Android app on Google Play

 

साडेसाती म्हणजे काय?

 

 साडेसाती ला अनेक नावांनी ओळखले जाते, उदा - शनिवारी, आफत, मुसीबत, आपत्ती, साडेसाती. इत्यादी. प्रस्तुत चराचर सृष्टीवर ज्योतिष शास्त्राचा चांगलाच प्रभाव दृष्टीक्षेपास येतो. व्यक्तिगत ज्योतिष , वैद्यक ज्योतिष, अशा प्रकारच्या ज्योतिषशास्त्राच्या अनेक शाखा आहेत. या सर्वांवर ग्रहमानाचा, राशीतील विचारांचा प्रचंड पगडा दिसून येतो. प्रत्येक ग्रहाकडे विशिष्ट जबाबदारी सोपवलेली असते. आपल्या ग्रहमालेतील शनि हा ग्रह दुख प्रदान करणारा असा प्रचार अनेक ज्योतिष ग्रंथातून व्यक्त केलेला दिसून येतो. काही अंशी खरे तर काही अंशी खोटे सुद्धा आहे. हा अनुभव व्यक्तीसापेक्ष आहे. शनि ने जन्माला येताच आपल्या गुणांची चुणुक खुद्द पित्यास म्हणजे रविस दाखविली. न्याय व नितीमत्तेस महत्व देणारा शनि हा साडेसाती निर्माण करतो.

साडेसाती या शब्दाचा अर्थ ७ || वर्षाचा कालावधी होय. शनि सर्व बारा राशी भ्रमण करण्यास ३० वर्षे घेतो. म्हणजे एका राशित शनि २ || वर्ष वास्तव्य करतो. शनिला ग्रहमालेत " छायामार्तड " संबोधन आहे. छाया ग्रह म्हणजे जो ग्रह ज्या राशितून भ्रमण करीत असेल त्या राशीच्या मागील राशितील ग्रहांना व पुढील राशितील ग्रहांना त्रास करतो. हाच विचार साडेसातीत अपेक्षित आहे. जेव्हा शनि बाराव्या जन्मराशीतून आणि द्वितीयातून भ्रमण करतो तेव्हा हा परिपूर्ण काळ साडेसातीचा मानला जातो.

शनि एका राशित २ || वर्ष असतो. तेव्हा तीन शनिच्या एकूण वास्तव्यास साडेसाती म्हणतात. महत्वाचे म्हणजे शनिची विशिष्ट ग्रहामागील, त्या ग्रहावरून व विशिष्ट ग्रहाच्या पुढील स्थानातून होणारे भ्रमण असा २ || x ३ = ७ || वर्षे काळ त्रासाचा समजला जातो. जन्मपत्रीकेतील मूळ चंद्राराशीच्या मागे व पुढे शनि असे पर्यंत साडेसाती समजली जाते. उदा. - एखाद्या जातकाची चंद्ररास तूळ असेल तर शनि ने कन्या राशित प्रवेश केल्यापासून ते वृश्चिक राशितून पुढे जाई पर्यंत साडेसाती सुरु होते किंवा जन्मस्थ चंद्र किती अंशावर आहे त्या अंशावर गोचरीने शनि आल्यावर साडेसाती सुरु होते.

जेव्हा चंद्राचे मागील राशितील शनिचे भ्रमण सुरु होते तो साडेसातीचा पूर्वार्ध होय. जन्मस्थ चंद्रावरून शनि भ्रमण करतो त्याला मध्यकाळ, तर चंद्राचे पुढील राशितून शनि जातो त्या वेळेस अंतकाळ वा उत्तरार्ध म्हणतात. यापैंकी कोणता काळ शुभ व अशुभ हे पाहणे महत्वाचे ठरते.

साडेसाती एक इष्टापती -

पायरी न ओळखता अविचाराने वागून बेभान वागणाऱ्या व्यक्तींना वठणीवर आणण्यासाठी साडेसाती हा रामबाण उपाय होय. आत्मपरीक्षण करण्याची समज नसलेल्यांना सुधारण्याचे, माणुसकीत आणण्याचे कार्य श्री शनिदेव करतो ते फक्त साडेसातीच्या माध्यमातून, म्हणून उच्च विचार केला असता साडेसाती ही एक इष्टापतीच होय. साडेसातीच्या काळात दिसून येणारा अनुभव म्हणजे स्वताच्या बाबतीत सर्वच प्रतिकूल दिसणे किंवा असणे . उदा :- कुठल्याही कामात अपयश , चूक नसताना त्रास भोगावा लागणे, दोस्त मंडळीकडून विश्वासघात, आर्थिक नुकसान, कौंटुबिक कलह वाढणे, मनाविरुद्धच्या घटना भाऊबंदकीचे प्रसंग उत्पन्न होणे, बुडीत जाणे , कोर्ट कचेऱ्यांचे सापडणे, चिवट दुखणी सुरु होणे, मानहानी वा मानसिक अत्याचार सहन करावे लागणे हे प्रकार अनुभवास येतात. साडेसाती हा भोग आहे, तो भोगूनच संपविला पाहिजे. यावर योग्य व जालीम उपाय करून परिणामांची तीव्रता कमी करता येते.