श्लोक ११ ते १५
अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् ।
परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ॥११॥
काय सांगूं फार । भिवोनि भवासी । अंतरीं इंच्छिसी । माझी प्राप्ति ॥२७५॥
तरी तुज खूण । दिली दाखवून । करीं ती जतन । सोऽहंभावें ॥२७६॥
जैसें कोणी बोले । चांदणें । पिवळें । बिघडतां डोळे । काविळीनें ॥२७७॥
तैसें माझ्या शुद्ध । स्वरूपाचे ठायीं । देखती ते पाहीं । नाना दोष ॥२७८॥
किंवा कोणी ज्वरें । बिघडतां मुख । म्हणे कडू विख । दुधातें हि ॥२७९॥
तैसे लेखिती ते । मज देहयुक्त । देहधर्मातीत । असतां मी ॥२८०॥
म्हणोनियां तुज । सांगें वारंवार । न पडो विसर । खुणेचा ह्या ॥२८१॥
नाहीं तरी स्थूल - । द्दष्टि स्वीकारितां । पाहणें तें तार्था । जाय वायां ॥२८२॥
स्थूल -द्दष्टीनें जे । पाहूं जाती मातें । न दिसें तयांतें । यथार्थत्वें ॥२८३॥
जैसें स्वप्नामाजीं । पिनोनि अमृत । नाहीं कोणी होत । चिरंजीव ॥२८४॥
आतां मातें द्दढ । जाणिलें म्हणोनि । बोलती जे कोणी । स्थूलद्दष्टि ॥२८५॥
तयां मूढांचें तें । ज्ञान चि अर्जुना । जाण सत्य -ज्ञाना । आड ठाके ॥२८६॥
जळीं नक्षत्रांचा । जाहला आभास । मानोनि तयांस । हिरेमोतीं ॥२८७॥
जैसा हंसें केला । आपुला चि घात । लोभें उदकांत । शिरोनियां ॥२८८॥
जाह्रवी म्हणोन । मृग -जळापाशीं । ठाकतां कोणासी । काय लाभ ? ॥२८९॥
सांगें कल्प -वृक्ष । म्हणोनि बाभूळ । पूजितां निष्फळ । नव्हे का तें ? ॥२९०॥
सर्पालागीं रत्न - । हार दुपदरी । मानोनियां करीं । घेऊं धांवे ॥२९१॥
किंवा जैसा कोणी । गारगोटया वेंची । पंक्ति हिरेयांची । समजोनि ॥२९२॥
ना तरी निधान । लाधलें म्हणोन । निखारे बांधोन । घेई खोळीं ॥२९३॥
किंवा कूपीं सिंह । जेविं उडी घाली । नेणोनि साउली । आपुली च ॥२९४॥
तेविं प्रपंचांत । पाद्दूं जाती मातें । ठेवोनियां तेथें । द्दढबुद्धि ॥२९५॥
तयांनीं चंद्रासी । धरावयासाठीं । बिंबा दिली मिठी । जळांतील ॥२९६॥
आणि तयांचा तो । निश्चय हि वायां । गेला धनंजया । जाण ऐसें ॥२९७॥
पिवोनियां कांजी । मग अमृताचा । परिणाम साचा । पाहूं जावें ॥२९८॥
तैसें नाशिवंत । स्थूलाकारीं तेथें । भरंवसा चित्तें । बांधोनियां ॥२९९॥
मज अव्ययातें । पहावया जाती । तयां माझी प्राप्ति । कैसी होय ॥३००॥
पूर्वेचिया वाटे । निघोनि साचार । पश्चिम -सागर । भेटे काय ? ॥३०१॥
किंवा कोंडेयाचें । करोनि कांडण । लाभेल कोठोन । दाणा तेथें ? ॥३०२॥
तैसें पंचमहा - । भूतांचें सकळ । विकारलें स्थूळ । विश्व जें हें ॥३०३॥
तयाचिया ज्ञानें । स्वरूप निर्मळ । कैसें आकळेल । सांग माझें ॥३०४॥
काय धनंजया । पिवोनियां फेन । उदक -प्राशन । केलें होय ? ॥३०५॥
भ्रांतमनोधमें । होवोनि मोहित । मज प्रपंचांत । पाहती ते ॥३०६॥
मग जन्म -मृत्यु । इत्यादिक स्थिति । त्या हि मजप्रति । भाविती ते ॥३०७॥
मज अनाम्यातें । ठेविती तो नाम । अक्रियासी कर्म । आरोपिती ॥३०८॥
मानिती ते मज । देहधर्मयुक्त । देहाविरहित । ऐसा जो मी ॥३०९॥
उपाधिरहिता । मज उपचार । कल्पिती आकार । निराकारा ॥३१०॥
विधि - विवर्जिता । मज व्यवहार । लाविती साचार । आचारादि ॥३११॥
वर्णहीना वर्ण । गुणातीता गुण । आणिक चरण । अचरणा ॥३१२॥
अहस्तातें मज । हस्त हि कल्पिती । मापाया पाहती । अमापातें ॥३१३॥
आणि सर्वांठायीं । असोनि हि जाण । कल्पिति ते स्थान । मज एक ॥३१४॥
निद्रितासी जैसें । पडोनियां स्वप्न । दिसे उपवन । शेजेमाजीं ॥३१५॥
तैसें आवडे तें । देती मज रूप । स्वभावें अरूप । असोनि मी ॥३१६॥
अकर्णातें कर्ण । अचक्षूसी नेत्र । अगोत्रातें गोत्र । कल्पिती ते ॥३१७॥
अव्यक्तासी व्यक्ति । अनार्तासी आर्ति । स्वयंतृप्ता तृप्ति । भाविती गा ॥३१८॥
अनावरणातें । मज प्रावरण । योजिती भूषण । अभूषणा ॥३१९॥
आदिकारणातें । देखती कारण । घडविती जाण । सहजातें ॥३२०॥
असोनि मी नित्य । माझें आवाहन । आणि विसर्जन । करिती ते ॥३२१॥
करिती ते प्राण - । प्रतिष्ठा माझी च । असोनि मी साच । स्वयंसिद्ध ॥३२२॥
असोनि मी नित्य । एक स्वयंसिद्ध । बाल्यादि संबंध । मानिती ते ॥३२३॥
मज अद्वैतातें । आणिती द्वैतांत । घालिती कर्मांत । कर्मातीता ॥३२४॥
भोगितों मी भोग । ऐसें पंडुसुता । असोनि अभोक्ता । बोलती ते ॥३२५॥
मज अकुळाचें । वर्णिती ते कुळ । विसरोनि मूळ । स्वरूपातें ॥३२६॥
मज शाश्वताचें । कल्पोनि निधन । दुःखें आक्रंदन । करिती ते ॥३२७॥
सर्वांतरा मज । वैर -मित्रत्वादि । विविध उपाधि । कल्पिती गा ॥३२८॥
नित्य निजानंदीं । निरंतर जाण । पूर्ण रममाण । असें जो मी ॥३२९॥
तया मज नाना । सुखांची कामना । ऐसी च भावना । करिती ते ॥३३०॥
सर्वांठायीं माझी । सारखी च व्याप्ती । असोनि म्हणती । एकदेशी ॥३३१॥
कोपोनियां एका । मारीतसें ठार । घेतसें कैवार । आणिकाचा ॥३३२॥
चराचरीं आत्मा । असोनि मी एक । ऐसें चि ते देख । रूढविती ॥३३३॥
काय सांगूं फार । धनंजया येथ । धर्म जे प्राकृत । मानवाचे ॥३३४॥
ते चि माझ्या ठायीं । कल्पिती समस्त । ऐसें विपरीत । ज्ञान त्यांचें ॥३३५॥
घडवूनि मृर्ति । ठेविती ती पुढें । करिती बापुडे । भक्ति माझी ॥३३६॥
भंगतां ती मग । गेलें देवपण । ऐसें समजोन । टाकिती ते ॥३३७॥
ऐशापरी पार्था । मानवी आकार । देती ते साचार । मजलागीं ॥३३८॥
म्हणोनि तयांचें । ज्ञान चि तें जाण । टाकितें झांकोन । सत्य ज्ञाना ॥३३९॥
मोघाशा मोघकर्माणी मोघज्ञाना विचेतसः ।
राक्षसीमासुरीं चैव प्रकृतीम मोहिनीं श्रिताः ॥१२॥
धनंजया येथें । काय ते जन्मून । वर्षाकाळावीण । मेघ जैसे ॥३४०॥
किंवा जैशा मृग - । जळाच्या लहरी । पहाव्या त्या तरी । दुरूनि च ॥३४१॥
ना तरी जादूचे । जैसे अलंकार । किंवा घोडेस्वार । मृत्तिकेचे ॥३४२॥
ना तरी गंधर्व - । नगरीचें जैसें । आकाशीं आभासे । गांवकूस ॥३४३॥
साबरीचीं झाडें । वाढालीं सरळ । फळ ना पोकळ । आंतुनि हि ॥३४४॥
किंवा शेळियेचे । गळां जैसे स्तन । होती दुग्धावीण । निरर्थक ॥३४५॥
शेवरीसी जैसीं । फळें आलीं वायां । द्यावया घ्यावया । येती ना तीं ॥३४६॥
तैसें चि तें तयां । मूढांचें जीवन । निरर्थक जाण । धनंजया ॥३४७॥
आणि तयांचा जो । कर्म -व्यवहार । सर्वथा धिःकार । असो त्याचा ॥३४८॥
आंधळ्यासी जैसें । सांपडावें मोतीं । मर्कटाचे हातीं । नारिकेल ॥३४९॥
तैसें अध्ययन । तयांनीं जें केलें । वायां चि तें गेलें । ऐसें जाण ॥३५०॥
काय सांगूं फार । तयांचीं तीं शास्त्रें । जैसीं हातीं शस्त्रें । बालिकेच्या ॥३५१॥
तैसें ज्ञान आणि । कर्म हि तें वायां । जाहलें गा तयां । निर्बुद्धांचें ॥३५२॥
तमोगुणरूपी । राक्षसी ती जाण । टाकी जी गिळोन । सद्बुद्धीतें ॥३५३॥
आणि विवेकाचा । उरूं नेदी ठाव । हिंडे जी सदैव । अविद्येंत ॥३५४॥
त्या चि प्रकृतीच्या । जाहले स्वाधीन । सर्वथा होवोन । भ्रांत -चित्त ॥३५५॥
हिंसारूपी जीभ । जियेच्या मुखांत । लोळते लाळेंत । आशेचिया ॥३५६॥
आणि संतोषाचे । घेवोनि चघळ । बैसे सर्वकाळ । चघळीत ॥३५७॥
निघोनि बाहेरी । श्रवणापर्यंत । दीर्घ ओष्ठप्रांत । चाटीतसे ॥३५८॥
ऐसी जी प्रमाद - । पर्वताची दरी । प्रकृति आसुरी । मत्त सदा ॥३५९॥
जियेचिया मुखीं । द्वेषाचिया दाढा । करिती चुराडा । प्रबोधाचा ॥३६०॥
अगस्तीसी जैसें । कुंभ -प्रावरण । तैसी जी झांकोन । टाकी मृढां ॥३६१॥
त्या चि प्रकृतीच्या । मुखामाजीं जाण । पडले होवोन । भूत -बळी ॥३६२॥
भ्रांतीचिया कुंडीं । बुडोनि ते गेले । खांचीं अडकले । अज्ञानाच्या ॥३६३॥
विचाराचा हात । लाभे ना तयांस । नुरे मागमोस । तयांचा गा ॥३६४॥
तरी वृथा बोल । असोत हे आतां । कासयासी कथा । विमूढांची ? ॥३६५॥
विस्तारें तयांचें । करोनि वर्णन । कां गा द्यावा शीण । वाचेलागीं ॥३६६॥
ऐकोनि हें ऐसें । देवाचें भाषण । अर्जुनें हि मान । डोलविली ॥३६७॥
मग देव म्हणे । ऐक संतगोष्टी । वाचेसि विश्रांति । मिळे जेथें ॥३६८॥
महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः ।
भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ॥१३॥
क्षेत्र -संन्यासी मी । होवीनि रहात । शुद्ध मानसांत । जयांचिया ॥३६९॥
जयांलागीं पाहें । निद्रेंत हि कैसें । पार्था , सेवितसे । वैराग्य तें ॥३७०॥
आणि जयांचिया । वासनेमाझारीं । धर्म राज्य करी । निरंतर ॥३७१॥
ऐशापरी आस्था । आणिक सद्भाव । विवेकी स्वभाव । जयांचा गा ॥३७२॥
ज्ञानगंगेमाजीं । करोनियां स्नान । सर्वथा पावन । जाहले जे ॥३७३॥
जयांचिया रूपें । पालवली शांति । पावले जे तृप्ति । पूर्णतेनें ॥३७४॥
जे का धैर्यरूप । मंडपाचें खांब । निघाले कीं कोंब । ब्रह्मालागीं ॥३७५॥
ब्रह्मानंदरूपी । सागरीं तुडुंब । बुडवोनि कुंभ । काढिले जे ॥३७६॥
नित्य भक्तिसुखीं । होवोनि तल्लीन । लेखिती जे हीन । मुक्तीतें हि ॥३७७॥
आणि जयांचिया । सहज -कर्मांत । राहिली जिवंत । दिसे नीति ॥३७८॥
सर्वेंद्रियांठायीं । अर्जुना , जयांनीं । चढविलीं लेणीं । शांतिरूप ॥३७९॥
सर्वकाळ मज । सर्वव्यापपकातें । व्यापोनि रहातें । चित्त ज्यांचें ॥३८०॥
धनंजया , ऐसे । महत जे साचे । दैवी प्रकृतीचें । भाग्य जे का ॥३८१॥
चढत्या वाढत्या । प्रेमें सर्वकाळ । जाणोनि सकळ । मद्रूप चि ॥३८२॥
महात्मे ते माझें । करिती भजन । परी दुजेपण । सांडोनियां ॥३८३॥
सेवितो ते मातें । होवोनियां मी च । कौतुक तें साच । ऐक आतां ॥३८४॥
सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च द्दढव्रताः ।
नमस्यन्तश्र्च मां भक्त्या नित्ययुक्त उपासने ॥१४॥
प्रायाश्चितांचें तों । संपलें चि काम । ऐसें चाले नाम - । संकीर्तन ॥३८५॥
नामसंकीर्तनीं । नाचतां रंगोन । पातकें जळोन । गेलीं सारीं ॥३८६॥
तीर्थांचें माहात्म्य । लोपलें सहज । जाहले निस्तेज । यम -दम ॥३८८॥
यम म्हणे आतां । काय नियमावें । कोणा आवरावें । म्हणे दम ॥३८९॥
काय खावें दोष । नाहीं राहिला च । बोलती ऐसें च । सर्व तीर्थें ॥३९०॥
करिती ते सर्व । दुःखपरिहार । माझिया साचार । नाम -घोषें ॥३९१॥
अवघें चि जग । मग दुमदुमोन । टाकिती भरोन । महा -सुखें ॥३९२॥
