नियत
एका ब्राह्मणाने एका शेठकडे एक हजार रुपये ठेवायला दिले. या गोष्टीला काही वर्षे उलटून गेली. एकदा ब्राह्मणाला पैशांची गरज लागली तेंव्हा त्याने ते शेठजीकडे परत मागितले तेंव्हा शेठजीने त्याला ते परत करण्यास नकार दिला. कारण शेठजीची नियत बदलली होती. तसेच पैसे ठेवल्याचा कोणताही पुरावा नव्हता. ब्राह्मण त्रस्त होवून राजाकडे दाद मागण्यास गेला. राजाही हि विचित्र परिस्थिती पाहून संभ्रमात पडला. मात्र शेठजीकडून पैसे परत मिळवण्यासाठी राजाने एक युक्ती आखली. राजाने नगरात शोभायात्रा काढायची घोषणा केली. जेंव्हा शोभायात्रा शेठजीच्या घरासमोरून चालली तेंव्हा राजाने ब्राह्मणाला आपले गुरुदेव म्हणून आपल्याजवळ बसविले. शेठजीने हे पाहून विचार केला कि हा ब्राह्मण तर राजाचा गुरु आहे. राजा याच्या ऐकण्यात असेल तर आणि याने राजाला त्या एक हजार रुपयांबद्दल सांगितले तर राजा मला माझ्या खोटेपणाबद्दल दंड केल्याशिवाय राहणार नाही. यातून वाचण्यासाठी मी ब्राह्मणाचे पैसे परत केलेले बरे. शोभायात्रा संपताच शेठजीने एक हजार रुपये ब्राह्मणाच्या घरी पोहोच केले. यामुळे ब्राह्मणाला खूप आनंद झाला. राजाच्या हुशारीमुळेच त्याला त्याचे पैसेच नाही तर योग्य सन्मानही मिळाला.
तात्पर्य - जीवनात कधी कधी असेही होते कि आपल्याजवळ खरेपणाचा पुरावा नसतो तेंव्हा हुशारीनेच सत्य जगासमोर आणावे लागते.