"श्री कृष्ण जन्माचा पाळणा "
(कविवर्य दामोदर अण्णा शेवलीकर चांदोरी.)
पहिल्या दिवशी कृष्ण जन्मला ॥
बंदीखाण्यामधे प्रकाश झाला ॥
माय पित्याला सुख देण्याला ॥
बंद मुक्त देव गोकुळी आला॥
जो बाळा जो जो रे जो ......
दुस-या दिवशी करूनी दंग ॥
माय पित्याचे फेडीले पांग ॥
माया गर्जुनी कंसाला सांग॥
वैरी नांदतो देव अभंग ॥
जो बाळा.........
तिस-या दिवशी यशोदा नंद ॥
गर्ग भविष्य ऐकूनी दंग ॥
माबळ भटाचे दुखविले अंग ॥
पुतणा मावशी केली दुभंग ॥
जो बाळा ........
चवथ्या दिवशी आनंद भारी एकमेकींना सांगती नारी ॥
वाणे घेऊन आल्या यशोदा घरी ॥ सुंठवडा वाटती आनंद भरी ॥
जो बाळा.........
पाचव्या दिवशी वेढिला वाडा ॥ आल्या गोपीका रांगोळी काढा ॥
निंब नारळ वाहती विडा ॥
तान्ह्या बाळाची दृष्ट ही काढा ॥
जो बाळा ......
सहाव्या दिवशी वर्णीती थोरी ॥
वेद ब्राह्मण पढताती घरी ॥
ऋषी पुराण गर्जती भेरी ॥
सावळे रूप वेढिला हरी ॥
जो बाळा .......
सातव्या दिवशी रत्न अमोल ॥
मंडप घातला करवेना मोल ॥
कृष्ण बाळाला शोभती बाल ॥
यशोदा मांडीवर घेवुनी डोल ॥
जो बाळा ......
आठव्या दिवशी करीतो लीला ॥
गोपगोपीका आनंद झाला ॥
जागृती शुसुप्ती आठवी देवाला ॥
धन्य जन्म त्याचा सफल झाला ॥
जो बाळा......
नवव्या दिवशी घेतला छंद ॥
फुंद फुंदोनी रडे मुकुंद ॥
राज मंदिरी होतो आनंद ॥
अनंत रूपे दावे गोविंद ॥
जो बाळा......
दहाव्या दिवशी दाही दिशाला ॥
मात कळली सर्व जगाला ॥
धाक पडला कंस राजाला ॥
आनंद झाला भक्त जनाला ॥
जो बाळा.....
अकराव्या दिवशी नारद आला ॥
म्हणे पृथ्वीवर बहु भार झाला ॥
दैत्य मर्दाया ईश्वर आला ॥
गुढया तोरणे उभारू चला ॥
जो बाळा......
बाराव्या दिवशी मोठा सोहळा ॥
बारा सोळा नारी होवूनी गोळा ॥
चौदा चौसष्ट केला गलबला ॥
रेशमाची दोरी हलवा कान्हाला ॥
जो बाळा......
तेराव्या दिवशी गाताती नारी ॥
कृष्ण दामोदर शाम मुरारी ॥
दोन तीन चार वर्णीती थोरी ॥
हलवा सयांनो नंदाचा हरी ॥
जो बाळा........
चौदाव्या दिवशी मोठी गर्जना ॥
कंस कुळाचा करील घाना ॥
साधु संतांच्या आला रक्षणा ॥
हलवा सयांनो कैवल्य राणा ॥
जो बाळा .......
पंधराव्या दिवशी नौबत वाजे ॥
कृष्ण वासुदेव नाम हे साजे ॥
देव अवतरले भक्तांचे काजे ॥
घ्या गे बायांनो बाळ हे माझे ॥
जो बाळा.....
सोळावे दिवशी सोहळा केला ॥
गर्ग भविष्य अनुभवाला ॥
चकोर दासाने पाळणा गाईला ॥
वाक् पुष्प हे अर्पु देवाला ॥
जो बाळा जो जो रे जो .
दंडवत प्रणाम