न होतां पहाट । देती जे प्रकाश । न देतां पीयूष । वांचविती ॥३९३॥
नाचरितां योग । अष्टांग -साधन । कैवल्य -दर्शन । घडविती ॥३९४॥
राजा -रंक ऐसा । मानिती ना भेद । ठेविती संबंध । सारिखा च ॥३९५॥
कैसे सान -थोरां । सर्वांसी साचार । होती ते माहेर । आनंदाचें ॥३९६॥
गांठी एखादा च । वैकुंठाची पेठ । अवघें वैकुंठ । केलें ह्यांनीं ॥३९७॥
नामघोषाचिया । गौरवें संपूर्ण । विश्व चि पावन । केलें ऐसें ॥३९८॥
पाहें धनंजया । सूर्यासारखी च । तेजस्विता साच । ह्यांचे ठायीं ॥३९९॥
परी सूर्य तो हि । मावळे हा दोष । अखंड प्रकाश । असे ह्यांचा ॥४००॥
मासान्तरीं चंद्र । एकदां संपूर्ण । हे तों परिपूर्ण । निरंतर ॥४०१॥
मेघ ते उदार । परी ओसरती । अपुरे पडती । उपमेसी ॥४०२॥
ऐशा महात्म्यांचें । कृपापूर्ण सिंह । ऐसें निःसंदेह । म्हणूं ये गा ॥४०३॥
शतावधि जन्म । उपासितां मातें । एक वेळ येतें । हातासी जें ॥४०४॥
ऐसें माझें नाम । जयांचिये वाचे - । पुढें नित्य नाचे । प्रेमभरें ॥४०५॥
तो मी एकवेळ । नसें वैकुंठांत । नाहीं सांपडत । भानु -बिंबीं ॥४०६॥
वरी एकवेळ । योग्यांचें हि मन । जाईं उल्लंघून । पलीकडे ॥४०७॥
परी जे का माझा । अखंड बरवा । करिती पांडवा । नाम -घोष ॥४०८॥
हारपतां मज । शोधावें तेथें च । तयांपासीं साच । सांपडें मी ॥४०९॥
माझे गुण गातां । कैसे तृप्त झाले । पाहूं विसरले । देश -काळ ॥४१०॥
नाम -संकीर्तनीं । होवोनि तल्लीन । सुखावले पूर्ण । स्वरूपीं च ॥४११॥
कृष्ण विष्णु हरि । गोविंद हीं नामें । गर्जोनियां प्रेमें । वारंवार ॥४१२॥
नामसंकीर्तना - । माझारीं उदंड । करिती उघड । आत्मचर्चा ॥४१३॥
असो हा विस्तार । धनुर्धरा ऐक । ह्यापरी कित्येक । भक्त माझे ॥४१४॥
मज निर्गुणाचे । गण गात गात । हिंडती जगांत । आवडीनें ॥४१५॥
आणिक ते आतां । ऐक पंडुसुता । स्वभावें दक्षता । ठेविती जे ॥४१६॥
पंचप्राण आणि । मन हे सांगाती । मार्ग दाखविती । जयांलागीं ॥४१७॥
यम -नियमांचें । कांटेरी कुंपण । बाहेरी लावोन । सभोंवतीं ॥४१८॥
आंत मूळबंध - । रूपी कोट भला । जयांनीं रचिला । बळकट ॥४१९॥
तयावरी मग । प्राणायामारूप । कार्यकर्ती तोफ । चढविली ॥४२०॥
तेणें ऊर्ध्वमुख । होतां कुंडलिनी । प्रकाश लक्षूनि । नीट तिचा ॥४२१॥
मन -पवन -बळें । सत्रावीचें तळें । हस्तगत केलें । एकाएकीं ॥४२२॥
पहा तेथें कैसा । प्रत्याहारें मग । पराक्रम चांग । गाजविला ॥४२३॥
विकारमात्राची । लावोनियां वाट । वळविलीं आंत । सर्वेंद्रियें ॥४२४॥
