Get it on Google Play
Download on the App Store

शेळी, करडू आणि लांडगा


एक शेळी सकाळी उठून चरण्यासाठी रानात जाण्यास निघाली. त्यावेळी ती आपल्या करडास म्हणाली, "बाळ, आपल्या खोपटाचे दार आतून लावून घे.' सगळ्या लांडग्याचा सत्यानाश होवो' असे शब्द जो उच्चारील त्यासच आत घे, इतरांस दार उघडू नको.' हे भाषण एका लांडग्याने आडून ऐकले आणि शेळी बाहेर जाताच, खोपट्याच्या दारापाशी येऊन तो म्हणाला, "सगळ्या लांडग्यांचा सत्यानाश होवो' शेळीने सांगितलेले शब्द उच्चारताच करडू दार उघडील असे त्यास वाटले होते, पण त्या करडास त्याचा शब्द ऐकून संशय आल्यामुळे, त्याने दार उघडले नाही. ते लांडग्यास म्हणाले, "तू जर बोकड आहेस, तर तुला दाढी कशी नाही?' हा प्रश्न ऐकून लांडगा ओशाळला आणि निमूटपणे चालता झाला.

तात्पर्य : फसवेगिरी करणाऱ्या माणसासंबंधात शक्य तितकी सावधगिरी ठेवावी.