सौंदर्य
एक सुंदर तरुणी विमानात तिची सीट शोधत होती. तिनं पाहिलं की तिच्या सीटच्या बाजूला दोन हात नसलेली एक अपंग व्यक्ती बसली आहे. त्या व्यक्तीच्या शेजारी बसणं तिला प्रशस्त वाटलं नाही.
ती एअरहोस्टेसला म्हणाली, "मी ह्या दोन हात नसलेल्या माणसाच्या शेजारच्या सीटवर बसून सुखाने प्रवास करू शकणार नाही. मला अशी माणसं आवडत नाही. म्हणून मला सीट बदलून देण्यात यावी."
"मॅडम, इकॉनॉमी क्लासमध्ये एकही सीट रिकामी नाहीये. मी विमानाच्या कॅप्टनशी बोलून बघते. असं म्हणून एअरहोस्टेस निघून गेली.
थोड्यावेळाने एअरहोस्टेस आली आणि त्या सुंदर तरुणीला म्हणाली, "मॅडम, तुम्हाला होत असलेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. ह्या संपूर्ण विमानात प्रथम श्रेणीत एक जागा रिकामी आहे. मी माझ्या टीमशी बोलले. एका व्यक्तीला इकॉनॉमी वर्गातून प्रथमश्रेणी वर्गात बसवण्याची परवानगी आमच्या विमान कंपनीने दिली आहे.
त्या सुंदर तरुणीला खूप आनंद झाला, यावर ती काही बोलणार एवढ्यात एअरहोस्टेस त्या दोन हात नसलेल्या व्यक्तीजवळ गेली आणि त्याला विचारलं, "सर, आपण प्रथम श्रेणी वर्गात जाऊन बसाल का? एका शिष्टाचार नसलेल्या प्रवाश्याबरोबर आपण प्रवास करून कंटाळून जाऊ नये असं आम्हाला मनापासून वाटतं." यावर विमानातल्या सर्व प्रवाश्यांनी या निर्णयाचं टाळ्या वाजवून स्वागत केलं. ती सुंदर तरुणी शरमेने मान खाली घालून बसली.
ती अपंग व्यक्ती उठून उभी राहिली आणि म्हणाली, "मी एक माजी सैनिक आहे. एका ऑपरेशन दरम्यान काश्मीर सीमेवर एका बॉम्ब स्फोटात माझे दोन्ही हात गेले. सर्वात प्रथम जेंव्हा मी ह्या सुंदर महिलेचे वक्तव्य ऐकले तेंव्हा मी विचार करू लागलो, की कोणत्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी मी माझे प्राण संकटात टाकून दोन हात गमावले. पण तुमची प्रतिक्रिया ऐकल्यावर स्वतःचा अभिमान वाटू लागला की मी माझ्या देशासाठी, देशातील लोकांसाठी माझे दोन्ही हात गमावले." असं म्हणून तो अपंग सैनिक प्रथम श्रेणी वर्गात गेला. ती तरुणी शरमेने मान खाली घालून बसली.
जर विचारात उदारता नसेल तर अशा बाह्य सौंदर्याला काडीची देखील किंमत नसते हेच खरं
*