या देवळात असलेल्या गणपतीच्या मूर्तीचा इतिहास
सन १८९३
श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची रहावयाची इमारत होती. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले. दरम्यानच्या काळात त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की, आपण काही काळजी करू नका, आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा व त्यांची रोज पूजा करा. ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्ज्वल करतील. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मुर्ती बनवून घेतली. ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, श्री. मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, रामाराव बुटलेर, गणपतराव विठूजी शिंदे, सरदार परांजपे, शिवरामपंत परांजपे, गोपाळराव रायकर, नारायणराव दरोडे यांसह सर्व थरांतील लोकांनी या समारंभाला हजेरी लावली होती. गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारूती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्य नियमाने पूजा चालू असते.
सन १८९६
सन १८९४ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली. सन १८९६ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला. दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतु त्यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी व तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली. त्याकाळी हा गणपती बाहुलीच्या हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून प्ळ्खला जात होता. या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरुण मंडळ करीत होते. सध्या ही मूर्ती आपल्या कोंढवा येथील बाबुराव गोडसे पिताश्री वृद्धाश्रमातील मंदिरात आहे.
सन १९६८
सन १८९६ साली बनवलेल्या मुर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती. त्यामुळे सन १९६७ साली आपल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त तत्कालीन सुवर्णयुग तरूण मंडळाच्या प्रताप गोडसे, माणिकराव चव्हाण, दिंगबर रासने, रघुनाथ केदारी, शंकर सुर्यवंशी, चंद्रकांत दरोडे, उमाजी केदारी, प्रल्हादशेठ शर्मा, रमाकांत मारणे, वसंत कोद्रे, कांता रासने, दत्तात्रय केदारी, उल्हास शेडगे, उत्तम गावडे इत्यादी कार्यकर्त्यांनी गणपतीची नवीन मुर्तीं बनविण्याचा संकल्प केला व त्यासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार श्री. शिल्पी यांना पाचारण केले. त्यांच्याकडून लहान मातीची मूर्ती नमुना म्हणून करून घेतली. बाळासाहेब परांजपे यांनी कार्यकर्त्यांना ती मूर्ती प्रोजेक्टरवरून मोठया पडद्यावर दाखविली व सर्वानुमते ती आधीच्या मूर्तीसारखी असल्याची खात्री पटल्यानंतर मोठया मूर्तींचे काम प्रत्यक्षात सुरू झाले. पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर श्री. शिल्पी यांनी त्याकाळी जे ग्रहण झाले त्या दिवशी संगम घाटावर ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली,. गणेश यंत्राची पूजा केली व त्यानंतर ज्या ठिकाणी मातीची मूर्ती तयार केली होती, त्याच ठिकाणी येऊन विधिवत धार्मिक गणेश याग केला, व त्यानंतर ते सिद्ध श्रीयंत्र मंगलमूर्तीच्या पोटामध्ये सर्वांसमक्ष ठेवले. शिल्पी यांनी जमलेल्या लोकांना या मंगलमूर्तीची तुम्ही सर्वांनी दररोज नित्य नियमाने पूजा करा व त्याचे शेवटपर्यंत पावित्र्य राखा असे सांगितले. त्याकाळी ही मूर्ती बनविण्याचा खर्च सुमारे ११२५/- (एक हजार एकशे पंचवीस रुपये) इतका आला होता.