Android app on Google Play

 

भाग ३

 

आणि समोर खोलीत पाहतो तो काय?

काळा मिट्ट काळोख! घनघोर अंधार!

हा अंधार काही वेगळाच होता!

ते सगळे कैदी आणि त्यांच्या हातचा कोठडीत मार खाणारा तो दुसरा मी... कुठे आहेत सगळेजण?

मला इतक्या ठार अंधारात काहीही डोळ्यांनी दिसत नसतांना सुद्धा असेच वाटत होते की ते सगळेजण इथेच उभे आहेत! माझ्याभोवती कडं करून! माझा घात करायला! हे सगळेजण मला आता मारतील! म्हणजे पोलिसांचा दार ठोठावण्याचा आवाज खोटा होता की काय? मी स्वप्नात आहे काय? की हे माझ्याविरुद्ध कुणी अघोरी शक्ती षडयंत्र रचत आहेत? असा मी विचार करत असतांनाच पाठीमागून एक आवाज आला. माझाच आवाज होता तो, म्हणजे त्या खोलीत असणाऱ्या दुसऱ्या "मी" चा!

"अरे, षडयंत्र तर नेहमी कुणाचे तरी कुणाविरुद्ध तरी सुरूच असते! ही अमर्याद सृष्टी सुद्धा आपल्या विरुद्ध नेहमी षडयंत्र रचतच असते! आता कसलाच विचार करत बसण्याची वेळ नाही, थांब मी तुझ्यावर स्वार होतो म्हणजे तुला नीट कळेल मी काय म्हणतो ते!"

कुणीतरी अंधारात छोटासा उंदीर आपल्या पाठीमागून पायावरून चढत गेल्यावर जसे वाटेल तसे मला पाठीवर जाणवले. मी पूर्ण अंगभर शहारलो!! पण तो उंदीर नव्हता, तर त्या खोलीतला "मी" होतो, छोट्या आकारातला मी! जसे स्पायडरमॅन पटापट डोंगरावर, भिंतींवर झरझर चढत जातो तसा ती माझी छोटी मानवाकृती पाठीवरून चढत चढत माझ्या मानेपर्यंत येऊन माझे केस पकडून माझ्या डोक्यावर बसली आणि तिने माझ्या डोक्याच्या मधोमध एका हाताची मूठ दणकून आपटली, माझ्या डोक्याला एक छिद्र पडलं आणि त्यातून ती माझी छोटी जिवंत प्रतिकृती आत शिरली आणि माझ्या मेंदूवर जाऊन बसली...

आणि माझे डोके पूर्ववत झाले. पुढे पुढे मला ती आकृती माझ्या मेंदूत समाविष्ट होऊन विरघळून गेली अशी जाणीव झाली. ह्या सगळ्या फक्त जाणिवाच तर होत्या! काळ्याशार अंधारातील मन सुन्न आणि बधिर करणाऱ्या जाणीवा!! डोळ्यांनी कुठे काहीच दिसत नव्हतं!! हे जे घडत होतं तेच मुळी नेमकं खरोखर घडत होतं का??

तो मेंदूत सामावलेला दुसरा मी, मलाच मेंदूमध्येच म्हणाला, "पुढं पावलं टाक पटापट! थोडयाच वेळात तुला एक धूसर गोलसर प्रकाश दिसेल. त्यात आपल्याला म्हणजे तुला म्हणजेच मला...आपण दोघे एकच आहोत रे! तर मी महणत होतो की,थोड्या वेळेसाठी त्या गोलसर धूसर प्रकाशात थोड्यावेळापूर्वी घडलेले परत दिसेल ते तू बदलू शकतोस, वेळ कमी आहे! लाव डोकं आणि बदल भूतकाळ! डोके वापर, वेळ कमी आहे! धूसर प्रकाशातल्या स्वतःला नीट विचार करून मार्गदर्शन कर!! संधी एकदाच आहे, हे लक्षात ठेव....आता ही संधी तुला म्हणजे आपल्याला कुणी दिली? का दिली? याचा विचार करत बसू नकोस!!"

आणि त्याचा आवाज माझ्या मेंदूतून येणं कायमचं बंद झालं. म्हणजे आता तो खोलीतला मी आणि लॉजमधला मी एकच झालो होतो आणि थोडे पुढे चालत जाऊन धूसर गोलाकार प्रकाशात मला थोड्यावेळापूर्वीचा प्रसंग पुन्हा दिसू लागला...

