अध्याय ३३
गोरक्षनाथ तीर्थयात्रेस गेला असतां मागें रेवती राणीनें मच्छिंद्रनाथाच्या कलेवराचा नाश केला व पार्वतीनें तें यक्षिणीकडून जतन करुन ठेवण्यासाठी कैलासास वीरभद्राच्या ताब्यांत दिलें, वगैरे झालेला प्रकार गोरक्षनाथास ठाऊक नव्हता. गोरक्षनाथ फिरत फिरत गोदावरीच्या तीरीं भामानगर आहे, त्याच्या जवळच्या अरण्यांत आला. तेथें त्यास क्षुधेनें फारच व्याकुळ केलें. उदकसुद्धां कोठें मिळेना. परंतु तो तसाच फिरत असतां माणिक या नावांचा एक दहा वर्षें वयाचा शेतकर्याचा मुलगा, शेतांत काम करीत असतांना त्यानें पाहिला. ऐन दोनप्रहरीं तो भोजनास बसणार, इतक्यांत गोरक्षनाथानें तेथें जाऊन 'आदेश' केला. तो शब्द ऐकून माणिक तसाच उठला व गोरक्षनाथाच्या पायां पडला आणि तुम्ही कोण, कोठें जातां, येथें आडमार्गांत कां आलेत, वगैरे विचारपूस मोठ्या आदरानें केली. तेव्हां गोरक्षनाथानें सांगितलें कीं, मी जति आहे; मला आतां तहान व भूक फार लागली असून जर कांहीं अन्न पाण्याची सोय होईल तर पाहा. हें ऐकतांच माणिक म्हणाला, महाराज! तयारी आहे भोजनास बसावें. असें म्हणून त्यानें त्यास जेवावयास वाढलें, पाणी पाजिलें व त्याची चांगली व्यवस्था ठेंविली. गोरक्षनाथ जेवून तृप्त झाल्यावर त्यास समाधान वाटलें.
मग गोरक्षनाथानें प्रसन्न होऊन माणिक शेतकर्यास, तुझे नाव काय म्हणुन विचारलें. तेव्हां तो म्हणाला, आतां आपलें तर कार्य झालें ना ? आतां माझें नांव वगैरे विचारण्यांत काय अर्थ आहे? कार्य साधून घेण्यासाठी प्रथम सर्व विचारण्यांत करावयाची जरूर असते; पण आतां ही चौकशी निरुपयोगी ! आतां आपण हळूहळू आपली मजल काढा ! यावर गोरक्षनाथानें उत्तर दिलें कीं, तें म्हणतोस ती गोष्ट खरी; पण आज ऐनवेळीं तुं मला जेवावयास घातलेंस तेणेंकरून मी प्रसन्न झालों आहे; यास्तव तुझ्या मनांत कांही इच्छा असेल ती तूं माग; मी देतों. तेव्हां माणिक म्हणाला, महाराज आपण घरोघर अन्नासाठीं भिक्षा मागत फिरतां, असें असतां तुम्हांस माझ कळवळा आला असला तरी तुमच्याजवळ मला देण्याजोगें काय आहे ? हें ऐकून गोरक्षनाथानें सांगितल की, तूं जें मागशील तें मी देतों. तें माणिकास खरें न वाटून तो म्हणाला, तुम्ही भिक्षुक, मला काय देणार ? तुम्हांलाच कांहीं मागावयाचें असेल तर मागा, मी देतों. तें घेऊन आपण आपला रस्ता सुधारावा.
