तीन माशांची गोष्ट
स्वच्छ पाणी असलेल्या एका तळ्याचा एक पाट एका नदीला मिळाला होता. त्या तळ्यात तीन मासे होते. त्यांपैकी एक मासा दूरदर्शी होता, दुसरा शहाणा व तिसरा अगदीच मुर्ख होता. एके दिवशी दोन कोळी त्या तळ्याजवळ आले व आत पाहात असता त्यांना ते तीन लठ्ठ मासे दिसले. तेव्हा त्यांना धरण्यासाठी ते आपली जाळी आणायला गेले. त्या कोळ्यांचा बेत त्या माशांच्या लक्षात येताच ते बिचारे भिऊन गेले. त्यांपैकी जो दूरदर्शी मासा होता तो पाटातून पळून जाऊन नदीत शिरला. थोड्या वेळाने ते कोळी आले व माशांनी पाटातून पळून जाऊ नये म्हणून त्यांनी पाटाचे तोंड बंद केले. ते पाहून त्या शहाण्या माशास आपण पळून न गेल्याबद्दल पश्चात्ताप झाला. पण तितक्यात त्याला एक युक्ती सुचली. मेल्यासारखा उताणा होऊन तो पाण्यावर तरंगू लागला. कोळ्यांनी त्याला वर काढले व तो मेला असे समजून त्याला पुन्हा पाण्यात फेकून दिले. तिसरा मूर्ख मासा पाण्याच्या तळाशी जाऊन इकडूनतिकडे पळत राहिला व शेवटी बिचारा त्या जाळ्यात सापडून कोळ्याच्या हाती सापडला.
तात्पर्य - एखादे संकट येणार असे दिसताच त्याच्या प्रतिकाराची तयारी न करणे मूर्खपणाचे आहे.