उत्सवाचे स्वरूप
बुद्ध पौर्णिमेला बोधगया येथे जगभरातून बौद्ध अनुयायी येतात आणि प्रार्थना करतात. बिहारमधील बोधगया हे बौद्ध धर्मानुयायांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी सात वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यांना त्यानंतर त्यांना बोधगया येथील एका-बोधिवृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञानप्राप्ती झाली. ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली. तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. बुद्ध पौर्णिमेच्या वेळी कुशीनगर येथे महापरिनिर्वाण विहार या ठिकाणी एक महिना तथागत गौतम बुद्धांचे स्मरण केले जाते. हे ठिकाण गौतम बुद्ध यांच्याशी संबधित असले तरी बौद्धांसह आजूबाजूच्या परिसरातील अन्य लोक देखील या ठिकाणाला मोठ्या संख्येने भेट देतात व येथील बुद्ध विहारात आस्थापूर्वक पूजा करतात. या विहाराचे महत्त्व गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणा शी जोडले गेले आहे. या विहाराचे स्थापत्य अजिंठा लेण्यांच्या विहारासारखे आहे. या विहारात गौतम बुद्धांची अंतिम क्षणाच्या मृत्युशय्येवर पडलेल्या अवस्थेतील (भू-स्पर्श मुद्रा) ६.१ मीटर लांबीची मूर्ती आहे. ही मूर्ती लाल मातीपासून बनवलेली आहे. जेथून मूर्तीसाठी माती काढली आहे तेथेच हा विहार तयार केला आहे. विहाराच्या पूर्व भागात एक स्तूप आहे. तेथे गौतम बुद्धांवर अंतिम संस्कार झाले.
बुद्ध जयंतीच्या दिवशी बौद्ध अनुयायी घरांमध्ये दिवे लावतात. घरे फुलांनी सजवतात. बौद्ध परंपरेतील धार्मिक ग्रंथांचे वाचन, पठण केले जाते. विहारातील तसेच घरातील बुद्धांच्या मूर्तीची फुले वाहून, दिवे ओवाळून पूजा केली जाते. बोधिवृक्षाचीही पूजा केली जाते आणि त्याच्या फांद्यांना पताकांनी सुशोभित केले जाते. वृक्षाच्या आसपास दिवे लावले जातात. झाडाच्या मुळाशी दूध आणि सुगंधी पाणी घातले जाते. या दिवशी केलेल्या चांगल्या कामांमुळे पुण्य मिळते अशी समजूत आहे.
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दिल्ली येथील संग्रहालयातील बुद्धाच्या अस्थी सर्वांच्या दर्शनासाठी बाहेर ठेवल्या जातात, तिथेही येऊन लोक प्रार्थना करतात. या दिवशी बौद्ध धर्माचे अनुयायी बौद्ध परंपरेतील लुंबिनी, सारनाथ, गया, कुशीनगर, दीक्षाभूमी अशा पवित्र धर्मस्थळांना जाऊन प्रार्थना व पूजा करतात. बौद्ध धर्माशी संबंधित सूत्रे, त्रिपिटके यातील भागांचे वाचन व पठण केले जाते. व्रताचा भाग म्हणून या दिवशी उपवास केला जातो. दानधर्म केला जातो. या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. वेगवेगळ्या देशात तेथील रीति-रिवाज आणि संस्कृतिनुसार कार्यक्रम आयोजित केले जातात.श्रीलंका तसेच अन्य आग्नेय आशियायी देशात हा दिवस 'वेसक' उत्सव म्हणून साजरा केला जातो. हा 'वैशाख' शब्दाचा अपभ्रंश आहे.
या दिवशी बौद्ध घरांमध्ये दिवे प्रज्वलित केले जातात आणि फुलांनी घर सजवले जाते.
बौद्ध धर्माच्या धर्मग्रंथांचे अखंड वाचन, पठण केले जाते.
बुद्ध विहारांमध्ये (बौद्ध मंदिरांमध्ये) आणि घरांमध्ये अगरबत्त्या लावल्या जातात. बुद्ध मूर्तीवर फळ-फूल चढवले जाते. आणि दिवा लावून पूजा केली जाते.
बोधिवृक्षाची पूजा केली जाते.
त्याच्या फांद्यांवर हार व रंगीत पताका सजवल्या जातात. मुळांना दूध व सुगंधित पाणी दिले जाते. वृक्षाच्या भोवती दिवे लावतात.
या दिवशी मांसाहार वर्ज्य असतो.
पक्ष्यांना पिंजऱ्यातून मुक्त करुन खुल्या आकाशात सोडले जाते.
गरिबांना भोजन व वस्त्र दिले जाते.
बौद्ध अनुयायींना तेथे जाऊन प्रार्थना करता यावी यासाठी दिल्ली येथील बौद्ध संग्रहालयातील बुद्धांच्या अस्थी बाहेर काढून ठेवतात.