Get it on Google Play
Download on the App Store

संत निळोबामहाराजांची गाथा ३

५०.

तंव ते आणिले मागिले गोपाळ । सारिसेंचि धैर्य वीर्य प्रताप बळ ।

हें देखोनियां विस्मित सकळ । म्हणती द्विविध कैसेनि हे झाले ॥१॥

तैसेचि वत्सें दोनी दोनी । एकएक गाईलागुनी ।

सुखें पिंऊ देती स्तनीं । आणि दुमती वोरसोनि यथेष्ट ॥२॥

तंव ते असुमाई गोटा । होतां आघासुराचे पोटीं ।

तेचि सांगती वडिला वोटीं । म्हणती नवल वितलें ॥३॥

आजि आम्हां अवघिया वनीं । घातले होते सर्पें वदनीं ।

मागें होता शारंगपाणी । तेणे तो चिरुनी टाकिला ॥४॥

मग वत्सें आणि गोवळ । आम्ही बाहेरी पडिलों सकळ ।

त्याचे पहाहो करवाळ । रक्तें पूर वाहाती ॥५॥

नवल तें ऐकोनि कानीं । लोक चालिले पहावया नयनीं ।

तंव ते पडिले बाळोनी । गंगाओघासारिखे ॥६॥

ये गोष्टीसी झालें वर्ष । गोवळां वाटे एकचि निमिष ।

निळा म्हणे सेविलें शेष । तेणें सर्वदा समाधी ॥७॥

५१.

ऐशीं अगाध चरित्रें याचीं । वर्णितां भागला शेष विरंची ।

लोक म्हणती हा सर्प बिलेंचि । कैसेनि पां वांचला ॥१॥

मग त्यां सांगे नारायण । यासी नेलें वर्ष होऊन ।

गोवळ वत्सें ब्रह्मसदन । पावोनि होते बैसले ॥२॥

कालिचि ते आले येथें । म्हणोनि सांगती नुतन वार्ते ।

द्विगुणपणें हे कैसेनि तुमतें । प्राप्त झाले कां नेणां ॥३॥

ऐसें सांगतां श्रीहरी । अवघ्यां जाणवलें अंतरीं ।

परम लाघविया मुरारी । खेळ खेळे विचित्र ॥४॥

अघासुरा वधिल्यावरी । पुढें धेनुका बोहरी ।

कैसी केली याची परी । तेहि सुजाण परिसतु ॥५॥

एकैक याचें कथनक । श्रवण भवबंधा मोचक ।

म्हणोनियां सात्त्विक लोक । हेंचि ऐकती अनुदिनीं ॥६॥

निळा म्हणे हे बाळक्रीडा । परी परमार्थ साधनाचा हुंडा ।

श्रवण मनन होतांचि फुडा । ब्रह्मसाक्षात्कार पाविजे ॥७॥

५२.

वत्सें वत्सप वनांतरीं । माजी परमात्मा श्रीहरी ।

खेळतां खेळ नानापरी । पुढें धेनुक देखिला ॥१॥

सांगता अंगींची बरव । मृणालिके ऐसी लव ।

शृंगें सुवर्णाची ठेव । रत्‍नापरी नयन दोन्ही ॥२॥

कर्ण जैसीं केंतकी दळें । अती राजस पादतळें ।

खुर शोभति रातोत्पळें । जेवीं जडूनि ठेविलीं ॥३॥

चारी चरण कर्दळीस्तंभ । हृदयावकाशीं सूक्ष्म नभ ।

पाठीवरी त्रिवेणी भांब । पुच्छ स्वयंभ शेषफणी ॥४॥

कांबळी लोबें कंठातळीं । विद्युतप्राय टिळकू भाळीं ।

वोसंड लवथवित मांस मोळीं । देखतां नव्हाळी डोळियां ॥५॥

गोंवळ म्हणती कृष्णा पाहें । नवल वृषभ आला आहे ।

चुकारिचाचि नवल नाहे । न्यावा धरुनि मंदिरा ॥६॥

निळा म्हणे ऐकोनि हरी । दृष्टी घालोनियां सामोरी ।

म्हणे धेनुक हा निर्धारी । आलासे मुक्ति मागावया ॥७॥

५३.

ऐसें विचारूनिया मनीं । म्हणे सौंगडियां सारंगपाणी ।

बैल चांगला दिसतो नयनीं । परी धरूं कैसा देईल ॥१॥

तुम्ही व्हारे पैलीकडे । दुरी परते वेंघोनि हुडे ।

चौताळतां हा चहुंकडे । करील रगडा सकाळांचा ॥२॥

ते म्हणती बरें कृष्णा । परी तूं सांभाळी हो आपणा ।

ऐसें म्हणोनियां पळती राणा । गिरीशिखरीं बैसले ॥३॥

मग कास घालूनि गोपीनाथ । चालिला पुढें चुचकारित ।

तंव तो म्हणे आजी कार्यार्थ । बरा साधला एकांतीं ॥४॥

जवळीं यावयाची वाट पाहे । उगाचि स्तब्ध उभा राहे ।

हें जाणोनियां यादवराया । अंग राखोनि चमकतु ॥५॥

ऐसा आटोपिला हरी । तंव ते मायावी असुरी ।

धांविन्नला तयावरी । शिंगें पसरूनि विस्तीर्णें ॥६॥

निळा म्हणे फुंपात उठी । चौताळ लागे पाठीं ।

तव हा परमात्मा जगजेठी । गांठी पडों नेदीचि ॥७॥

५४.