याप्रमाणें भाषण ऐकुन गोरक्षनाथानें विचार केला कीं, शेतकरी लोक अरण्यांत राहत असल्यानें त्यांना फारसें ज्ञान नसतें; यास्तव आपण याचें कांहीं तरी हित केलें पाहिजे. मग नाथ त्यास म्हणाला, अरे, मी सांगेन ती वस्तु देईन असें तुं म्हणतोस ! पण वेळ आली म्हणजे मागें सरशील. हें ऐकून माणिक वर्दळीवर येऊन म्हणाला, अरे, जो जीवावरहि उदार, तो पाहिजे तें देण्यास मागें पुढें पाहिल काय ? तुला वाटेल तें तूं माग. पाहा मी तुला देतों कीं नाहीं तें असें बरेंच भाषण झाल्यावर गोरक्षनाथानेंहि त्याची परीक्षा पहाण्याकरितां त्यास सांगितलें कीं, जी जी गोष्ट तुला करावीशी वाटेल किंवा ज्यावर तुझी इच्छा असेल, अशाच तुं तिरस्कार करावास, हेंच माझें तुझ्यापाशीं मागणें आहे. तें गोरक्षनाथाचें मागणें त्यानें आनंदानें कबूल केलें व नाथ तेथून पुढें निघून गेला.
नंतर माणिक आपलें आउतादि सामानाचें ओज्ञें डोक्यावर घेऊन शेतांतून घरीं निघाला व प्रथम जेवणाकडे त्याचें लक्ष गुंतलें इतक्यांत गोरक्षनाथ वचन दिल्याची त्यास आठवण झाली. मनांत येईल तें न करणें हाच वचन देण्यांत मुद्दा होता. मग त्याच्या मनांत आलें कीं, मन घरीं जाऊं इच्छीत आहे, त्याअर्थी वचनास गुंतल्याअन्वयें आतां घरीं जातां येत नाहीं. म्हणून तो तेथेंच उभा राहून झोंप घेऊं लागला. डोक्यावर बोचकें तसेंच होतें. मग अंग हलवावयास मन इच्छीत होतें, पण त्यानें अंग हालूं दिलें नाहीं. त्या वचनाचा परिणाम असा झाला कीं, वायुभक्षणा वांचून त्यास दुसरा मार्गच राहिला नाहीं. यामुळें कांहीं दिवसांनीं त्याचें शरीर कृश झालें. रक्त आटून गेलें; तिळभरसुद्धां मांस राहिलें नाहीं त्वचा व अस्थि एक होऊन गेल्या; असें झालें तरी तो रामानामस्मरण करीत एंका जागीं लाकडाप्रमाणें उभा राहिला.
इकडे गोरक्षनाथ फिरत फिरत बदरिकाश्रमास गेला. तेथें बदरिकेदाराच्या पायां पडून चौरंगीनाथाची काय स्थिति झाली आहे. ती पाहावयास गेला. त्यानें गुहेच्या दाराची शिळा काढून आंत पाहिलें तों चौरंगीचें सर्वांग वारुळानें वेष्टून टाकिलेलें, मुखानें रामानामाचा ध्वनि चाललेला, अशी त्याची अवस्था दिसली. ती पाहून गोरक्षनाथ हळहळला. त्यानें त्याच्या अंगावरचें सर्व वारूळ काढून टाकले आणि त्याच्या शरीराकडे पाहिले. तपःसामर्थ्यानें त्यास हातपाय फुटलेले दिसले. मग गोरक्षनाथ आलों आहें, असें बोलून त्यानें चौरंगीस सावध केल व बाहेर घेऊन आल्यावर त्याच्याकडे कृपादृष्टीनें पाहतांच त्यास चांगली शक्ति आली. तेव्हां चौरंगीनाथ गोरक्षनाथाच्या पायां पडला व मी आज सनाथ झालों, असें त्यानें बोलून दाखविलें.