आता मी त्या अंधाऱ्या खोलीत उभा राहून त्या भूतकाळातील प्रसंगामधल्या मला सूचना देऊन नियंत्रण करायला लागलो...

रात्रीचे दोन वाजले होते....

मी रेल्वेच्या फूटओव्हर ब्रिजवर जाऊन उभा असलेलो दिसलो. ब्रिज निर्मनुष्य होता. खाली पाहिले तर स्टेशनवर दोन चार कुत्री भुंकत फिरत होती आणि एक दोन माणसं बाकड्यावर बसून पेंगत होती. एक ट्रेन न थांबता धाड धाड रूळ थरारत स्टेशनातून निघून गेली. मी एक केले, ते गळ्यातले ताईत काढून खिशात ठेऊन टाकले. म्हणजे पुढे काही चूक होणारच नाही! झटापटीत ताईत गळ्यातून त्या माणसाच्या अंगावर पडण्याची आता शक्यता नव्हती. म्हणजे भूतकाळातली एक चूक मी आता सुधारली!

आता तो मास्कधारी माणूस येणार....

पिवळ्या मंद लाईटच्या प्रकाशात आता मला दूरवर जिन्यावर एक सावली चढतांना दिसली. कुणीतरी पायऱ्या चढत होतं वाटतं... शिरिष असावा बहुतेक!! ती सावली मोठी होत गेली आणि पूर्ण पायऱ्या चढून एक काळा कोट घातलेला माणूस दिसू लागला. तो माझेकडे वळला आणि मला त्याने उजवा हात वर करून खूण केली आणि मी डावा हात वर केला. ओळखायला तशी खूण ठरली होती.

तो हळूहळू माझेकडे येऊ लागला....

ह्याने मुखवटा का घातला? हा नक्की शिरीष आहे की दुसरं कुणी? नाही! शिरीषच असावा कारण ओळखायची खूण ठरली त्याप्रमाणे झाले होते...

तो माझ्यासमोर आला, थांबला. काही बोलला नाही. शेक हँड केले नाही. मास्कच्या आडून त्याचे डोळे एकसारखे माझ्याकडे रोखून बघत होते. पण... मला दुसरी चूक करायची नव्हती....

म्हणून पूर्वीसारखा मी त्याला मी घाबरलो नाही! त्याने बॅगसाठी हात पुढे केला, पण मी त्याच्या हातात बॅग दिली नाही.

उलट मी धिटाईने म्हणालो, "आधी मास्क काढ!"

"ए, जास्त आवाज करतो काय? चुपचाप बॅग दे!"

"तू शिरिषच आहेस कशावरून?"

"जास्त आवाज करतो लेकाचा!" असे म्हणून त्याने मला जोराचा बुक्का मारला आणि खाली पाडले व तो बॅग घेऊन पळू लागला...

मी उठून त्यांचेकडे पाळायला लागलो. त्याला पकडलं आणि बॅग खाली ठेऊन त्या अंधाऱ्या पुलावर आमची जोरदार मारामारी जुंपली...

मी भारी पडतोय हे पाहून त्याने मला पायांच्या बुटाचा जोरदार तडाखा दिला...

त्या तडाख्याने तोल जाऊन कमी उंचीच्या कठड्यातून रेल्वे रुळांवर खाली पडायला लागलो....

तो तडाखा वाचवायला मी चपळाईच्या सूचना त्या पुलावरच्या "मी" ला दिल्या पण त्याला तितक्या वेगाने हालचाल करणं शक्य झालं नाही...

नाही!! मला हे असे अपेक्षित नव्हते!!

मी आता पुन्हा मागे वळून लॉजवरच्या खोलीत परत जायला हवे नाहीतर माझा खेळ इथेच खलास!! मी जर धूसर प्रकाशातल्या भूतकाळातल्या मला रुळांवर पडू दिले तर मी ट्रेनखाली येऊन मरेन! ट्रेन समोर दिसतच होती...

जास्त विचार करायची आता वेळ नाही...मी परत जायला हवे...

जास्तीत जास्त काय होईल?

पोलीस पकडतील!

पण मी मरणार तर नाही ना!

सिर सलामत तो, बचनेके तरिके पचास!!!

आणि हा सगळा विचार मी प्रचंड वेगाने काही सेकंदातच माझ्या मेंदूत केला होता आणि त्याच वेगाने मी पुन्हा मागे पळत जाऊन ते दार उघडले आणि लॉजवरच्या खोलीत पुन्हा येऊन पोहोचलो आणि कडी लावून टाकली! एकदाची! आणि सुटकेचा निश्वास टाकला....

