Get it on Google Play
Download on the App Store

शिक्षकांचा सन्मानाचा दिवस

शिक्षक दिन जवळ आले की आपल्या सर्वाना आपणास शिकविलेल्या शिक्षकांची आठवण येते. समाजतील प्रत्येक व्यक्ती या दिवशी शिक्षकांचा मान सन्मान करतो. प्रत्येकाचा एक दिवस ठरलेला असतो त्याप्रमाणे शिक्षक मंडळी साठी 5 सप्टेंबर हा दिवस भारताचे दूसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षकी पेशेपासून आपल्या जीवनाला सुरुवात करणारे राधाकृष्णन् भारताच्या सर्वोच्च अश्या राष्ट्रपती पदापर्यन्त पोहोचले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक शिक्षकानी  राहावे, आचरण करावे, दिशाभूल होणाऱ्या शिक्षकांना परत रस्ता मिळावा यासाठी हा दिवस शिक्षक बांधवासाठी अत्यंत महत्वाचे आहे. तसे पाहिले तर शिक्षकासाठी सर्वच दिवस महत्वाचे आहेत. रोजच त्यांचा संबंध सजीव असणाऱ्या मुलांशी येतो. त्यामुळे त्यांना रोजच जिवंत वेगवेगळे अनुभव येतात. शेतकरी आपल्या शेतातील, घरातील आणि बाहेरील भरपूर कामे वर्षभर बैलाकडून करवुन घेतो त्याबदल्यात पोळ्याला त्याला सजवुन धजवून त्याला गोड धोड खाऊ घालून पूजा अर्चा केली जाते असाच काही प्रकार शिक्षक मित्राच्या बाबतीत घडते असे मनात नेहमी शंका डोकावत असते. फक्त आजच का म्हणून सन्मान करायचा ? वर्षभरात असे अनेक दिवस किंवा महत्वाचे दिन आहेत ज्यावेळी शिक्षक मित्राचा सन्मान करता येतो. मुलींच्या शिक्षणाची ज्योत पेटविणारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म दिनी राज्यातील तमाम महिला शिक्षिकाचा गौरव गाव स्तरा पासून देश स्तरा पर्यन्त केला जावा. मुलीसाठी पहिली शाळा उघडणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी राज्यातील उत्कृष्ट शिक्षण प्रणालीत काम करणाऱ्या शिक्षका पासून तर अधिकारी मंडळी पर्यन्त सत्कार करावा. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या दिवशी तरुण तडफदार युवक शिक्षकाचा सन्मान करावा. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दिवशी फक्त ध्वजारोहण न करता शाळेतील उत्कृष्ट शिक्षकांचा गौरव सर्वा समक्ष करावा. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर उत्तम संस्कार केले म्हणून स्वराज्य निर्मितीची कल्पना सत्यात साकारण्यात आली. त्यांच्या जयंती निमित्त समाजातील अश्या थोर माता जे की शिक्षिका आहेत आणि त्यांचे पाल्य जीवनात यशस्वी झाले आहेत अश्याचा सत्कार करणे आवश्यक आहे. ज्यांच्या अंगी नेतृत्व गुण चांगले आहेत असे शाळा प्रमुख मुख्यध्यापकाचाही सन्मान भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनी करण्यात आल्यास यथोचित होईल असे वाटते. काही वेळा शाळेत विविध स्पर्धाच्या माध्यमातून विद्यार्थी तालुका, जिल्हा, विभाग, राज्य किंवा देश स्तरावर चमकतात तेंव्हा विद्यार्थ्या सोबत मार्गदर्शक असलेल्या शिक्षकाचा ही गौरव केले तर चांगले प्रोत्साहन मिळेल. सोशल मिडियात वाचण्यात आले की पाच सप्टेंबरला शिक्षक दिन का साजरा करायचा आम्ही, त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोलाची अशी काय कामगिरी केली त्यापेक्षा महात्मा फुले यांच्या जयंती दिनी हा दिवस साजरा केला जावा ह्या मतप्रवाह मध्ये बरीच मंडळी दिसून येतात. अशा आणि इतर मत असणाऱ्या लोकांसाठी वरील पर्याय सर्वोत्तम आहे असे वाटते. एखादे दिवस साजरे करीत असताना त्या दिवसामागची संकल्पना स्पष्ट करून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. मात्र समाजात शिक्षकांना आजच्या 5 सप्टेंबर चा दिवस सोडला तर बाकीच्या दिवशी फारच विचित्र अनुभव येतो त्याचा कुठे तरी विचार व्हायला हवा.

शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. आरश्यावर धूळ साचली असेल तर त्यातील प्रतिमा स्पष्ट न दिसता धूसर दिसते आणि त्यावरील धूळ साफ केल्यावर अगदी स्पष्ट दिसते. असेच काही काम शिक्षक मंडळीचे आहे. गावातील अनाड़ी, अनपढ आणि अज्ञान अश्या लोकांना साक्षर करणे हे शिक्षकांचे काम आहे. शाळेतील मुलांना अक्षर व अंक ज्ञान दिले तर भविष्यात ही मुले जेव्हा भारताचे नागरिक होतील त्यावेळी त्यांच्यावर अनाड़ी, अनपढ आणि अज्ञान हा ठपका लागू नये याची काळजी प्रत्येक शिक्षकांने घ्यावे यात गैर काही नाही. मात्र ही भावना व्यक्त करताना परिस्थिती आणि उपलब्धता या गोष्टीचा ही विचार करायला हवा. मात्र समाजात या बाबीचा विचार न करता शिक्षक मंडळीना दोष दिले जाते, मुलाच्या अपयशाचे खापर शिक्षकांच्या डोक्यावर फोडले जाते. कदाचित काही ठिकाणी काही अंशी शिक्षक जबाबदार असतील ही पण त्यावरुन सर्व शिक्षक एकाच माळेचे म्हणी समजणे योग्य आहे का ? गव्हासोबत कीडे रगडण्याची ही प्रक्रिया समाजतील होतकरु आणि उपक्रमशील शिक्षकांना घातक आहे. त्यामुळे त्यांच्या मनात निरुत्साह आणि नाउमेदपणा तयार होतो. काम करणाऱ्या शिक्षकावर कौतुकाची एक थाप पुरेसे असते, कसल्याही प्रकारचे नियम किंवा बंधन नसताना ही मग तो मन लावून काम करू शकतो. पण याच ठिकाणी कमतरता जाणवते. शाळेत येणारा अधिकारी, पदाधिकारी किंवा अन्य कोणी त्यांच्यावर कौतुकाची थाप तर दूरची गोष्ट साधी त्यांची प्रेमळपणाने विचारपुस देखील करत नाही. त्यामुळे शिक्षक नाराज होतात निराश होतात. समाजात एक नियम आहे , जो करतो तो चुकतो. जो करतो त्यालाच इतर लोकांचे बोलणे खावे लागते. जो काहीच करत नाही त्याला कोणी काहीच करत नाही "जाऊ दया हो त्यांच्या मागे लागून काही फायदा नाही तो जन्मात कधी काही केला नाही तो आज काय करेल ? " असे म्हणून काम न करणाऱ्याच्या मागे कोणी लागत नाही ही सत्य परिस्थिती आहे. इथे शिक्षक मंडळीच्या बाबतीत ही असेच घडत असताना दिसत आहे. मन लावून , जीव आतून शिकविणाऱ्या शिक्षकला कधी ही मान सन्मान मिळत नाही आणि हातात खडू न धरलेल्या शिक्षकास भारताच्या राष्ट्रपतीच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार, राज्य पुरस्कार किंवा जिल्हा पुरस्कार दिला जातो. ही शिक्षण प्रणालीत असलेली फार मोठी शोकांतिका आहे. पुरस्कार मिळविण्यासाठी भरपूर अटी ची पूर्तता करावी लागते. एखादा नविन शिक्षक मुलांना खूप छान अध्यापन करीत असेल तरी त्यास तालुका स्तरीय पुरस्कार सुद्धा दिल्या जात नाही. पुरस्कार मागून घ्यावा लागतो. मी अमुक वर्षे सेवा केली असून अमुक सामाजिक, शैक्षणिक कार्य केले आहे त्यामुळे यावर्षीचा पुरस्कार मलाच द्यावे अशी याचना करावी लागते. वेळप्रसंगी शिफारस लावावी लागते आणि शेवटी धनलक्ष्मीचा ही वापर करावा लागतो. मला सांगा त्या पुरस्काराला काही महत्व आहे का ? माझा एक शिक्षक मित्र याच धोरणामुळे पुरस्कारापासुन दूर आहे. त्याचे म्हणणे असते की माझ्या नावाची शिफारस माझ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी केली तर मला पुरस्कार घेताना खूप आनंद होईल. त्याही पेक्षा माझी मुले मला हसत हसत नमस्कार करतात आणि भविष्यात ते मला विसरणार नाहीत हेच माझ्या साठी पदक आहे व पुरस्कार पण. खरोखर जे शिक्षक विद्यार्थी हेच दौलत आणि सर्व काही मानतात त्यांना कोणत्या पुरस्काराची किंवा पदकाची गरज आहे का ? मला पुरस्कार दया म्हणून याचना करणारी पद्धत भविष्यात बंद होईल असा विश्वास यावर्षीच्या ऑनलाइन पुरस्कार नोंदणी मुळे होईल असे वाटते. आजचे पाऊल भविष्यात नक्कीच आशादायी चित्र तयार करेल असा विश्वास ठेवण्यास काही हरकत नाही. समाजाचा ही शिक्षकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने आज सकारात्मक विचारधारा चालू आहे ती अंखड़ित रहावी.