मग गोरक्षनाथानें खाण्यापिण्याची कशी व्यवस्था झाली म्हणून विचारपूस केली. तेव्हां त्यानें उत्तर दिलें कीं , मला माहीत नाही. तें चामुंडा सांगेल. मग तिला विचारल्यावर ती म्हणाली, आम्ही रोज फळें आणून देत होतों, परंतु चौरंगीचें लक्ष वर शिळेकडे असल्यामुळें त्यानें तीं भक्षण केलीं नाहींत. इतकें बोलून चांमुडेनें फळांचे पर्वताप्रमाणें झालेले ढीग दाखविले. ते पाहून गोरक्षनाथास विस्मय वाटला. त्याने चोरंगीच्या तपाची फारच वाखाणणी केली व आपला वरदहस्त त्याच्या मस्तकीं ठेविला. मग तो त्यास घेऊन बदरिकेदाराच्या देवालयांत गेला. तेथें उमारमणास जागृत करून चौरंगीस भेटविलें. नंतर गोरक्षनाथानें सहा महिनें तेथें राहून चौरंगीनाथाकडून विद्याभ्यास करविला व शस्त्रास्त्रविद्येंत त्यास आशीर्वाद देवविले.
नंतर बदरिकेदारेश्वरास वंदन करून गोरक्षनाथ चौरंगीनाथास घेऊन निघाला आणि वैदर्भदेशांत उतरून कौंडण्यपुरास गेला. तेथें चौरंगीनाथास आपल्या आईबापांस भेटून येण्यास सांगितलें , त्यांनीं तुझे हातपाय तोडिले. म्हणुन तूं आपला प्रताप त्या दोघांस दाखीव असेंहि गोरक्षनाथानें सुचविलें. त्या आज्ञेप्रमाणें चौरंगीनाथानें वातानें भस्म मंत्रुन तें राजाच्या बागेकडे फुंकिलें. तें वातास्त्र सुटतांच बागेंत जे सोळाशें माळी रखवालीस होते, ते सर्व वादळ सुटल्यामुळें आकाशांत उडून गेले. मग वातास्त्र काढून घेतांच ते सर्वजण खालीं उतरले. त्यांतुन कित्येक मूर्च्छना येऊन पडले; कित्येक पळून गेले. कित्येकांनीं जाऊन हा बागेंत झालेला प्रकार राजाच्या कानांवर घातला. तेव्हां सर्व विस्मयांत पडले. मग हें कृत्य कोणाचं आहे, ह्याचा शोध करण्याकरितीं राजानें दूतांस पाठविलें. ते दूत शोधाकरितां फिरत असतां त्यांनीं पाणवठ्यावर या उभय नाथांस बसलेले पाहून राजास जाऊन सांगितलें कीं, महाराज ! पाणवठ्यांशीं दोन कानफडे गोसावी दिसत आहेत ! ते महातेजस्वी असून त्यांच्याजवळ कांहीं तरी जादू असावी असें दिसतें.
दूतांचें भाषण ऐकून राजनें विचार केला कीं, हे गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ असतील, त्यांस आपण शरण जावें; नाहीं तर हें नगर पालथें घालून ते सर्वाचे प्राण संकटांत पाडतील. मग तो आपल्या लव्याजम्यानिशीं त्यास सामोरा गेला. तेव्हां आपला प्रताप दाखविण्याची गोरक्षनाथानें चौरंगीनाथास आज्ञा केली. त्या अन्वयें त्यानें राजाबरोबर आलेल्या सैन्यावर वातास्त्राची योजना केली. त्याक्षणींच राजासहवर्तमान सर्व लोक हत्ती, घोडे, रथासुद्धां आकाशांत उडून गेले. त्यामुळें सर्व भयभीत होऊन त्यांची प्रार्थना करूं लागले मग गोरक्षनाथाच्या आज्ञेवरून चौरंगीनाथानें पर्वतास्त्र सोडून वातास्त्र परत घेतलें. तेव्हां सर्वजण पर्वतास्त्राच्या आश्रयानें हळूंहळूं खाली उतरले.
मग गोरक्षच्या आज्ञेनें, चौरंगी आपला पिता जो शशांगार राजा, त्याच्या पायां पडला व आपण पुत्र असल्याची त्यानें ओळख दिली. ओळख पटतांच राजानें त्यास पोटाशी धरिलें. नंतर राजा गोरक्षनाथाच्या पायां पडला. मग त्या उभयतांचीं चौरंगीच्या प्रतापाविषयीं भाषणें झाली. इतक्यांत चौरंगीनें वज्रांस्त्र सोडून पर्वतास्त्राचा मोड केला.
थोड्या वेळानें राजानें घरीं येण्याबद्दल गोरक्षनाथास अति आग्रह केला; पण चौरंगीनें राजास सांगितलें कीं, तुझ्या घरीं आम्हीं येणार नाहीं, कारण सावत्र आईच्या कपटी बोलण्यावर विश्वास ठेवुन तूं माझे हातपाय तोडिलेस. असें बोलून मुळारंभापासुन खरा घडलेला वृत्तांत त्यानें सांगितला. त्यासमयीं आपलीं भुजावंती स्त्री जारिणी आहे असें समजून राजास तिचा अत्यंत राग आला. त्यानें राणीस मारीत झोडीत तेथें घेऊन येण्याची सेवकांस आज्ञा केली, परंतु तसें करण्यास चौरंगीनें किरोध केला. घरींच तिला शिक्षा करावी असें त्याचें मत पडलें. मग त्या दोघांस पालखीत बसवुन राजा आपल्या वाड्यांत घेऊन गेला. तेथें राजानें राणीचा अपराध तिच्या पदरांत घालून तिला शिक्षा केली व घरांतुन घालवून दिलें. नंतर गोरक्षनाथानें राजाचे शांतवन करून दुसरी स्त्री करण्याची आज्ञा केली व आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून वंश वाढेल असा आशीर्वाद दिला. तेथें गोरक्षनाथ एक महिना राहून चौरंगीनाथास घेऊन तेथून पुढें गेला.
कौंडण्यापूर सोडल्यावर ते फिरत फिरत प्रयागास गेले तेथें स्नान करून शिवालयात देवाचें दर्शन घेतल्यानंतर पूर्वीच्या गुरविणीस बोलावून गोरक्षनाथानें तिला गुरुच्या देहाबद्दल विचारलें तेव्हां ती भयभीत होऊन थरथरां कापूं लागली. अडखळत बोलूं लागली. ती त्याच्या पायां पडली व म्हणाली, महाराज,रेवती राणीनें मला धमकी देऊन विचारल्यावरून मी खरी गोष्ट तिच्यापाशीं सांगितली. गुरुच्या देहाची कय व्यवस्था झाली आहे ती प्रत्यक्ष जाऊन पाहावी. असा जेव्हां तिच्या बोलण्याचा आशय दिसला, तेव्हां गोरक्षाच्या मनांत संशय उत्पन्न झाला. तो लागलाच भुयाराकडे गेला व दार उघडून पाहातो तो आंत मच्छिंद्रनाथाचें प्रेत दिसेना. तेव्हा तो शोक करूं लागला. तें पाहून गुरविणीनें त्यास सांगितलें कीं, तुम्हीं अंमळ स्वस्थ बसा; मी राणीस भेटून तिनें प्रेताची काय व्यवस्था केली आहे, तें विचारून येतें. असे सांगून ती लागलीच तेथून निघाली.
नंतर तिनें राजवाड्यांत जाऊन राणीची भेट घेतली आणि राणीस म्हटलें, मच्छिंद्रनाथाच्या शरीराबद्दल मी तुमच्यापाशीं गोष्ट काढून बारा वर्षाची मुदत सांगितली होती, ती पुरी झाली म्हणुन मला आज त्या गोष्टीचें स्मरण झाल्यावरून आपल्याकडे आलें आहें, तें तिचें भाषण ऐकून राणी तिला एकीकडे घेऊन गेली व म्हणाली राजा त्रिविक्रमाच्या देहांत मच्छिंद्रनाथानें प्रवेश केला व आपला राजा त्रिविक्रमाच्या देहांत मच्छिंद्रनाथानें प्रवेश केला व आपला देह शिष्याकडून शिवालयाच्या भुयारांत लपवून ठेविला वगैरे हकीकत तुं मला सांगितलीस. त्यानंतर थोड्याच दिवसांत तुझ्या नकळत मीं त्याच्या शरीराचे तुकडे करून ते रानांत टाकून दिले. या गोष्टीस आज पुष्कळ दिवस झाले. ते तुकडे किडीमुंग्यांनीं खाऊन सुद्धां टाकले असतील. अशा रीतीनें मी चिंतेचें बीज समूळ खणुन टाकिलें. आतां तूं निर्धास्त राहा.
राणीचें हे भाषण ऐकून ती फारच घाबरली. परंतु नशिबावर हवाला ठेवुन व आतां पुढें काय भयंकर परिणाम होणार अशी भीति मनांत आणुन तिनें परत येऊन गोरक्षनाथास ती हकीकत सांगितली. तेव्हां त्यास अत्यंत राग आला आणि राणीस शिळा करण्याचें त्याच्या मनांत आलें. परंतु आतां ती मच्छिंद्रनाथाची स्त्री असल्यामुळें आपली माता झाली. असा विचार येऊन तिला शिक्षा करण्याचा विचार त्यानें सोडून देला. त्यानें मनांत विचार केला कीं, गुरुच्या शरीराचे तुकडे झाले असले तरी ते नाश पावावयाचे नाहींत. कोठें तरी पडलेले असतील, ते शोधून काढावे. नंतर त्या उद्योगास लागल्याचें त्यानें ठरविलें आणि तो चौरंगीस म्हणाला, मच्छिंद्रनाथाच्या देहाचा शोध करण्याकरितां मी माझा देह येथें ठेवून सूक्ष्मरूपानें जातों, माझ्या शरिराचें तूं नीट संरक्षण कर. येथील राणी रेवती हिनें मच्छिंद्राच्या देहाचा जसा नाश केला तसा ती माझ्याहि शरीराचा नाश करील. यास्तव फार सावधगिरी ठेव. असें सांगून गोरक्षनाथ शरीरांतुन प्राण काढून जिकडे तिकडे पाहूं लागला. त्यानें सुक्ष्म रूपानें सर्व पृथ्वी, पाताळ, स्वर्ग आदिकरून सर्व ठिकाणी धूंडून पाहिलें; पण पत्ता लागेना. शेवटी तपास करीत करीत तो कैलासास गेला व शिवगणांस पाहू लागल. तेथें मच्छिंद्रनाथाच्या अस्थि, त्वचा, मांस वगैरे त्यास दिसुन आलें.
त्या वेळेस त्या शिवगणांस वीरभद्र सांगत होता कीं, बारा वर्षांची मुदत पुरी झाली; आतां मच्छिंद्रनाथाच्या शरीराचें रक्षण करण्यास फारच सावध राहा. कारण, त्याचा शिष्य गोरक्षनाथ हा शोध करण्यासाठीं केव्हां कोणत्या रूपानें येईल याचा नेम नाहीं.हे वीरभद्राचे शब्द गोरक्षनाथाच्या कानीं पडतांच तो तेथून निघुन पुनः परत येऊन आपल्या देहांत शिरला. मग गोरक्षनाथ व चौरंगीनाथ एक विचार करून भस्म व झोळी घेऊन युद्धास सिद्ध झाले. गोरक्षनाथानें सूर्यावर प्रथम पर्वतास्त्राची योजना केली, तेणेंकरून त्याचा रथ चालेना. सूर्यानें वज्रास्त्रानें पर्वतास्त्राचा मोड केला व मला अडथळा करण्यासारखें पर्वतास्त्र सोडणारा कोण, ह्याचा सूर्यानें मनांत शोध केला, तो गोरक्षनाथाजवळ आला. त्याचा ताप लागूं नये म्हणुन गोरक्षनाथानें चंद्रास्त्राची योजना करुन कोटी चंद्र निर्माण केले; तेणेंकरून थंडावा येऊन सूर्याचा ताप लागेनासा झाला. नंतर गोरक्ष व चौरंगी हे दोघेहि सूर्याच्या पायां पडले. ह्या वेळेस मला हैराण करण्याचें कारण कोणतें, म्हणुन सूर्यानें विचारल्यावर गोरक्षनाथानें सांगितलें कीं, मच्छिद्रनाथाचा देह शिवगणांनी कैलासास नेला आहे. यास्तव आपण मध्यस्थी करून तो आमच्या हातांत येईल असें करावें. म्हणजे आपले आम्हांवर मोठें उपकार होतील.