धारणा -तुरंगीं । दाटोनियां तेथ । केलीं एकत्रित । महा -भूतें ॥४२५॥
मग संकल्पाचें । चतुरंग दळ । सकळ समूळ । नष्ट केलें ॥४२६॥
तंव ‘ जय झाला ’ । ऐसें पुकारीत । ध्यानाची नौबत । झडूं लागे ॥४२७॥
तन्मयावस्थेचें । एकछत्र कैसें । तिये वेळीं दिसे । झळाळत ॥४२८॥
समाधिश्रियेचें । स्वानुभूतिमय । अखंड जें होय । राज्यसुख ॥४२९॥
पट्टाभिषेक तो । सुखाचा त्या भला । तयांलागीं झाला । सामरस्यें ॥४३०॥
अर्जुना , गहन । माझें हें भजन । आणिक सांगेन । ऐक आतां ॥४३१॥
वस्त्रांमाजीं दोन्ही । पालवांपर्यंत । असे ओतप्रोत । एक तंतु ॥४३२॥
तैसा चराचरीं । मीच असें एक । ऐसें चि व्यापक । ज्ञान ज्यांचें ॥४३३॥
ब्रह्मयापासोनियां । कीटकापर्यंत । जाणोनि समस्त । रूप माझें ॥४३४॥
मग सान थोर । ऐसा भेदभाव । सजीव निर्जीव । नेणोनियां ॥४३५॥
देखिल्या वस्तूमी । मी च ती म्हणोन । उजू लोटांगण । घालिती ते ॥४३६॥
आपुलें महत्त्व । तरी विसरोन । पुढील नेणोन । योग्यायोग्य ॥४३७॥
भेटे जी जी व्यक्ति । तियेचिया पायां । पडावें हें तयां । आवडे गा ॥४३८॥
उंच स्थानाहून । पडलें जें जळ । गांठीतसे तळ । आपोआप ॥४३९॥
तैसें भूतजात । नमावें लवोन । स्वभाव चि जाण । तयांचा हा ॥४४०॥
फळभारें जैसी । वृक्षाची डहाळी । ओथंबते खालीं । सहजें चि ॥४४१॥
तैसे जीवांपुढे । होवोनियां लीन । तयांसी वंदन । करिती ते ॥४४२॥
नम्रपणा ही च । तयांची संपत्ति । गर्वहीन स्थिति । अखंडित ॥४४३॥
आणि जयमंत्रें । सर्व हि तें धन । समर्पिती जाण । माझ्याठायीं ॥४४४॥
गळोनियां गेले । मान -अपमान । होतां चि नमन । ऐशापरी ॥४४५॥
म्हणोनियां पाहें । जाहले मदूप । कैसे आपोआप । एकाएकीं ॥४४६॥
ऐसे एकरूप । होवोनि साचार । मज निरंतर । उपासिती ॥४४७॥
अर्जुना , ही ऐसी । माझी थोर भक्ति । येथें तुजप्रति । निवेदिली ॥४४८॥
आतां अवधारीं । आणिक भक्तांतें । यजिती जे मातें । ज्ञान -यज्ञें ॥४४९॥
तयांची ती रीति । तुज असे ठावी । वर्णिली जी पूर्वीं । प्रसंगें चि ॥४५०॥
तंव पार्थ म्हणे । तुझ्या कृपेनें च । जाणतसें साच । सर्व हि तें ॥४५१॥
परी अमृताचें । वाढितां जेवण । म्हणेल का कोण । पुरे ऐसें ? ॥४५२॥
ऐकोनि हे बोल । देवें ओळखिलें । ज्ञानीं लगटलें । चित्त ह्याचें ॥४५३॥
संतोषून मग । लागे डोलावया । पुन्हां बोलावया । सरसावे ॥४५४॥
म्हणे भलें केलें । तुवां पंडुसुता । एर्हवीं सर्वथा । अवेळ हा ॥४५५॥
परी ज्ञानाठायीं । आस्था असे तुज । बोलविते मज । ती च येथें ॥४५६॥