शृंगे पसरिले जैसे शूळ । नेत्रींहूनि निघती ज्वाळ ।

श्वास रंघ्‍रीं धूम्रकल्लोळा । डरकिया अंतराळ दुमदुमितो ॥१॥

मागें सरे पुढें धांवे । आडवाचे उडे उंच उंचावे ।

ऐशीं दावूनियां लाघवें । हरिसन्निध पातला ॥२॥

देव हाणे मुष्टी घातें । तेणें आर्डाय दुखवोनि तेथें ।

सवेंचि सरसावोनियां वरिते । उपसों धांवे गोविंदा ॥३॥

दोघां मांडलें महार्णव । दाविती बळ प्रौढीगौरव ।

मग धेनुकें करूनियां माव । कृष्णातळीं संचरला ॥४॥

येरें रगडूनि तेथेंचि धरिला । दोहीं शिंगीं हाता घातला ।

मग ते उपटुनी त्राहाटिला । निघात घातें खडकावरी ॥५॥

ऐसा करूनियां शतचूर्ण । रक्त मांस त्वचा भिन्न ।

अस्थि तिळप्राय होऊन । गेल्या उडोनि दाहीदिशा ॥६॥

निळा म्हणे ऐशियापरी । धेनुका मुक्तीची शिदोरी ।

देऊनि पाठविला श्रीहरी । आपुलिया निजधामा सुखवस्ती ॥७॥

५५.

हें देखोनियां गोवळ । आले धावोनियां सकळ ।

कृष्णासी म्हणती युद्ध बळ । केलें तुवां वृषभेंसी ॥१॥

आम्हीं देखिलें दुरोनी । होतों डोंगरीं बसोनि ।

तो बैल आम्हांलागुनी । कृष्णा कोण तो सांग पा ॥२॥

येरु म्हणे तो असुर । तुम्हां भासला होता ढोर ।

कंसरायाचा तो हेर । जाता वधुनी सकाळांतें ॥३॥

ऐसा जाणोनियां निभ्रांता । शांति पावविला तो आतां ।

तुम्ही भयातें न धरितां । सुखें विचरा मत्संगें ॥४॥

माझिये भजनीं जे राहाती । त्यांचिया विघ्नाची शांती ।

करूनिया सुखविश्रांती । तया अर्पी सर्व सिद्धी ॥५॥

ऐसें ऐकोनियां हरिवचन । संतोषले सकळही जन ।

मग नमस्कारूनियां उभय चरण । गोकुळांप्रती चालिले ॥६॥

निळा म्हणे सांगती वडिलां । वनीं वर्तमान जो देखिला ।

धेनुकासुर तो निपातिला । आजीं कृष्णें युद्धसंधीं ॥७॥

५६.

पूर्वील कथा अनुसंधान । राहिलें होतें करितां कथन ।

मतिविस्ताराचे महिमान । स्फुर्ती फांकोन वाहावली ॥१॥

माभळभट गेलिया वरी । कागासुर तो माव करी ।

येऊनियां गोकुळा भीतरी । बिंबवृक्षावरी बैसला ॥२॥

म्हणे फोडूनियां दोन्ही डोळे । बाळका करीन मी आंधळे ।

चुंचिघातें कंठनाळें । फोडीन वक्षस्थळीं बैसोनी ॥३॥

काय करील तें लेंकरूं । मनुष्य मानवी ते इतरु ।

आम्हां दैत्यांचा आहारु । कैसेनि येती ते मजपुढें ॥४॥

कंसाचिये आज्ञे भेणें । करितो मनुष्यांचीं संरक्षणें ।

आतां तों प्रेरिलेंसें तेणें । आड आलिया निवटीन ॥५॥

आलिया त्याचिया कैवारा । आकळूं शकें मी इंद्रादिसुरां ।

मज कोपलिया कृतांतवीरा । कोण सामोरा येऊं शके ॥६॥

निळा म्हणे ऐशिया मदें । मातला मनेशींचि अनुवादें ।

कंसा तोषवीन आनंदें । प्रतीक्षाकरी कृष्णाची ॥७॥

५७.

ऐसें जाणोनियां श्रीहरी । पालखीं निजविल्या रुदन करी ।

न राहे अंकींही क्षणभरी । निजवितां शेजारी तैसाची ॥१॥

काय करूं गे यशोदा म्हणे । कां हें करिताहे रुदनें ।

दिठावलें माझें तान्हें । निंबलोण उतरीं तया ॥२॥

तरी न राहे रुदतां । अधिक अधिक आक्रंदतां ।

यशोदा म्हणे बाहेरी आतां । नेऊ तरी कोणाकडे ॥३॥

मग घेऊनियां कडियेवरी । काग दाविला निंबावरी ।

तया देखोनियां हास्य करी । मग ते सुंदरी हरिखली ॥४॥

म्हणे निजऊनियां येथें । करीन कामकाज ऐसें ।

विचारूनियां चित्तें । म्हणे कागातें अवलोकीं ॥५॥

ऐशापरी निजविला । क्षण एक काजकामीं गेला ।

तंव काग तेथूनियां उठिला । झडपूं आला गोविंदा ॥६॥

देखोनी यशोदा घाबरी । हाहाकार केला इतरीं ।

निळा म्हणे तो असुरी । हरीचीवरी झेंपावला ॥७॥

५८.

