श्लोक २१ ते २९
ब्राह्मस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम् ।
स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्रुते ॥२१॥
आत्मस्वरुपातें । सांडोनियां जाण । न होय आधीन । इंद्रियांच्या ॥१८८॥
सर्वथा तो पार्था । सेवी ना विषय । नवल तें काय। असे येथें ॥१८९॥
सहजें अपार । आत्मसुखें पूर्ण । जाहलें प्रसन्न । अंतरंग ॥१९०॥
म्हणोनियां बाह्य । भोगांची प्रवृत्ति । तयाचिया चित्तीं । संभवे ना ॥१९१॥
कुमुदाच्या पात्रीं । भोजन स्वादिष्ट । करी जो यथेष्ट । चंद्रिकेचें ॥१९२॥
कैसा तो चकोर । रुक्ष वाळवंट । बैसेल चाटीत । आवडीनें ॥१९३॥
तैसें आत्म -सुख । आपुल्या चि ठायीं । प्राप्त झालें पाहीं । जयालागीं ॥१९४॥
तया स्वभावें चि । सुटले विषय । बोलोनियां काय । सांगावें हें ॥१९५॥
भोग -सुखें आतां । भुलविले कोण । पाहें विचारुन । कौतुकें हें ॥१९६॥
ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते ।
आद्यन्तवन्तः कौत्नेय न तेषु रमते बुधः ॥२२॥
जैसा का भुकेला । भिकारी तो पाहीं । भक्षितो कोंडा हि । आवडीनें ॥१९७॥
तैसें जयालागीं । नाहीं आत्मज्ञान । रमे तो चि जाण । इंद्रियार्थी ॥१९८॥
ना तरी तृषार्त । होवोनि हरिण । भ्रमें विसरोन । जळालागीं ॥१९९॥
मग माळरानीं । दिसे जळाभास । भुलोनि तयास । येई तेथें ॥२००॥
तैसी स्व -सुखाची । सदा जया वाण । नाहीं आत्मज्ञान । जयालागीं ॥२०१॥
तयासी च पाहें । विषय हे पार्था । वाटती सर्वथा । सुखमय ॥२०२॥
एर्हवी विषयीं । सुख धनंजया । बोलणें चि वायां । जाण ऐसें ॥२०३॥
नाहीं तरी कां गा । विद्युत्प्रकाशेंच । उजाडे ना साच । जगामाजीं ॥२०४॥
जरी मेघच्छाया । पर्जन्याची धारा । ऊन आणि वारा । निवारील ॥२०६॥
पाहें बचनाग । जो का विषकंद । तया जैसें गोड । म्हणावें गा ॥२०७॥
तैसें भोगसुख । जरी म्हणों गोड । वायां बडबड । नेणतां ती ॥२०८॥
भौमग्रहालागीं । बोलती ‘मंगळ । मृगजळा ‘जळ ’ । संबोधिती ॥२०९॥
भोग -सुखालागीं । तैसें जाण वायां । ‘सुख ’ म्हणोनियां । नांव देणें ॥२१०॥
सांगें सर्पाचिया । फणीची साउली । शीतल केतुली । मूषकासी ॥२११॥
जोंवरी तो मासा । आमिषाचा घांस । लावी ना मुखास । धनंजया ॥२१२॥
तोंवरी च घांस । म्हणावा तो चांग । विषयांचा संग । तैसा जाण ॥२१३॥
असोत हे बोल । विषय सकळ । पाहें दुःखमूळ । निःसंदेह ॥२१४॥
पंडुरोगीं जैसी । अंगा येई पुष्टी । घातक ती खोटी । सर्वथैव ॥२१५॥
विषय हे तैसे । पाहतां किरीटी । विरक्त जाणती । दुःखरुप ॥२१६॥
म्हणोनियां जें का । विषयांचें सुख । साद्यन्त तें दुःख । जाण बापा ॥२१७॥
परी जे अज्ञान । तयांलागीं जाण । भोगसुखाविण । करमे ना ॥२१८॥
विषयांचें वर्म । नेणती बापुडे । सेवणें तें घडे । अत्यादरें ॥२१९॥
पूय -पंकांतील । कीटकांलागोन । वाटते का घाण । पंकाची त्या ॥२२०॥
तयां दुःखितांसी । दुःख चि जीवन । सुखाचें साधन । तें चि त्यांचें ॥२२१॥
भोग -पंकांतील । जणूं ते बेडूक । सुखावती देख । विषयीं च ॥२२२॥
जळचरें तीं कीं । भोगजळांतील । केविं सांडितील । भोगांलागीं ॥२२३॥
आणि जीवमात्र । विषयांच्या ठायीं । उदासीन राही । जरी येथें ॥२२४॥
तरी त्या सकळ । दुःखयोनी मग । न होती का सांग । निरर्थक ॥२२५॥
जन्म -मरणाचे । अपार सायास । आणि गर्भवास । कष्टप्रद ॥२२६॥
बिकट हा पंथ । अविश्रांतपणें । घडेल चालणें । कैसें कोणा ॥२२७॥
भोगापासोनियां । भोगासक्त जीवें । जरी निवर्तावें । सर्वथैव ॥२२८॥
तरी धनंजया । महादोषीं मग । कोठें जावें सांग । रहावया ! ॥२२९॥
आणिक संसार । ऐसा शब्द जो का । नव्हेल लटिका । जगामाजीं ? ॥२३०॥
भोग -दुःखांसीच । मानोनियां सुख । स्वीकारिले देख । भोग ज्यांनीं ॥२३१॥
त्यांनी अविद्या जी । वस्तुतः नाहीं च। करोनि ती साच । दाखविली ॥२३२॥
ह्या चि लागी पार्था । विषय हे दुष्ट । चुकोनि ही वाट । धरिसील ॥२३३॥
तरी नको धरुं । मार्ग हा साचार । करोनि विचार । पाहें वीरा ॥२३४॥
विरक्त पुरुष । विषयांतें विष । मानोनि निःशेष । अव्हेरिती ॥२३५॥
तयां निरिच्छांसी । सुखरुपी दुःख । दाखविलें देख । नावडे तें ॥२३६॥
शक्रोतीहैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् ।
कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः ॥२३॥
असोनिया देही । जयांनीं संपूर्ण । ठेविले स्वाधीन । देह -भाव ॥२३७॥
तयां ज्ञानियाच्या । ठायीं पाहें पार्था । नाहीं गंधवार्ता । विषयांची ॥२३८॥
विषयांची भाषा । नेणे तयांलागीं । नांदे अंतरंगी । ब्रह्मसुख ॥२३९॥
परी तें वेगळें । राहोनि भोगावें । विहंगें चुंबावें । फळ जैसे ॥२४०॥
तैसें नव्हे , तेथें । भोग्य भोक्ता भोग । त्रिपुटी ही साङ्ग । विसरावी ॥२४१॥
ब्रह्मसुख -भोग । घेतां ऐसी एक । तेथें वृत्ति देख । उद्भवे ती ॥२४२॥
कीं जी अहंतेचा । पदर तो लोटी । दृढ मारी मिठी । सुखालागीं ॥२४३॥
दृढ आलिंगन । ऐसें घडे तेव्हां । होय ऐक्य तेव्हां । आपोआप ॥२४४॥
मग अभिन्नत्वें । जळीं जळ राहे । तैसी स्थिति आहे । सुखरुप ॥२४५॥
किंवा आकाशीं तो । वायु होतां लीन । तेथें लोपे पूर्ण । द्वैत -बोली ॥२४६॥
उरे तैसे येथें । संभोगावस्थेंत । सुख चि अद्वैत -। स्वरुपें तें ॥२४७॥
लोपतां तें ऐसें । नांव हि द्वैताचें । ऐक्य होय साचें । म्हणों जरी ॥२४८॥
तरी ऐक्य झालें । ऐसें जाणावया । अर्जुना त्या ठायां । साक्षी कोण ॥२४९॥
योऽन्तःसुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः ।
स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ॥२४॥
लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः ।
छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः ॥२५॥
म्हणोनि हें सर्व । असो शब्दातीत । काय शब्दें येथ । वर्णावें तें ॥२५०॥
स्वभावें ही खूण । पावतील ते च । जे का होती साच । ब्रह्मनिष्ठ ॥२५१॥
ऐशा ब्रह्मसुखें । संपन्न होवोन । स्व -रुपीं आपण । रंगले जे ॥२५२॥
मानितों मी तयां । किंवा परिपूर्ण साचे । ब्रह्मैक्यभावाचे । पुतळे चि ॥२५३॥
सुखाचे अंकुर । किंवा आनंदाची । प्रतिमा ते साची । तंतोतंत ॥२५४॥
नातरी ते देखा । महा -बोधालागीं । स्थान झाले जगीं । निवासाचें ॥२५५॥
परब्रह्माचे ते । मानावे स्वभाव । किंवा होती गांव । विवेकाचे ॥२५६॥
ब्रह्मविद्येचे ते । तैसे सर्वथैव । होती अवयव । अलंकृत ॥२५७॥
नातरी सत्त्वाचे । सात्त्विक ते संत । किंवा मूर्तिमंत । चैतन्य ते ॥२५८॥
असो हें एकैक । वर्णितां अपार । म्हणोनि विस्तार । पुरे आतां ॥२५९॥
संत -स्तुतिमाजीं । होतां चि तल्लीन । जासी विसरोन । कथाभाग ॥२६०॥
निर्गुण ब्रह्माचें । रसाळ वर्णन । स्व -रुपीं रंगून । करिसी तूं ॥२६१॥
परी तो रसौघ । आवरीं आणिक । उजळीं दीपक । गीतार्थाचा ॥२६२॥
संत -अंतरंग -। मंदिरीं मंगल । करीं उषःकाल । ज्ञानदेवा ॥२६३॥
श्रीगुरुनाथांचा । ऐसा हा आदेश । ऐकोनियां दास । निवृत्तीचा ॥२६४॥
मग म्हणे आतां । बोलिला श्रीकांत । तें चि ऐका चित्त । देवोनियां ॥२६५॥
आत्मसुखडोहीं । घेवोनियां उडी । मारोनियां बुडी । राहिले जे ॥२६६॥
स्थिरावोनि ते हि । तेथें चि तद्रूप । होती आपोआप । धनंजया ॥२६७॥
शुद्ध आत्मज्ञान । होतां चि जो सर्व । देखतसे विश्व । स्व -रुपीं च ॥२६८॥
तया असो पार्था । रुप आणि नाम । सदेह तो ब्रह्म । मानूं आम्हीं ॥२६९॥
वस्तुतः अत्यंत । जें का असे श्रेष्ठ । मर्यादा -रहित । अविनाशी ॥२७०॥
आणि सर्वथा जे । निरिच्छ संसारीं । होती अधिकारी । ग्रामाचे ज्या ॥२७१॥
महर्षीसाठींच । राखोनि ठेविलें । वांटयासी जें आले । विरक्तांच्या ॥२७२॥
आणि जे का झाले । संदेह -रहित । तयांसी जें होत । फलद्रूप ॥२७३॥
कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् ।
अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् ॥२६॥
विषयांपासोन । हिरोनि आपण । जयांनीं स्वाधीन । केलें चित्त ॥२७४॥
निश्चयें ते पार्था । जेथें झाले लीन । न येती फिरोन । वृत्तीवरी ॥२७५॥
आत्मज्ञानी ज्यातें । राहिले लक्षून । ऐसें जें निर्वाण । परब्रह्म ॥२७६।
तें चि ते पुरुष । होती मूर्तिमंत । जे का ब्रह्मनिष्ठ । पंडुसुता ॥२७७॥
पार्था कैशा रीती । ते हे ऐसे झाले । देहीं चि जे आले । ब्रह्मत्वासी ॥२७८॥
पुससी हें आम्हां । तरी तें संक्षिप्त । भलें तुज येथ । सांगूं आतां ॥२७९॥
स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः ।
प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्ययन्तरचारिणौ ॥२७॥
यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः ।
विगतेच्छाभयक्रोधा यः सदा मुक्त एव सः ॥२८॥
तरी वैराग्याचा । घेवोनि आधार । विषय बाहेर । घालविले ॥२८०॥
जयांनीं एकाग्र । केल्या मनोवृत्ति । शरीरीं जे होती । अंतर्मुख ॥२८१॥
एक इडा नाडी । दुजी ती पिङ्गला । सुषुम्ना मंगला । तिसरी ती ॥२८२॥
भुवयांची अग्रें । होती एकत्रित । जेथें घडे भेट । तिहींची ह्या ॥२८३॥
तेथें उफराटी । दृष्टि वळवोनि । सुस्थिर राखोनि । नासिकाग्रीं ॥२८४॥
सांडोनिया इडा । पिङ्गला ह्या दोन । सम प्राणापान । करोनियां ॥२८५॥
सुषुम्नेच्या द्वारा । चित्तालागीं जाण । ठेविती नेवोन । चिदाकाशीं ॥२८६॥
मग जैसी गंगा । ओहोळांचे पाणी । पोटीं सामावोनि । सकळ हि ॥२८७॥
भेटतां सिंधूसी । मग नये देख । वेगळें एकैक । निवडितां ॥२८८॥
तैसें जिये वेळीं । प्रभंजनें होय । पार्था मनोलय ।चिदाकाशीं ॥२८९॥
तदा तेथें नाना । वासना -विचार । थांबतो साचार । आपोआप ॥२९०॥
संसाराचे चित्र । उमटतें जेथें । पट चि तो फाटे । मनोरुप ॥२९१॥
जैसें सरोवर । आटोनियां जातां । दिसे ना शोधितां । प्रतिबिंब ॥२९२॥
तैसें मनपण । मनाचें सकळ । लोपतां समूळ । धनंजया ॥२९३॥
मग तेथें कोठें । अहंभावादिक । विकार ते देख । राहतील ॥२९४॥
म्हणोनियां पाहीं । असोनि हि देही । ब्रह्म चि तो होई । स्वानुभवें ॥२९५॥
भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम् ।
सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ॥२९॥
इति श्रीमद्भगवद्भीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसंन्यासयोगो नाम पंचमोऽध्यायः ॥५॥
मन -पवनाची । क्रमोनियां वाट । आले व्योमीं नीट । म्हणोनियां ॥२९६॥
पार्था ते देहींच । ब्रह्मत्व पावले । ऐसें सांगितलें । मागें तुज ॥२९७॥
यम -नियमांचे । दुर्घट डोंगर । निर्धारें सत्वर । ओलांडोनि ॥२९८॥
तेविं अभ्यासाचे । क्रमोनि सागर । पार्था पैलपार । पातले ते ॥२९९॥
घेतलें तयांनी । प्रपंचाचें माप । करोनि निर्लेप । आपणांसी ॥३००॥
मग परब्रह्म -। स्वरुप जें साच । होवोनियां तें च । राहिले ते ॥३०१॥
योगमार्गाचा हा । सारांशें उद्देश । बोले हृषीकेश । पार्थालागीं ॥३०२॥
तेव्हां चि तो भला । मर्मज्ञ कौन्तेय । पावला विस्मय । अंतरांत ॥३०३॥
जाणोनि तें कृष्णें। पार्थ -मनोगत । मग तो सस्मित । काय बोले ॥३०४॥
म्हणे पार्था येथें । ऐकोनि ही मात । काय तुझें चित्त । आनंदलें ॥३०५॥
तंव तो अर्जुन । म्हणे देवा भला । माझा ओळखिला । मनोभाव ॥३०६॥
