पार्श्वभूमी
राजस्थानच्या चित्तोडगढच्या संग्रामात अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे 'भोसले' हे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित बाबाजीराजे भोसले यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली.