पत्रकारिता
मुंबईतल्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकवताना, समाजात वावरताना बाळशास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत. पारतंत्र्याने ग्रासलेला देश, याबरोबरच समाजातील अनेक रूढी, चालीरीती, अज्ञान, दारिद्र्य, भाकड समजुती यामुळे एतद्देशीय समाज कसा व्याधिग्रस्त झाला आहे, या विचाराने ते चिंताग्रस्त असत. त्यांना जाणवले की, केवळ महाविद्यालयात शिकवून उपयोग नाही; तर संपूर्ण समाजालाच धडे दिले पाहिजेत. श्रीपती शेषाद्री नावाच्या एका मुलाला त्यांनी योग्य मार्ग दाखवला; मात्र लवकरच समाजाचे प्रबोधन करण्यासाठी वृत्तपत्र काढावे, असे त्यांना वाटू लागले. या जाणिवेतून आपले सहयोगी गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजनांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले.
जानेवारी ६, इ.स. १८३२ रोजी दर्पणाचा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांसाठी वृत्तपत्राची भाषा मराठी ठेवण्यात आली असली तरी ब्रिटिश शासनापर्यंत आपला आवाज जावा या हेतूने, वृत्तपत्राचा एक स्तंभ इंग्लिश भाषेत असायचा [१]. वृत्तपत्राची किंमत १ रुपया होती. इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषेत प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र! या अंकात दोन स्तंभ असत. उभ्या मजकुरात एक स्तंभ (कॉलम) मराठीत आणि एक स्तंभ इंग्रजीत असे. मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहिले आहे, हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी इंग्रजी मजकूर होता. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी लोकांना नवीन होती. त्यामुळे दर्पणचे वर्गणीदार सुरुवातीच्या काळात खूप कमी होते. पण हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. दर्पण अशा रीतीने साडे आठ वर्षे चालले आणि जुलै, इ.स. १८४० ला त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.
दर्पण वृत्तपत्रासोबत मराठीतले पहिले मासिक 'दिग्दर्शन' त्यांनी इ.स. १८४० साली सुरू केले. 'दिग्दर्शन' मधून ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, व्याकरण, गणित तसेच भूगोल व इतिहासावर लेख प्रकाशित करत. भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी हे त्यांचे विद्यार्थी त्यांना या कामी मदत करत.[२] या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी ५ वर्षे काम पाहिले. या मासिकातून त्यांनी भूगोल, इतिहास, रसायन शास्त्र, पदार्थ विज्ञान, निसर्ग विज्ञान आदी विषयांवर्चे लेखन नकाशे व आकृत्यांच्या साहाय्याने प्रसिद्ध केले. या अभिनव माध्यमातून त्यांनी लोकांची आकलनक्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला. ६ जानेवारी १८३२ रोजी जांभेकर यांनी पहिले "दर्पण" हे मराठी वृत्तपत्र काढले. दर्पण या वृत्तपत्रात इंग्रजी व मराठी भाषेमध्ये मजकूर असायचा. या वर्तमानपत्राचा उद्देश हा स्वदेशीय लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि या देशाची समृद्धी येथील लोकांचे कल्याण या विषयी स्वतंत्रेतेने आणि उपपद्धतीने विचार करावयास व्हावे.