तों चि पार्थ बोले । भक्त -प्रियकरा । चांदणें चकोरा - । साठीं च का ॥४५७॥
चांदण्याचा तरी । ऐसा चि स्वभाव । चराचर सर्व । शांतवावें ॥४५८॥
करिती चकोर । चंद्राकडे चोंच । तृप्ति आपुली च । करावया ॥४५९॥
तैसी आमुची ती । विनवणी किता । देव कृपामूर्ति । स्वभावें चि ॥४६०॥
करी मेघराज । जगालागीं तृप्त । तेथें काय आर्त । चातकाचें ! ॥४६१॥
परी चूळभरी । गंगोदकासाठीं । गंगेची च भेटी । घ्यावी लागे ॥४६२॥
तैसें असो आर्त । थोडें की बहुत । सांगावें समस्त । देवासी च ॥४६३॥
तंव म्हणे देव । स्वस्थ राहें पार्था । पाहोनियां आस्था । संतोषलों ॥४६४॥
तयावरी आतां । साहवेल स्तुति । ऐसी कांहीं स्थिति । उरली ना ॥४६५॥
जाण सावधान । करिसी श्रवण । तें चि आमंत्रण । वक्तृत्वासी ॥४६६॥
देवोनियां तया । ऐसें प्रोत्साहन । देव नाराया । काय बोले ॥४६७॥
ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते ।
एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम् ॥१५॥
म्हणे ऐक ज्ञान - । यज्ञाचें लक्षण । तुज निवेदीन । यथार्थत्वें ॥४६८॥
मूळ -संकल्प हा । यज्ञ -स्तंभ तेथें । पंचमहाभूतें । मंडप तो ॥४६९॥
भेद तो चि पशु । जयाचें हनन । करिती बांधोन । यज्ञ -स्तंभा ॥४७०॥
विशेष जे गुण । शब्द -स्पर्शादिक । इंद्रियें आणिक । पंचप्राण ॥४७१॥
साहित्य सामुग्री । यज्ञाची ही जाण । आणिक अज्ञान । तें चि तूप ॥४७२॥
मनबुद्धिरूप । यज्ञीय कुंडांत । पेटे धगधगीत । ज्ञान -वह्नि ॥४७३॥
सुख -दुःखादिक - । द्वन्द्वीं समचित्त । जाण शोभिवंत । वेदिका ती ॥४७४॥
विवेकबुद्धीचें । प्रावीण्य जें तेथें । मंत्र -विद्येचें तें । थोरपण ॥४७५॥
स्त्रुक् स्त्रुव पळ्या । शांतिरूप दोन । जीव यजमान । ज्ञान -यज्ञीं ॥४७६॥
घेवोनि तो आत्म - । प्रचीतीचें पात्र । जपे मह -मंत्र । विवेकाचा ॥४७७॥
ऐसा ज्ञानरूप । अग्नि -होत्रें जाण । नाहींसा करोन । टाकी भेद ॥४७८॥
यजिता यजन । ऐसी भाषा लोपे । घृत तें हि संपे । अज्ञानाचें ॥४७९॥
आत्मसमरसीं । अवभृ -स्नान । जीव -यजमान । करी जेव्हां ॥४८०॥
तेव्हां महाभूतें । शब्दादि विषय । आणिक इंद्रिय - । गण सर्व ॥४८१॥
न म्हणे हीं भिन्न । जाणे अभिन्नता । ब्रह्मतादात्म्यता । पावोनियां ॥४८२॥
जैसा कोणी एक । पाहें पंडु -सुता । निद्रेंतून येतां । जागृतीसी ॥४८३॥
म्हणे स्वप्नांतील । विचित्र ती सेना । जाहलों होतों ना । स्वयें मी च ॥४८४॥
स्वप्नांतील सेना । नव्हती ती साच । एकला एक च । होतों तेथें ॥४८५॥
