Get it on Google Play
Download on the App Store

राखी पौर्णिमा

लहानपणी ज्याच्या हातात मोठी राखी तो भारी असा काहीसा समज होता. त्या मोठ्या राखीला कमीत कमी तीन ते चार कुशनच्या चकत्या असत आणि प्रत्येक चकतीनंतर एक चंदेरी गोलाकार कागद. सगळ्यात वरच्या चकतीवर एखादे स्वस्तिक, ओम, देवाचं चित्र किंवा अजून काहीस भक्तीमय लिहिलेलं असायचं. गावातले पुढारी लोक किंवा प्रतिष्ठित लोक हातात अशा मोठाल्या राख्या बांधून मोठ्या ऐटीनं स्टॅण्डवर किंवा बाजारपेठेतून मिरवायचे. हातात किमान आठ दहा राख्या बांधून घेतल्याने मनगटापर्यंत पार्किंग फुल झालेले असायचे. कपाळावर सुद्धा आठ दहा गंध उमटवले गेल्यामुळे आणि त्यातूनही प्रत्येकीने आपलाच गंध इतरांहून वेगळा व उठून दिसावा अशा हेतूने ओढल्यामुळे कपाळावरती गंधाऐवजी चांगला कुंकवाचा मळवट भरल्यासारखे दिसायचे. त्यात अधूनमधून चिकटलेल्या अक्षता तो धिप्पाड देह रस्त्यावरून चालू लागला कि बसणाऱ्या हादऱ्यांमुळे एकेक करून कपाळाची साथ सोडून त्या हत्तीच्या सॉरी हस्तीच्या पायी यायच्या. 


आमच्या शाळेत एक बरं होत; वरच्या वर्गातल्या मुली खालच्या वर्गाला राखी बांधायच्या आणि खालच्या वर्गातल्या मुली वरच्या वर्गाला .. त्यामुळं वर्गातलं प्रेम राखी पौर्णिमेला अभंग राहायचं ; ते कालांतराने शकलं होऊन डोळ्यादेखत  वरात होऊन भरल्या मांडवातून गाव सोडून जायचं ते वेगळं. ... आणि आपल्याहून अचाट लहान मुलाशी किंवा मुलीशी संधान बांधू पाहणारा सैफ अली आणि अमृता सिंग दोन्ही आमच्याकडे नसल्याने शाळेतल्या रक्षाबंधनाला प्रेमभंगाचं गालबोट लागायचं नाही. 

ओवाळणी म्हणून टाकायला वडील माणसे दोन पाच रुपये द्यायचे; त्याहून जास्त कधी आम्ही मागितले नाहीत ना कधी भगिनी वर्गाला त्याहून जास्तीची अपेक्षा होती. गावात मात्र लगबग असायची. साड्यांच्या दुकानात दहा वीस बाया आणि त्यांचे भाऊ ठाण  मांडून बसलेले दिसायचे  थोडी नाजूक परिस्थिती आहे तो भाऊ नुसताच पीस घालायचा आणि जो त्यातल्या त्यात तालेवार असायचा तो बहिणीसाठी लुगडं घ्यायचा. मग ती बहिणपण आपल्या भावाचा अभिमान डोळ्यात साठवून त्यातल्या त्यात बरं दिसेल ते लुगडं निवडायची आणि मग भाऊ आता बास म्हणेस्तो घासाघीस करून त्या दुकानदाराला फेस आणायची. घरी आल्याआल्या ते नवीन लुगडं नेसून साऱ्या गल्लीला सांगितलं जायचं कि भावाने घेतलंय .. फॉल , पिको , मॅचिंग ब्लाउज ही जळमटं अजून त्या काळच्या निर्व्याज प्रेमाच्या भिंतींना चिकटली नव्हती. 


गावात अजून मिठाईची दुकाने आलेली नव्हती. राखी बांधताना भावाच्या तोंडात बुचकुली भरून साखर तरी कोंबली जायची नाहीतर त्या साखरेतहून गोड असणारा गावच्या एकमेव हॉटेलातला खास सणासाठी आणलेला पेढा तरी असायचा. पण अजून डायबेटीस नावाचा श्रीमंत रोग गावच्या वेशीने आत येऊ दिला नव्हता त्यामुळे कुठलाच भाऊ त्या साखरेच्या बुचकुलीला नाही म्हणायचा नाही. जेवणाला पुरणाची भरपूर पुरण घातलेली पोळी आणि गुळाचे गुळवणी, कटाची आमटी ,रेशनच्या तांदळाचा भात , कुरडया , पापड आणि जेमतेम तेलात तळले गेल्याने आतलं पीठ खाताना जाणवणारे भजी .. उन्हातान्हात शेतात राबणारा रांगडा भाऊ दोन तीन पोळ्या सहज फस्त करून वर दोन चार वाट्या कटाच्या आमटीच्या भुर्र भुर्र आवाज करून प्यायचा आणि त्याला मध्येच एखादा ठसका लागायचा तेव्हा पाणी मात्र तिच्या डोळ्यात यायचं. जेवण करून भाऊ निरोप घेऊन जाताना त्याचा घसा जड व्हायचा , "येऊ का मी ?" असं तो दाजींना विचारून निघायचा तेव्हा काहीही न बोलता बहिणीची काळजी घ्या हे सांगणारे त्याचे डोळे सारं बोलून जायचे. 


चौकटीत उभी राहून भावाच्या पाठमोऱ्या देहाला हात करणारी बहीण आणि इच्छा असूनही पाठी फिरून तिला न पाहणारा भाऊ घरोघरी दिसायचे .... !