Get it on Google Play
Download on the App Store

प्रस्तावना

हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला रक्षाबंधन म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो..हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. श्रावण पोर्णिमेस राखी बांधावी, असे धर्मशास्त्रात म्हटले आहे. या विधीस 'पवित्रारोपण' असेही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते.

उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो अशी कामना करतात. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे. राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्परप्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे.

काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना, आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते. आपल्यापेक्षा बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना आहे.भारतीय समाजात ऐक्‍य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण रजपूत लोकांत रूढ झाला. आजकाल मात्र बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा सण साजरा होतो. या दिवशी बहिणी आपल्या सख्ख्या भावाच्या हातावर राखी बांधतातच आणि शिवाय त्या बंधुत्वसमान नाते असलेल्या व्यक्तीसही राखी बांधतात.