Get it on Google Play
Download on the App Store

कारगील युद्ध

कारगील युद्धादरम्यानची मुत्सद्देगिरी वाजपेयींच्या कणखरतेची साक्ष देणारी आहे. लाहोर भेटीत दोन देशादरम्यानचे संबंध सुधारण्यासाठी वाजपेयी प्रयत्‍न करत असतांना पाकिस्तान काश्मीरमध्ये घुसखोरी करत होता. हिवाळ्यात काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील अतिउंचावर असलेल्या चौक्यांवर उणे ५० अंशापर्यंत तापमान घसरत असल्याने दोन्ही देशांकडून त्या चौक्या खाली केल्या जात. उन्हाळा सुरू होताच दोन्ही देशाचे सैनिक परत चौक्यांवर रुजू होत. पण १९९९ च्या प्रारंभी पाकिस्तानने आपले सैनिक आणि अधिकारी दहशतवाद्यांच्या वेशात भारतीय रिकाम्या चौक्यांवर घुसवले. त्यांतल्या कित्येक सैनिकांकडे व अधिकाऱ्यांजवळ त्यांची पाकिस्तानी ओळखपत्रेही होती. तसेच सोबतीला काही भाडोत्री दहशतवादीही होते.


उन्हाळा सुरू होताच भारतीय सैन्याच्या ध्यानात ही बाब आली. आणि जून १९९९मध्ये ऑपरेशन विजय सुरू केले. भारतीय सैन्याला अतिदुर्गम प्रदेश, अतिउंच शिखरे, बोचरी थंडी यांचा सामना करावा लागला. तरी हवाई दल आणि भूदलाच्या एकत्रित कारवाईने पाकिस्तानच्या सैन्याचा पराभव दिसू लागला. नवाझ शरीफ यानी याही परिस्थितीचे भांडवल करून त्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप द्यायचा प्रयत्‍न केला. चीनला भेट देऊन त्यांनी मदतीची याचना केली. पण भारताने मोठ्या शिताफीने ऑपरेशन विजयची कारवाई नियंत्रण रेषेपर्यंतच मर्यादित ठेवली होती. भारताच्या पवित्र्यापुढे चीनने हस्तक्षेप नाकारला. नवाझ शरीफ यांनी मग अमेरिकेकडे मद्तीची याचना केली. तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी मध्यस्थीची तयारी दाखवत.वाजपेयींना चर्चेसाठी वॉशिंग्टनला बोलावले. पण वाजपेयींनी बाणेदारपणे हे निमंत्रण सरळ धुडकावून लावत नकार दिला. यामुळे अमेरिकेला जागतिक पोलीस समजण्याच्या प्रवृत्तीला सणसणीत उत्तर गेलेच पण काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा आणि तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप करवून शिमला करार मोडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्नही शिताफीने उधळला.