तैसें सर्व विश्व । तया याज्ञिकास । येई प्रत्ययास । एकपणें ॥४८६॥
मग जीव -भाव । संपोनि आब्रह्म । भरे परमात्म - । भरे बोधें पूर्ण ॥४८७॥
ज्ञान -यज्ञें ऐसे । भजती कित्येक । जाणोनियां एक - । पणें सर्व ॥४८८॥
आतां अर्जुना , हें । अनादिक अनेक । नामरूपादिक । तें हि भिन्न ॥४८९॥
ऐशापरी भेद । विश्वीं जरी नाना । तरी तें भेदे ना । ज्ञान त्यांचें ॥४९०॥
भिन्न भिन्न गात्रें । एका चि देहाचीं । एक चि मरीची । नाना रश्मि ॥४९१॥
ना तरी साचार । शाखा सान थोर । परी तरुवर । एकला चि ॥४९२॥
तैसीं नाना नामें । नानाविध व्यक्ति । आणिक त्या वृत्ति । वेगळाल्या ॥४९३॥
ऐसीं भिन्न भिन्न । भूतें तरी साच । मज एकाचीं च । जाणती ते ॥४९४॥
ऐसा ज्ञान -यज्ञ । आचरती चांग । वेगळाले भाग । स्वीकारोनि ॥४९५॥
परी जाणते ते । म्हणोनि तयांचें । ज्ञान एकत्वाचें । भेदे चि ना ॥४९६॥
किंवा जेव्हां जेथें । देखती जें कांहीं । मजविण नाहीं । हा चि बोध ॥४९७॥
पाहें बुडबुडा । जाय जेथें जेथें । आहे तया तेथें । उदक चि ॥४९८॥
मग तो तैसा चि । राहे किंवा विरे । तरी तें हि सारें । उदकीं च ॥४९९॥
वातें उडवितां । मृत्तिकेचे कण । काय पृथ्वीपण । जाय त्यांचें ? ॥५००॥
आणि मागुतीं ते आले जरी खालीं । तरी तयां झेली । धरणी च ॥५०१॥
तैसें हवें तेथें । हवें त्या स्थितींत । पार्था , वस्तुजात । असो नसो ॥५०२॥
परी सर्वपणें । मी च तें समस्त । ऐसी च प्रचीत । असे त्यांची ॥५०३॥
धनंजया , माझी । जेवढी ही व्याप्ति । तेवढी प्रतीति । तयांची हि ॥५०४॥
ऐसें ते मद्रूप । होवोनि अनेक । नानाकारीं देख । वावरती ॥५०५॥
पांहू जातां सदा । सूर्य -बिंब जैसें । सन्मुख चि दिसे । सर्वांलागीं ॥५०६॥
तैसें सर्वव्यापी । तयांचें तें ज्ञान । सर्वांसी म्हणोन । सन्मुख ते ॥५०७॥
तयांचिया ज्ञान । नाहीं पाठपोत । नभीं सर्वगत । वायु जैसा ॥५०८॥
तैसा तेवढा चि । तयांचा सद्भाव । जेवढा मी देव । परिपूर्ण ॥५०९॥
म्हणोनि तयांचें । होतसे भजन । न करितां जाण । स्वभावें चि ! ॥५१०॥
एर्हवीं सकळ । मी च तरी मज । भजे ना सहज । कोण कोठें ? ॥५११॥
परी जयांलागी । नाहीं ऐसें ज्ञान । न घडे भजन । तयांसी गा ॥५१२॥
असो ज्ञान -यज्ञ । करोनि उचित । यजिती ते भक्त । सांगितले ॥५१३॥
होतसे अर्पण । सकळांचें द्वारा । मज सर्वेश्वरा । सर्व कांहीं ॥५१४॥
नित्य निरंतर । ऐसें चि हें जाण । सहज भजन । घडतसे ॥५१५॥
परी मतिमंद । नेणती हें कांहीं । म्हणोनियां नाहीं । माझी प्राप्ति ॥५१६॥