहून दिल्लीकडे अब्दालीच्या सेन्याशी लढायला जातांना रस्त्यात त्यांच्या मांडलिक राजांकडून सैन्य, आर्थिक आणि अन्नधान्य मदत मिळत जाते पण त्यापैकी तीन राजांकडून त्यांना धोका मिळतो. दोन वेळेस मराठा सैन्याला त्याचा सुगावा लागून जातो पण तिसऱ्यांदा ऐन युद्ध सुरु असतांना विश्वासघात होतो. तिन्ही विश्वासघातांची कारणे वेगवेगळी असतात. म्हणून प्रचंड मोठा विश्वासघात असेलेली कथा! तसेच या कथेत आणखी दिल्लीतील राजकारणाचा अंतर्गत विश्वासघात पण आहे आणि अब्दालीसोबत त्याच्यात देशात होत असलेला विश्वासघात पण दाखवलेला आहे. पानिपतची कथेची पार्श्वभूमी आणि घडामोडी खूप किचकट, गुंतागुंतीच्या असूनही कथा साधी सोपी आणि सरळ करून पडद्यावर आशुतोष गोवारीकर यांनी मांडली आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन! एकूण या सिनेमात चार ते पाच वेळा आश्चर्याचे धक्के देणारे प्रसंग आहेत!

कथेबद्दल अगदी थोडक्यात सांगतो:
चित्रपटाच्या सुरुवातीला सदाशिवराव आणि राघोबादादा हे दक्षिणेतील उरल्यासुरल्या निजामशाहीचा पाडाव करून येतात. नंतर पेशव्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे सदाशिवराव यांची निवड सेनापती ऐवजी धन मंत्री म्हणून होते. दिल्लीतील नजीब जंगच्या सांगण्यावरून एक लाख सैन्यासह अफगाणीस्तानहून येणाऱ्या अब्दालीच्या आक्रमणाची चाहूल जेव्हा मराठ्यांना लागते तेव्हा पुण्याहून फक्त चाळीस हजाराचे सैन्य घेऊन राघोबादादा यांना नानासाहेब जायला सांगतात तेव्हा राघोबादादा नाही म्हणतात, पण सदाशिवराव एवढ्या कमी सैन्यासह तयार होतात कारण उत्तरेतील मांडलिक राजे सैन्य-मदत देतीलच हा त्यांना विश्वास असतो. सोबत विश्वास राव तसेच पार्वतीबाई आणि इतर बायकापण जातात. इतर अनेक कुटुंब पण सोबत जातात. प्रवासादरम्यान अनेक राजांच्या भेटी घेऊन मदतीचे आश्वासन घेऊन झाल्यावर मराठा सैन्याचा आमना सामना अब्दाली आणि शुजा यांच्या एकत्रित सैन्याशी अनपेक्षितरित्या रोहिला येथे होतो पण मध्ये असते खळाळती यमुना नदी! प्रचंड पाण्याच्या प्रवाहामुळे सैन्यासह आणि लवाजम्यासह यमुना पार करणे अशक्य असल्याने त्यांच्या सैन्याला चकवून मराठा सैन्य नदीपात्राच्या कडेने दिल्लीकडे कूच करून एका घटनेमुळे अस्थिर झालेली दिल्ली जिंकतात आणि आणखी पुढे कुंजपुराकडे जाण्याआधीच अब्दाली सैन्य हत्तीवरून यमुना पार करून मागोमाग आलेलं असतं. तिथे पानिपतचं मैदान असतं आणि युद्ध सुरु होण्याआधी अब्दालीचा मुलगा तैमुर अफगाणीस्तानहून बातमी आणतो की तिथे अब्दालीच्या सिंहासन बळकावण्याच्या हालचाली सुरु आहेत म्हणून अब्दाली युद्ध न करता परत जायचे ठरवतो आणि सदाशिवराव यांचेशी तह करण्यासाठी काही अटी समोर ठेवतो. मग पुढे काय होते ते पडद्यावर बघा.

शेवटच्या अर्ध्या तासाच्या पानिपत युद्धाबद्दल थोडे सांगतो:
आशुतोषने स्पेशल इफेक्टचा भरपूर वापर करण्याचे टाळले आहे आणि त्यामुळे युद्ध प्रसंग अगदी जिवंत झालेत. स्लो मोशन प्रसंग खूप वेळ दाखवण्याचा मोह त्याने टाळला आहे, हे खूप चांगले झाले. 300 या हॉलिवूड युद्धपट मध्ये तसेच बाहुबली युद्धामध्ये खूप स्लो मोशन प्रसंग आहेत. युद्धातील अनेक बारकावे आशुतोषने दाखवलेत. युद्धनीती पण यात दाखवली गेली आहे. युद्ध प्रसंग खूप थरारक आहेत, अंगावर काटा येतो. युद्धात भाग न घेतलेली कुटुंबे आणि बायका पानिपतच्या किल्ल्यावर सुरक्षित असतात तेव्हा तिथे अब्दालीचे सैन्य हल्ला करते तेव्हा पार्वतीबाई सुद्धा लढते. एकूणच शेवटचा अर्धा तास थरारक आहे!

माझे रेटिंग:
चित्रपटाची लांबी जास्त आहे म्हणून कदाचित माझे परीक्षण पण लांबले असे वाटते. चांगले संगीत, किचकट विषय असूनही पडद्यावर सरळ सोप्या पद्धतीने मांडलेली कथा, 90 टक्के कलाकारांचा चांगला अभिनय, भव्य सेट, थरारक युद्धा प्रसंग यामुळे या चित्रपटाला मी पाच पैकी चार स्टार रेटिंग देतो. चित्रपट जरूर बघा!

(लेखन दिनांक: 8 डिसेंबर 2019, रविवार)
- निमिष सोनार, पुणे
sonar.nimish@gmail.com

 

पानिपत चित्रपट परीक्षण: सोपी करून सांगितलेली गुंतागुंतीची कथा!!

Nimish Navneet Sonar
Chapters
पानिपत चित्रपट परीक्षण: सोपी करून सांगितलेली गुंतागुंतीची कथा!!