गणपतीची जन्मकथा
एकदा पार्वती मातेस स्नान करण्यास जावयाचे असताना बाहेर कोणीच राहण्याकरता नसल्यामुळे तिने मातीची मूर्ती करून ती जिवंत केली व पहारेकरी नेमून कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नको असे सांगून पार्वतीमाता स्नानास निघून गेली.
काही वेळाने भगवान शंकर तिथे आले व आत जाऊ लागले. पहारेकर्याने त्यांना रोखले. भगवान शंकर संतप्त होऊन त्यांनी पहारेकर्याचे शिरच उडवले.
पार्वतीमाता स्नान करून परत आल्यावर पहारेकर्याला मारलेले पाहून अतिशय संतापली. तेव्हा शंकरांनी आपल्या गण नावाच्या शिष्याला बाहेर जाऊन जो कोणी भेटेल त्या प्राण्याचे डोके कापून घेऊन ये असा आदेश दिला. गण बाहेर पडल्यावर त्याला एक हत्ती दिसला. त्याचे मस्तक कापून तो घेऊन आला. भगवान शंकरांनी ते मस्तक पुतळयाला लावले व जिवंत केले. हा पार्वतीमातेचा मानस पुत्र गज (हत्ती) आनन (मुख) असलेला गजानन होय. भगवान शंकराच्या गणाचा ईश म्हणजे परमेश्वर म्हणून गणेश हे नाव ठेवले. हा दिवस चतुर्थीचा होता. त्यामुळे चतुर्थीस गणेश चतुर्थी म्हणून महत्त्व आहे.
या दिवशी भक्तगण श्रीगणेशाची पूजा, प्रार्थना व तसेच उपवास करून भक्ती करतात. भाद्रपद चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात फार मोठा उत्सव साजरा होत असतो. श्रीगणेशाचे वास्तव्य या काळात मानण्यात येऊन गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली. गणेशाच्या अवतारांपैकी गुणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी व्रत- गाणपत्य संप्रदायाचे हे एक महत्वाचे व्रत आहे. श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी या असे महिनाभर करायचे हे व्रत आहे. नदीकिनारी जावून, स्नान करून मातीची आपल्या हाताच्या अंगठ्याएवढी गणेशमूर्ती हातावरच तयार करावी. तिचे सोळा उपचारांनी पूजन करून ती लगेच नदीतच विसर्जन करावी असे हे व्रत आहे. याला पार्थिव गणेश व्रत म्हणतात. महिनाभर जमले नाही तर किमान शेवटच्या दिवशी तरी पार्थिव मूर्तीची पूजा करावी अशी यामागे धारणा आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला महासिद्धीविनायकी चतुर्थी किंवा शिवा असेही म्हणतात. गणपती ही संघटनेची देवता आहे.ऋग्वेदात ब्रहमणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. या देवतेचा विकास होवून पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते.