Get it on Google Play
Download on the App Store

मी व योग

वयाच्या चाळीशीपर्यंत मी योग हा शब्द केवळ ऐकलेला होता .व्यायाम म्हणजे दंड बैठका एवढीच समजूत होती .तोही अधूनमधून केला तर केला ,नाही तर नाही केला ,अशी परिस्थिती होती .लहानपणापासून खेडेगावात रहात असल्यामुळे व वाहतुकीच्या सोई अत्यंत कमी असल्यामुळे दररोज चार पाच किलोमीटर चाल सहज होत असे .कधी कधी तर पंधरा किलोमीटर सुद्धा चाल सहज होत असे .पुण्याला असताना सायकलिंग खूपच होत असे .मुंबईला दोन वर्षे होतो.माझा जॉब फॅक्टरी इन्स्पेक्टरचा होता.त्यामुळे एकूण चाल खूप होत असे. नाशिकला आल्यावर सायकलिंग व चालणे हे भरपूर प्रमाणात होत असे .

नाशिकहून नाशिकरोडला प्रमोशनवर माझी बदली झाली .स्कूटर घेतली .नाशिकची थंड हवा, स्कूटरवर फिरणे ,चालण्याचा व सायकलिंगचा व्यायाम बंद अशी स्थिती निर्माण झाली .वयही चौतीसच्या पुढे गेले . वाढते वय स्कूटरवरील थंडगार हवा आणि व्यायामाचा अभाव याचा एकत्रित परिणाम म्हणून तीव्र स्वरूपाची सर्दी व दमा हे दोन्ही सुरू झाले .मी लहानपणापासून थंड पाण्याने स्नान करीत असे तसे इथेही स्नानासाठी गार पाणीच वापरत असे.गरम पाणी स्नानासाठी वापरून पाहिले.सर्दी आणखी वाढली . कमी झाली नाही.डॉक्टरी उपाय व इतरही उपाय चालू होते .शिंका, नाक गळणे, नाक चोंदणे ,नाक अजिबात बंद होणे, श्वास तोंडातून घेणे भाग पडणे ,दमा ,रात्री झोप नाही .औषध घेतल्यावर नाक थोडावेळ उघडे ,श्वास थोडासा घेता येई नंतर नाक पुन्हा बंद होई.स्टिरॉइडस् घेतल्यावर पूर्ण बरे वाटे पण ते तात्पुरते असे.स्टिरॉइड्स वारंवार घेणे सर्वच दृष्टींनी घातक त्यामुळे त्यावर जोर देता येईना . इतर औषधे लागू पडत परंतु ती वारंवार बदलावी लागत व डोसही वाढवावा लागे.दोन तीनदा तर मला तीव्र दमा आटोक्यात यावा म्हणून इंजेक्शनसही घ्यावी लागली .या सर्वांचा प्रकृतीवर व झोपेवर फार वाईट परिणाम झाला .माझा व्यवसाय बोलण्याचा(प्राध्यापक ) असल्यामुळे एकूण परिस्थिती बिकट झाली .काय करावे काही सुचेना .अडुसष्ट सालापासून त्रास थोडाथोडा सुरू झाला व तो क्रमश: वाढत वाढत एकूणिसशेत्र्याहत्तर सालापर्यंत खूप वाढला .त्या वेळी नाशिकला यौगिक उपचार केंद्रे नव्हती.अशा चिवट रोगावर यौगिक उपचार लागू पडतात असे कुठेतरी वाचनात आले .लोणावळ्याला कुवलयानंदाचा आश्रम आहे. तिथे यौगिक उपचार होतात. तिथे दीर्घकाळ राहावे लागते असे कोणीतरी सांगितले .त्यांची एक शाखा चर्नी रोडला तारापोरवाला मत्स्यालयाच्या शेजारी आहे.तिथे उपचार होतात व शास्त्रशुद्ध यौगिक शिक्षण दिले जाते असे कळले. माझे एक मेहुणे मुंबईला झावबाची वाडी येथे राहत असत .त्यांना सविस्तर पत्र पाठविले व सर्व चौकशी करण्यास सांगितले .तेथील कोर्स कमीत कमी तीन महिन्यांचा होता मला दिवाळीची सुट्टी एकच महिना होती. दोन महिने आणखी रजा काढावी लागली असती.मला एक महिन्यामध्ये सर्व क्रिया प्रक्रिया शिकवणार का असे विचारण्यास सांगितले.त्यांचा होकार आल्यावर मी मुंबईला माझ्या लांबच्या बहिणीकडे राहून हा कोर्स करण्याचे ठरविले .झावबाच्या वाडीपासून ही इन्स्टिट्यूट जवळ होती .त्यांची सर्व पद्धत शास्त्रोक्त होती. प्रथम एमबीबीएस डॉक्टरकडून सर्व तपासण्या केल्या जात. त्यानंतर तेथील डॉक्टर रोगानुसार कोणत्या क्रमाने कोणते उपचार केले पाहिजेत हे( प्रिस्क्रिप्शन )लिहून देत.क्रिया अासने बंध व प्राणायाम अशी एकामागून एक साखळी होती . तेथील इन्स्ट्रक्टर आपल्याकडून त्या त्या गोष्टी करून घेत.सुरुवातीला एक लिटर खारे पाणी किंचित कोमट करून पिणे, नंतर पोटात घशातून एक रबरी ट्यूब टाकून ते सर्व बाहेर काढणे म्हणजे वमन,

त्यानंतर नाकामध्ये एक छोटी ट्यूब टाकून ती घशातून काढून ताक घुसळल्या प्रमाणे दोन्ही नाकपुड्या साफ करणे . (नोझल मसाज)त्यानंतर अठरा फूट लांबीची व दोन इंच रुंदीची मलमलची पट्टी निर्जंतुक करून (पाण्यात बराच वेळ उकळून )गिळण्याचा प्रयत्न करणे,अश्या सुरुवातीच्या क्रिया होत्या . ही पट्टी अर्ध्या तासाच्या आत गिळता आली पाहिजे .घडय़ाळाकडे लक्ष ठेऊन पंचवीस मिनिटे झाल्याबरोबर पट्टी बाहेर ओढून काढली पाहिजे.त्यासाठी त्यांनी पुढील कारण सांगितले .दर अर्ध्या तासाने जठराचा आतड्याकडे जाणारा व्हॉल्व्ह उघडतो .त्याआधी पट्टी पूर्णपणे ओढून जठरातून बाहेर निघाली पाहिजे . नाहीतर पट्टी जठर व आतडे यांमध्ये अडकेल . हे सर्व व्यवस्थित जमण्याला वेळ लागतो .वमन व नाकपुडयांचा मसाज जमण्याला मला पंधरा दिवस लागले .कापडाची पट्टी तर घशातून अातच जाईना ती ताबडतोब बाहेर फेकली जाई.घसा प्रतिक्षिप्त क्रियेने ट्यूब व पट्टी (फॉरेन बॉडी )बाहेर फेकून देतो. नाकातून ट्यूब घातल्यावर ती घशात येते .नाकातून घश्यापर्यंत सरकवणे हेही कौशल्याचे काम आहे .ती हाताच्या चिमटीने बाहेर पकडून काढणे हेही कौशल्याचे काम आहे .सवय होण्याला वेळ लागतो .सवयीने सर्व काही साध्य होते .मी इथे येईपर्यंत कापडाची पट्टी घशातून किंचितही आत जात नव्हती .इथे आल्यावर पट्टी आत जाण्याला मला आणखी एक महिना म्हणजे एकूण दोन महिने लागले .एक वर्ष संपूर्ण अठरा फूट लांबीची पट्टी पोटात जाण्याला लागले.वमन केलेले पाणी व घशातून गिळून नंतर बाहेर काढलेली पट्टी श्लेष्मयुक्त कलर बाय टेक्निकलर असे. या क्रियेनंतर विशिष्ट अासने ,नंतर काही बंध ,मुद्रा, नंतर तीन चार८ प्रकारचे प्राणायाम शिकविले .महिन्याभर्‍यात एकूण तंत्र शिकून घेतले.इथे आल्यावर त्याचा अभ्यास प्रामाणिकपणे सुरू केला. या सर्वामुळे त्यांच्या म्हणण्या प्रमाणे एकूण श्वसनमार्गाची व आंतरिक शुद्धी होते .आमचे कॉलेज सकाळचे होते त्यामुळे पहाटे साडेचारला उठून या सर्वाला सुरुवात करावी लागे.एक वर्ष कठोर तपस्या केली .नंतर क्रिया सोडून दिल्या फक्त आसने बंध मुद्रा व प्राणायाम तेवढाच चालू ठेवला.योगा वरची काही पुस्तके विकत आणली होती. त्यानुसार व वेळोवेळी इतर काही जणांकडून पाहून त्यामध्ये भर घालीत गेलो .किंचित खारट पाणी पिण्याचे काम जवळ जवळ दोन हजार बारा पर्यंत चालू होते .हल्ली सकाळी दोन तीन फुलपात्रे गार पाणी पितो .आसनाअगोदर काही व्यायामाचे प्रकार करतो .वयानुसार हळूहळू काही आसने बंद केली.काही व्यायाम प्रकार बंद केले .आवर्तनाचे प्रमाण कमी केले .सर्व आसने पूर्णपणे जमली असे नाही .शरीराला नैसर्गिकरित्या जेवढे जमेल तेवढेच करावे हे मुख्य सूत्र होय.दमता कामा नये हे आणखी एक सूत्र .कोणताही व्यायाम योग वगैरे केल्यावर उत्साह वाढला पाहिजे .थकावट येता कामा नये.

गेली पंचेचाळीस वर्षे अव्याहत हे सर्व मी करीत आहे .(प्रवास आजारपण काही सण समारंभ वगैरे अर्थातच वगळून )आज माझे वय पंच्याऐंशी वर्षे आहे .

या सर्वामुळे माझी सर्दी पूर्ण गेली नाही. त्याच प्रमाणे दमाही गेला नाही .तीव्रता व अॅटॅक येण्याचे प्रमाण कमी झाले .एकूण जीवन सुसह्य झाले असे म्हणता येईल .निवृत्त झाल्यापासून गेली पंचवीस वर्षे सर्दी दमा यांचे प्रमाण बरेच कमी झाले आहे .गरजेप्रमाणे अॅलोपथी होमिओपथी आयुर्वेद इत्यादीचा वापर मी करतो. शेवटी आपल्याला काय सोसते काय सोसत नाही काय करावयाचे व काय नाही ते ज्याचे त्याने ठरवायचे आहे .दीर्घायुष्य व तुलनात्मक निरोगी जीवनाचे काही श्रेय निश्चितपणाने योग प्रक्रियेला जाते.

१४/७/२०१८ ©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com