गोरक्षनाथाचें तें भाषण ऐकून शिष्टाई करण्याचें कबूल करुन सूर्य कैलासास गेला. त्यास पाहतांच शिवगणांनीं त्याच्या पायां पडून येण्याचें कारण विचारिल्यावर गोरक्षनाथकडून मध्यस्थीचें काम घेऊन आलों आहें. असें सांगून सूर्यानें त्यांस मच्छिंद्रनाथाचें शरीर परत द्यावें म्हणुन फारच सुरस बोध केला व गोरक्षनाथाचा प्रतापहि वाखाणिला. परंतु सूर्याच्या बोलण्याचें वीरभद्राजवळ वजन पडलें नाहीं. त्यानें उत्तर दिलें कीं, मच्छिंद्रनाथानें आम्हांस अत्यंत त्रास देऊन दुःसह दुःखे भोगावयास लावून आमचे प्राण सुद्धा धोक्यात घातले; असा शत्रु अनायासें आमच्या तावडीत आलेला असल्यानें प्राण गेले तरी आम्ही त्यास सोडून देणार नाहीं, जर गोरक्ष युद्ध करील तर त्याचीहि मच्छिंद्राप्रमाणें अवस्था करुं. असें वीरभद्राचें वीरश्रीचें भाषण ऐकून सूर्यानें त्यास सांगितलें कीं,एवढे पाणी जर तुमच्यामध्यें होतें तर मच्छिंद्रनाथानें मागें तुमच्यी दुर्दशा करून प्राणावर आणुन बेतविलें, तेव्हां तुमचा प्रताप कोणीकडे लपून राहिला होता ? आतां तो सहज तुमच्या हातात आला म्हणून तुम्हीं इतकी मिजाज करित आहां. पण मच्छिंद्र आणि गोरक्ष हे दोघे सारखे बलवान आहेत. शिवाय त्या वेळेस मच्छिंद्रनाथ एकटाच होता. आतां गोरक्षानाथाच्या साह्यास चौरंगीनाथ आला आहे, यास्तव तुझ्या या अविचारी व दांडगाईच्या उत्तरेनें चांगला परिणाम घडून येणार नाहीं. परंतु सूर्यानें सांगितलेलें हें सर्व भाषण फुकट गेलें व कांहीं झालें तरी मच्छिंद्राचा देह परत देणार नाहीं, असें वीरभद्रादिकांनीं स्पष्ट सांगितलें.
मग सूर्याने त्यास सांगितलें कीं , तुम्हीं आतां इतकें करा कीं, हें युद्ध कैलासास न होतां पृथ्वीवर होऊं द्या. कैलासास झालें तर कैलासाचा चुराडा होऊन जाईल; असें सांगुन सूर्य तेथून निघाला.