स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्य नंतर जर शाळा आणि शिक्षक या दोन बाबीचा आपण विचार केलो तर आजचे शिक्षक सर्व बाबतीत समाधानी आहेत. त्यांना कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही, उणीव नाही. दळणवळणच्या सुविधेमुळे आज शिक्षकास कोणत्याच गोष्टीचा त्रास होत नाही तरी शाळेतील गुणवत्ता म्हणावी तशी का नाही ? याचे कारण शोधण्यासाठी संशोधनच करावे लागते. त्यातील काही महत्वाचे मुद्दे म्हणजे आज शिक्षक हा पेशा नसून तो एक व्यवसाय बनला आहे. सन 1990 ते 1998 या काळात शिक्षक होणाऱ्या लोकांकडे वेगळ्याच नजरेने पाहिले जायचे. मागता येईना भीक तर मास्तरकी शीक असे याबाबतीत बोलले जायचे. त्यानंतरच्या काळात मात्र हा झटपट नोकरी आणि भरपूर पगार यामुळे प्रत्येक जण याक्षेत्राकडे आकर्षिले गेले , आणि या क्षेत्रात आमुलाग्र बदल होत गेला. आज भावी शिक्षक होण्यासाठी लाखों मुले गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र सरकार गेल्या पाच सहा वर्षापासुन शिक्षक भरती बंद केल्यामुळे डी टी एड धारक मुलांची ससेहोलपटचालू आहे. शिक्षक होण्यासाठी लाखों मुले तयार आहेत, समाजात आज ते जरी शिक्षक नसतील म्हणून काय झाले ते सुद्धा खाजगी शिकवणी किंवा इतर काही माध्यमातून शिकविण्याचे काम करीत आहेत त्यांचा ही कुठे तरी मान सन्मान होणे आवश्यक आहे. पुरस्काराने माणसाला स्फूर्ती मिळते, चेतना मिळते, आणि त्यांच्यात ऊर्जा तयार होते. त्यामुळे लहान वयात पुरस्कार द्यावे की सेवानिवृत्ती जवळ आलेल्या व्यक्तीला द्यावे हा विचार करण्यासारखा प्रश्नांची सोडवणूक करावी एवढी अपेक्षा आजच्या शिक्षक दिनानिमित्त व्यक्त करावे वाटते.

  - नागोराव सा.येवतीकर
    मु. येवती ता. धर्माबाद
    09423625769

शिक्षक दिन

Nagorao Yeotikar
Chapters
शिक्षकांचा सन्मानाचा दिवस