रूप विक्राळ भयानक । चुंचु वाढिलें अधिकाधिक ।

पक्ष पसरोनियां अधोमुख । रक्तवर्ण द्विनेत्र ॥१॥

क्रोधें झगडतां कृष्ण शरीरीं । येरें पक्ष धरिलें करीं ।

उपटूनियां सांडी पृथ्वीवरी । अपार वातें उसळलें ॥२॥

लोक मिळाले भोंवतें । परी भिताती देखोनियां त्यातें ।

मग धरूनियां चंचूतें । दोन्ही फाळी करूं पाहें ॥३॥

अनंत हस्तांचा श्रीधर । काय ते काउळे किंकर ।

परी तो मायावी असुर । खग वोडणेंसी ठाकला ॥४॥

कृष्णें लत्ताप्रहरें त्यांसी । पाडियेलें तोंडघसी ।

धरूनियां निजकशीं । आपणासी ओढि येला ॥५॥

दक्षिणकरें मुष्टीप्रहरीं । हाणितलें त्या शिरावरी ।

मस्तक फुटतां मेंदूवरी । शोणित वाहे भडभडा ॥६॥

निळाम्हणे दीर्घपापी । कागरूपीया अति विकल्पी ।

परि हा परमात्मा पुण्यप्रतापी । मोक्षपदासी पाठविला ॥७॥

५९.

मग धांवोनिया यशोदा । हृदयीं आळंगी गोविंदा ।

बारे तूंतें अरिष्टेंचि सदा । जैम पासुना जन्मलासी ॥१॥

प्रथम पूतनेचा घात । दुजा भटाचा विपरीतार्थ ।

तिजा कागदाचा हा अनर्थ । आम्हीं देखिला समस्ती ॥२॥

यावरी काय काय होईल । नकळे आम्हांतें तें पुढील ।

मागें शकटाचेंहि नवल । मारिलेंचि होतें तुज कृष्णा ॥३॥

कैसें घरासचि पुसती । नानापरीचे उत्पात येती ।

काय करूं रे श्रीपती । कैसा वांचसील काय जाणं ॥४॥

किती चिंता करूं खेद । मज हे न देखवती प्रमाद ।

तंव गगनवाणीचे शब्द । ऐकती झाली निज कर्णीं ॥५॥

परमात्मा हा पूर्ण अवतार । उतरावया धराभार ।

तुझिये उदरीचा कुमर । निवटेल असुरीं अपरिमित ॥६॥

जे जे पापी अतुर्बळी । आहेत हे भूमंडळीं ।

तितुकियांसिही मांडुनी कळी । पाठवील त्या यमपंथें ॥७॥

निळा म्हणे ऐकोनि कानीं । यशोदा संतोषली मनीं ।

टाळी पिटिली सकळही जनीं । थोर आश्चर्य वाटलें ॥८॥

६०.

अवघे करूनि जयजयकार । हर्षें झाले सुखनिर्भर ।

म्हणती आतां वारंवार । भय संकोच न धरावा ॥१॥

तंव यशोदा म्हणे पूर्वीही ऐसें । गर्गाचार्यें कथिलें विन्यासें ।

राशिनक्षत्राचेनियां मिसे । उदंड भाषार्थ सांगितला ॥२॥

पुढें वधील कंसासुरा । सोडवील हा मातापितरां ।

मथुरेसी उग्रसेना नृपवरा । भद्रा सिंहासनी बैसवील ॥३॥

करील धर्माचें पाळण । सकळ पांडवाचें संरक्षण ।

भीमकीचेंही पाणिग्रहण । करील अरिवीरां मर्दुनी ॥४॥

वधूनियां भोमासुरा । सोळा सहस्त्र अंतःपुरा ।

प्राणूनियां हा एकसरा । पुत्रपौत्रीं नांदेल ॥५॥

कौरवां वधील पांडवाहातें । राज्यीं स्थापील हा धर्मातें ।

उतरुनी भूभारातें । अवनी उत्फुल्लित करील ॥६॥

गोकुळींचिया नगरनारी । रंजवील हा नानापरी ।

गोवळ गाईचा मनोहरी । क्रीडा करील हा कौतुकें ॥७॥

अतुर्बळिया नारायणु । यशोदे तुझा हा नंदनु ।

नाटकी कौसाल कान्हु । करील पवाडे अगणित ॥८॥

निळा म्हणे ते प्रसंगीं । स्मरलें अवघें यशोदेलागीं ।

मग नाना वस्तु पदार्थ चांगी । वरुनी सांडी श्रीकृष्णा ॥९॥