सूर्य निघून गेल्यावर युद्धाकरितां तुम्हीं पुढें चला मी मागाहून लवकर येतों असा वीरभद्राचा शिवगणांस हुकूम झाला. त्याप्रमणें अष्टभैरव, गुण आदिकरून सर्व युद्धास येऊन थडकले.बहात्तर कोटि चौर्याऐंशीं लक्ष गण शस्त्रास्त्रांसह युद्धांस आले असे पाहून गोरक्ष व चौरंगी सावध झाले. दोन्हीं बाजु जयाची इच्छा धरून लढू लागल्या. शेवटीं चौरंगीच्या मोहिनी व वातास्त्रांनी वीरभद्राच्या दळांतील लोकांचा मोड होऊन ते भ्रमिष्टासारखे होऊन देहभान विसरले. इतक्यांत वीरभद्र चामुंडांसह येऊन दाखल झाला. आपल्या दळाचा पराभव झाला असें पाहून वीरभद्र गोरक्षनाथावर चवताळला. त्यांनी एकमेकांच्या नाशास उद्युक्त होऊन शस्त्रास्त्रांचा एकसारखा मारा चालूं केला. परंतु गोरक्षाच्या शक्तीमुळें वीर भद्राचीं अनेक शस्त्रें व अस्त्रें दुर्बल झाली. शेवटीं गोरक्षनाथानें संजीवनीं अस्त्राची योजाना करुन सकल दानव उठविले. त्यात त्रिपुर, मधु महिषासुर , जलंधर काळयवन, अद्यासुर , बकासुर, हिरण्यापक्ष, हिरण्याकशिपु , मुचकुंद, वक्रंदत, रावण, कुंभकर्ण इत्यादि अनेक महापराक्रमी राक्षस युद्धासाठीं येऊन पोचलें. त्यावेळीं तेहतीस कोटि देवांनीं रणक्षेत्र सोडून आपपली विमानें पळविली व त्यांना मोठी चिंत्ता उप्तन्न झाली. त्यांनीं वैकुंठास जाऊन हा सर्व प्रकार श्रीविष्णुच्या कानांवर घातला. तेव्हां अतां पुनः अवतार घ्यावा लागेल, असें वाटून त्यालाहि काळजी पडली, मग विष्णुनें शंकरास बोलावून आणुन सर्व वृत्तांत त्यास सांगितला व वीरभद्राच्या वेडेपणानें या पल्ल्यास गोष्ट आली, असें सांगितलें.
मग तंटा मिटवून विघ्न टाळण्यासाठीं ते गोरक्षनाथाकडे गेले व त्यास त्यांनी पुष्कळ प्रकारांनी समजावून सांगितलें. परंतु गुरुचें शरीर माझ्या स्वाधीन करा म्हणजे तंटा मिटेल, असें गोरक्षनाथानें स्पष्ट उत्तर दिलें, मग शंकरानें चामुंडास पाठवुण मच्छिंद्रनाथाचा देह आणविला. व गोरक्षनाथाच्या स्वाधीन केला आणि राक्षसांस अदृश्य करावयास सांगितले. तेव्हा गोरक्ष म्हणाला, अस्त्राच्या योगानें राक्षस उप्तन्न न होतां संजीवनीं मंत्रप्रयोग केल्यामुळें राक्षस उप्तन्न झालें आहेत. यास्तव पुनः अवतार घेऊन त्यास मारुन टाका किंवा वीरभद्राची आशा सोडा. दोहोंतुन जसें मला सांगाल तसें मी करितो. हें ऐकून शकरानें सांगितलें कीं, मधुदैत्य माजला त्या वेळेस आम्ही रानोमाळ पळुन गेलों, शेवटीं एकादशीस अवतार घेऊन त्याचा नाश करावा लागला. अशीं संकटें अनेक वेळां सोसावीं लागली यास्तव आतां विलंब न लावितां लौकरच राक्षसांचा बंदोबस्त कर; आम्हीं वीरभद्राची आशा सोडून दिली असें शिव व विष्णु त्यास म्हणूं लागले. त्या वेळीं प्रतापवान वीरभद्र एकटाच त्या राक्षसमंडळींशीं लढत होता. तें पाहून गोरक्षनाथानें वाताकर्षण अस्त्राची योजना केली आणि मंत्र म्हणुन भस्म फेंकतांच वीरभद्रासह सर्व राक्षस गतप्राण होऊन निश्चेष्ट जमिनीवर पडले. तेव्हां शंकर व विष्णु यांनीं गोरक्षनाथाची स्तुति केली. मग गोरक्षनाथानें अग्न्यस्त्र योजून निश्चेष्ट पडलेल्यांस जाळून टाकलें हा वाताकर्षण प्रयोग नाथपंथावांचून देवदानवांस ठाऊक नव्हता.