घड्याळात अजून पावणेचार वाजले होते आणि पोलिसांच्या लॉजच्या दरवाज्यावर थपडा पडतच होत्या, शेवटी मीच जाऊन दरवाजा उघडला...

आनंदी चेहऱ्याने पोलिसांना सामोरा गेलो...मरण वाचल्याचा तो आनंद होता हे पोलिसांना काय माहिती बरं??

पोलिसांनी माझ्या मुसक्या आवळल्या, बेड्या घातल्या...दोनचार काठीचे दणके दिले...

आता मात्र मी घाबरून रडत, ओरडत होतो...

त्यांनी मला पोलीस व्हॅनमध्ये डांबले...

कोर्टात माझ्यावरचा गुन्हा सिद्ध झाला...

मी गुन्हे करून गाव सोडून पळून आलेलो असल्याने माझ्या अटकेबद्दल कळलं किंवा नाही कळलं तरी मला सोडवायला कुणीही येणार नव्हतं...

मला शेवटी एका कोठडीत टाकण्यात आलं...

खोलीत अनेक कैदी होते...

तिथे प्रवेश करताच एका दांगट राकट टकल्या गुंडांने दुसऱ्या गुंडाला विचारलं,

"कंचा अपराध केलाय रं या येड्यानं?"

"आरं, त्यानं एका माणसाला दिलंय ढकलून पुलावरून खाली, सरळ झुक झुक झुक झुक आगीन गाडी च्या चाकांखाली! त्या माणसाचं डोस्कं आनं शरीर अलगच झालं की राव!"

तेच संवाद, तेच प्रसंग जे मी दाराआडून लॉजच्या खोलीत ऐकले होते...

"आपल्यासोबत या 'काळ'कोठडीत जो कुनीबी पहिल्यांदा येतो तो आपल्या सर्वांच्या हातचा लई मार खातो, काय रं!"

"नाही हो, मला नका मारू. मी परिस्थितीमुळे गुन्हेगार झालोय. मी काही जन्मापासून गुन्हेगार नाही..आधीच मला पोलिसांनी भरपूर मारलंय, आता पुन्हा मार खाण्याची शक्ती नाही माझ्यात!"

ते सर्वजण कुत्सितपणे खदाखदा हसायला लागले.

"तू जन्मापासून गुन्हेगार नाय म्हणतो, मंग आम्ही जन्मापासून गुन्हेगार जन्मलो का काय? कपाळावर अपराधी असा शिक्का छापून आम्ही जनमलो हुतो काय रं?"

"नाही, तसं नाही हो पण..."

"ते काय नाय. पकड रे याला...दोन जण हात धरा, दोन जण पाय पकडा याचे! आणि आम्ही चौघे याला मग देतो चोप!"

ते सगळे कैदी मला मारायला धावले...

आणि मी वेड्यासारखं त्या कोठडीतील सगळ्या दगडी भिंती ठोठावून बघायला लागलो...कुठे ते लॉजचं दार दिसतं का ते शोधत राहिलो...जेणेकरून मला तो लॉजवर थांबलेला "पलीकडचा मी" सापडेल आणि मी त्याला खोलीचा दरवाजा उघडायला लावेल आणि सांगेल, "बाबा रे! कृपया भूतकाळात काहीही झालं तरी पुन्हा परत पळत जाऊन खोलीतून लॉजमध्ये जाऊ नकोस...आणि गेलास तरीसुद्धा पोलीस दार कितीही ठोठावू देत...उघडायचा नाही दरवाजा...!!"

आता रोज वेड्यासारखं मी त्या दगडी भिंतीवर माझ्या हाताच्या मुठी आपटत असतो आणि सगळे कैदी पोट धरून मला हसतात...माझे कपडे फाटलेले आणि मळलेले...

मला वेडा म्हणायला लागलेत ते...

नाही, मी वेडा नाही...

एक न एक दिवस मला तो दरवाजा नक्की सापडेल!!

आणि मला वाचवायला येईल तो - पलीकडचा मी!!

लेखक: निमिष सोनार, पुणे
sonar.nimish@gmail.com

("आरंभ" च्या २०१८ च्या दिवाळी अंकात ही कथा प्रसिद्ध झाली आहे)

आरंभ दिवाळी अंक येथून डाऊनलोड करू शकता:
https://drive.google.com/open?id=1Z1VLFmq9i7XoZ6mWErTG0yOOPOuJCoWL