तुम्ही परचित्त - । जाणत्यांचे राजे । आधीं चि सहजें । जाणतसां ॥३०७॥
करोनि विचार । पुसावें जें कांहीं । तें चि तुम्हीं पाहीं । ओळखिलें ॥३०८॥
तरी आतां जें का । बोलिलें संक्षिप्त । विवरोनि स्पष्ट । सांगावें तें ॥३०९॥
खोल पाण्यांतून । दुर्घट पोहणें । पाय -उतारानें । जाणें सोपें ॥३१०॥
ज्ञान -मार्गाहून । तैसा सोपा भला । तुम्हीं दर्शविला । योग -मार्ग ॥३११॥
आम्हां दुर्बळांसी । येथें लागे वेळ । तरी तें येईल । सुखें साहों ॥३१२॥
म्हणोनियां आतां । एकवेळ देवा । पडताळा घ्यावा । तयाचा चि ॥३१३॥
विस्तरेल तरी । विवरोनि येथ । सांगावा साद्यन्त । मजप्रति ॥३१४॥
मग योगेश्वर । बोलती गा पार्था । मार्ग हा सर्वथा । आवडला ॥३१५॥
तरी सांगावया । व वेंचे गा कांही । सुखें बोलों , देई । अवधान ॥३१६॥
उत्कंठेनें घेसी । ऐकोनियां चांग । आणि जरी मग । आचरिसी ॥३१७॥
तरी सांगितल्या -। वीर्ण कैसे राहूं । मागें पुढें पाहूं । काय येथें ॥३१८॥
श्रीहरी आधींच । कृपाळु अत्यंत । त्यांत भेटे भक्त । आवडता ॥३१९॥
मग प्रेमभाव । बहरता त्याची । अद्भुतता साची । कोण जाणे ॥३२०॥
कृपादृष्टीचें त्या । किती कैसें कोण । करील वर्णन । यथार्थत्वें ॥३२१॥
कारुण्य -रसाची । वृष्टी च ती साची । सृष्टी न स्नेहाची । अभिनव ॥३२२॥
किंवा अमृताची । म्हणों ती ओतली । पिवोनि मातली । पार्थ -प्रेम ॥३२३॥
मग तया प्रेमीं । राहिली गुंतोन । म्हणोनि तेयोन । निघूं नेणे ॥३२४॥
असो बडबड । करावी ही किती । कथेची संगति । सोडोनियां ॥३२५॥
कृष्णार्जुन -प्रेम । वर्णाया यथार्थ । वाचा असमर्थ । सर्वथा ती ॥३२६॥
नेणे चि जो माप । आपुलें आपण । ईश्वरा त्या कोण । कैसा जाणे ॥३२७॥
म्हणोनि तें प्रेम । साच शब्दातीत । विस्मय तो येथ । काय असे ॥३२८॥
पूर्व -अभिप्राय । पाहोनियां गमे । देव पार्थ -प्रेमें । मुग्ध झाला ॥३२९॥
कीं तो बलात्कारें । म्हणे बापा पार्था । ऐक जें जें आतां । सांगेन मी ॥३३०॥
बोधे तुझें चित्त । प्रकारें ज्या जैसें । कौतुकें तें तैसें । निवेदीन ॥३३१॥
तरी कवणातें । नांव देती योग । काय उपयोग । तयाचा तो ॥३३२॥
किंवा आचराया । कोणा अधिकार । सर्वथा साचार । असे येथें ॥३३३॥
ऐसें जें जें कांहीं । असे येथें उक्त । सांगेन समस्त । तें तें आतां ॥३३४॥
तरी सावधान । ऐक सविस्तर । बोले योगेश्वर । पार्थालांगी ॥३३५॥
पार्थ -सख्यत्वाचा । न होतां वियोग । सांगेल जो योग । हृषीकेश ॥३३६॥
तो चि भाग पुढें । स्पष्ट करुं साचा । दास निवृत्तीचा । म्हणे ऐसें ॥३३७॥
। इति श्री स्वामी स्वरुपानंदविरचित श्रीमत् अभंग -ज्ञानेश्वरी पंचमोऽध्यायः ।
हरये नमः । हरये नमः । हरये नमः । श्रीकृष्णार्पणमस्तु ।